गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

21

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस चौथा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग एकवीस*🌿🌿
                    चार दिवसांच्या प्रवासानंतर वैरागजवळ आलो असता संपूर्ण वैराग मध्ये आतिषबाजी सुरु होती फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते रात्रीच्या आकाशात होणाऱ्या या आतिषबाजीने सारे आकाश उजळून निघाले होते जणू माझ्या आगमनाचे स्वागत करण्यात येत होते दिवाळीचा सण साजरा करण्यात येत होता परंतु माझे कशाकडेही लक्ष नव्हते घराची ओढ लागली होती अखेर चार दिवसातील 1055 किमीच्या प्रवासानंतर सायंकाळच्या साडे सात वाजता घरी आलो गाडीवरून उतरताना मन भरून आले होते आणि उगीचच महाभारताच्या लढाईची आठवण झाली मी गाडीचे आभार मानले अगदी मनापासून ती निर्जीव अन यंत्र असली तरी कारण एखाद्या जिवलग मित्राप्रमाने जशी गेली दोन वर्षे साथ दिली तशीच साथ गेल्या चार दिवसांत दिली होती कसलाही त्रास न देता, अगदी हवाही चेक करण्याची गरज लागली नव्हती, घरात आल्यावर सौ ने औक्षण केले आणि मला मी एखाद्या लढाईवरून आल्यासारखे वाटलं, घरी आल्यावर पहिले काम मी जर कोणते केले असेल तर फ्रेश होऊन एक msg तयार करून whats app वर पोस्ट केला कारण मला माहित आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची कमी नाही  पण निलेश शिंदेला माझ्या लक्षात असूनही फोन केला नाही परत करू, परत करू असे करता करता  राहून गेले आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजता परत निलेशचा फोन आला आणि माझीच मला लाज वाटली कारण माझा फोन आला नाही म्हणून त्याने फोन केला होता अशा जिवलग मित्रांचे आभार मानले तर मैत्रीचा उपमर्द ठरेल म्हणून मी त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करतो
               प्रवास संपल्यावर कंटाळा येतो पण मला असे वाटलेच नाही उलट मला उत्साह मिळाला आनंद झाला कधीकधी प्रवासाच्या  मानसिक अवस्थेचा जर विचार केला तर प्रवास हाच त्रास दायक ठरतो तोच नकोसा वाटतो माहेरवाशिणीला माहेरहून निघताना गहिवरून येते आणि संपूर्ण प्रवासात गहिवर राहतो पण सासरी आल्यावर मात्र ती परत त्या घराशी एकरूप होऊन जाते अशी अवस्था मी अनुभवली आहे कैकवेळा  जेंव्हा मी नवीन नोकरीला लागलो होतो तेव्हा हिंगोलीहून येताना कधी गावाकडे पोहोचतो असे व्हायचे पण गावाकडून जाताना मात्र माहेरवाशिणीसारखे व्हायचे संपूर्ण प्रवास जीवावर यायचा, नकोसा वाटायचा  पण एकदा तिथे गेल्यावर मात्र परत येईपर्यंत गावाकडची आठवण व्हायची नाही 
                    प्रवासवर्णन  करत असताना काही ठिकाणी वेळ व  अंतर  लिहिलेले असून ते फक्त आपल्या माहिती साठी असून अंदाजे आहे मी जो प्रवास चार दिवसात केला आहे तो खरं तर कमीत कमी 8 दिवसांचा नक्की आहे मी फार गडबडीत पूर्ण केला याची मला जाणीव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोबतीला कुणीतरी हवेच आपले हक्काचे माणूस नाहीतर जो आनंद आपण एकटेच अनुभवतो  तो असुरीच ठरेल, नाही का?
                   पाटेश्वराच्या डोंगरावरून जड अंतःकरणाने उतरताना झालेली घालमेल अन सज्जनगडावरून उतरताना आलेले वैराग्य कसे विसरणार, लिंगमळा धबधबा पहायला जातांना चार माकडांना पाहून मनात वाटलेली भीती वेण्णा नदीचे खोरे क्षितिजापर्यंत पाहताना छाती दडपून जाते की काय या विचाराने पाणी पाणी झालेले मन इको पॉइंटवर असताना झालेली एकटेपणाची जाणीव काळभैरव मंदिरात जाताना आलेली चीड प्रतापगडावरून जावळीचे खोरे पाहताना भरून आलेली छाती, पालगडला सानेगुरुजींच्या आठवणीने कासावीस झालेले मन , मुरुडचा समुद्र किनारा पाहून एक जिवलग मित्र भेटल्याची भावना, रायगडावर तुमचं आमचं नातं काय ? या जयघोषानंतर अंगावर आलेले रोमांच, पहाटेच्या गडवाऱ्यात आणि रायगडावरील सूर्योदय पाहताना परत कधी असा योग्य येईल या विचाराने कातर झालेले मन, असे  एक ना अनेक प्रसंग मनात घर करून बसले आहेत आणि त्या वरही पुरून उरला तो म्हणजे एकट्यानं एवढा प्रवास करण्याचा बेधुंद अनुभव, खरंच एकट्यानं प्रवास करण्यातही एक मजा आहे एक धुंदी आहे एक मस्ती आहे एक आनंद आहे तो अनुभवण्यासाठी आपणही कधीतरी एकट्याने प्रवास करावाच यापुढंही असा प्रवास करायला खूपच आवडेल नक्कीच पण कधी योग येईल काय माहित? असा योग आल्यास नक्की प्रवास करणारच आपल्यापैकी जर कोणाला करायची आवड असल्यास आपणही प्रवास करावा हि विनंती आणि तो प्रवास माझ्याबरोबर असेल तर सोने पे सुहागाच!
                      आज माझ्या *बाईकसवारी:-एक प्रवास* या प्रवास वर्णन लेखनाचा शेवटचा भाग आहे लेखनसमाप्ती करताना अतिव दुःख होतं आहे मन भरून आलं आहे एखादी सुंदर कलाकृती पूर्ण केल्यावर कलाकाराला जो अनुभव येत असेल तोच अनुभव मी घेत आहे, तो आनंद आणि ते मानसिक समाधानही मी यावेळी अनुभवतो आहे सुखदुःखाच्या ऊनपावसाचा अनुभव मला आता येतोय अन मला कृतार्थ झाल्यासारखे वाटत आहे प्रवास वर्णन  लेखन करणे हा हेतू नव्हताच मुळी पण लक्ष्मण वाघमारे गुरुजीसारख्या जेष्ठ मित्रांच्या आग्रहामुळे हा अक्षरयज्ञ मी आरंभिला, प्रत्येक शब्दाची समिधा या यज्ञात अर्पण करताना मन भरून येत आहे पण त्याच बरोबर परत एकदा वाचकांच्यासह  सहल केल्याचा आनंद अनुभवायला मिळाला याबद्दल माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांचे त्रिवार आभार व्यक्त करण्यापेक्षा ऋणात राहणेच मी पसंत करीन. 
                आज लेखन करताना हात अन हृदय दोन्ही जड झालेलं आहे शब्द सुचत नाहीत  यावेळी ज्यांच्या आठवणीने माझे डोळे भरून  आले आहेत ते माझे परममित्र मार्गदर्शक अन निखळ मनाचा माणूस शिवशंकर  साखरे गुरुजी, संपूर्ण प्रवासात माझी फोन करून विचारणा करणारा आदिल सय्यद सर , राजेंद्र आवारे गुरुजी अध्यक्ष शिक्षक संघ वैराग,आनंद पिंपळे सर (करमाळा), दीपक शेळके,  गु.ना कल्याणी, (ज्याचे हेल्मेट घेऊन मी हा प्रवास पूर्ण केला )बा रा पाटील गुरुजी  सतिश ढेकळे गुरूजी महावीर तुपसमिंदर सर (सातारा) भोसले सर (सातारा)महाबळेश्वरचा प्रवास ज्यांच्यामुळे कमी वेळात पूर्ण झाला ते चव्हाण सर (सातारा) , विनायक शिंदे सर ( महाड ) निलेश शिंदे (रहाता) तसेच सर्व मित्र हितचिंतक वाचकांचे व  प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मित्रांचे ऋण डोक्यावर घेऊन नाचताना आनंद होतो आहे
               माझ्या लेखनाचे कौतुक करणारे बब्रूवाहन काशीद गुरुजी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक संघ शाखा सोलापूर ,आमची प्रत्यक्ष ओळख नसतानाही संपूर्ण प्रवासात माझी विचारपूस करणारे तसेच माझ्या प्रत्येक भागाच्या  लेखनाचे कौतुक करणारे शिक्षक नेते जोतिराम बोंगे गुरुजी (पंढरपूर) तुमची कौतुकाची थाप माझे मनोबल वाढविणारी ठरते प्रत्येक वेळी!
                   प्रवास वर्णनाचे लेखन करतेवेळी माझ्या लेखनाला इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही नव्हती. सोशल मीडियावर दररोज अंदाजे 12 ते 13 हजार मित्रांपर्यंत माझे लेखन पोहोचत आहे, या प्रवास वर्णनाच्या लेखनाने मला काय मिळालं तर अनेक मित्र केवळ या लेखनाच्या माध्यमातून मिळाले शेकडो मित्रांनी माझ्या लेखनाचे समक्ष, सोशल मीडियावर, फोन करून कौतुक केलं, अनेकांनी प्रवास समक्ष अनुभवत असल्याचे सांगितले याहीपेक्षा मला मिळालेलं आत्मिक समाधान खूप मोठं आहे परत एकदा माझ्यावर प्रेम करणाऱ्या , मला लेखन करायला लावणाऱ्या , माझं लेखन वाचणाऱ्या, माझं कौतुक करणाऱ्या  आणि प्रत्यक्ष प्रवास करताना मला मदत करणाऱ्या ज्ञात-अज्ञात मित्रांचे ऋण व्यक्त करतो 
           जीवनाच्या मागे धावपळ करत असताना वेळ मिळाला तर असा प्रवास करायला नक्कीच आवडेल या लेखमालेचे वाचन करणारा एखादा वाचक जर पुढच्या प्रवासात सोबती मिळाला तर यापेक्षा आनंद तो दुसरा कोणता असेल? पाणावलेल्या पापण्यांच्या कडा आणि भरून आलेलं मन यासह तात्पुरता आपला निरोप घेऊन लेखनाची सांगता करतो 
नमस्कार!!!!!🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
     परत भेटू लवकरच नव्या प्रवास वर्णना सह
*ता क*:-ज्या वाचक मित्रानी पहिल्या भागापासून वाचन केले नाही त्या वाचकांना तर माझा प्रवास सुरू आहे असे वाटते असे बरेच संदेश, फोन मला आले  या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो की सदरचा प्रवास मी 27 ते 30 ऑक्टो.2016 या काळात केलेला आहे. प्रवास करताना माझे लेखन उपयुक्त ठरले तरच या लेखनाचे यश आहे माझ्या *बाईकसवारी:-एक प्रवास* या लेखमालेच्या मागच्या सर्व भागांचे pdf रूपांतर केले आहे ते download करण्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून download करून घ्यावे
https://goo.gl/n8ncCL

लेखनसीमा
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
मागील सर्व भागांचे pdf download करण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/n8ncCL
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा