गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

*चारधाम पदभ्रमण यात्रा...*

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - ५*


गंगोत्रीला दुपारी बारा वाजता पोहोचलो. मला गोमुख आणि तपोवन हा ट्रेक करायचा होता. गोमुख हे गंगेचे उगमस्थान आहे, तर 
तपोवनला शिवलिंग शिखर, त्यांच्या पायथ्याशी मोठे पठार व ग्लेशियर आहे. त्याच्यासाठी परमिट ( परवाना) घेणे आवश्यक होते. ऑनलाइन परवानगीचा मार्ग अवलंबला असता असे लक्षात आले की, शासनाकडे अधिकृत नोंदणी असलेल्या  अशा ॲडव्हेंचर/ ट्रेकिंग कंपनीचे पत्र तुम्हाला त्या ऑनलाईन परमिशनसाठी आवश्यक असते. गंगोत्री बाजारात बराच वेळ चौकशी केल्यानंतर एका रिअल एडवेंचर नावाच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलो. त्या सद्गृहस्थाला  सगळी माहिती सांगितली. जाण्याचा एक दिवस दुसऱ्या दिवशी गोमुख, तपोवन व मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी परत येणे. याचा त्याने हिशेब केला.  रजिस्ट्रेशन फी दीडशे रुपये प्रत्येकी अधिक पत्र देण्याचे रु एक हजार, पोर्टर त्याचे एक हजार प्रति दिन, गाईड देणार होता त्याचे दोन हजार रुपये प्रतिदिन,  तंबू रु दोनशे प्रति दिन, स्लीपिंग बॅग रु शंभर प्रति दिन, झोपण्यासाठी मॅटिंगचे रु पन्नास प्रति दिन, आणि तीन दिवसांची खाद्यपदार्थ व स्टोव्हची व्यवस्था एवढ्या सगळ्याचे त्याने पंधरा हजार रुपये सांगितले. कमी करा म्हणून विनंती करूनही तो अडून बसला. तो फारच महागडा असल्यामुळे मी त्याचा नाद सोडून दिला व तेथून बाहेर पडलो. दुसऱ्या एका ॲडव्हेंचर एजन्सीकडे गेलो. त्याला आधार कार्ड दिले. तो मला उत्तर काशीहून परवानगी, सामान मागवायला लागेल वगैरे कारणे सांगू लागला. त्याचे दुकानाचे काम चालू होते. सिझन सुरू होत  असल्यामुळे दुकान दुरुस्त करणे या  गडबडीत तो होता. मी बाहेर  दुसरीकडे काही व्यवस्था होईल का याची चौकशी करत होतो. पण काही झाले नाही. शेवटी बसस्टँड शेजारील फॉरेस्ट ऑफिसमध्ये गेलो. इथून काही होणार नाही, तुम्हाला ऑनलाईनच परवानगी घ्यायला लागेल असे उत्तर मिळाले. आता तिथे ऑनलाइन परवानगी घ्यायची म्हणजे ऑनलाइन फॉर्म भरा, त्याला डॉक्युमेंट्स स्कॅन करून जोडा आणि पैसे कसे भरायचे, कारण कनेक्टिव्हिटी हा तिथे प्रॉब्लेम होता. मी बराच वेळ थांबल्यामुळे  शेवटी तिथल्या अधिकाऱ्याने सांगितले, आमच्या इथे काही होत नाही, तुम्ही वरती  राम मंदिरापाशी आमचे फॉरेस्ट ऑफिसर बसतात त्यांना भेटा. आम्हाला वाटले जवळ असेल. चालत निघालो. वाटेत एक जण पत्र्याच्या कुटीसमोर पहुडले होते. त्यांना फाॅरेस्ट ऑफिस कोठे आहे म्हणून विचारले. ते म्हणाले, फॉरेस्ट ऑफिस सरळ पुढे दोन किलोमीटरवर राम मंदिराच्या शेजारी आहे. पोटात गोळा आला. नुसती चौकशी करायला दोन किलोमीटर !!! ते ही चढाच्या रस्त्यावर !!! गरजवंताला अक्कल नसते. आम्ही पुढे  निघताना, थोडे बसा मी चहा देतो ते म्हणाले. परंतु आमच्या दृष्टीने परमिट घेणे हे जास्त महत्त्वाचे असल्यामुळे त्याचे आभार म्हणून आम्ही पुढे निघालो.   जवळजवळ पाऊण एक तास चालल्यानंतर वनखात्याच्या ऑफिस पाशी पोचलो. गंगोत्री दहा हजार फुटावर आहे.
अति उंचीवरील ठिकाणी  हवेत ऑक्सिजन कमी असतो, तसाच तो गंगोत्रीलाही होता.
 मी नुकताच गंगोत्रीला आल्यामुळे व त्या हवेचा सराव व्हायच्या आतच धावपळ करायला सुरुवात केल्यामुळे दम लागायला लागला. हळूहळू चालण्याशिवाय पर्याय नव्हता.  वनखात्याच्या ऑफिस मध्ये पोचल्यानंतर थोडावेळ बसलो. तिथल्या अधिकाऱ्यांची बोललो. मला इथून काहीच करता येणार नाही. तुम्हाला तपोवनसाठी सगळे ऑनलाईनच करावे लागेल. कारण ऑनलाइन अर्ज करताना ॲडव्हेंचर कंपनीचे पत्र हे आवश्यक आहे.  काय करावे मला समजेना. तेवढ्यात आठवले संजीवकुमार सेमवाल यांना फोन लावावा. 


पुण्याहून निघताना निवास व्यवस्थेसाठी गंगोत्रीतील भागीरथी सदनचे मालक आणि गंगोत्री मंदिरातील पुजारी संजीव कुमार सेमवाल यांच्याशी मी बोललो होतो. शेवटचा प्रयत्न त्यांची काही मदत होईल का पहावे म्हणून, त्यांना फोन लावला.  सुदैवाने त्या ठिकाणाहून त्यांना फोन लागला.  गेले अनेक दिवस त्यांचा फोनच लागत नव्हता. आज नशिबाने लागला. परमिटची अडचण आहे, तर तुम्ही अधिकाऱ्यांची बोलता का असे त्यांना म्हणालो.  ते फॉरेस्ट ऑफिसरशी बोलले.  संबंधित फाॅरेस्टरने उद्या सकाळी साडेसात वाजता या,  तुम्हाला परमिट देतो असे सांगितले. त्यांचे आभार मानले आणि पुन्हा चालत गंगोत्रीच्या निवासस्थानाच्या दिशेने कूच केले.

खाली येऊन पोर्टर शोधला. त्याचे गाईड वजा पोर्टर वजा स्वयंपाकी अशा सर्व कामांचे  पैसे ठरवले. त्याला ॲडव्हान्स दिला आणि शांतपणे भागीरथी सदनकडे निघालो. सगळ्यात चार तास गेले.
कमल साही हे पोर्टरचे नाव. तो नेपाळचा नागरिक. त्याचे वडील, चुलत भाऊ व इतर नातेवाईक उदरनिर्वाहासाठी गंगोत्रीत राहतात. सगळ्यांची कुटुंबे नेपाळमध्ये. गंगोत्रीत सर्व पोर्टर नेपाळी दिसून आले. पोर्टरला २५ किलो वजन वाहण्यासाठी रु १००० एवढा दररोजचा आकार द्यावा लागतो. ते जास्तीचीही मागणी करतात. गंगोत्रीहून निघाल्यापासून परत येईपर्यंतच्या सर्व दिवसांचे पैसे द्यावे लागतात. मला तीन दिवसांच्या गोमुख तपोवन ट्रेकसाठी एकूण रु १००००/- एवढा खर्च आला. मी एकटा असल्यामुळे खर्चीची विभागणी होऊ शकली नाही. अन्यथा ३-४ व्यक्तींच्या तीन दिवसांच्या ट्रेकसाठी सामान वाढले तरी , ते २५ किलोच्या आत असल्यामुळे परमिट खर्च वगळता एवढाच खर्च येऊ शकतो. 

गोमुख साठीचे ऑनलाईन परमिट काढताना, ॲडव्हेंचर/ ट्रेकिंग कंपनीचे पत्र तुम्हाला आवश्यक नाही, हे आम्हाला नंतर समजले. काही हुशार पोर्टर, ट्रेकर्सना फक्त गोमुखचे ऑनलाईन परमिट काढायला सांगतात. नंतर तेथे पोहोचल्यावर सकाळी कोणी उठायच्या आत गंगा नदी, ट्राॅलीतून किंवा पाण्यातून पार करतात आणि गोमुखच्या परमिटवर तपोवनला जातात. कोणाला या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही. आमच्या हुशार पोर्टरने आम्हाला हे काही सांगितले नाही.असो. नशीब आपले.

दरवर्षी एक मे नंतर परमिट गंगोत्री च्या बस स्टॅन्ड शेजारील ऑफिस मधून द्यायला सुरुवात होते ही परमिट फक्त गोमुख पर्यंतची दिली जातात. तपोवन चे परमिट हवे असल्यास ते ऑनलाईनच काढावे लागते.  परमिटचा शासकीय अर्ज भरून सोबत दीड ते दीडशे रुपये प्रति व्यक्ती भरून अर्ज करावा लागतो. या कामासाठी वनखात्याने सकाळी आठ ते दहा व सायंकाळी पाच ते सात एवढी वेळ उपलब्ध करून दिलेली आहे. त्या वेळेव्यतिरिक्त गेल्यास दुसऱ्या दिवशी परमिट मिळते. परमिट काढताना ओळख म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा शासकीय ओळखपत्र पाहून ते वनखात्याच्या ऑफिसमध्ये जमा करून घेतात. आपण परत आल्यानंतर ते ओळखपत्र परत मिळते. याव्यतिरिक्त शिवाय पाचशे रुपये डिपॉझिट घेतले जाते. आपण नेताना नोंदवलेल्या प्लास्टिकच्या वस्तू किंवा त्याची रॅपर्स परत आणलेली आहेत हे पाहून डिपाॅझिट परत केले जाते. परमिट हे फक्त दोन दिवसासाठी दिले जाते त्यापेक्षा जास्त राहिल्यास प्रतिदिन पन्नास रुपये एवढा आकार परत आल्यावर द्यावा लागतो

पोर्टर कमल साही ने किराणा माल, राॅकेल, तंबू, मॅट , घरचा स्टोन्स जमा केले व रूमवर आणून ठेवले. त्याला सकाळी ६.३० ला बोलावले. 

रात्री ट्रेकच्या विचाराने व अति थंड तापमानामुळे ( -१° ) नीट झोप लागली नाही. वनखात्याच्या गेटवर पोहोचलो. साहेब चक्क तयार होऊन बसले होते. मला आश्चर्य वाटले. नंतर साहेबांनीच कारण सांगितले. त्यांचे जिल्हा वनाधिकारी ( DFO ) आणि उत्तरकाशीचे रेंजर  दोघेही गोमुख व तपोवन भेटीवर आमच्या पाठोपाठ येणार होते. त्यांना माझ्याकडून नीट माहिती, वेस्ट कलेक्शन बॅग मिळाली असे साहेबांना आवर्जून सांगायला सांगितले. त्या बरोबर आमच्या तीन स्लीपिंग बॅग घेऊन जाण्याचे सांगितले होते. त्यांचे प्रति बॅग, प्रति दिन रु शंभर याप्रमाणे रु नऊशे त्याला द्यायचे होते. आम्हाला स्लीपिंग बॅगची गरज होती. त्यानेही मदत केल्याबद्दल हात मारला. एवढेच नव्हे तर आम्ही परत आल्यावर तो ऑफिसमध्ये हजर नव्हता. त्यामुळे स्लीपिंग बॅग चेक पैसे तेथील शिपायांकडे कसे द्यायचे याचा विचार आम्ही त्यावेळी दिले नाहीत. तर पठ्ठ्याने कमल ला फोन करून पैसे देण्याची सूचना केली...

सगळे सोपस्कार, स्लीपिंग बॅग भरून आम्ही आठ वाजता संस्मरणीय अशा गोमुख, तपोवन ट्रेकसाठी निघालो. सकाळ असल्याने चांगली थंडी होती. कानटोपी, ग्लोव्हज घालून चालत होतो. संपूर्ण गोमुख पर्यंत चढाचा रस्ता असणार होता. १०००० फुटापासून १३३०० फुटांपर्यंत जायचे होते. साहजिकच प्रत्येक पाऊल उर्ध्व दिशेने टाकत होतो. 

चि मिहिर, माझा मुलगा याच्या प्रोत्साहनामुळे मी गोमुख, तपोवन ट्रेकला निघालो होतो. हळूहळू चालावे लागत होते. मनाने तुम्ही कितीही तरूण असला तरी शरीराचे ऐकावे लागते... मनात खूप औत्सुक्य होते. काठीचा आधार, पाठीवर सॅक चढाचा रस्ता... कुठे मातीचा तर कुठे पडलेले दगड आच्छादून केलेला, कुठे पायऱ्या तर कुठे डोंगरावरून वाहात येणाऱ्या पाण्यातून... दहा पावले टाकली तर श्वास वाढायचा. थांबावेच लागायचे. सुरुवातीला अर्ध्या तासाच्या रस्त्यात मोबाईल चालू होते. नंतर आपण खरे संपर्कहीन होतो. हळूहळू आपण हिमालयाच्या कुशीत जातो मागचे सगळे विसरून आपली वाटचाल सुरू राहते. मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून आता आपल्याला जास्तीत जास्त वेळ बॅटरी टिकवायची असते. मोबाईलचा खरा उपयोग आता आपल्याला करता येणार असतो तो,  फोटो काढणे व्हिडिओ शूटिंग करणे या कामासाठी. आपण जिथे जाणार आहोत तिथे विज नाही, जनरेटर असला तरी तो डिझेलवर चालणारा. सोलर वर जेवढी वीज निर्माण होईल तेवढ्या विजेवर अत्यावश्यक गोष्टी स्वयंपाक जेवण इत्यादी केल्या जातात. उरलेला शिल्लक वीज तेथील स्थायिक लोक मोबाइल चार्ज करण्यासाठी वापरतात.  आम्हालाही आता मोबाईलची बॅटरी जास्तीत जास्त  निसर्गाला मोबाईलच्या कॅमेरात बंद करण्यासाठी वाचवून ठेवायला हवी होती. 

दोन अडीच तासांच्या चालल्यानंतर आम्ही थांबलो.  कमल सहीने पाठीवरचे सामान उतरवले. स्टोव्ह काढून आधी गरम पाणी केले. कारण रस्त्यात असणाऱ्या सर्व ओहोळांचे पाणी बर्फासारखे थंड असते.  चालताना घाम येतो, पण थंडी असल्यामुळे तहान लागत नाही. त्यामुळे पाणी पिणे होत नाही. आवर्जून पाणी प्यायले पाहिजे. सर्वसाधारणपणे सर्व ट्रेकर्सना पाणी कमी पिल्यामुळे मुतखड्याचा त्रास होतो असा अनुभव आहे. त्यामुळे स्टोव्ह पेटवल्यावर शक्य तेवढे गरम पाणी पिणे गरजेचे ठरते. गरम पाणी पिऊन झाल्यानंतर चहा बनवला. चहा आणि पार्ले जी बिस्किटे. या थंड हवेमध्ये चहा आणि सोबत बिस्किटे. याचा आनंद फक्त त्यावेळी तेथे चालून दमलेल्या व थंड हवेत गरम काहीतरी हवे असलेलाच सांगू शकतो. केवळ स्वर्ग...  चहा बिस्किटे खाऊन पाच मिनिटे बसून पुन्हा वाटचाल सुरू केली

आपण चालताना सर्व गोष्टींचे भान ठेवावे लागते. पायवाटेवर नीट चालत आहोत ना, वरून दगड तर कोसळणार नाहीत ना, त्याबरोबरच आजुबाजूचा निसर्ग, पक्षी, प्राणी,  झाडेझुडपे, फुले, फुलपाखरे तसेच साधे मातीचे डोंगर, अंगावर ल्यायलेले बर्फाचे डोंगर अशा अनेक गोष्टींचे व्यवधान सांभाळावे लागते. कारण आपण काही इथे सतत येणार नसतो. त्यामुळे जे समोर, आजूबाजूला आहे ते डोळ्यात साठवून, मनात जतन करता आले पाहिजे. माणसाला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जाताना जेवढा उत्साह ताकद ऊर्जा असते तेवढे ते साध्य झाल्यानंतर नसते. त्यामुळे सर्व गोष्टी जातानाच काळजीपूर्वक पाहाव्यात, आनंद घ्यावा हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. येताना पोहोचण्याची घाई झालेली असते. रस्त्यामध्ये छोटी छोटी ४-५ इंचाच्या उंचीची झुडपे होती. त्याला गंगा तुळशी म्हणतात. श्वास घेताना त्रास व्हायला लागला तर त्याची चार पाने तोडून त्याचा वास घेतात म्हणजे श्वास सुरळीत होण्यास मदत होते असे आम्हाला सांगितले गेले. त्याचा सुगंधही छान असतो. कधीकधी चालताना मधुनच त्या झुडपांचा सुगंध सुद्धा आपल्याला येत असतो. जसा रातराणीचा मोगर्‍याचा सुगंध येतो तसा... परिस्थितीनुरूप निसर्ग सुद्धा तुमच्या साठी काही गोष्टी देत असतो. त्यामुळे घरून कापूर नेण्याची आवश्यकता नाही असे जाणवले.

 गंगोत्रीहून निघाल्यापासून आठ किलोमीटरवर चीरबासा नावाचे ठिकाण लागते. चीर म्हणजे चीरपाईन वृक्ष आणि बासा म्हणजे जंगल. येथे चीर पाईन नावाच्या वृक्षांचे जंगल आहे. थोडक्यात या भागात चीरपाईन वृक्ष भरपूर प्रमाणात दिसून येतात. चीरबासामध्ये वनखात्याचे एक छोटे चेक पोस्ट आहे. गंगोत्री हुन निघालेल्या प्रवाशांचे परमीट येथे पाहण्याचे काम केले जाते. पण आम्ही तेथून जाताना ते बंद होते. तिथे कुणीही नव्हते. सर्वसाधारणपणे एक मे नंतर परमिट खुली होतात. म्हणजे गंगोत्री च्या बस स्टँड जवळ असलेल्या वनखात्याच्या ऑफिस मधून अर्ज करून गोमुखी परमिट दिली जातात कारण एक मे नंतर यात्रेकरू, पर्यटक आणि गिर्यारोहक यांचा ओघ वाढतो. एक मे नंतर दररोज सुमारे १५० एवढी परमिट गोमुख साठी दिली जातात. विना परमिट कोणी पुढे जाऊ नये म्हणून या चेकपोस्टची व्यवस्था केली आहे

गंगोत्रीला आपल्या समोर वाहणारी गंगा नदी आता हळूहळू आपल्यापासून खाली जाऊ लागते आणि आपण हिमालय मध्ये वरती चढायला सुरुवात करतो. गंगा नदी आणि आपल्यातले अंतर वाढू लागते. रस्ताही बारीक होऊ लागतो. तोल सांभाळून चालणे गरजेचे बनते. रस्त्याने चालताना इकडे तिकडे न बघता चालणे श्रेयस्कर. कारण एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी यामध्ये आपले पायवाट असते. आपणांस या भागात फिरण्याचा सराव नसल्यामुळे अनर्थ होऊ शकतो, दुर्घटना घडू शकते. म्हणून काही पाहायचे वाटल्यास थांबावे, बघावे आणि मग निघावे. चालता चालता बघताना जर पाय घसरला, चुकला तर कपाळमोक्ष नक्की. आणि निसर्ग विशेषतः हिमालयामध्ये क्षमा नाही. खरेतर तुम्ही निसर्गात फिरायला, मजा करायला, आनंद घ्यायला आलेले असता, तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. मग घाई-गडबड  कशासाठी ? आणि तुम्ही घाई गडबड करू शकत नाही. कारण तुम्ही गडबडीने चालू लागला तर दम लागतो. त्यामुळे थांबावेच लागते आणि एवढा खटाटोप करून आलेलो आहात आणि अशी वेळ नेहमी थोडीच येणार आहे ?

दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्ही चीरबासा येथे पोहोचलो.  तेथे  दोन शेड बांधून, एका ठिकाणी विश्रांतीची तर दुसऱ्या ठिकाणी स्वयंपाकासाठी ओटे बांधून, त्याला आडोसा तयार करून स्वयंपाक करण्याची व्यवस्था केलेली आहे. या भागात भरपूर वारा असल्यामुळे स्टोव्ह पेटवताना वारा लागू नये म्हणून तशी तजवीज करून ठेवली आहे. जंगलामध्ये आपल्याला लाकूड पेटवता येत नाही. लाकूड पेटवल्यास ठिणगीने आजूबाजूच्या असलेल्या वनसंपदेला आग लागून ते नष्ट होण्याची शक्यता असते. त्याबरोबरच तिथे असणारे पशु पक्षी, प्राणी, कीटक आणि इतर वनसंपदाहु नष्ट होऊ शकते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल रॉकेल यावर चालणारे स्टोव्ह याच्यावरच आपल्याला स्वयंपाक करावा लागतो. चुकून लाकुड पेटवून स्वयंपाक करताना आढळल्यास शिक्षा, दंड  किंवा दोन्ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याही पुढे जाऊन असे सांगावेसे वाटते की आपण निसर्गात गेल्यानंतर निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची गरज आहे. शहरात आपण वाटोळे केलेच आहे निदान जंगलात, हिमालयात तरी तेथील वनसंपदा जतन करण्याचे काम आपण नक्की केले पाहिजे.

चीरबासा येथे पोहोचल्यानंतर कमलने स्टोव्ह पेटवून त्यावर आधी गरम पाणी तयार केले ते पाणी आम्ही प्यायल्यावर, मग मॅगी तयार केली. पोटभर मॅगी खाऊन झाल्यावर, चहा केला. तो पिऊन सुमारे अर्धा तास विश्रांती घेतली. विश्रांतीपूर्वी कमलने स्टोव्ह बंद करून, त्यातले केरोसीन कॅनमध्ये भरले. सगळे आवरले. ओला कचरा टाकण्यासाठी तेथे कचरा पेटी होती. त्याच्यात ओला कचरा टाकला. कोरडा कचरा आम्ही आमच्याकडील गार्बेज बॅगमध्ये घेतला. खाली पडलेले सगळे स्वच्छ केले. एक ते दीड आमची वामकुक्षी झाली. काही राहिले नाही हे तपासून आम्ही पुढे प्रयाण केले. सकाळी आठ पासून आतापर्यंत म्हणजे दुपारी साडेबारा पर्यंत साडे चार तासात आठ किलोमीटरचा प्रवास झालेला होता.  चहा आणि जेवणाचा वेळ लक्षात घेता ताशी सरासरी दीड ते पावणेदोन किलोमीटर या वेगाने आम्ही हिमालयामध्ये, चढावर वाटचाल करीत होतो. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार हे अंतर कमी किंवा जास्त होऊ शकते. खरे सांगायचे तर हे असे ट्रॅक चाळीशी पूर्वी किंवा तरुण असताना, अंगात उत्साह, ताकद असताना, धाडस करण्याची शक्ती असताना, मन तरुण असताना शरीर तरुण, असताना केले पाहिजेत. विशिष्ट वयानंतर मर्यादा येत जातात. क्षमता कमी होते कॉन्फिडन्स राहत नाही‌ भीती वाटते आणि आपली जबाबदारी विनाकारण दुसऱ्या माणसावर येऊन पडते. तेव्हा अजूनही शक्य  असेल तर अशा गोष्टी लवकरात लवकर करून आनंद घ्यावा हे बरे...

बरोबर दीड वाजता आम्ही पुढे प्रयाण केले अजून पाच किलोमीटर नंतर पुढचा मुक्काम होता. आता चढ अधिकाधिक वाढू लागला. पुढचा मुक्काम पाच किलोमीटरवर भोजबासा येथे होता व तेथेच आम्ही राहणार होतो. त्याच्यापुढे मुक्कामाची सोय नाही. पुढे गेल्यानंतर मोकळ्या हवेत पर्वताच्या पायथ्याशी, बर्फाच्या सान्निध्यात, वाऱ्यामध्ये आणि हिमनदी कोसळण्याच्या, दरड कोसळण्याच्या शक्यतेमध्ये, तंबूत रात्री राहावे लागते. 

चालताना फारसे कुणी आम्हाला दिसले नाही फक्त दिसले ते काम करणारे मजूर. खचलेला रस्ता तयार करणे, दगड लावणे, भराव टाकणे, दगडांची भिंत बांधणे,  गरज पडली तर सिमेंट लावणे अशी कामे मजूर करत होते.   हे मजूर रोजंदारीवर काम करतात बिगारी कामगारास पाचशे रुपये तर मिस्त्री ला सहाशे रुपये रोज मिळतो. खाण्याची व्यवस्था शासन करते. या ठिकाणी या मजुरांची राहायची व्यवस्था उत्तराखंड शासनाने केलेली आहे.  दररोज यांना ये-जा करावे लागत नाही. तेथेच रहायचे आणि तेथेच काम करायचे याचे कारण आहे की काही विशिष्ट पट्ट्यामध्ये सतत रस्ते असतात वरून दरडी कोसळतात. मोठे दगड पडल्यामुळे  रस्ते नष्ट होतात. ते पुन्हा पुन्हा करत राहावे लागते. कारण हिमालयामध्ये सर्व अनिश्चितता आहे. रस्ते बंद होऊन चालणार नाही. त्यामुळे काम सतत चालू ठेवावे लागते आणि रस्त्यांवर रोज लक्ष ठेवावे लागते. कारण रसद पोहोचवणे आणि ये-जा करण्यासाठी रस्ते वापरायोग्य राहिलेच पाहिजेत.

गंगोत्री पासून दूर हिमालयात प्रतिकूल परिस्थितीत थंडी, वारा, ऊन, पाऊस, हिमवर्षाव, कडे कोसळणे, दरड कोसळणे, दगड कोसळणे या सगळ्यांमध्ये ही माणसं सतत काम करीत असतात. तरी ते हसतमुख असतात. आपल्याला नमस्कार करून पाणी हवे का हे आवर्जून विचारतात. आलेल्या पाहुण्याला पाणी विचारण्याची संस्कृती हिमालयात सुद्धा अजून टिकून आहे. पोर्टर असो गाईड असो किंवा रस्ता बांधणे, दुरुस्त करणारे कामगार असोत अतिशय माफक मजुरीवर जीव धोक्यात घालून त्यांना काम करावे लागते. जगण्याची धडपड दूरवर हिमालयात चालू आहे. ती पाहायला मात्र कोणी नाही. काम करणारा मजूर, रस्ता दाखवणारा गाईड आणि सामान वाहणारा पोर्टर यांच्या या प्रवासामध्ये अनिश्चिततेमुळे उद्याची खात्री नाही. जिवंत परत येऊन काही माहिती नाही उद्याचा दिवस दिसेल का नाही हे सांगता येत नाही. तरीही पोटासाठी ते हे करतात. हे सर्व मजूर नेपाळहून उदरनिर्वाहासाठी येथे आले आहेत.

दुपारी साडेचार वाजता आम्ही भोज बासा येथे पोचलो. भोज म्हणजे भूर्ज आणि बासा म्हणजे जंगल. येथे भूर्ज वृक्षांचे जंगल म्हणून भोज बासा असे नाव आहे. पूर्वी ऋषी मुनी भूर्जपत्रावर लेखन करायचे. भूर्ज वृक्षांची साल म्हणजे भूर्जपत्र... येथे वनखात्याचे ऑफिस आहे. पोलिस स्टेशन आणि त्यांची निवास व्यवस्था आहे. गढवाल मण्डल विकास निगम यांची निवास व्यवस्था आहे आणि लाल बाबा म्हणून एक साधू होते त्यांचा मोठा आश्रम आहे. यापैकी गढवाल मण्डल निगम मध्ये बुकिंग करून व्यवस्था होऊ शकते. तर लाल बाबांच्या आश्रमामध्ये ऐन वेळेला उपलब्धतेनुसार निवासव्यवस्था आणि भोजन व्यवस्था होऊ शकते. लाल बाबाच्या आश्रमामध्ये डॉर्मेटरी पद्धतीची म्हणजे एका खोलीमध्ये दहा लोकांना राहण्याची सोय होते. याप्रमाणे एकूण ७५ लोक वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात. लालबाबा आश्रमामध्ये प्रति व्यक्ती प्रति दिन रुपये ४००/- एवढा आकार घेतात. यामध्ये ब्लॅक टी, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण याचा समावेश आहे. गढवाल मण्डलच्या रिसॉर्टमध्ये सुमारे ७५ लोकांची डॉर्मेटरी पद्धतीने निवास व्यवस्था होऊ शकते. त्याचे ते प्रति व्यक्ती प्रतिदिन रुपये ७००/- एवढा आकार घेतात. त्याव्यतिरिक्त चहा नाश्ता आणि जेवण याचे पैसे वेगळे द्यावे लागतात.

 सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत लाल बाबा आश्रम, गढवाल मंडल निगमचे रिसॉर्ट आणि पोलीस यांचे प्रिमायसेस बंद असतात. फक्त वनखात्याचे कर्मचारी तेथे उपलब्ध असतात. एखादा साधुसंत विशेष शासकीय विशेष परवानगीने लालबाबा आश्रमात अति थंडीच्या मुक्काम करू शकतात. बर्फ असल्यामुळे कुठेही बाहेर पडता येत नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असते. त्यामुळे येथे जाण्याची इतरांना परवानगी मिळत नाही आणि तसे धाडसही कोणी करू नये.

*टीप : गोमुख तपोवन साठी बरेच लेखन* *असल्यामुळे त्याचे एकापेक्षा अधिक भाग* *होण्याची शक्यता आहे. कृपया नोंद घ्यावी ही* *विनंती. 

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा