मंगळवार, १० जानेवारी, २०१७

भाग बारा

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस तिसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग बारा*🌿🌿
                "श्यामची आई " हे मातृप्रेमाचे महंन्मंगल स्तोत्र ज्या सानेगुरुजींनी लिहिले ते वाचत असताना अनेक वेळा डोळ्यातून अश्रू अनावर झाले आपोआप डोळ्याला धारा लागल्या सानेगुरुजींनी सुरवातीलाच लिहिले आहे की ही कथा ऐकून वाचून वाचकाच्या डोळ्यात अश्रू नाही आले तर लेखनच व्यर्थ, मला तर वाटते की श्यामची आई वाचून एकदाही डोळ्यात अश्रू येणार नाही असा माणूसच सापडणार नाही हे नक्कीच !
              अश्या महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पालागडचे दर्शन हीच मुळी आनंदाची गोष्ट आहे एक किमीचा अतिशय खराब रस्ता पार करून आम्ही सानेगुरुजींच्या घरासमोर आलो जेथे श्यामची आई मधला शाम जन्मला,वाढला, खेळला ते घर आता स्मारक घोषित करण्यात आले आहे आणि त्या स्मारकाच्या बाहेर चपला काढून प्रवेश केला मी माझ्या सोबत असणाऱ्या मुलाला विचारले कधी आला होता इथे? तर तो म्हणाला की खूप दिवस झाले, मला वाईट वाटले परंतु मनातल्या मनात म्हटले आपण बार्शीत राहून तरी कधी जातो भगवंत मंदिरात? 
           अशा पावन पवित्र ठिकाणी फोटो काढण्याची ईच्छा अनावर झाली मी माझ्या सोबत असणाऱ्या मुलाला माझा फोटो काढण्याची विनंती केली अन  त्याने माझे फोटो काढले नंतर दोघांनी मिळून घरात असणाऱ्या सर्व खोल्यांची माहिती घेतली  तेथे गुरुजींच्याजीवनातील प्रसंगांच्या  वेगवेगळ्या प्रतिमा अन वेगवेगळी पेपरची कात्रणे अशी ठेवलेली आहेत महत्त्वाच्या घटनांच्या  नोंदी याठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत सानेगुरुजींच्या जीवनातील अनेक प्रसंगाची कात्रणे येथे आपल्याला त्यांच्या महानतेची जाणीव करून देतात  अशा परम पवित्र जागी आल्याचा खूप आनंद झाला होता घराशेजारीच सानेगुरुजींनी काढलेली शाळाही दिसली परत एकदा त्या पवित्र वास्तूला वंदन करून परत निघालो पण त्या वेळी श्यामची आई या पुस्तकातील अनेक गोष्टी डोळ्यासमोरून जात होत्या अन त्या काळात गेल्याची अनुभूती होत होती त्या दिवशी मी माझ्या मनात विचार करत होतो की खरोखरच आज आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच असा  सुंदर योगायोग आलेला आहे 
                  पालगड ते दापोली अंतर साधारणपणे 30 किमी आहे या मार्गावरून प्रवास करत असताना सानेगुरुजींच्या जीवनातील अनेक प्रसंग आठवत होते रस्ता खराब असला तरी जंगल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे झाडी दाट आहे मध्येच अनेक ठिकाणी दूर दूर पर्यंत हिरवी झाडेच दिसत असताना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्याकाही  ठिकाणी दोनचार फोटो काढले नऊ वाजत आले होते आणि मी दापोलीत आलो की मुरुडला जाण्याचा मार्ग सोबतच्या मित्राला विचारला आणखी माहिती घेतली आणि निरोपाचे विडे दिले -घेतले दापोलीपासून सहा किमीवर लाडघर तामतीर्थ असून 7 किमी अंतरावर आसूद हे गाव आहे निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे गाव  याची माहिती मी पुढे सांगेनच दापोलिहून 12 किमी वर मुरुडचा अतिशय सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा आहे गावात दुर्गा देवीचे देखणे मंदिर आहे त्यापुढेच 4 किमीवर हर्णे बंदर आहे त्या ठिकाणी दररोज दुपारी चार पाच वाजता मासळीचे लिलाव होत असतात खूप मोठी उलाढाल असते अगदी 5-6कोटीपर्यंत त्यापुढेच आंजर्ले येथे कड्यावरचा गणपती मंदिर आहे आजच्या प्रवासात मला काहीच नियोजन करता आहे नाही कारण म्हणजे सर्व अचानक पहायचे ठरले तोही फक्त मुरुडचा किनारा पण वाटेत पालगड, आसुद, लाडघर, असे असेल हे  माहीतच नव्हते  
        सव्वा नऊ वाजता मुरुडला पोहोचलो या परिसराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरात अनेक ठिकाणी घरोघरी जेवणाची सोय व मुक्कामाची सोय केलेली आहे या गावातील अनेक लोकांनी आपल्या घरी निवासाची सोय केलेली असते त्यामुळे आपल्याला या गावात अस्सल कोकणी गावात कोकणी माणसांचा पाहुणचार घेता येतो कोकणातील माणूस हा प्रेमळ मायाळू आणि प्रचंड प्रमाणात स्वच्छताप्रिय आहे मग ते हॉटेल असो की घर , अशाच एका घरवजा हॉटेलात चहाला थांबलो  घरची सर्व मंडळी यात गुंतलेली असतात त्या हॉटेलात नव्हे घरात मिळालेला चहा खूपच छान होता  एकदम मस्त अमृततुल्य चव जिभेवर रेंगाळत राहणारी! पण दिवाळीचा सण असल्याने इतक्या लवकर नाश्ता मिळाला नाही माझा आवडीचा कोकणी नाश्ता म्हणजे कांदेपोहे आणि त्यावर किसून टाकलेले खोबरे पण सुके नाहीतर ओल्या नारळाचे पण सणाचा दिवस 
अन सकाळची वेळ असल्याने माझी हि ईच्छा अपूर्णच राहिली 
             गावातून दोन अडीच किमी अंतर कच्च्या रस्त्याचे पार करून किनाऱ्यावर पोहोचलो अथांग सागर पाहताना डोळे भरून आले होते आणि त्याच्या लाटांचा आवाज म्हणजे जीवाचा जिवलग मित्र भेटल्यावर जणू तो मला पाहून आपला आनंद व्यक्त करीत आहे असे मला वाटत होतं समुद्रावर बऱ्यापैकी गर्दी होती अन अनेक किनारे मी पाहिले पण या ठिकाणी असणारे एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आले होते ते म्हणजे आपण या ठिकाणी अगदी पाण्यापर्यंत आपले वाहन चालवत घेऊन जाऊ शकतो अनेक ठिकाणी असे असेलही पण मी मात्र पहिल्यांदाच पाहत होतो त्यामुळे मला खूप आनंद झाला होता.मोटारसायकलवरून समुद्रकिनाऱ्यावर ड्राईव्ह करणे हे अतिशय आनंद देणारे आहे मी पहिल्यांदासागरकिनारी  खूप लांबपर्यंत ड्राईव्ह केले मोटासायकलवरच किनाऱ्यावर अनेक ठिकाणी अनेक प्रकारची वॉटर स्पोर्ट्स ची सोय आहे पण महागडीच तसेच किनाऱ्यावर अनेक हॉटेल्स आहेत अगदी साधारण पासून ते पंचतारांकित मी एका हॉटेलात गेलो त्याठिकाणी वेगवेगळे झोपाळे,झुले, बाकडे होते खूप जास्त प्रमाणात आणि याठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये आहेत प्रत्येकाला आपापली स्पेस मिळावी यासाठी म्हणून अगदी दूरदूर प्रत्येक नारळाच्या झाडाला बांधलेले झुले पाहून मला माझ्या एकटेपणाची जाणीव झाली होती तीही प्रकर्षाने ,सुरूंच्या बागेत झाडाला बांधलेल्या झुल्यावर कानात हेडफोन घालून गाणी ऐकत झुलण्यासारखा आनंद नाही नाहीतर सुरूंच्या बनात सागराकडे तोंड करून असलेल्या बाकावर बसून सागरात मावळणारा सूर्य पाहत चहाची लज्जत घेणे अशीही सोय असणारी  खूप हाँटेल्स इथं आहेत पण थोडी महागच बरं का, 
                 एका हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करायला गेलो किनाऱ्यावरच होते म्हणून पण उपिट (उपमा) शिवाय काही तयार नव्हते म्हणून तोच घेतला अन चहाचा कप हातात घेऊन एका झोपाळ्यावर बसून एकेक घोट घेत समुद्राकडे पाहत होतो सागराचा आवाज ऐकू येत होता त्यामुळे खूप छान वाटत होतं जणू माझ्या जिवलग मित्राला माझ्याकडे पाहून उचंबळून येत आहे अशा  त्या रोम्यांटिक प्रसंगातून बाहेर यायलाच नको वाटत होते पण आता मात्र माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मनात पक्के केले की हे  आनंदच लेणं लुटायला वेळ काढून परत एकदा यायलाच हवे  चहाचा कप संपवून मी परत किनाऱ्यावर आलो होतो आलेल्यापैकी एकाला फोटो काढायची विनंती केली अन दोनचार फोटो काढून गाडीवर बसून एक चक्कर मारली किनाऱ्यावर अगदी सिनेमातल्याप्रमाणे पाण्यातून  गाडी चालवत असताना खूप मजा येत होती गाडी लावून पाय पाण्यात भिजवून शांतपणे सागराकडे पाहत उभा राहून क्षितिजकडे पाहून मन थक्क व्हायला लागले होते व वेळ कमी असल्याने मी सागराकडे एक कटाक्ष टाकला आणि त्या जिवलग मित्राला येतो असे सांगून मागे वळून पाहताना आपला मित्रही आपल्याला हसून निरोप देण्यासाठी अगणित लाटांचे हात हलवत बाय म्हणत होता असे वाटले.
                           एक मात्र नक्की कि आज मला सागराच्या रूपाने एक जिवलग मित्र मिळाला होता आणि माझ्या जिवलग मित्रांची यादी आज एकने वाढली होती
                    कच्च्यारस्त्याने गावात आलो की मुख्य रस्त्याला वळताना डाव्या बाजूला दुर्गादेवीचे अतिशय सुंदर आणि देखणे मंदिर आहे दुर्गादेवीची मूर्ती पाहून अन दर्शन घेऊन मंदिराची रचना कशी झाली आहे आणि त्या मंदिराची माहिती व इतिहास पुजारी बाबांकडून ऐकला आणि परत निघालो आलेल्याच मार्गाने, पण मनातून मात्र सागराच्या लाटांचा घुमणारा आवाज मात्र साथ सोडायला तयारच नव्हता उंचच उंच माडांच्या झाडातून जाताना मन अगदी कातर झालं होतं
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा