शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस तिसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग चौदा*🌿🌿
               दापोलीहून खेड पालगड कडे जाणाऱ्या रस्त्याने मी जात होतो कोकणातील रस्ते खराब नसतात असा माझा अनुभव होता पण रस्ते खूप खराब होते त्यामुळे गाडी चालवताना कसरत करावी लागत होती अलका याज्ञीक ची गाणी ऐकत मी गाडी चालवत होतो गाण्याच्या संगतीने वेळ कसा जात होता हे कळत नव्हते मनात  सकाळपासून पाहिलेल्या ठिकाणांचे विचार येत होते अगदी अचानक ठरवले होते पण किती अप्रतिम ठिकाणे पाहण्यात आली होती मन अगदी प्रसन्न होऊन गेले होते मुरुडच्या बीचवरील बहुतेक सर्व हॉटेल्सची वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत हेही लक्षात आले होते व त्यांच्या रुमचे बुकिंग आपण करू शकतो हे माहित झाले होते
      हिरवा निसर्ग हा भवतीने
 जीवनसफर करा मस्तीने
     असा सगळा माहोल असतो कोकणातील सफरीचा. परतीच्या वाटेवर असणाऱ्या या रस्त्याने गाडी चालवत असताना अधून मधून खूप उंच  टॉवर लाईन दिसत होती बहुतेक दाभोळ वीज प्रकल्पाची असेल या मार्गावर अनेक ठिकाणी छोटे मोठे घाट आहेत रस्ता मात्र बराच खराब आहे दोन्ही बाजूला असलेल्या दाट झाडीतून गाडी चालवण्याचा आनंद अवर्णनीयच आहे मधून मधून मित्रांचे फोन येत होते हेडफोन असल्याने व ऑटो answer on केल्याने बोलायला अडचण नव्हती आलो तसेच होतो त्याच रस्त्याने परत जायचे असल्याने रस्ता विचारायचे कारण नव्हते हा प्रवास पूर्ण खेडेगावातून होता व भात काढणीची लगबग सुरू झाली होती वाटेत अनेक ठिकाणी भाताची कापणी करत असलेला शेतकरी दिसत होता सगळा महाराष्ट्र  दिवाळीचा सण साजरा करत असताना ही शेतकाऱ्याला मात्र सुट्टी नव्हतीच, शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रात (नव्हे देशातच) कुठलाही का असेना अत्यंत अडचणीत आहे आणि त्यांच्यासाठी सरकार व सर्व समाजाने काहीतरी  करणे आवश्यक आहे 
        साधारण साडेबाराच्या सुमारास  महाड जवळ आलो होतो थोडा वेळ होता म्हणून मी एकेठिकाणी चौकशी केली की सव येथील गरम पाण्याच्या झऱ्याकडे जायला रस्ता कुठून आहे आणि मला समजलं की महाडवरून दोन रस्त्याने सवला जाता येतं 
1 दादली पुलावरून 7-8 किमी आहे तसेच 
 2 मुंबई हायवेलगतही  तेवढेच अंतर  मात्र सावित्री नदीचे पात्र पायी चालत ओलांडावे लागते बस , आपण  जर महाडमध्ये असलो तर आपल्याला वरीलपैकी दोन नंबरचा मार्ग सोपा आहे
            मी दापोलीहून येत असल्याने दादली पुलाच्या अलिकडूनच म्हणजे 1 नंबरच्या मार्गाने मी निघालो सावित्री नदीच्या काठाने 7-8 किमी अंतरावर सव आहे या मार्गाने मात्र गाडी एकतर रस्त्याला लावावी लागते व एक दीड किलोमीटर भाताच्या शेतातूनच पायी चालत जावे लागते किंवा भाताच्या शेतीच्या अगदी बांधाबांधाने एक दीड किमी अंतर पार करून गाडी लावावी लागते मग 100 200 मीटर अंतरावर दाट झाडीत सावित्रीच्या काठावर तीन गरम पाण्याची कुंड आहेत 
                            मी गाडी घेऊन बांधावरून गेलो व थोडे अलीकडे गाडी पार्क करून चालत गेलो भात शेती सभोवताली आहे आणि भात काढणी सुरु झाली आहे अशा वेळी मी बांधावरून गाडी चालवत आलो होतो वाटेत अनेक शेतकरी डोक्यावर कापलेल्या भाताचे भारे घेऊन येत होते रस्ता अगदी लहान असल्याने माझ्या गाडीमुळे त्यांना खूप अडचण येत होती पण कोणीही बोलून दाखविली नाही माझ्या गाडीला वाट देण्यासाठी ते ओझे घेऊन एका बाजूला उभे राहून मला जायला रस्ता देत होते मला मात्र खूप वाईट वाटलं पण आता मात्र काही इलाज नव्हता गाडी पार्क केल्यावर मी चालत जाऊन अगदी जवळ जवळ आल्यावर एका आजोबाला गरम पाण्याचे झरे कुठे?असे विचारले असता ते वैतागले कारण कुंड अगदी समोरच्याच झाडीत होते अन त्यांच्यामते आज दिवाळी असल्याने किमान दोन तीन हजार माणसे अंघोळ करून गेली असतील आणि मी मात्र अगदी जवळ येऊन विचारण्यापेक्षा दहा वीस पावलं पुढं गेलं की तिथेच  कुंड आहेत असो.
             तीन कुंड आहेत इथे आणि पाणी हे कढत अंघोळ करण्यासारखं आहे सुरवातीला थोडं गरम लागत पण नंतर आपले शरीर पाण्याशी समायोजन करते  इथल्या गरम पाण्यात अंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत सर्व प्रकारचे त्वचा रोग नाहीसे होतात कोणताही आजार नसला तरीही  इथल्या अंघोळीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला प्रवासाने  आलेला कंटाळा, आळस, शीण,थकवा अगदी क्षणात नाहीसा होतो अंघोळ नाही केली तरी गुडघाभर पाय पाण्यात बुडवून बसलो तरी सर्व शीण निघून जातो हा स्वानुभाव आहे
               त्या पाण्यातून बाहेरच यावे वाटत नाही अगदी दुपारची वेळ असल्याने तसेच मी एकटाच असल्याने  अंघोळ करण्यापेक्षा पाय भिजवावे अशा विचारात होतो आणि  थोडावेळ पाण्यात पाय बुडविल्यानंतर दोन तीन तरुण अंघोळीला आले होते मग मीपण त्यांच्या सोबत पाण्यात उतरलो त्यावेळी काय वाटत होते हे वर्णन करणे केवळ अशक्य शब्दातीत आहे तीन दिवसाचा ताण आळस क्षणात पळून गेला होता आणि माझे शरीर व मन एकदम ताजेतवाने झाले होते त्याचबरोबर अतिशय हलके हलके  वाटत होते 
             कितीवेळ त्या गरम पाण्यात गेला याकडे लक्षच नव्हते पण  अर्धा तास झाला असेल तेंव्हा तिथे एक मुस्लिम समाजातील कुटुंब आल्याने आम्ही आवरते घेतले कारण बहुतेक त्यांनाही तिथे अंघोळ करायची होती  कुंडाशेजारीच एक दर्गा आहे त्यामुळे तिथे गर्दी असते मात्र गर्दीच्या प्रमाणात तिथे सोयीसुविधा मात्र काहीच नाहीत 
                  उन्हाळे, वज्रेश्वरी इथल्या गरम पाण्याच्या कुंडाला मी भेट दिलेली आहे मात्र इथल्यासारखे या कुंडावर स्त्री-पुरुषांना वेगळी सोय नाही अंघोळीची पण अन कपडे बदलायची पण. त्यामुळे सर्वांचीच कुचंबणा होते अंघोळीचा आनंद घेता येत नाही  मुंबई-गोवा हायवे वर असणाऱ्या अरवली इथल्या कुंडातील पाणीतर खूप गरम आहे 
                 या ठिकाणी या सोयी केल्या तर पर्यटकांचा ओघ खूप वाढू शकतो एका कुंडात अंघोळ करायचे साबण लावायला बंदी आहे कारण पाणी खराब होते तेच पाणी दुसऱ्या बाजूला असलेल्या एका कुंडात जाते त्या व तिसऱ्या कुंडात या कुंडात कपडेही धुतले जातात त्या ऐवजी स्त्री पुरुषांना अंघोळीची व कपडे बदलण्याची वेगळी सोय केली तर खूप बरे होईल पर्यटक इथे येऊन इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल व पर्यटकांचीही सोय होईल 
                मी पटकन  कपडे बदलून टाकले आता शरीर अगदी हलकं हलकं झालं होतं आणि मनही!!  तेथील एका ठिकाणी जाऊन शहाळे घेऊन पाणी प्यायलो अन खोबरे खाल्ले  मला शहळ्यातील ओल्या अन लुसलुशीत खोबऱ्याची (मलई) भारी आवड आहे आणि मी कोकणात आलो की नेहमी एक म्हण आठवते 'कोकणात नारळ फुकट' आमच्या परिसरात वापरात असलेली ही एक म्हण अर्थ असा असावा कि जेथे खूप पिकते तेथे विकताना खूप स्वस्ताई असते मात्र शहाळ्याच्या बाबतीत मात्र असे कधीच जाणवले नाही कोंकणात जो भाव तोच भाव देशावरही असतो असो  मी मात्र परत गाडीकडे निघालो मनातला सारा ताण अन शीण कुठल्या कुठे पळून गेला होता पण मला आता  कडाडून भूक लागली होती दुपारचे दोन वाजले असतील 
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा