गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

*चारधाम पदभ्रमण यात्रा...*

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - ५*

गंगोत्रीला दुपारी बारा वाजता पोहोचलो. मला गोमुख आणि तपोवन हा ट्रेक करायचा होता. गोमुख हे गंगेचे उगमस्थान आहे, तर 
तपोवनला शिवलिंग शिखर, त्यांच्या पायथ्याशी मोठे पठार व ग्लेशियर आहे. त्याच्यासाठी परमिट ( परवाना) घेणे आवश्यक होते. ऑनलाइन परवानगीचा मार्ग अवलंबला असता असे लक्षात आले की, शासनाकडे अधिकृत नोंदणी असलेल्या  अशा ॲडव्हेंचर/ ट्रेकिंग कंपनीचे पत्र तुम्हाला त्या ऑनलाईन परमिशनसाठी आवश्यक असते. गंगोत्री बाजारात बराच वेळ चौकशी केल्यानंतर एका रिअल एडवेंचर नावाच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलो. त्या सद्गृहस्थाला  सगळी माहिती सांगितली. जाण्याचा एक दिवस दुसऱ्या दिवशी गोमुख, तपोवन व मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी परत येणे. याचा त्याने हिशेब केला.  रजिस्ट्रेशन फी दीडशे रुपये प्रत्येकी अधिक पत्र देण्याचे रु एक हजार, पोर्टर त्याचे एक हजार प्रति दिन, गाईड देणार होता त्याचे दोन हजार रुपये प्रतिदिन,  तंबू रु दोनशे प्रति दिन, स्लीपिंग बॅग रु शंभर प्रति दिन, झोपण्यासाठी मॅटिंगचे रु पन्नास प्रति दिन, आणि तीन दिवसांची खाद्यपदार्थ व स्टोव्हची व्यवस्था एवढ्या सगळ्याचे त्याने पंधरा हजार रुपये सांगितले. कमी करा म्हणून विनंती करूनही तो अडून बसला. तो फारच महागडा असल्यामुळे मी त्याचा नाद सोडून दिला व तेथून बाहेर पडलो. दुसऱ्या एका ॲडव्हेंचर एजन्सीकडे गेलो. त्याला आधार कार्ड दिले. तो मला उत्तर काशीहून परवानगी, सामान मागवायला लागेल वगैरे कारणे सांगू लागला. त्याचे दुकानाचे काम चालू होते. सिझन सुरू होत  असल्यामुळे दुकान दुरुस्त करणे या  गडबडीत तो होता. मी बाहेर  दुसरीकडे काही व्यवस्था होईल का याची चौकशी करत होतो. पण काही झाले नाही. शेवटी बसस्टँड शेजारील फॉरेस्ट ऑफिसमध्ये गेलो. इथून काही होणार नाही, तुम्हाला ऑनलाईनच परवानगी घ्यायला लागेल असे उत्तर मिळाले. आता तिथे ऑनलाइन परवानगी घ्यायची म्हणजे ऑनलाइन फॉर्म भरा, त्याला डॉक्युमेंट्स स्कॅन करून जोडा आणि पैसे कसे भरायचे, कारण कनेक्टिव्हिटी हा तिथे प्रॉब्लेम होता. मी बराच वेळ थांबल्यामुळे  शेवटी तिथल्या अधिकाऱ्याने सांगितले, आमच्या इथे काही होत नाही, तुम्ही वरती  राम मंदिरापाशी आमचे फॉरेस्ट ऑफिसर बसतात त्यांना भेटा. आम्हाला वाटले जवळ असेल. चालत निघालो. वाटेत एक जण पत्र्याच्या कुटीसमोर पहुडले होते. त्यांना फाॅरेस्ट ऑफिस कोठे आहे म्हणून विचारले. ते म्हणाले, फॉरेस्ट ऑफिस सरळ पुढे दोन किलोमीटरवर राम मंदिराच्या शेजारी आहे. पोटात गोळा आला. नुसती चौकशी करायला दोन किलोमीटर !!! ते ही चढाच्या रस्त्यावर !!! गरजवंताला अक्कल नसते. आम्ही पुढे  निघताना, थोडे बसा मी चहा देतो ते म्हणाले. परंतु आमच्या दृष्टीने परमिट घेणे हे जास्त महत्त्वाचे असल्यामुळे त्याचे आभार म्हणून आम्ही पुढे निघालो.   जवळजवळ पाऊण एक तास चालल्यानंतर वनखात्याच्या ऑफिस पाशी पोचलो. गंगोत्री दहा हजार फुटावर आहे.
अति उंचीवरील ठिकाणी  हवेत ऑक्सिजन कमी असतो, तसाच तो गंगोत्रीलाही होता.
 मी नुकताच गंगोत्रीला आल्यामुळे व त्या हवेचा सराव व्हायच्या आतच धावपळ करायला सुरुवात केल्यामुळे दम लागायला लागला. हळूहळू चालण्याशिवाय पर्याय नव्हता.  वनखात्याच्या ऑफिस मध्ये पोचल्यानंतर थोडावेळ बसलो. तिथल्या अधिकाऱ्यांची बोललो. मला इथून काहीच करता येणार नाही. तुम्हाला तपोवनसाठी सगळे ऑनलाईनच करावे लागेल. कारण ऑनलाइन अर्ज करताना ॲडव्हेंचर कंपनीचे पत्र हे आवश्यक आहे.  काय करावे मला समजेना. तेवढ्यात आठवले संजीवकुमार सेमवाल यांना फोन लावावा. 

पुण्याहून निघताना निवास व्यवस्थेसाठी गंगोत्रीतील भागीरथी सदनचे मालक आणि गंगोत्री मंदिरातील पुजारी संजीव कुमार सेमवाल यांच्याशी मी बोललो होतो. शेवटचा प्रयत्न त्यांची काही मदत होईल का पहावे म्हणून, त्यांना फोन लावला.  सुदैवाने त्या ठिकाणाहून त्यांना फोन लागला.  गेले अनेक दिवस त्यांचा फोनच लागत नव्हता. आज नशिबाने लागला. परमिटची अडचण आहे, तर तुम्ही अधिकाऱ्यांची बोलता का असे त्यांना म्हणालो.  ते फॉरेस्ट ऑफिसरशी बोलले.  संबंधित फाॅरेस्टरने उद्या सकाळी साडेसात वाजता या,  तुम्हाला परमिट देतो असे सांगितले. त्यांचे आभार मानले आणि पुन्हा चालत गंगोत्रीच्या निवासस्थानाच्या दिशेने कूच केले.

खाली येऊन पोर्टर शोधला. त्याचे गाईड वजा पोर्टर वजा स्वयंपाकी अशा सर्व कामांचे  पैसे ठरवले. त्याला ॲडव्हान्स दिला आणि शांतपणे भागीरथी सदनकडे निघालो. सगळ्यात चार तास गेले.
कमल साही हे पोर्टरचे नाव. तो नेपाळचा नागरिक. त्याचे वडील, चुलत भाऊ व इतर नातेवाईक उदरनिर्वाहासाठी गंगोत्रीत राहतात. सगळ्यांची कुटुंबे नेपाळमध्ये. गंगोत्रीत सर्व पोर्टर नेपाळी दिसून आले. पोर्टरला २५ किलो वजन वाहण्यासाठी रु १००० एवढा दररोजचा आकार द्यावा लागतो. ते जास्तीचीही मागणी करतात. गंगोत्रीहून निघाल्यापासून परत येईपर्यंतच्या सर्व दिवसांचे पैसे द्यावे लागतात. मला तीन दिवसांच्या गोमुख तपोवन ट्रेकसाठी एकूण रु १००००/- एवढा खर्च आला. मी एकटा असल्यामुळे खर्चीची विभागणी होऊ शकली नाही. अन्यथा ३-४ व्यक्तींच्या तीन दिवसांच्या ट्रेकसाठी सामान वाढले तरी , ते २५ किलोच्या आत असल्यामुळे परमिट खर्च वगळता एवढाच खर्च येऊ शकतो. 

गोमुख साठीचे ऑनलाईन परमिट काढताना, ॲडव्हेंचर/ ट्रेकिंग कंपनीचे पत्र तुम्हाला आवश्यक नाही, हे आम्हाला नंतर समजले. काही हुशार पोर्टर, ट्रेकर्सना फक्त गोमुखचे ऑनलाईन परमिट काढायला सांगतात. नंतर तेथे पोहोचल्यावर सकाळी कोणी उठायच्या आत गंगा नदी, ट्राॅलीतून किंवा पाण्यातून पार करतात आणि गोमुखच्या परमिटवर तपोवनला जातात. कोणाला या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही. आमच्या हुशार पोर्टरने आम्हाला हे काही सांगितले नाही.असो. नशीब आपले.

दरवर्षी एक मे नंतर परमिट गंगोत्री च्या बस स्टॅन्ड शेजारील ऑफिस मधून द्यायला सुरुवात होते ही परमिट फक्त गोमुख पर्यंतची दिली जातात. तपोवन चे परमिट हवे असल्यास ते ऑनलाईनच काढावे लागते.  परमिटचा शासकीय अर्ज भरून सोबत दीड ते दीडशे रुपये प्रति व्यक्ती भरून अर्ज करावा लागतो. या कामासाठी वनखात्याने सकाळी आठ ते दहा व सायंकाळी पाच ते सात एवढी वेळ उपलब्ध करून दिलेली आहे. त्या वेळेव्यतिरिक्त गेल्यास दुसऱ्या दिवशी परमिट मिळते. परमिट काढताना ओळख म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा शासकीय ओळखपत्र पाहून ते वनखात्याच्या ऑफिसमध्ये जमा करून घेतात. आपण परत आल्यानंतर ते ओळखपत्र परत मिळते. याव्यतिरिक्त शिवाय पाचशे रुपये डिपॉझिट घेतले जाते. आपण नेताना नोंदवलेल्या प्लास्टिकच्या वस्तू किंवा त्याची रॅपर्स परत आणलेली आहेत हे पाहून डिपाॅझिट परत केले जाते. परमिट हे फक्त दोन दिवसासाठी दिले जाते त्यापेक्षा जास्त राहिल्यास प्रतिदिन पन्नास रुपये एवढा आकार परत आल्यावर द्यावा लागतो

पोर्टर कमल साही ने किराणा माल, राॅकेल, तंबू, मॅट , घरचा स्टोन्स जमा केले व रूमवर आणून ठेवले. त्याला सकाळी ६.३० ला बोलावले. 

रात्री ट्रेकच्या विचाराने व अति थंड तापमानामुळे ( -१° ) नीट झोप लागली नाही. वनखात्याच्या गेटवर पोहोचलो. साहेब चक्क तयार होऊन बसले होते. मला आश्चर्य वाटले. नंतर साहेबांनीच कारण सांगितले. त्यांचे जिल्हा वनाधिकारी ( DFO ) आणि उत्तरकाशीचे रेंजर  दोघेही गोमुख व तपोवन भेटीवर आमच्या पाठोपाठ येणार होते. त्यांना माझ्याकडून नीट माहिती, वेस्ट कलेक्शन बॅग मिळाली असे साहेबांना आवर्जून सांगायला सांगितले. त्या बरोबर आमच्या तीन स्लीपिंग बॅग घेऊन जाण्याचे सांगितले होते. त्यांचे प्रति बॅग, प्रति दिन रु शंभर याप्रमाणे रु नऊशे त्याला द्यायचे होते. आम्हाला स्लीपिंग बॅगची गरज होती. त्यानेही मदत केल्याबद्दल हात मारला. एवढेच नव्हे तर आम्ही परत आल्यावर तो ऑफिसमध्ये हजर नव्हता. त्यामुळे स्लीपिंग बॅग चेक पैसे तेथील शिपायांकडे कसे द्यायचे याचा विचार आम्ही त्यावेळी दिले नाहीत. तर पठ्ठ्याने कमल ला फोन करून पैसे देण्याची सूचना केली...

सगळे सोपस्कार, स्लीपिंग बॅग भरून आम्ही आठ वाजता संस्मरणीय अशा गोमुख, तपोवन ट्रेकसाठी निघालो. सकाळ असल्याने चांगली थंडी होती. कानटोपी, ग्लोव्हज घालून चालत होतो. संपूर्ण गोमुख पर्यंत चढाचा रस्ता असणार होता. १०००० फुटापासून १३३०० फुटांपर्यंत जायचे होते. साहजिकच प्रत्येक पाऊल उर्ध्व दिशेने टाकत होतो. 

चि मिहिर, माझा मुलगा याच्या प्रोत्साहनामुळे मी गोमुख, तपोवन ट्रेकला निघालो होतो. हळूहळू चालावे लागत होते. मनाने तुम्ही कितीही तरूण असला तरी शरीराचे ऐकावे लागते... मनात खूप औत्सुक्य होते. काठीचा आधार, पाठीवर सॅक चढाचा रस्ता... कुठे मातीचा तर कुठे पडलेले दगड आच्छादून केलेला, कुठे पायऱ्या तर कुठे डोंगरावरून वाहात येणाऱ्या पाण्यातून... दहा पावले टाकली तर श्वास वाढायचा. थांबावेच लागायचे. सुरुवातीला अर्ध्या तासाच्या रस्त्यात मोबाईल चालू होते. नंतर आपण खरे संपर्कहीन होतो. हळूहळू आपण हिमालयाच्या कुशीत जातो मागचे सगळे विसरून आपली वाटचाल सुरू राहते. मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून आता आपल्याला जास्तीत जास्त वेळ बॅटरी टिकवायची असते. मोबाईलचा खरा उपयोग आता आपल्याला करता येणार असतो तो,  फोटो काढणे व्हिडिओ शूटिंग करणे या कामासाठी. आपण जिथे जाणार आहोत तिथे विज नाही, जनरेटर असला तरी तो डिझेलवर चालणारा. सोलर वर जेवढी वीज निर्माण होईल तेवढ्या विजेवर अत्यावश्यक गोष्टी स्वयंपाक जेवण इत्यादी केल्या जातात. उरलेला शिल्लक वीज तेथील स्थायिक लोक मोबाइल चार्ज करण्यासाठी वापरतात.  आम्हालाही आता मोबाईलची बॅटरी जास्तीत जास्त  निसर्गाला मोबाईलच्या कॅमेरात बंद करण्यासाठी वाचवून ठेवायला हवी होती. 

दोन अडीच तासांच्या चालल्यानंतर आम्ही थांबलो.  कमल सहीने पाठीवरचे सामान उतरवले. स्टोव्ह काढून आधी गरम पाणी केले. कारण रस्त्यात असणाऱ्या सर्व ओहोळांचे पाणी बर्फासारखे थंड असते.  चालताना घाम येतो, पण थंडी असल्यामुळे तहान लागत नाही. त्यामुळे पाणी पिणे होत नाही. आवर्जून पाणी प्यायले पाहिजे. सर्वसाधारणपणे सर्व ट्रेकर्सना पाणी कमी पिल्यामुळे मुतखड्याचा त्रास होतो असा अनुभव आहे. त्यामुळे स्टोव्ह पेटवल्यावर शक्य तेवढे गरम पाणी पिणे गरजेचे ठरते. गरम पाणी पिऊन झाल्यानंतर चहा बनवला. चहा आणि पार्ले जी बिस्किटे. या थंड हवेमध्ये चहा आणि सोबत बिस्किटे. याचा आनंद फक्त त्यावेळी तेथे चालून दमलेल्या व थंड हवेत गरम काहीतरी हवे असलेलाच सांगू शकतो. केवळ स्वर्ग...  चहा बिस्किटे खाऊन पाच मिनिटे बसून पुन्हा वाटचाल सुरू केली

आपण चालताना सर्व गोष्टींचे भान ठेवावे लागते. पायवाटेवर नीट चालत आहोत ना, वरून दगड तर कोसळणार नाहीत ना, त्याबरोबरच आजुबाजूचा निसर्ग, पक्षी, प्राणी,  झाडेझुडपे, फुले, फुलपाखरे तसेच साधे मातीचे डोंगर, अंगावर ल्यायलेले बर्फाचे डोंगर अशा अनेक गोष्टींचे व्यवधान सांभाळावे लागते. कारण आपण काही इथे सतत येणार नसतो. त्यामुळे जे समोर, आजूबाजूला आहे ते डोळ्यात साठवून, मनात जतन करता आले पाहिजे. माणसाला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जाताना जेवढा उत्साह ताकद ऊर्जा असते तेवढे ते साध्य झाल्यानंतर नसते. त्यामुळे सर्व गोष्टी जातानाच काळजीपूर्वक पाहाव्यात, आनंद घ्यावा हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. येताना पोहोचण्याची घाई झालेली असते. रस्त्यामध्ये छोटी छोटी ४-५ इंचाच्या उंचीची झुडपे होती. त्याला गंगा तुळशी म्हणतात. श्वास घेताना त्रास व्हायला लागला तर त्याची चार पाने तोडून त्याचा वास घेतात म्हणजे श्वास सुरळीत होण्यास मदत होते असे आम्हाला सांगितले गेले. त्याचा सुगंधही छान असतो. कधीकधी चालताना मधुनच त्या झुडपांचा सुगंध सुद्धा आपल्याला येत असतो. जसा रातराणीचा मोगर्‍याचा सुगंध येतो तसा... परिस्थितीनुरूप निसर्ग सुद्धा तुमच्या साठी काही गोष्टी देत असतो. त्यामुळे घरून कापूर नेण्याची आवश्यकता नाही असे जाणवले.

 गंगोत्रीहून निघाल्यापासून आठ किलोमीटरवर चीरबासा नावाचे ठिकाण लागते. चीर म्हणजे चीरपाईन वृक्ष आणि बासा म्हणजे जंगल. येथे चीर पाईन नावाच्या वृक्षांचे जंगल आहे. थोडक्यात या भागात चीरपाईन वृक्ष भरपूर प्रमाणात दिसून येतात. चीरबासामध्ये वनखात्याचे एक छोटे चेक पोस्ट आहे. गंगोत्री हुन निघालेल्या प्रवाशांचे परमीट येथे पाहण्याचे काम केले जाते. पण आम्ही तेथून जाताना ते बंद होते. तिथे कुणीही नव्हते. सर्वसाधारणपणे एक मे नंतर परमिट खुली होतात. म्हणजे गंगोत्री च्या बस स्टँड जवळ असलेल्या वनखात्याच्या ऑफिस मधून अर्ज करून गोमुखी परमिट दिली जातात कारण एक मे नंतर यात्रेकरू, पर्यटक आणि गिर्यारोहक यांचा ओघ वाढतो. एक मे नंतर दररोज सुमारे १५० एवढी परमिट गोमुख साठी दिली जातात. विना परमिट कोणी पुढे जाऊ नये म्हणून या चेकपोस्टची व्यवस्था केली आहे

गंगोत्रीला आपल्या समोर वाहणारी गंगा नदी आता हळूहळू आपल्यापासून खाली जाऊ लागते आणि आपण हिमालय मध्ये वरती चढायला सुरुवात करतो. गंगा नदी आणि आपल्यातले अंतर वाढू लागते. रस्ताही बारीक होऊ लागतो. तोल सांभाळून चालणे गरजेचे बनते. रस्त्याने चालताना इकडे तिकडे न बघता चालणे श्रेयस्कर. कारण एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी यामध्ये आपले पायवाट असते. आपणांस या भागात फिरण्याचा सराव नसल्यामुळे अनर्थ होऊ शकतो, दुर्घटना घडू शकते. म्हणून काही पाहायचे वाटल्यास थांबावे, बघावे आणि मग निघावे. चालता चालता बघताना जर पाय घसरला, चुकला तर कपाळमोक्ष नक्की. आणि निसर्ग विशेषतः हिमालयामध्ये क्षमा नाही. खरेतर तुम्ही निसर्गात फिरायला, मजा करायला, आनंद घ्यायला आलेले असता, तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. मग घाई-गडबड  कशासाठी ? आणि तुम्ही घाई गडबड करू शकत नाही. कारण तुम्ही गडबडीने चालू लागला तर दम लागतो. त्यामुळे थांबावेच लागते आणि एवढा खटाटोप करून आलेलो आहात आणि अशी वेळ नेहमी थोडीच येणार आहे ?

दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्ही चीरबासा येथे पोहोचलो.  तेथे  दोन शेड बांधून, एका ठिकाणी विश्रांतीची तर दुसऱ्या ठिकाणी स्वयंपाकासाठी ओटे बांधून, त्याला आडोसा तयार करून स्वयंपाक करण्याची व्यवस्था केलेली आहे. या भागात भरपूर वारा असल्यामुळे स्टोव्ह पेटवताना वारा लागू नये म्हणून तशी तजवीज करून ठेवली आहे. जंगलामध्ये आपल्याला लाकूड पेटवता येत नाही. लाकूड पेटवल्यास ठिणगीने आजूबाजूच्या असलेल्या वनसंपदेला आग लागून ते नष्ट होण्याची शक्यता असते. त्याबरोबरच तिथे असणारे पशु पक्षी, प्राणी, कीटक आणि इतर वनसंपदाहु नष्ट होऊ शकते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल रॉकेल यावर चालणारे स्टोव्ह याच्यावरच आपल्याला स्वयंपाक करावा लागतो. चुकून लाकुड पेटवून स्वयंपाक करताना आढळल्यास शिक्षा, दंड  किंवा दोन्ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याही पुढे जाऊन असे सांगावेसे वाटते की आपण निसर्गात गेल्यानंतर निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची गरज आहे. शहरात आपण वाटोळे केलेच आहे निदान जंगलात, हिमालयात तरी तेथील वनसंपदा जतन करण्याचे काम आपण नक्की केले पाहिजे.

चीरबासा येथे पोहोचल्यानंतर कमलने स्टोव्ह पेटवून त्यावर आधी गरम पाणी तयार केले ते पाणी आम्ही प्यायल्यावर, मग मॅगी तयार केली. पोटभर मॅगी खाऊन झाल्यावर, चहा केला. तो पिऊन सुमारे अर्धा तास विश्रांती घेतली. विश्रांतीपूर्वी कमलने स्टोव्ह बंद करून, त्यातले केरोसीन कॅनमध्ये भरले. सगळे आवरले. ओला कचरा टाकण्यासाठी तेथे कचरा पेटी होती. त्याच्यात ओला कचरा टाकला. कोरडा कचरा आम्ही आमच्याकडील गार्बेज बॅगमध्ये घेतला. खाली पडलेले सगळे स्वच्छ केले. एक ते दीड आमची वामकुक्षी झाली. काही राहिले नाही हे तपासून आम्ही पुढे प्रयाण केले. सकाळी आठ पासून आतापर्यंत म्हणजे दुपारी साडेबारा पर्यंत साडे चार तासात आठ किलोमीटरचा प्रवास झालेला होता.  चहा आणि जेवणाचा वेळ लक्षात घेता ताशी सरासरी दीड ते पावणेदोन किलोमीटर या वेगाने आम्ही हिमालयामध्ये, चढावर वाटचाल करीत होतो. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार हे अंतर कमी किंवा जास्त होऊ शकते. खरे सांगायचे तर हे असे ट्रॅक चाळीशी पूर्वी किंवा तरुण असताना, अंगात उत्साह, ताकद असताना, धाडस करण्याची शक्ती असताना, मन तरुण असताना शरीर तरुण, असताना केले पाहिजेत. विशिष्ट वयानंतर मर्यादा येत जातात. क्षमता कमी होते कॉन्फिडन्स राहत नाही‌ भीती वाटते आणि आपली जबाबदारी विनाकारण दुसऱ्या माणसावर येऊन पडते. तेव्हा अजूनही शक्य  असेल तर अशा गोष्टी लवकरात लवकर करून आनंद घ्यावा हे बरे...

बरोबर दीड वाजता आम्ही पुढे प्रयाण केले अजून पाच किलोमीटर नंतर पुढचा मुक्काम होता. आता चढ अधिकाधिक वाढू लागला. पुढचा मुक्काम पाच किलोमीटरवर भोजबासा येथे होता व तेथेच आम्ही राहणार होतो. त्याच्यापुढे मुक्कामाची सोय नाही. पुढे गेल्यानंतर मोकळ्या हवेत पर्वताच्या पायथ्याशी, बर्फाच्या सान्निध्यात, वाऱ्यामध्ये आणि हिमनदी कोसळण्याच्या, दरड कोसळण्याच्या शक्यतेमध्ये, तंबूत रात्री राहावे लागते. 

चालताना फारसे कुणी आम्हाला दिसले नाही फक्त दिसले ते काम करणारे मजूर. खचलेला रस्ता तयार करणे, दगड लावणे, भराव टाकणे, दगडांची भिंत बांधणे,  गरज पडली तर सिमेंट लावणे अशी कामे मजूर करत होते.   हे मजूर रोजंदारीवर काम करतात बिगारी कामगारास पाचशे रुपये तर मिस्त्री ला सहाशे रुपये रोज मिळतो. खाण्याची व्यवस्था शासन करते. या ठिकाणी या मजुरांची राहायची व्यवस्था उत्तराखंड शासनाने केलेली आहे.  दररोज यांना ये-जा करावे लागत नाही. तेथेच रहायचे आणि तेथेच काम करायचे याचे कारण आहे की काही विशिष्ट पट्ट्यामध्ये सतत रस्ते असतात वरून दरडी कोसळतात. मोठे दगड पडल्यामुळे  रस्ते नष्ट होतात. ते पुन्हा पुन्हा करत राहावे लागते. कारण हिमालयामध्ये सर्व अनिश्चितता आहे. रस्ते बंद होऊन चालणार नाही. त्यामुळे काम सतत चालू ठेवावे लागते आणि रस्त्यांवर रोज लक्ष ठेवावे लागते. कारण रसद पोहोचवणे आणि ये-जा करण्यासाठी रस्ते वापरायोग्य राहिलेच पाहिजेत.

गंगोत्री पासून दूर हिमालयात प्रतिकूल परिस्थितीत थंडी, वारा, ऊन, पाऊस, हिमवर्षाव, कडे कोसळणे, दरड कोसळणे, दगड कोसळणे या सगळ्यांमध्ये ही माणसं सतत काम करीत असतात. तरी ते हसतमुख असतात. आपल्याला नमस्कार करून पाणी हवे का हे आवर्जून विचारतात. आलेल्या पाहुण्याला पाणी विचारण्याची संस्कृती हिमालयात सुद्धा अजून टिकून आहे. पोर्टर असो गाईड असो किंवा रस्ता बांधणे, दुरुस्त करणारे कामगार असोत अतिशय माफक मजुरीवर जीव धोक्यात घालून त्यांना काम करावे लागते. जगण्याची धडपड दूरवर हिमालयात चालू आहे. ती पाहायला मात्र कोणी नाही. काम करणारा मजूर, रस्ता दाखवणारा गाईड आणि सामान वाहणारा पोर्टर यांच्या या प्रवासामध्ये अनिश्चिततेमुळे उद्याची खात्री नाही. जिवंत परत येऊन काही माहिती नाही उद्याचा दिवस दिसेल का नाही हे सांगता येत नाही. तरीही पोटासाठी ते हे करतात. हे सर्व मजूर नेपाळहून उदरनिर्वाहासाठी येथे आले आहेत.

दुपारी साडेचार वाजता आम्ही भोज बासा येथे पोचलो. भोज म्हणजे भूर्ज आणि बासा म्हणजे जंगल. येथे भूर्ज वृक्षांचे जंगल म्हणून भोज बासा असे नाव आहे. पूर्वी ऋषी मुनी भूर्जपत्रावर लेखन करायचे. भूर्ज वृक्षांची साल म्हणजे भूर्जपत्र... येथे वनखात्याचे ऑफिस आहे. पोलिस स्टेशन आणि त्यांची निवास व्यवस्था आहे. गढवाल मण्डल विकास निगम यांची निवास व्यवस्था आहे आणि लाल बाबा म्हणून एक साधू होते त्यांचा मोठा आश्रम आहे. यापैकी गढवाल मण्डल निगम मध्ये बुकिंग करून व्यवस्था होऊ शकते. तर लाल बाबांच्या आश्रमामध्ये ऐन वेळेला उपलब्धतेनुसार निवासव्यवस्था आणि भोजन व्यवस्था होऊ शकते. लाल बाबाच्या आश्रमामध्ये डॉर्मेटरी पद्धतीची म्हणजे एका खोलीमध्ये दहा लोकांना राहण्याची सोय होते. याप्रमाणे एकूण ७५ लोक वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात. लालबाबा आश्रमामध्ये प्रति व्यक्ती प्रति दिन रुपये ४००/- एवढा आकार घेतात. यामध्ये ब्लॅक टी, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण याचा समावेश आहे. गढवाल मण्डलच्या रिसॉर्टमध्ये सुमारे ७५ लोकांची डॉर्मेटरी पद्धतीने निवास व्यवस्था होऊ शकते. त्याचे ते प्रति व्यक्ती प्रतिदिन रुपये ७००/- एवढा आकार घेतात. त्याव्यतिरिक्त चहा नाश्ता आणि जेवण याचे पैसे वेगळे द्यावे लागतात.

 सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत लाल बाबा आश्रम, गढवाल मंडल निगमचे रिसॉर्ट आणि पोलीस यांचे प्रिमायसेस बंद असतात. फक्त वनखात्याचे कर्मचारी तेथे उपलब्ध असतात. एखादा साधुसंत विशेष शासकीय विशेष परवानगीने लालबाबा आश्रमात अति थंडीच्या मुक्काम करू शकतात. बर्फ असल्यामुळे कुठेही बाहेर पडता येत नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असते. त्यामुळे येथे जाण्याची इतरांना परवानगी मिळत नाही आणि तसे धाडसही कोणी करू नये.

*टीप : गोमुख तपोवन साठी बरेच लेखन* *असल्यामुळे त्याचे एकापेक्षा अधिक भाग* *होण्याची शक्यता आहे. कृपया नोंद घ्यावी ही* *विनंती. 

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

चारधाम यात्रा

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - ३*

ऋषिकेश होऊन पुढे निघालो. पहाटे पावणे चार वाजता रामानंद आश्रम सोडला. गल्लीबोळातून चालत असताना, १-२ श्वान अंगावर धावून आले. मी शांतपणे चालत राहिलो. मी निरुपद्रवी आहे हे लक्षात आल्यावर ते शांत झाले.  वाटेत एक-दोन रिक्षाचालक ग्राहकांची वाट पहात बसले होते.  गुगल बाबा की जय. तो दाखवत असलेल्या रस्त्यावरून गंगा किनार्‍यावरुन चाललो होतो. दूरवर कुठेतरी श्वानांचा आवाज येत होता. किनाऱ्यावरून चालताना  उजव्या हाताला गंगामैयाचा खळखळ आवाज शांततेत जाणवणारा. तर डाव्या हाताला आश्रम, हॉटेल, लॉजेस. उजव्या हाताला *जानकी सेतू*, पादचारी आणि दुचाकींसाठी बांधलेला. अंधारात त्याच्यावरील दिवे लक्ष वेधून घेत होते. बसण्यासाठी बांधलेल्या तसेच गंगा किनारी काही यात्रेकरू उघड्यावर झोपले होते. पहाटेच्या वेळी रस्त्यावर मी एकटाच.

रामानंद आश्रम मनाला भावला.  दिखाऊपणा नाही, भपका नाही‌.  तेथे राहण्याचा योग आला. वेळ आली राहिलो, आनंद घेतला, निघालो... आपल्या सर्वांना नदी, नाले, झरे, वारा यांच्यासारखे वाहते राहता यायला पाहिजे.  वाहणारे पाणी स्वच्छ राहते. मनाला भावते.  रोगराई होत नाही. बंद खोलीतील हवा कुबट होते. तसेच माणसाने सुद्धा सतत वाहते राहायला पाहिजे. याचा अर्थ संसार सोडून संन्यासी व्हावे असे नाही.  तर घराबाहेर पडून प्रवास 
करण्याऐवजी शरिराचे चोचले पुरवणाऱ्या ठिकाणी थांबून, अडकून पडू नये. नाहीतर एक प्रपंच सोडायचा आणि दुसरा तयार करायचा असे होते.  हे लक्षात येत नाही, हे खरे.
चरैवेति चरैवेति...
चालत राहा... चालत राहा...

चालताना वाटेत पेड पार्किंग बाहेर बसलेल्या दोघांना नरेंद्र नगर चा रस्ता विचारला. त्यांनी दाखवलेल्या दिशेने चालू लागलो.  त्यातला एक जण म्हणाला बाबूजी नरेंद्रनगर तो यहा से बहुत दूर है टॅक्सी करनी पडेगी.  मी ठिक आहे असे म्हणालो आणि पाऊल उचलले. पुढे चढाचा रस्ता लागला.  गुगल बाबांनी जिथे वळायला सांगितले होते तिथे रस्त्यावर पाणी जाण्यासाठी चारी बांधली होती आणि त्याच्या मागे जंगलात जाणारी पायवाट दिसत होती. गुगल बंद केले व तसाच पुढे चालत राहिलो. रस्त्यावर विचारायला कोणी नव्हते.  पुढे गेल्यावर हायवेवर पाटी लागली नरेंद्र नगर.  डाव्या हाताला वळलो. आपले लक्ष नरेंद्रनगर होते.  इथून पुढे चढाचा रस्ता... घाट... घाट आणि घाट.  हिमालयात जाण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. समोरून मागून वाहने चालली होती. अर्धा तास चालल्यानंतर एका ठिकाणी तीन रस्ते येऊन मिळाले होते. तेथे पोलिसांनी पुढे जाणारा रस्ता बंद केला होता.  चौकशी केल्यावर पुढे दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होता व राडारोडा उचलून रस्ता क्लिअर करण्याचे काम चालू होते. त्यामुळे रस्ता बंद केल्याचे त्यांनी सांगितले. थांबलेल्या वाहनातील, रात्रभर प्रवास करून आलेले प्रवासी बराच वेळ वाहन थांबून ठेवल्यामुळे त्रस्त होऊन गाडीतून खाली उतरून येरझाऱ्या मारत होते. पोलीस चेक पोस्ट शेजारीच काली मातेचे मंदिर होते. सकाळच्या शांततेत कोणीतरी घंटा वाजवली त्याचा आवाज निरव शांततेत छान घुमला. मी चालत चाललो आहे, असे सांगितल्याने मला पुढे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली.पोलिसांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी पुढे निघालो.

 माझ्यासोबत एका हातात काठी व एका हातात पाण्याचा कॅन घेऊन एक जेष्ठ नागरिक पुढे चालले होते. झप झप  चालून त्यांना गाठले आणि चौकशी केली.  त्यावर त्यांनी मी व्यायामाला चाललो असून त्यांचे नाव केपीएस नेगी असे त्यांनी सांगितले . हातातला कॅन,  लावलेल्या झाडाला पाणी घालण्यासाठी घेऊन जात आहे असे ते म्हणाले नेगी हे आडनाव ऐकल्यावर मला पूर्वी भारतीय हॉकी संघात असलेल्या मीर रंजन नेगी या गोलकीपर ची आठवण झाली. चालताना ते हातातील काठी रेलींगवर आपटत आवाज करत चालले होते. याचे कारण विचारले असता रात्री रस्त्यावर हत्ती येतात‌. त्यांना पळवण्यासाठी मी काठीचा रेलींगवर आवाज करतो असे त्यांनी सांगितले. ऐकून माझी दातखीळ बसली.
काठीच्या आवाजाने बाकी जंगली पशु पळून जातात. पण हत्ती मात्र जाम हलत नाही. तो ठाम उभा राहतो व प्रसंगी अंगावर धावून येतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली.  हे गृहस्थ दहा मिनिटात परत जाणार होते. पुढे अंधारात घाट रस्त्यावर जंगलातून मला एकट्यानेच प्रवास करायचा होता. सगळाच उत्तराखंडाच्या घाट रस्ता जंगलाचा आणि प्राणी असलेला असा आहे.
हा प्रसंग माझ्यावर आला असता तर सामान टाकून पळून जाण्याशिवाय माझ्या हातात दुसरे काही नव्हते.  बघू या. गुरुदेव दत्त म्हणालो, जे येईल त्याला सामोरे जाण्याचे ठरवले आणि मी रेलींगवर काठी आपटत पुढे निघालो‌.

नरेंद्र नगर, हिंडोलाखाल, दुवाधार, आगराखाल, फकोट, बेमुंडा, खाडी, नांगणी, चंबा ही रस्त्यातील काही गावांची नावं.  गूगल बाबांनी दाखवलेल्या दोन गावाच्या मधील अंतर आणि प्रत्यक्षात अंतर यात फरक असल्याचे लक्षात आले. चंबाला नाष्टा केला चहा पिताना टपरीवाल्याशी बोलताना तो म्हणाला की, येथून गंगोत्री दोनशे किलोमीटर आहे. नवीन धरण बांधल्यामुळे आधीचा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे गंगोत्रीला जाताना तीस ते पस्तीस किलोमीटरचा फेरा पडतोय व त्यामुळे अंतर वाढले आहे अशी माहिती त्यांनी टपरी चालकाने मला पुरवली.

उत्तराखंड म्हणजे डोंगरी भाग. गंगोत्रीला जाताना जास्त चढ उतार कमी.  या राज्यात अनेक डोंगर रांगा आहेत.  येथील सर्वात मोठे शिखर नंदादेवी. आपण सुरुवात करतो छोट्या डोंगरातून पुढे हळूहळू गगनचुंबी सुळके स्वागतासाठी उभे असतात. त्यानंतर हळूहळू दिसू लागतात बर्फाच्छादित डोंगर आणि त्यांच्या अंगावर वाढलेले सूचिपर्णी वृक्ष. 

या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO ) आणि स्थानिक प्रशासन यांचे रस्ता बांधणी व  देखभाल आणि दुरुस्ती यांचे काम ३६५ दिवस चालूच असते. कोसळलेल्या दरडी उचलणे, रस्ता मोकळा करणे, वाहून गेलेला रस्ता पुन्हा नीट करणे, पूल दुरुस्त करणे,  कोसळण्याची शक्यता असलेल्या दरडी उतरवणे अशी अनेक कामे ते अविश्रांत करत असतात. सर्व रस्त्यावर जागोजागी पाट्या लावलेल्या दिसून येतात येथे थांबू नका, वाहन उभे करू नका, दरड कोसळण्याची शक्यता इत्यादी... वाटेत एका ट्रकचा मागचा ॲक्सल तुटून , मागील दोन चाके वेगळी झाली होती. 

प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची धडपड चालू आहे. जसे जसे आपण पहाडी भागात आत जातो तसे तसे सर्व गोष्टींचे परिमाण बदलत जातात उपलब्ध साधन संपत्ती, सुविधा या कमी होत जातात.  या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा आहे. सर्व भार खाजगी वाहतूक व्यवस्थेवर सोपवलेले दिसतो. सहाजिकच नफेखोरीसाठी जास्त प्रवासी भरून वाहने निघणे यावर कंत्राटदारांचा भर असतो. पंचवीस क्षमतेच्या बसमध्ये ४५ लोक भरले जातात. हात दाखवल्यावर वाहन उभे राहते. भाजीपाला, दूध, फळे, किराणामाल दूरवरून आणावा लागतो.
१०० किलोमीटरच्या परिसरात एखादे कॉलेज. इंजीनियरिंग कॉलेज राज्याच्या मुख्यालयामध्ये म्हणजे डेहराडूनला. आरोग्य सेवांची व्यवस्था तर विचारूच नका. जिल्हा आरोग्य केंद्रांमध्ये एक पुरुष व एक महिला डॉक्टर. तेच सर्व आजारांवर उपचार करणार. बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्यास पेशंटला सुरक्षित रुग्णालयात हलवे पर्यंत रुग्ण दगावणावरच. एकट्या पुणे शहरात ७० हून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत असे समजते. आपला आदिवासी भाग व येथील दुर्गम डोंगरी भाग यात फार फरक नाही. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी पण आदिवासी आणि डोंगरी लोक अजून दुर्लक्षितच आहेत असे खेदाने नमूद करावेसे वाटते. दोन वर्षांच्या कोव्हिडच्या कालावधीत इथे काय परिस्थिती झाली आहे याचा आपण अंदाज तरी बांधला आहे का ?

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*

चारधाम यात्रा

*चारधाम पदभ्रमण यात्रा...*

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - २*

हरिद्वारहून पहाटे ५ वाजता ऋषिकेश ला प्रमाण केले.

पहाटे लवकर उठून आवरून, सॅक भरली. धर्मशाळेत एक लखनऊ चा बारा तेरा वर्षाचा मुलगा काम करत होता. छोटू त्यांचे नाव. अगदीच कोवळा मुलगा होता. बिचाऱ्याला या वयात काम करावे लागत होते, हे पाहून वाईट वाटले.  अशा परिस्थितीत सुद्धा तो हसत मुख होता. त्याला चहा सांगितले चहा आणून दिला, साबण कुठे मिळते विचारले तर साबण आणून दिला‌ चार हेलपाटे मारले आधार कार्डची झेरॉक्स मिळावी म्हणून... जे सांगेल ते काम विना तक्रार करत होता. त्याला म्हणालो, उद्या पहाटे निघायचे आहे.  ५ वाजता दरवाजा उघडावा लागेल म्हणून तुला सांगून ठेवलं.   मी  दरवाजाजवळच्या खोलीत झोपतो. तुम्ही मला कधीही हाक मारा. मी दरवाजा उघडेन, काळजी करू नका, असे तो उत्तरला. दरवाजा आतून लॉक केल्यामुळे त्याला उठवण्याशिवाय पर्याय नव्हता. पाच वाजता निघताना त्याला झोपेतून उठवले. त्याने दरवाजा उघडला त्याला अच्छा केला आणि निघालो.
मजबुरी...या वयातील शहरी मुलं १० हाका मारल्या तरी उठत नाहीत. जबाबदारी मुलांना पोक्त करते. काही पैसे त्याच्या हातात ठेवून निघालो. तेवढेच मी करू शकत होतो.

गल्ली बोळ पार करत गंगामैयाच्या पुलावर आलो. पुलाच्या तोंडाशी सुमारे शंभर फूट उंचीचा एक मोठा केशरी रंगाने रंगवलेला जाडजूड खांब आणि त्याच्यावर त्रिशूल आणि डमरू लावलेले होते.  पहाटेच्या वेळी अंधारात त्रिशूल आणि डमरू विशेष लक्ष वेधून घेत होते.  पूल ओलांडला आणि हरिद्वार - ऋषिकेश हायवेवर आलो. डाव्या हाताला वळून ऋषिकेश कडे कूच केले.

 रात्रभर प्रवास करून आलेल्या लक्झरी गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या.  एकेक गाडीतून यात्रेकरू उतरून हरकी पोडीच्या दिशेने मार्गस्थ होत होते. मधूनच कार हायवेवरून आत वळत होत्या. चुकून पुढे गेलेल्या मोटारी बिनधास्त राॅंग साईडने येत होत्या. उतरणाऱ्या लोकांना हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी रिक्षा, सायकल रिक्षा यांची गर्दी झाली होती. रस्त्यावर चालणारा मी एकटाच होतो. रस्त्यावर शहरात असल्यामुळे दिवे होते. पण जसजसा पुढे गेलो तसे दिवे बंद झाले. पण तेवढ्यात फटफटू लागले. त्यामुळे हेड लाईट लावावा लागला नाही. पहाटे २० ते २२ डिग्री तापमान होते. आल्हाददायक वाटत होते,  परंतु वारं असल्यामुळे  थंडी बोचरी वाटत होती.कानाला गार लागायला लागल्यामुळे खिशातून रुमाल काढून कानावर बांधला. टोपी घातलेली होतीच. सर्व सामान पाठीवर सॅकमध्ये ठेवले होते. त्यामुळे दोन्ही हात मोकळे होते. 

हरकी पोडी संपल्यानंतर हरिद्वार संपतेच. सीमेवर असलेल्या एका बागेत  शंकराची एक भव्य मूर्ती उभी केलेली होती. त्याच्यावर फोकस टाकल्यामुळे मूर्ती अंधारातही दूरवरून सहजच दिसत होती. हरिद्वार नगरीत स्वागत करण्यासाठी आणि हरिद्वार नगरीचे रक्षण करण्यासाठी साक्षात महादेव सीमेवर पहारा देत उभे असावेत असे वाटले. मूर्ती खूप मोहक आहे. मूर्तीचे फोटो काढून पाय उचलले.

चालत असताना रस्त्याला दुकानाच्या हसू येईल अशा पाट्या दिसल्या एका दुकानावर पाटी लिहिली होती मुलाला मुन्नालाल टायर पंचर दुसऱ्या दुकानावर पाटी लिहिली होती, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मिक्साॅलाॅजी...मस्त पुढे निघालो.

रस्त्याने चालताना  कधी फूटपाथ तर कधी डांबरी सडकेवरून चालत होतो. मधूनच फूटपाथ गायब, तर कधी ओव्हरब्रीजच्या कामामुळे सर्व्हिस रोड छोटा...कुठे पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी यात्रेकरूंची गाडीत बसायची लगबग सुरू होती. 
एक मूर्तीकाराच्या दुकानात छान मूर्ती करून ठेवल्या होत्या. समोरच ठेवलेली भगवान बुद्धांची
मूर्ती जणू स्वागत करीत होती.

 आकाश लाल झाले, ७ वाजले होते. दोन तास चालत होतो. चहा पिण्यासाठी थांबलो. चहावाल्याने तंदूर पेटवला होता. एक जण हात शेकत होता. धुळीसाठी लावलेला मास्क उच्छ्वासामुळे ओला झाला होता. तो तंदूर वर गरम केला. मिथुन भाई,( दुकान चालकाचे नाव ) त्याने मस्त, गरमगरम, फक्कड व ग्लासभर चहा आणून दिला. १० मिनिटे विश्रांती झाली. पुढे निघालो.

८ वाजले. पोटात कावळे ओरडू लागले होते नाष्ट्याची व्यवस्था पाहायला हवी होती. परंतु कुठेही टपऱ्या दुकाने रेस्टॉरंट उघडण्याची चिन्हे दिसत नव्हती एका ठिकाणी उभा राहून एका मोटरसायकलला हात केला आणि विचारले तेव्हा त्यांनी सांगितले पुढे उजव्या हाताला आत गावात तुम्हाला दुकानात मिळतील तिथे नाश्ता मिळेल रस्ता क्रॉस करून पलीकडे गेलो वाटेत तिथला गावकरी भेटला तो म्हणाला गावातले सगळे दुकाने बंद आहेत समोर दिसणारे दोन स्नॅक्स सेंटर चालू आहे तिथे तुम्हाला नाश्ता मिळेल पुन्हा रस्ता क्रॉस करून समोर गेलो स्नॅक्स सेंटर मध्ये बसलो काय विचारले पराठे ची ऑर्डर दिली पराठे तयार होईपर्यंत घरी फोन करुन पत्नीसह वर्षाला सकाळी निघून तीन तासाचा प्रवास झाल्याचे कळवले आठ वाजेपर्यंत एकूण 13 किलोमीटरचा प्रवास झाला होता पाण्याचा वेग चांगला होता ख्यालीखुशाली कळवून व इतर चर्चा करून चौकशी करून कप्पा वरून फोन ठेवला व पुढे निघालो दोन पराठे त्याच्यावर अमूल बटर एक चहा पाण्याची बाटली एवढ्या सगळ्या चे बिल फक्त एकशे तीस रुपये.

चालताना पुढे  एक मोठा ओव्हरब्रीज लागला. तो खूप उंच होता. एवढे चढायला नको, म्हणून मी पुलाच्या सर्विस रोड कडून पुढे जाऊ लागलो. पुढे गेल्यानंतर तो सर्विस रोड पुलाच्या शेजारून जाता जाता  डेड एंड झाला होता हे मला नंतर समजले. तसाच पुढे चालत राहिलो. चालताना काय मला काही खरे वाटेना, म्हणून समोरून येणाऱ्या दोघांकडे चौकशी केली की हा रस्ता पुलाच्या तिकडे जातो का ? त्यातला एक जण म्हणाला याच रस्त्याने पुढे जा, तर दुसरा म्हणाला, जानवर का डर हैं, इधरसे मत जाव. पूल चढके पुरसे जाव. मी तसेच पुढे जायचे ठरवले.  वाटेत रेल्वे क्रॉसिंग होते. धड रस्ताही नव्हता. कसातरी उड्या मारत,हकसरत करीत पुलाच्या डाव्या हाताला पोहोचलो.  काल ज्या धर्मशाळेत मी उतरलो होतो तिथल्या मॅनेजर काकांनी मला आधीच घाबरवुन सोडले होते. पहाटे लवकर निघू नका, वाटेत जंगले प्राणी असतात. त्यामुळे मी पहाटे तीनच्या ऐवजी पाच ला निघालो आणि सकाळी सात वाजले तरी त्या दोघांनी मला जंगली प्राण्यांची भीती घालून  आणखीन घाबरून सोडले. तरीही मनाचा हिय्या करून मी पुढे चालत राहिलो. समोरून चालत आलेली एक दोन माणसे मागे गेली.   रेल्वे क्रॉसिंग करून पलिकडे गेल्यानंतर वनखात्याचे चेकपोस्ट दिसले. त्यांच्याकडे चौकशी करता ते म्हणाले की, रात्री पुलाखालून प्राण्यांची ये-जा असते आणि आता तर सकाळ झाली त्यामुळे आता प्राणी येत नाहीत. फुकट दोन तास उशीर निघालो, त्यामुळे उन्हात चालावे लागणार होते. कपाळावर हात मारला आणि चालू लागलो. पुलावरून सोडून गेलो असतो तर परवडले असते, इतका वेळ या सगळ्यात गेला होता.

 पुढे रस्त्यात ठिकठिकाणी बोर्ड लावले होते. मोतीचूर रेंज, राजाजी टायगर रिझर्व.  प्राणी रस्ता ओलांडतात, प्राणी रस्त्यात येऊ शकतात, गाडीतून उतरून नका.  हे मी घरी सांगितले असते तर घरच्यांनी मला सकाळी सातच्या आत बाहेर पडू नको सल्ला दिला असता. पण मी निघून इथे येईपर्यंत जवळजवळ दोन तास गेले होते व लक्ख उजाडले होते. 

ऊन वाढू लागले होते मी रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला गेलो. आता माझ्या समोरून वाहने येत होती. या बाजूला थोडी झाडी असल्यामुळे थेट ऊन अंगावर येत नव्हते. काही सोनचाफ्याची तर काही अनोळखी झाडे होती. चालताना झाडांची महत्त्व कळते. कितीही कडेने चालले तरी वाहने अगदी शेजारून जात होती. एकूणच पादचाऱ्यांना शून्य किंमत असते.

वाटेत काली कमलीवाले बाबा यांची मोठी गोशाळा लागली. मोठे आवार, सुसज्ज व्यवस्था, खूप गोधन होते. उत्तराखंड मध्ये काली कमलीवाले बाबा यांचे अनेक ठिकाणी आश्रम आहेत. बाहेरच्या मानाने तेथे माफक दरात निवासाची सोय होते.

 सावलीमुळे चालणे थोडे सुसह्य झाले. पण  ऊन लागायला लागल्यामुळे  तहान लागून सारखे पाणी प्यावे असे वाटत होते. सुरुवातीला पाणी   प्यायलो,नंतर ज्यूस, उसाचा रस, शहाळे असे करत करत वाटचाल चालू होती. दहा वाजता हायवेवर लावलेली आडवी पाटी दिसली... ऋषिकेश पाच किलोमीटर !!!  एक तासात आश्रमात पोहोचू असा विचार केला. गुगल मॅप उघडून स्वामी रामानंद आश्रमाचा पत्ता टाकला तर तो दोन तास पंधरा मिनिटे ची वेळ दाखवत होता.  चुपचाप गुगल मॅप बंद केले आणि पाय उचलले. 

थोडे पुढे गेल्यानंतर एक स्थानिक नागरिक भेटला. त्याला आश्रमाचा पत्ता विचारलं तर त्यांनी मला नीट पत्ता सांगितला तो म्हणाला पुढे गेल्यानंतर  चंद्रभागा ( एक क्षण नाव ऐकून मला आश्चर्य वाटले ) पूल लागेल. तो पूल ओलांडला की उजव्या हाताला वळा आणि मग विचारत विचारत पुढे जा. आश्रम खूप लांब आहे. तुम्हाला रिक्षाने जावे लागेल.  त्यावर मी हरिद्वार पासून चालत आलोय सांगितल्यानंतर तो चकित झाला. पण तरीही आश्रम खूप लांब आहे हे सांगणे त्यांनी मात्र सोडले नाही. नंतर माझी चौकशी केली, तुम्ही कुठून आलात कशासाठी चालत आलात  वगैरे विचारले माहिती दिल्यानंतर शुभेच्छा देऊन तो त्याच्या वाटेने, तर मी माझ्या वाटेने निघालो. सासूबाई आणि सासरे यांना वाटचालीची माहिती कळविली. त्यांचे आशीर्वाद होतेच. त्यांनी चार धाम यात्रेसाठी त्यांचा सहभाग व शुभेच्छा म्हणून आर्थिक वाटा उचलला. माझ्या या पूण्यकर्मात सर्वांचा वाटा होताच. एकट्याने सगळे थोडेच होते. 

चालताना उजव्या हाताला बहात्तर सीडी नावाचा घाट नावाचा घाट लागला. त्यावर मंदिर गंगेश्वर बजरंग महादेव अशी पाटी होती.  येथून खाली डोकावल्यावर ऋषिकेश च्या गंगेचे प्रथम दर्शन झाले. दोन मिनिटं उभा राहिलो, फोटो काढले आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. ऋषिकेशमध्ये चौकशी करीत रामानंद आश्रमात पोहोचलो. माझे बुलढाण्याचे एक मित्र श्री सुनील वायाळ यांनी त्यांच्या नातेवाईकां मार्फत सदर आश्रमात राहायची सोय केली होती. रजनीकांत, नरेंद्र मोदी हे स्वामी रामानंद यांचे शिष्य. मला पण आपण सेलिब्रिटी झाल्याचा फील आला...

श्री अशोक वायाळ यांची भेट घ्यायची होती.
आश्रमात प्रवेश करून त्यांची चौकशी केली तर ते समोरच उभे. नमस्कार केला. समक्ष भेट आज प्रथमच झाली होती. काल फोन करून मी उद्या १२-१ वाजेपर्यंत पोहोचतो आहे, असे कळवले होते. श्री अशोक वायाळ यांचे वडील ऋषिकेश ला संस्कृत शिक्षणासाठी. त्यांनी पुढे पीएचडी केली व येथेच स्थायिक झाले. स्वामी रामानंद तसेच त्यांचे उत्तराधिकारी  विद्यमान स्वामीजीं
यांचे ते अगदी निकटचे सहकारी आहेत. त्यांना अनेक भारतीय भाषा अस्खलितपणे बोलता येतात. अतिशय उमदा माणूस व प्रभावी व्यक्तिमत्त्व. तुम्ही कितीही दिवस राहा, काळजी करू नका असे त्यांनी मला अनेकदा सांगितले.
ऋणानुबंध म्हणायचे...त्यांचा टूर्स आणि ट्रॅव्हल्स चा व्यवसाय आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा यात्रेकरूंची गर्दी लोटली होती. सगळी लाॅजेस, आश्रम, धर्मशाळा ओव्हरफुल झाली होती. त्यांना कामामुळे उसंत नव्हती.

दुपारचे १२.३० झाले होते. आश्रमाची जेवणाची वेळ झाली होती. घंटा वाजली. आम्ही भोजनासाठी गेलो. सगळा शिस्तबद्ध कारभार...
तांदळाची खीर, मेदू वडे, सांबार, कारल्याची भाजी व ताक... भरगच्च मेन्यू.
हवे तेवढे घ्या, फक्त टाकू नका. जेवण झाल्यावर स्वतः चे ताट, चमचे, भांडे स्वतः स्वच्छ धुवून ठेवायचे. चांगला नियम व शिस्त.

आश्रमात बरेच विद्यार्थी आढळले. यातील काही लहान तर काही प्रौढ ही होते. तीन वर्षांचे वैदिक व उच्च शिक्षण येथे देतात. तरूण संन्याशी ही येथे बरेच आहेत. सायंकाळी तांदळाची खिचडी,कढी, रस्सा भाजी व पोळी असा मेन्यू होता.

या आश्रमात सर्वांना सरसकट प्रवेश मिळत नाही. अनुयायी, शिष्य, विद्यार्थी यांनाच प्रवेश दिला जातो. आश्रम खूप मोठा, स्वच्छ ठेवलेला परिसर असा आहे. शंकराचे मंदिर, स्वामीजींचे समाधी स्थान,यज्ञ शाळा, पाहुण्यांसाठी सुसज्ज व वातानुकूलित खोल्या. मोठे भोजन गृह. पार्किंगसाठी भरपूर जागा.

आश्रमाच्या मागील बाजूस गंगा वाहात असते. त्यावर बांधलेला घाट. सायंकाळी मनोहारी वातावरण असते. लोक पायऱ्यांवर येऊन बसतात. कोणी एकटा येतो, तर कोणी सहकुटुंब.
कोणी ध्यानात मग्न तर कोणी मित्र मैत्रिणींशी हितगुज करण्यात मशगुल. कोणी आरती करून दिले पाण्यात सोडतो तर कोणी पाण्यात पाय सोडून विचारात हरवलेला... कोणी पाण्यात खेळत असतात तर कोणी दुरूनच गंगामैय्याला डोळ्यात साठवत असतात...घाटाच्या पायऱ्यांवर बांधलेल्या रस्त्यावर व्यायाम करणारे, सन्याशांची ये-जा चालू असते...बऱ्याच वृद्धांची मनिषा सफल झाल्याची भावना.

 संध्याछाया पसरत असतात, समोर गंगामैय्या संथपणे वाहात असते, कोणीतरी आरती करून सोडलेले दिवे हेलकावे खात पुढे जात असतात, मधूनच एखादा मासा पाण्यावर उडी मारून क्षणात पाण्यात लुप्त होतो, मासे आपल्याशी लपाछपी खेळत असतात... प्रत्येक आश्रमाच्या गंगारती होतात. हा छोटेखानी सोहळा असतो.
चटई पसरून बसलेले भाविक. मंत्र म्हणणारे विद्यार्थी, दीपमाळेला लावलेल्या वाती...उदबत्तीचा सुगंध, वातींचा धूर...

हळूहळू काळोख आपले बाहू पसरतो. उरल्या सुरल्या संधीप्रकाशाला कवेत घेतो. लोक घरी परतू लागतात... मागे उरतो गंगामैय्याचा आवाज, दूरवर दिसणारे मंदिराचे दिवे, साधनामस्तांसाठी उत्तम वेळ... कालचक्र आहे हे...न थांबणारे.
मर्त्य मानव, आज असणारे उद्या नाहीत... निसर्ग मात्र तोच आहे...