बुधवार, १८ जानेवारी, २०१७

वीस

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस चौथा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग वीस*🌿🌿
                     भक्तीगीत ऐकत प्रवास करायची  मजाच निराळी, ती  मस्तीच निराळी ती मजा अन मस्ती अनुभवतच मी निघालो होतो परतीच्या प्रवासाला,  पाठीमागे रायगड सोडून मी महाडच्या दिशेने निघालो होतो महाड म्हटले की आठवतो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला चवदार तळ्याचा सत्याग्रह ते तळे नेमके कोठे आहे हे मला नाही त्यामुळे त्या ठिकाणाला भेट देणे तेवढे राहून गेले आता महाडजवळून सावित्री नदी ओलांडून जात असताना पुलाची आठवण झाली वाहून गेलेल्या पण उंच कठडे असल्याने काही दिसत नव्हते आणि राष्ट्रीय महामार्ग असल्याने थांबूही शकत नव्हतो त्यामुळे तसाच पुढे निघालो दीड तासाच्या प्रवासात मी वरंध घाटात आलो होतो निसर्गरम्य असणारा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट आहे चढायलाही थोडा अवघड आहे या घाटाची शोभा प्रत्यक्ष अनुभवायलाच हवी  आणि या वरंध घाटातच सुप्रसिद्ध 'शिवथर घळ'आहे ज्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी 'दासबोध'लिहिला मी कित्येक वेळा या वरंध घाटातून प्रवास केला आहे पण दरवेळी शिवथरला भेट देणे राहून गेलं आणि देशावरून म्हणजे घाटावरून येणाऱ्या माणसांना शिवथर घळ हे ठिकाण थोडे गैरसोयीचे आहे असे मला वाटते कारण आपण कोकणात येत असताना आपल्याला मुक्कामाला कोकणात जायचे असते अन देशावर येताना घरी पोहोचायची घाई असते यामुळे माझे तर बऱ्याच वेळा यामुळेच येथे भेट देणे राहून गेले आहे 
                     शिवथर घळ येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कोकणात वरंध घाट उतरून उजव्या बाजूला बरसगाव येथे असणाऱ्या रस्त्याने शिवथर येथे यावे अंतर फक्त 15 किमी आहे अन परतही याच मार्गाने जावे हाच रस्ता योग्य आहे या प्रवासाचा,  पण  माझी चूक झाली मला नक्की माहित नसल्यामुळे अन मी घाट चढून तेथे असणाऱ्या माझेरी या ठिकाणापासून शिवथर ला गेलो आणि अंतर फक्त सहा किमी आहे परंतु या मार्गाने मोटारसायकलही 30 किमी पेक्षा जास्त वेगाने धावू शकत नाही रस्ता अतिशय अरुंद व अति खराब आहे मोठमोठे गोलगोल दगडगोटे असल्याने गाडी चालवत असताना खूप त्रास होतो आणि जेवढा घाट आपण चढलो तेवढाच उतरावा लागतो अतितीव्र उतार व अवघड वळणे आहेत जायला खूप वेळ लागतो आणि आता तर रस्त्याच्या कडेला दुरुस्तीचे काम सुरु होते  आणि त्या वेळेत आपण विनात्रास घाट उतरून 15 किमी अंतर पार करून जाऊ शकतो तो रस्ता सपाटीचा आहे असो.
                मी घाट माथ्यावर आल्यावर शिवथर घळ 6 किमी असा बोर्ड दिसला आणि मनात विचार केला की आपण दरवेळेस हे ठिकाण चुकवतो आता जाऊयात पण समोर रस्ता अतिशय खराब होता वाटले थोडा असेल म्हणून मी जायला निघालो अन जावे कि नको या विचारात असताना तोच  पुण्याहून येणाऱ्या बसने माझ्यासमोर नुकताच उतरलेला एक माणूस दिसला तो तेथेच जाणार होता मी त्याला विचारले की रस्ता कसा आहे आणि त्याने सांगितले बरा आहे आणि त्याने मला लिफ्ट मागितली मीपण त्याला सोबत घेत पुढे निघालो अन रस्ता खूप खराब झालेला दिसला इतका कि तीन दिवस जो त्रास झाला नाही तो आंता होत होता खांदे दुखायला लागले होते कारण असे होते की खराब रस्ता तीव्र व अतितीव्र उतार अन डबलशीट अर्धा पाऊण तासाच्या कसरतीनंतर मी शिवथरला पोहोचलो मी सोबत्याला म्हणालो कि जर तुम्ही मला रस्त्याची माहिती सांगितली असती तर मी आलो नसतो आणि तुम्ही तर उलट माहिती सांगितली होती आणि त्याचे कारण असे होते की त्याची घरी जायची सोय झाली होती त्यामुळे तो गप्प होता  तेथून पुढे अर्धा किमी अंतरावर शिवथर घळ आहे त्याने मला दुरूनच रस्ता दाखवला आणि तो निघून गेला आणि पुढे निघालो होतो त्या पवित्र ठिकाणी जिथे समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून दासबोध स्रवला आणि त्यांचे शिष्य कल्याणस्वामी यांनी स्वतःच्या लेखणीतून साकार केला असे परमपवित्र ठिकाण "शिवथरघळ"
                        अर्धाएक किमीच्या सोप्या प्रवासानंतर मी शिवथरघळ  इथं पोहोचलो अतिशय निरव शांतता व नयनरम्य परिसर असे हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जाऊन बसलो कि सर्व शीण निघून जातो माझेही असेच झाले इथे माकडेही भरपूर प्रमाणात आढळतात डाव्या बाजूला मंदिर सोडून थोडे पुढे गेल्यावर समोरच एक धबधबा आहे त्याचा धीरगंभीर नाद वातावरणात पसरलेला असतो सततच्या प्रवाहामुळे दरड कोसळली आहे आणि 
 " गिरीचे मस्तकी गंगा ।तेथुनी चालिली बळे।
धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे।
गर्जतो मेघ तो सिंधू। ध्वनिकल्लोळ उठिला।
कड्यासी आदळे धारा। वात आवर्त होतसे।  "
            असे वर्णन ज्या ठिकाणा चे समर्थानी केले आहे ते अगदी योग्य आहे त्या ठिकाणी मी आता उभा होतो एका विलक्षण अनुभूतीत 
             त्या धबधब्याच्या थोडेच  अलीकडे आहे शिवथर घळ शिवथर घळीचे  तीन भाग आहेत यात रामाचे मंदिर कल्याणस्वामींचे राहण्याचे ठिकाण अन समर्थांचे राहण्याचे ठिकाण अतिशय सुंदर आणि सुरेख संगम असणारे ठिकाण आहे तेथून अलीकडे आलो की मंदिर आहे मंदिराचे दर्शन घेतले अन एका बाजूला असलेल्या कट्ट्यावर बसवून तेथील एका आजोबांनी माहिती सांगायला सुरुवात केली खूप चांगली माहिती मिळाली होती त्यांनी समर्थ विद्यापीठ सज्जनगड यांचेमार्फत चालवल्या जाणाऱ्या अनेक अभ्यासक्रमाची माहिती दिली सर्व अभ्यासक्रम पोस्टल असून अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांना करता येईल अशी शिबिरे अभ्यासक्रम सुरू असल्याची माहिती मिळाली तसेच सहलीसाठी मुक्काम व जेवणाची सोयही असल्याचे सांगितले आणि खरं तर पायच निघत नव्हता परंतु आज मुक्कामी घरी जायचे होते अन टप्पा लांबचा होता त्यामुळे मन असून देखील मी निघालो त्या रस्त्याने यायचे जीवावर आले होते पण नाईलाज होता अर्धा तास कसरत करावी लागली होती आणि मग मी अखेर घाटावर आलो थोडे पुढे गेल्यावर समोरच एक मोठी खिंड असून त्यातून पलीकडे जाता येते त्या ठिकाणी खूप सुंदर दृश्य दिसते उंचच उंच डोंगर खोल खोल दऱ्या हिरवेगार जंगल आणि याच ठिकाणी वडापाव व भजी खाण्याची मजाच न्यारी त्या ठिकाणी माकडेही खूप आहेत मी थांबुन वडापाव खाल्ला त्याची चव अप्रतिम होती वडापावची चव अन वरंध घाटाचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर एकदा यायलाच हवे आणि हो! तेही पावसाळ्यात मला मात्र  वेळ खूप कमी होता त्यामुळे मी लगेच निघालो  घाट उतरत असताना मला एका बाजूला पाण्याचा जलाशय दिसत होता अगदी खूप दूरपर्यंत सोबत होता पाण्यामुळे निसर्गही खुलला होता बऱ्याच ठिकाणी पॉईंट  तयार करण्यात आले होते पण मी मात्र थांबत नव्हतो रस्ता खराब असल्याने उरकत नव्हता आणि मला रस्ता चुकल्यासारखे वाटत होते आणि 20-25किमीच्या प्रवासानंतर आंबेघर हे गाव आले अन ध्यानात आले की आपला रस्ता बरोबर आहे कारण या गावातूनच पुढे रायरेश्वर कारी या ठिकाणाकडे रस्ता जातो आणि मागे एकदा असेच माहित नसल्याने रायरेश्वराच्या अगदी जवळ जाऊन परत आलो होतो फक्त उशीर झालेला असल्याने आणि परत एक वर्षाने रायरेश्वराच्या दर्शनाला जाण्याचा योग जुळून आला 
                आज मात्र खूप  कंटाळाच आला होता आणि रस्ताही उरकत नव्हता मागे याच रस्त्याने रायरेश्वरला गेलो होतो आणि त्यावेळेच्या आठवणी आता ताज्या झाल्या होत्या भोरहून हायवेला लागलो  आणि कापूरहोळ मार्गे सासवडला जायचे होते कापूरहोळ येताच आठवले शंभूराजे आणि त्यांना दूध पाजणारी दूध आई धाराऊ गाडे सईबाईसाहेब यांचे निधन झाल्यावर शंभुराजांना धाराऊ गाडे यांनी अंगावर पाजले त्यांचे गाव कापूरहोळ आजही त्यांचे वंशज या गावात राहत असतीलच 
               त्यापुढेच केतकावळेचा प्रतिबालाजी, नारायणपुरचा एकमुखी दत्त, नारायणेश्वराचे मंदिर सासवड येथील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची समाधी संत सोपानदेव यांची समाधी , बोपगाव येथील कानिफनाथ मंदिर या ठिकाणी मंदिरात प्रवेश करण्यासाठी फक्त एक छोटी खिडकी आहे आणि आपल्याला आत रांगत जावे लागते असे कानिफनाथ मंदिर सासवडपासून फक्त 15 किमी अंतरावर आहे अशी अनेक ठिकाणे डोळ्यापुढून सरकत होती पण मला मात्र आता या ठिकाणी जाता येत नव्हते अगदी रस्त्यावर असून जवळअसूनदेखील याचे  कारण म्हणजे मला आता घराचे वेध लागले होते सासावडमध्ये आलो होतो तेंव्हा अडीच वाजले होते भूक तर पळूनच गेली होती सासावडमध्ये मस्तपैकी चहा घेतला आणि लगेच पुढे निघालो अजून घर 200 किमी दूर होते आणि रस्ते तर असे खराब आहेत यामुळे वैरागला जाण्यासाठी रात्रीचे किमान 10 तरी वाजतील असे वाटले होते कारण अनुभव होता मागील चार दिवसांचा पण असे झाले नाही कारण मागील चार दिवसापेक्षा रस्ता खूप चांगला आहे सासवड जेजुरी मोरगाव बारामती इंदापूर टेम्भूर्णी हा रस्ता संपूर्ण प्रवासातील खूप चांगला रस्ता आहे त्यामुळे मी अगदी 70किमी प्रतितास या वेगाने गाडी चालवु शकलो संपूर्ण प्रवासात कुठेही रस्ता चुकलो नाही पण मोरगावहून बारामतीला आल्यानंतर मात्र रस्ता शोधत असताना अर्धा पाऊण तास रस्ता शोधण्यात गेला एकजनाने जाणीवपूर्वक दौंडकडे जाणाऱ्या रस्त्याला जायला सांगितले एकतर उशीर झालेला असताना असा वेळ गेला पण काही हरकत नव्हती साडेपाच वाजता माझा  जिवलग मित्र निलेश शिंदेचा फोन आला होता की मी पोहोचलो कि नाही कारण दोघांचे पोहोचायचे अंतर रायगडापासून जवळपास सारखेच होते अन तो आता पोहोचला होता आणि मी मात्र अजून 100 किमी अंतर दूर होतो मी  त्याला सांगितले की मी  7:30 ते   8:00 पर्यंत वैरागला पोहोचेल आणि त्याने पोहोचल्यावर फोन करण्यास सांगितले होते  आणि माझा वैरागकडे परतीचा प्रवास सुरू होता 
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा