पहिली भटकंती एक्सप्रेस:- सोलो

 🥗 पहिली भटकंती एक्सप्रेस:- सोलो 🥙

🥙🥙🥙 भाग एक 🥗🥗🥗

दहावी ऑक्टोबर पास होऊन नुकताच कॉलेजात जाऊ लागलो होतो. त्यावेळेस माझ्या जवळच्या नात्यातील नवविवाहितेस भिवंडीतील अंजूर फाट्याला सोडायचं सोडायचं होतं. आणि सोडून परत येण्यासाठी किमान तीन दिवस तरी लागणार होते. साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी महिना असावा तो. शेतातील कामाचे ते दिवस असल्याने तीन दिवस म्हणजे खूप मोठा काळ होता. मग शेतीमधील कामासाठी कमी कामाचा किंवा बिनकामाचा आणि बसच्या पाट्या नीट वाचून योग्य ठिकाणी जाऊन न चुकता परत येऊ शकेल  म्हणून माझा विचार समोर आला. इतक्या लांबवर जायची ही आमच्या कुटुंबातील पहिलीच वेळ होती. त्यामुळे मुराळी म्हणून जाणारा हा सुशिक्षित पण असावा आणि त्याच्यामुळे शेतातील कामात अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. म्हणून मी मुराळी म्हणून जावं असं माझ्या पश्चात ठरलं आणि माझ्यापुढे मुराळी म्हणून जायचा प्रस्ताव आला आणि मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पण मनातला आनंद मी दाखवू शकत नव्हतो. नाही तर पाव्हन्यांच्या घरी जाऊन यायचंय, जत्रेला नाही जायचं असं ऐकून घ्यावं लागलं असतं. 

दोन दिवसांनी निघायचं होतं. कसं जायचं हे सुद्धा माहिती नव्हते फक्त लांब फिरायला जायचं हे मात्र मनातल्या मनात ठरवलं होतं पण ते कुठे, कसं याचा काहीच विचार केला नव्हता. मुंबई बघायला मिळणार आहे याचा मात्र खूपच आनंद झाला होता.

बार्शीतून सायंकाळी सहा वाजता उस्मानाबाद- मुंबई या गाडीने  निघालो. परांडा करमाळा नगर अशी गावं मागे पडत होती. रात्रीच्या जेवणासाठी नगरच्या पुढे कुठेतरी बस थांबली. सोबत चपात्या होत्याच फक्त भाजी मागवली आणि जेवण केलं. ही आयुष्यातील पहिलीच वेळ हॉटेलात जेवायची. त्यामुळेच बहुतेक पण जेवण आवडलंच नाही. गाडी सुरू झाली आणि झोप कधी लागली ते कळलंच नाही. माळशेज महाराष्ट्राचं कुलू-मनाली  रात्री कधीतरी याच घाटातून गाडी गेली असेल पण तेव्हा हे नावसुद्धा माहिती नव्हतं. अगदी पहाटे पहाटे अंजूर फाट्यावर उतरून पाहुण्यांच्या  घरी गेलो. एक काम संपलं होतं. सकाळी पाहुणे कामावर निघून गेल्यावर घरी मात्र मला घरात करमेना, जेवण झाल्यावर बाहेर कुठे तरी फेरफटका मारून यावा असं ठरवलं पण कुठे जायचं? हे मात्र माहीतच नव्हतं. 

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙


🥗 पहिली भटकंती एक्सप्रेस:- सोलो 🥙

🥗🥗🥗 भाग दोन 🥙🥙🥙

बंद घरात बसून राहणं जमतच नाही. छोट्या छोट्या गल्लीतून अंजूर फाट्याच्या चौकात आलो. जायचं कुठे? हे ठरवलंच नव्हतं, सोलो ट्रीपमध्ये ही एक चांगली गोष्ट असते. नियोजन कधीही बदलू शकतो. अचानक भिवंडीला जाऊ असं ठरवलं,लगेचच रिक्षात बसून भिवंडी बसस्टँडला आलो. तिथून वज्रेश्वरीला जाणारी बस फलाटावर थांबली होती. बसमध्ये बसलो आणि बस सुरू झाली. अर्धा पाऊण तासात वज्रेश्वरीला बस आली, पण तिथं उतरण्यापेक्षा तिथून अंदाजे पाच किमी अंतरावर असलेल्या गणेशपुरी या ठिकाणी आलो. 

स्वामी सद्गुरू नित्यानंद महाराज  यांच्या समाधी मंदीरापासून जवळच असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ आलो. अखंड गरम पाणी तेही नदीच्या पात्रात?? खूपच आश्चर्यकारक होतं. 

तानसा नदीच्या पात्रात चारीबाजूला थंड पाणी वाहत असते आणि मधोमध असलेल्या कुंडातून अखंड गरम पाणी वाहत होते. त्यामागील वैज्ञानिक कारणं त्यावेळी माहिती नव्हती. अखिल महाराष्ट्रातून अनेक माणसं इथं आली होती. इथल्या कुंडातून वाहणाऱ्या गरम पाण्याने अंघोळ करत होती. नदीपात्रात असलेल्या कुंडातून वाफा बाहेर पडत होत्या. मी जवळ जाऊन पाणी किती गरम आहे हे बघितलं तर हाताला चटका बसेल इतकं पाणी गरम होतं. त्या पाण्याने अंघोळ कशी करणार? असा विचार करत होतो. थोड्या वेळाने एक गोष्ट लक्षात आली की या पाण्याशी शरीर समायोजित झालं की मग पाण्याचे चटके बसत नाहीत. 

कुंडाच्या परिसरात बरमुडा, टॉवेल, प्लास्टिकचा मग हे दोन रुपये भाड्याने मिळत होते. माझ्यासारख्या अनेकांची त्यामुळे सोय होते. मी पण वरील साहित्य भाड्याने घेतले पण एकटाच असल्याने अंगावरचे कपडे ठेवायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला पण मनाचा हिय्या करून  एका ठिकाणी जिथं माझं सारख लक्ष जाईल तिथं कपडे ठेवली. एका व्यक्तीला माझे फोटो काढण्याची विनंती केली आणि फोटो काढून कॅमेरा सुद्धा तिथंच ठेवायला सांगितलं.

घरी अंघोळीला गरम पाणी असतं त्याहीपेक्षा ज्यास्त गरम पाणी होतं. एकटाच असल्याने किती वेळ घालवायचा हे मी एकटाच ठरवणार होतो. पण माझ्याकडे भाड्याने असलेल्या वस्तू जास्त वेळ माझ्याकडे ठेवणे दुकानदारास परवडणारे नव्हते म्हणून तो सारखं सारखं मला झालं का?  म्हणून हटकत होता. केवळ त्याच्या बोलावण्यामुळे मी इथली अंघोळ आटोपती घेतली. 

मनात विचार आला की या पाण्याने त्वचा रोग बरे होतील की नाही हे माहीत नाही पण मला मात्र खूपच छान वाटत होतं. सगळं शरीर अगदी हलकं होऊन गेले होते. 

भारतातील उष्ण पाण्याचे झरे

भारतामध्ये 340 ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. त्यापैकी 232 गरम पाण्याचे झरे आठच राज्यात आहेत. महाराष्ट्रात 28 गरम पाण्याचे झरे आहेत त्यापैकी 18 झरे कोकणात आहेत. तुम्ही कोणत्या तरी गरम पाण्याच्या झऱ्यात स्नान केलं आहे की नाही? केलं असेल तर नाव सांगा, नसेल केलं तर कोरोना संपला की लगेचच निघा, जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्याकडे. आणि तुमचा अनुभव सांगा. मी कोकणात असलो की जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्याकडे जातोच अंघोळ करायला, त्वचा रोग बरे होतात की नाही हे माहिती नाही पण दिवसभरात आलेला थकवा मात्र निघून जातो हा माझा अनुभव आहे.

 इथसुद्धा गणेशपुरी, अकलोली, दातावली इथं गरम पाण्याचे झरे आहेत. सद्गुरू स्वामी नित्यानंद महाराजांच्या समाधीचे  दर्शन घेतले आणि वज्रेश्वरी कडे निघालो.

वज्रेश्वरी देवीचे मंदिर जरा उंचीवर आहे आणि त्याचा जीर्णोद्धार चिमाजीआप्पा  यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. वसई किल्ल्यावर हल्ला करण्याआधी आप्पांनी देवीला नवस केला होता असे म्हणतात. तीनशे वर्षापूर्वीचे मंदिर खूपच प्रशस्त आहे. देवीचे दर्शन घेऊन मी परत भिवंडीच्या मार्गाला लागलो. तिथून परत अंजूर फाट्यापर्यंत येईस्तोवर सूर्य क्षितिजापलीकडे गेला होता आणि कातरवेळ नुकतीच अवतरली होती आणि त्यामुळे आसमंतात एक वेगळाच भाव दिसत होता.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙


🥗 पहिली भटकंती एक्सप्रेस:- सोलो 🥙

🥗🥗🥗 भाग तीन 🥙🥙🥙

कालचा दिवस गणेशपुरी, वज्रेश्वरी अशी ट्रिप झाली होती ती ही अचानक, आज मात्र जरा नियोजन केले होते. माझ्या आयुष्यातील पहिलाच ट्रेक, पहिलाच किल्ला, कोणता असेल तो? तर कल्याणजवलील मलंगगड, हाजीमलंग!!! तुम्ही सर्वप्रथम कोणता किल्ला पाहिला? आठवतो का? आठवणारच, नव्हे, नव्हे विसरणारच नाही. तर सांगा बरं तुम्ही सर्वप्रथम कोणता किल्ला पाहिला?

सकाळी जेवण झाल्यानंतर अंजूर फाटा, भिवंडी वरुन कल्याणला आलो. बस स्थानकाबाहेर आलो आणि हाजीमलंग किंवा मलंगगड  कडे जाणाऱ्या वाहनाचा शोध घेत होतो तेव्हा लगेचच ध्यानात आले की तिकडे जाणारे बरेच जण आहेत आणि वाहनांची संख्या सुद्धा भरपुर आहे. एका रिक्षात बसून मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या वावंजे गावात आलो. कल्याण पासून इथं येईपर्यंत तासभराचा वेळ गेला होता. पण एक गोष्ट मनाला चटका लावून जात होती ती म्हणजे अनेक ठिकाणी हाजीमलंग आणि मलंगगड अशी माहिती दिली होती. काही कट्टर आणि धर्मांध संघटनाची नावं पण लिहिली होती. दोन तीन वर्षापूर्वीच मुंबईत जातीय दंगली झाल्या होत्या त्यामुळे खूपच वाईट वाटलं पण आपलं  हे वाईट वाटणं हे देखील वैयक्तिकच. कल्याण शहराच्या बाहेर आल्यापासूनच उंचच उंच डोंगर लक्ष वेधून घेत होते. सह्याद्रीच्या या डोंगररांगा प्रथमच पाहत होतो. या आधी बालाघाट डोंगररांगा, महादेवाच्या डोंगररांगा बघितल्या होत्या पण त्यापेक्षा कितीतरी पटीने उंच डोंगर मी पाहत होतो. पहिलीच वेळ असल्याने मी खूपच एक्साईट झालो होतो. वावंजे गावात उतरून किल्ल्याकडे निघालो. माझ्यासारखे अनेकजण होते, काही भाविक सुद्धा होते. पण माझ्यासारखं सोलो कुणीच नव्हते. 

आता जर मी ट्रेकला निघालो तर सोबतीला मित्र, सॅक, त्यात पाण्याची बाटली, खाऊ,हाप पॅन्ट, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सोबत असतात पण यावेळी मात्र सोबतीला काहीच नव्हतं. पायथ्याशी आल्यावर उंचीचा अंदाज आला होता पण जायला किती वेळ आणि यायला किती वेळ याचा अंदाज मात्र आला नव्हता. वाटेत अनेक ठिकाणी माकडं होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे काही तरी खायला मिळेल या हेतूने बघत होते. बरेच जण त्यांना खायला देत होते. पण माझ्याकडे काहीच नव्हते. 

जिथं वर्दळ असते तिथं सौंदर्य राहत नाही. तसंच  इथंही झालेलं दिसलं. तासभर चालून हाजीमलंग साहेबांच्या दर्ग्याच्या परिसरात आलो, दर्ग्याचं दर्शन घेऊन दुकानांच्या गर्दीतून थोडं बाहेर पडलो. नॉनस्टॉप चालून घशाला कोरड पडली होती. सोबत पाणी नव्हते त्यामुळे पाण्याची बाटली विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पाणी पिऊन थोडी हुशारी आली.

दर्ग्याजवळच मच्छीन्द्रनाथ  यांची समाधी पण आहे. आणि हे ठिकाण किल्ल्याच्या मध्यावर आहे. किल्ला हा तीन टप्प्यात किंवा भागात आहे. दर्गा असलेले ठिकाण म्हणजे पीरमाची,त्याच्यापेक्षा वरची माची  सोन माची आणि सर्वात उंचीवर बालेकिल्ला आहे. सभोवताली खूप खूप दूरवरचा परिसर दिसतो. या ठिकाणी आल्यावर माहिती नव्हते की बालेकिल्ला पाहता येणार नाही कारण सोनमाचीच्या वरती बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पर्वतारोहण करण्याची कला आणि साहीत्य देखील हवे असते. मला माहिती नसल्याने एकटाच वरती चाललो होतो. उंचावर जाऊन सभोवताली असलेल्या परिसराला न्याहाळणे हे खूपच आवडते. सोन माचीवरून देखील खूप खूप दूरवर असलेला परिसर दिसतो. पुढे जाता येते की नाही हे माहिती नसले तरीही मी निघालो होतो. पण परतीच्या वाटेवर असलेल्या काही ट्रेकर्सनी मला हटकले आणि एकट्याला वरती जाणे शक्य नाही असे सांगितले आणि परत जाण्याचा सल्ला दिला. कारण हातात फक्त पाण्याची बाटली घेऊन मी बालेकिल्ल्याकडे निघालो होतो. त्यांच्या सांगण्यावरून अनिच्छेनेच मी परत आलो. परत तोच मार्ग, तोच परिसर खूप मज्जा येत होती. बालेकिल्ला पाहता आला नाही याचं फारसं काही वाटत नव्हतं. जेवढं पहायला मिळाले होते ते सुद्धा काही कमी नव्हते. सकाळीच जेवण केल्यामुळे खूप भूक लागली होती पण खरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता कारण भूक लागली म्हणून बाहेरचं खाणं ही इच्छा ही नव्हती आणि आवडही. परत त्याच मार्गाने वेळेत अंजूर फाट्याला आलो. हा किल्ला शहरालगत असल्याने वाहनांची संख्या भरपूर असते. पुढच्या भागात मलंगगडाची माहिती पाहू.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

🥗 पहिली भटकंती एक्सप्रेस:- सोलो 🥙

🥙🥙🥙 भाग चार 🥗🥗🥗

🥗🥗 किल्ले मलंगगड 🥙🥙

मलंगगड महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.


मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे याच मंदिरातील मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीला हाजीमलंग म्हणतात. येथील मलंग मच्छिंद्रनाथ समाधीची यात्रा माघ पौर्णिमेला असते. या यात्रेत नाथांची पालखी निघते. या पालखीवर ॐकार आहे व नाथ संप्रदायाची चिन्हे आहेत. या स्थानाचा मालकी वाद हा मुंबई सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी हिंदू पक्षकार म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे हे पाहत आहेत. दर पौर्णिमेला या समाधीची आरती होते व समाधीवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते. या समाधीच्या पूजेचा मान आजही केतकर या हिंदू ब्राम्हण घराण्याकडे आहे.


स्थान

मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे आणि तो पनवेल वरुण वावंजे गावपासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे, बदलापूरच्या नैर्ऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा व उरण नैर्ऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता.


इतिहास 

ॲबिंग्डन ह्या इंग्रजी अधिकाऱ्याने १७८० मध्ये मलंगगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरवले. लढाई सुरू होताच नैर्ऋत्येच्या व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यांस ३०० माणसांनिशी नेमलेले हाते. अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही. १२५ जण सोने माचीकडे धावले. तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले. ॲबिंग्डनने गडावर पोहचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीर माचीपर्यंत वाट शोधून काढली. नाना फडणविसाने वेढा उठवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. ॲबिंग्डनने पीर माचीच्या पठारावर तीन तोफा चढवल्या व सोने माचीवर गोळीबार चालू केला. पण प्रवेशद्वार मोठ्या खुबीने बांधले असल्यामुळे तेथवर गोळे पोहचेनात. मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहीत असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता. किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली पण त्यांनी प्रत्यक्ष न येता ७०० शिपाई पाठवले जे तेथवर पोहचू शकले नाहीत. कॅप्टन ॲबिंग्डनने शिडा लावून २५० माणसे सोने माचीवर चढवली. पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्यांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. ॲबिग्डनने पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. गंगाधररावाने संधी साधून दाणापाणी व दारूगोळा भरून घेतला. नाना फडणीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राधो विश्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. त्यांच्या फौजा शिरवळ या मलंगच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहचल्या. मराठांची फौज तीन हजारावर होती. त्यांनी शत्रूला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. १६ सप्टेंबरला गारांची एक पलटण पीर माचीवर चाल करून गेली. त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या.


मेजर वेस्टफॉलने ॲबिंग्डनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली. या सेनेने रसद घेऊन येणाऱ्या मराठांच्या तुकडीला उद्ध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. काही धान्य पावसाने नासले, खजिना संपत आला. मराठ्यांनी इंग्रजांचेही दळणवळण तोडून टाकले होते. तेव्हा कर्नल हार्टलेने बेलापूर, पनवेल, तळोजे मार्ग सुरक्षित केला. शिरवळच्या मराठ्यांच्या तळावर हल्ला करून त्यांना हुसकावून लावले.


आता ब्रिटिशांनी कॅप्टन कारपेंटरच्या हुकमतीत मलंगगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा भडिमार सुरू केला. तटाला भगदाड पडले की आत घुसायला ३५० सैनिक तयार ठेवले होते पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवला. इंग्रजांचे बरेच सैनिक कामी आले. तेव्हा इंग्रजांनी हल्ले थांबवले. पण वेढा मात्र उठवला नाही. पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार करून त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले. ऑक्टोबरनंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागली. बाहेरून गंगाधर कार्लेकर काही मदत पाठवू शकले नाहीत. शेवटी नाना फडणविसाने काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसईवर धाडली. स्वतः नाना व हरिपंत फडके दहा हजार फौजेसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. त्यामुळे हार्टलेला प्रतिशह दिला जाणार होता. ताबडतोब हार्टलेने मलंगगडावरून सैन्य काढून घेतले व लगेचच मराठांनी मलंगगडाकडे जादा कुमक व रसद धाडली. अशाप्रकारे मराठांनी अखेरपर्यंत मलंगगड शर्थीने लढवला.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

माचीवरून सरळ पुढे जात पलीकडचे टोक गाठायचे. तेथून एका चोर वाटेने खाली उतरले की गडाच्या निम्म्या उंचीवर एक आश्रम लागतो. तिथून गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाच्या दिशेने वळसा घेत जाणाऱ्या वाटा निघतात. पहिली वाट खाली वावंजे गावात जाते. तेथून पनवेलला जायला एस टी मिळते. उत्तर दिशेच्या वाटेने गेले की दोन वाटा फुटतात. सरळ जाणारी वाट गडाला वळसा घालून पालखीसारख्या आकाराच्या खडकाखालून किल्ल्यावर जाते. उजवीकडे खाली उतरणारी वाट मलंगगड व गणेश कार्तिक सुळक्यांचा डोंगर यांच्यामधील खिंडीत पोहचते. माचीवरून बालेकिल्याकडे जाण्यासाठी कडाला उजवीकडे ठेवत वळसा घालून गेले की खोदीव पायऱ्या दिसतात. पायऱ्यापुढे एक गुहा व पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाणे कठीण आहे. पन्नास साठ पायऱ्यांनंतरच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. तो भाग चढण्यासाठी दहा बारा फुटांचा एक पाईप आडवा टाकलेला आहे आणि हातांच्या आधारासाठी दोर लावला आहे. हा अवघड टप्पा पार करून दहा मिनिटांत गडमाथ्यावर पोहचता येते. शिरोभाग तसा लहान आहे. छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक वाडा दिसतो. त्याच्या मागे खोदलेली सात टाकी आहेत. बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराचे झाड आहे.श्रीगणेश मंदिरसुद्धा आहे.आणि काही ठिकाणी तटबंदीही आहे. बालेकिल्याच्या समोरच देवणीचा सुळका आहे. येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते असे म्हणतात. पूर्वेकडून नैर्ऋत्येकडे गोरखगड, राजमाची, माथेरान, पेब, इर्शाळ, प्रबळगड हा परिसर दिसतात.


गडावर जाण्याच्या वाटा

कल्याणहून सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. पनवेल वरुण वावंजे गावांसाठीही बसची सोय आहे, वावंजे गावपासुन २ की.मी. अंतरावर गडाचा पायथा आहे, पायथ्यापर्यंत रिक्षाची सोय आहे, गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. तिथपर्यंत पायऱ्या आहेत. वाटेत दुकाने आहेत. एक देवीचे मोठे मंदिर आणि शंकराचे लहान देऊळ आहे. वरच्या या दर्ग्यापर्यंत भविकांची भरपूर वर्दळ असते. दर्ग्याच्या अलीकडे दुकानांच्या रांगेतून एक बोळ उजवीकडे जातो. तेथे घरे आहेत आणि विहीरही आहे. वाट समोरच्या डोंगराला लागून उजवीकडून वर चढायला लागते. पधंरा वीस मिनिटांत पहिला चढ पार करून वरच्या उभ्या कड्यापाशी पोहचता येते. तसेच श्री मलंगगडाच्या दक्षिणेच्या समोरील बाजूस पनवेल तालुक्यातील (शिरवली गाव) आहे त्या गावा समोर एक आदिवासी कोंडपवाडी आहे त्या ठिकाणाहून एक सोपी पायवाट आहे. पूर्वी रोजी रोटी साठी गावकरी गडावर याच वाटेतून जात असत


राहण्याची सोय

येथे राहण्याची सोय आहे


जेवणाची सोय

येथे जेवणाची सोय आहे. गडावर लहान मोठी हॉटेले आणि इतर दुकाने आहेत.


पाण्याची सोय

गडावर अनेक टिकाणी पाण्याची टाकी आहेत. यातील पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते.


जाण्यासाठी लागणारा वेळ

पायथ्यापासून २ तास.

साभार:- विकिपीडिया

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙


🥗 पहिली भटकंती एक्सप्रेस:- सोलो 🥙

🥗🥗🥗 भाग पाच 🥙🥙🥙

🥙🥙🥙 जीवाची मुंबई 🥗🥗🥗

दोन दिवस झाले होते भिवंडी मध्ये येऊन, दोन दिवसांत वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली, हाजी मलंग, मलंगगड इत्यादी ठिकाणे पाहिली होती. आता मुंबई बघायची होती. आतापर्यंत मुंबई म्हणजे फसवाफसवी, मुंबई म्हणजे मायापुरी, मुंबई म्हणजे दोन नंबर धंदे, मुंबई म्हणजे लोकल आणि त्यामधील गर्दी, मुंबई म्हणजे दाऊद, मुंबई म्हणजे गँगवॉर, मुंबई म्हणजे गुन्हेगारी अन, मुंबई म्हणजे गेट वे ऑफ इंडिया असंच ऐकलं होतं. 

यापैकी गेट वे ऑफ इंडियाचे आकर्षण असल्याने फक्त गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी मुंबईला जायचं होतं आणि कमी पैशात प्रवास म्हणून लोकलने जायचं होतं. अंजूर फाटा ते ठाणे असा प्रवास करून ठाण्यावरून शेवटचे स्टेशन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) चे तिकीट काढलं होतं, अर्थात त्यावेळी मात्र त्याचं नाव व्हिकटोरिया टर्मिनस VT असंच होत. ठाण्यातून लोकलमध्ये बसताना अकरा वाजले असतील. लोकलला तितकीशी गर्दी नव्हती तरीही आपल्या दृष्टीने खूपच गर्दी होती.

गर्दीत बसायला जागा नसल्याने मी उभा राहिलो तेही दरवाज्यातील खांबाजवळ उभा होतो, लक्षपूर्वक तोल वगैरे सांभाळून. पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो आहे हे मात्र माझ्या लक्षात आले नाही आणि एका स्टेशनवर एक कोळीण ओरडली की उतरायचं नसेल तर मागे उभा रहा म्हणून. बहुतेक तिने मला बरेच वेळ झाले बघितलं असावं. मग मी माझ्याकडून झालेली चूक ध्यानात घेऊन रिकाम्या जागेवर बसलो. नजर मात्र बाहेरच भिरभरत होती. कोणत्या स्टेशनवर गाडी आली आहे आणि   vt किती वेळ लागू शकतो हेच मी बघत होतो. एक दोन लोकांना विचारलं सुद्धा आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने 'कोठून आलास ? ' म्हणून हटकले. 'सोलापूरहून' असं मी म्हटलं.

गप्पा मारायला सुरुवात झाली आणि त्यांच्याकडून मला समजलं की बऱ्याच गोष्टी न विचारताही केवळ निरीक्षण करून देखील समजतात. त्यांनी उदाहरणाने समजावून सांगितले की जर आपल्याला लोकल मधील फॅन, लाईट लावायची असेल तर कोणालाही विचारायची आवश्यकता नाही तर चौकसपणे बघितलं की सगळी बटणं दिसतात. गप्पांच्या ओघात vt कधी आले ते समजले देखील नाही आणि अखेरीस vt ला माझी लोकल थांबली. गेट वे ऑफ इंडिया कडे जाण्याचा मार्ग मार्ग देखील माहिती नव्हता पण तो मी स्वतःच ठरवला. 

गेटवे ऑफ इंडिया अरबी समुद्राच्या बाजूला आहे. अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे आणि मी पश्चिमेकडे तोंड करून चालत गेल्यास मी नक्की गेटवे ऑफ इंडिया कडे पोहोचेल. थोडं पुढे गेल्यावर मात्र दोन तीन रस्ते पार केल्यावर मी योग्य रस्त्याने जात आहे का याची खात्री करावी वाटली पण खरी माहिती देणार कोण?

फक्त पोलिसच खरी माहिती देतील यावर विश्वास होता आणि म्हणून मी एखादा पोलीस शोधत होतो पण तो दिसत नव्हता आणि  अखेरीस तो दिसलाच पण मला मात्र आसमान से टपके अन खजूर मे अटके असंच झालं.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙


🥗 पहिली भटकंती एक्सप्रेस:- सोलो 🥙

🥙🥙🥙 भाग सहा 🥗🥗🥗

🥙🥙🥙 जीवाची मुंबई 🥗🥗🥗

विरप्पन सारख्या मिशा असलेल्या पोलीस काकांना मी साधा प्रश्न विचारला की हाच रस्ता गेट वे ऑफ इंडिया कडे जातो का? हो किंवा नाही इतकंच उत्तर अपेक्षित होते. पण असं उत्तर द्यायचं बहुदा त्यांच्या मनात नसावं. त्यांनी माझीच उलटतपासणी सुरु केली, अन प्रश्नांची सरबत्ती केली.

नाव सांग!

 कुठून आला? 

कशाला आला?

कुठे चालला?

एकटाच कसा?

साथीदार किती आहेत आणि कुठे आहेत?


आता आली का पंचाईत.

एक तर पोलीस काकांचा आणि आपला काहीच संबंध नाही अगदी दूर दूर पर्यंत. आताची गोष्ट सोडून द्या पण तेव्हा.

आरोपी असल्याचा भास झाला की राव त्यावेळी. पण पोलीस काकांच्या प्रत्येक प्रश्नांवर सिक्सर बसल्याने काकांची खात्री झाली की हे पोरगं गेट वे ऑफ इंडिया कडेच चाललंय. 

त्यांनी किती चौक लागतील. कुठून वळायचं हे सांगितले आणि चोर, खिसेकापूपासून सावध रहा असा सल्ला दिला. वर्दीतला माणूस दिसला मला.

20 ते 25 मिनिटांत गेट वे ऑफ इंडिया समोर आलो. ती उंच इमारत बघितली. फोटो काढला. सभोवताली खूप गर्दी होती पण  माझ्यासारखा मी एकटाच होतो. अरबी समुद्र भूगोलाच्या पुस्तकात कितीतरी वेळा वाचलेला पण प्रत्यक्ष पाहण्याची पहिलीच वेळ. त्यावेळी नेमकं वाटलं याचा उलगडा होणं अशक्यच. पण पठया मित्रासारखा वाटला. तेंव्हापासून आतापर्यंत अगणित वेळा समुद्र किनाऱ्यावर गेलो असेल पण दरवेळी नित्य नवा भासला. त्याच्याकडे (म्हणजे समुद्राकडे)  पाहत असताना पाठीमागे असलेली इमारत म्हणजे जगप्रसिद्ध ताज हॉटेल आहे हे सुद्धा माहिती नव्हते. मी माझ्याच तंद्रीत होतो. शेजारीच असलेल्या धक्क्यावरून बोटी समुद्रात जात होत्या त्या एलिफंटा गुहेकडे जात होत्या. आपणही जावं का तिकडं? असा विचार करत होतो.तोच मुंबई दर्शन! मुंबई दर्शन!! चलो!! मुंबई दर्शन!!! या आवाजाने माझे लक्ष वेधून घेतले.   थोडा वेळ थांबून सगळी माहिती घेतली. काय काय दाखवणार? किती वेळ लागणार? कुठे सोडणार? ही खात्री करून घेतली. आणि फसवणूक होणार नाही असं खात्री करून मोठ्या बसमध्ये बसलो. निम्म्या सीट अद्याप रिकाम्या होत्या. थोड्याच वेळात सगळ्या सीट भरल्या. आणि गाडी मुंबई दर्शनसाठी निघाली. गाडीत असलेले बरेच जण परप्रांतीय होते. अगदी ड्रायव्हर, क्लिनर, आणि गाईड सुद्धा 

तारापोरवाला मत्स्यालय

हाजी अली दर्गा

म्हातारीचा बूट

हँगिंग गार्डन 

एस्सेल वल्ड

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

फ़िल्म सिटी

टॉवर ऑफ सायलेन्स

सिद्धिविनायक मंदिर

जुहू चौपाटी 

अशी ठिकाणं आता बघायची होती. मी माझ्या सीटवर बसून खिडकीतून बाहेरची मुंबई अनुभवत होतो.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙


🥗 पहिली भटकंती एक्सप्रेस:- सोलो 🥙

🥙🥙🥙 भाग सात 🥗🥗🥗

🥙🥙🥙 जीवाची मुंबई 🥗🥗🥗

पाच सहा तासांत वरील सर्व ठिकाणं पहायची सोय झाली होती. एक ठिकाण पाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना गप्पांचा माहोल असायचा पण गाईडला मात्र ते आवडत नसावं कारण जेव्हा गप्पा रंगात येतील तेंव्हा तो शाळेतील मुलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण जसं गोष्ट सांगतो तसं एक गोष्ट सांगितल्यासारख करायचा आणि अपनी बाये ओर की बिल्डिंग की 19 वि मंजिलपर स्मिता पाटील, जॅकी श्राफ यांचा फ्लॅट आहे असं सांगायचा. प्रवासातील सगळी ठिकाणं खूपच आवडली. टॉवर ऑफ सायलेन्स मात्र बाहेरूनच पाहिलं आणि पाच  वाजताची वेळ असल्याने बहुतेक कावळे, गिधाडे अशा अनेक प्रकारच्या पक्षांचे आवाज त्या परिसरात घुमत होते. जुहू चौपाटीवर मुंबई दर्शनचा शेवट होता. गाईडने सांगितल्याप्रमाणे देवानंदच्या घरासमोर आमची गाडी थांबली होती.पण देवानंद यांचं दर्शन होईल या आशेने बरेच पर्यटक त्यांच्या घरासमोर उभे राहिले होते पण माझ्यासकट बरेच पर्यटक मात्र चौपाटीवर गेलो. दिवस मावळतीला चालला होता. चौपाटी भेळचा आस्वाद घेतला आणि फोटो काढले. समुद्राच्या पाण्याशी खेळण्याची पहिलीच वेळ.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा