भटकंतीचे बाळकडू

🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥗🥙🥗 भाग एक 🥙🥗🥙

साधारणपणे 84-85 चा काळ असेल, डिझेल इंजिनांनी विहिरीवर चालणाऱ्या मोटेवर गदा आणली. अन मोटा आणि नाडे गुंडाळून ठेवले गेले. पाऊसकाळ भरपूर होत असे त्यामुळे संक्रांतीपर्यंत गावातील ओढा वाहत असे असे मोठी माणसं म्हणत. पण प्रत्यक्षात अनुभव आला नव्हता पण तरीही नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत तरी ओढ्यातील डोहात पाणी असे, शाळेच्या मधल्या सुट्टीत गावापासून जर लांब असलेल्या  त्या डोहात डुंबण्याने स्वर्गीय आनंद मिळत असे. सभोवताली असलेली उंच उंच झाडे, वाळलेले अन वाळत आलेले हिरवे गवत, पाण्यावर फिरणाऱ्या पाननिवळ्या, गवताच्या जवळ असलेल्या पाण्यातून आपली तहान भागवणाऱ्या मधमाश्या, बाजूलाच असलेली आमराई यामुळे वातावरण अगदी पुस्तकात वाचल्याप्रमाणे असे, ओढ्याच्या दोन्ही बाजूला टाकलेल्या विहिरीतील उपस्यामुळे ओढ्याची उंची खूपच वाढलेली आहे. मार्च महिन्यात याच आंबे, चिंचा लिंब यांच्या सावलीत पुस्तक वाचायला मजा यायची, त्याही पेक्षा मोहळ झाडणे अन सुरपारंब्या खेळायला. सह्याद्रीच्या कुशीत फिरताना आज जसा फील येतो अगदी तस्साच फील येत असे तेव्हा  ओढ्याच्या या भागांतून फिरताना. उंचीवरच्या बाजूने उताराकडे घसरगुंडी सारखे घसरत येताना चड्डी फाटेल याची तमा नसायची.

ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना त्याची ओढ लागलेली असायची, त्या पाण्यावर स्वार होऊन जावं असं वाटायचं. 

वडील आणि चुलत्यांच्या (मुख्यत्वे चुलत्यांच्याच!!) मागे लागून ज्वारीच्या खळ्याला राखण म्हणून रात्री शेतात गेल्यावर डोक्यावर दिसणाऱ्या चांदण्या वेड लावून जात, पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात तर रात्र खूपच सुंदर भासत असे. आकाशातली  नक्षत्र, तारे, ग्रह यातलं  काही कळायचं नाही पण त्यांच्याकडे पाहून मन हरखून जायचं. त्यातच एखादा तारा तुटे त्याकडे पाहताना कुतूहल मिश्रित भीती वाटे, एखादवेळी ते आपल्या अंगावर पडलं तर !! या भीतीने अंगाचं पाणी होत असे. काळ्या मातीत झोपताना कधी साप, विंचूकाटा यांची भीती शिवायची नाही, रानातल्या रानात चिंचा पाण्यात भिजायला ठेवून त्याच चिंचेच्या पाण्यात  गूळ घालून तयार केलेल्या (चिंचवणी)मध्ये भाकरी कुस्करून खाताना खूपच आनंद होत असे. आंबे, बोरं, जांभळं, चिंचा पेरू, सीताफळ यातच सगळं बालपण गेलं पण त्याहीपेक्षा माळावर कधीतरी गेल्यावर दूरवर दिसणाऱ्या बालाघाट डोंगररांगा बघताना उगीचच मनात कालवाकालव होत असे नेमकं कळत नसायचं की होतंय काय, पण न सांगता येणारी हुरहूर मात्र मनात काहूर उठवायची.


मग मोठी जाणती माणसं सांगायची की इकडं येरमाळा, इकडं तेरखेडा, आणि सायंकाळी इथुन येडाईच्या डोंगरावरील दिवा दिसतो, वगैरे वगैरे.

बालमन खूप विचार करत असे की खरंच इथुन दिसत असेल येडाई मंदिर, तेथील डोंगरावरचा दिवा. आपल्याला कधी मिळेल बघायला, ते दृश्य कसे दिसत असेल याचं चित्र मनचक्षुच्या पटलावर आपोआपच तयार होत असे पण ते कधी बघायला मिळेल ही हुरहूर लागून रहायची. 

 जरा मोठं झाल्यावर म्हणजे  इंजिन जाऊन मोटार विहिरीत बसली आणि पाणी माळावर गेलं तेव्हाच ज्वारीच्या खळ्याच्या निमित्ताने इथं म्हणजे माळावर मुक्कामी जायचा योग आला, अर्थात तो काही सहजासहजी आला नव्हता त्यासाठी बराचवेळ भोकाड पसरावे लागले होते. पण तरीही  किती किती आनंद झाला असेल माझ्या बालमनाला याचं वर्णन करणे अशक्य आहे. रात्रीच्या चांदण्यात येडाईच्या डोंगरावरचा दिवा कोणता आणि चांदणी कोणती, यातला फरक कळला नाही पण चांदण्याची आवड निर्माण झाली असावी ती अशाच प्रसंगातून!! 

रात्रीच्या अंधारात  चोरवाड्याच्या माळावरून भुतांची दिवटी फिरत असते म्हणे, तेही विशेषतः अमावष्येच्या रात्री,  ती पहायची खूपच इच्छा होती पण ती अपूर्ण राहिली, त्याची अनेक प्रकारची रसाळ वर्णने थोरामोठ्यांकडून ऐकलेली असायची ऐकतानादेखील मनाचे पाणी पाणी होत असे. पुढे वैज्ञानिक जाणिवा निर्माण झाल्या आणि त्यातील सत्य समजले पण भुतांच्या दिवटीच्या तावडीत सापडल्यास माणसात भीती निर्माण झाली नाही तर तो जिवंत राहू शकतो, फक्त भुतांनी सांगेल ते ऐकलं पाहिजे. भुतं जर जेवायला लागली तर त्यांचं झाल्याशिवाय बस म्हणायचं नाही फक्त नाही तर आपणसुद्धा भूत होतो. 

  एकदा गावातला एक पारधी सांगत होता की मी राखणीला गेलो असता असाच भुतांच्या तावडीत सापडलो, भूतांनी मला जेवायला बसवले, काय तो जेवणाचा थाट होता. सगळे दिवाळीतील पदार्थ तयार होते खायला. लाडू,अनारसे करंज्या ताटात वाढल्या जात होत्या मी पोटभर खाल्लं तरी माझ्या ताटात वाढलंच जायचं त्यामुळे मला माहीत होते की मी नको म्हटलं की मी भूत होणार म्हणून मी नको म्हणत नव्हतो पण ताटातले तर संपायला पाहिजे होते म्हणून मी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लाडू, करंज्या,अनारसे माझ्या मागे फेकत होतो, पहाट व्हायला लागली आणि भुतं मला सोडून गेली आणि मी उजाडल्यावर मात्र मी तिथं फेकून दिलेले लाडू,अनारसे, करंज्या पोत्यात भरून घरी आणले व महिनाभर मी दररोज एकटाच खात होतो कारण ते दुसऱ्याला देता येत नाही कारण ते दुसऱ्यांनी खाल्लं की माणूस मरतो आणि भुत होतं. अश्या अनेक गमतीजमती त्याकाळी मनात घर करून बसलेल्या असत. असं असलं तरीही माळाची ओढ लागली ती लागलीच.

पावसाळ्यात याच माळावर कास पठारावर असलेल्या फुलासारखी फुलांची आणि कुसळांची हिरवी दुलई पसरलेली असे. दूरवर क्षितिजावर दिसत असलेल्या हिरव्यागार बालाघाट डोंगररांगा पाहताना तर मन उचंबळून येत असे. जनावरे चारताना इथल्याच गवत असलेल्या खड्ड्यात साठलेले पाणी पिताना जी चव अनुभवली ती फिल्टरच्या किंवा बाटलीबंद पाण्यात परत कधीच मिळाली नाही. (अपवाद फक्त एखाद्या किल्ल्यावर विशेषतः सिंहगडावरील देवटाकं )  पावसाळ्यात इतकं छान असलेलं हे माळाचं ठिकाण उन्हाळ्यात मात्र खूपच भकास दिसत असे सगळ्या माळावर असलेले एकमेव लिंबाचे निष्पर्ण झाड.  आणि सगळीकडे वाळलेली कुसळं, सगळीकडे पसरलेल्या पिवळ्या मातीमुळे उन्हाचा तडाखा खूपच जास्त असे, त्यामुळे उन्हाळ्यात इकडं सहसा कुणी ही फिरकत नसे. अपवाद फक्त पिवळ्याच फुफाट्यात एकाकी जाणाऱ्या गाडवाटेने सकाळी किंवा सायंकाळी कुणा माहेरवाशिणीची एखादी तट्टे लावलेली गाडी माहेरकडे जात असेल तीच फक्त.

अशा या माळरानाने मला भटकंतीच बाळकडू दिलं हे मात्र नक्कीच!!!

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥗🥙🥗 भाग दोन 🥙🥗🥙

आपल्या गावातल्या आणि पंचक्रोशीतील  जत्रा म्हणजेच पर्यटन आणि मनोरंजन असा तो काळ असायचा,  कोणत्याही जत्रेत गेलं की पहिल्यांदा देवदर्शन मग ओळखीच्या लोकांच्या, पाव्हन्यांच्या भेटीगाठी आणि सरतेशेवटी तुटपुंजी खरेदी,  असा कार्यक्रम असायचा. जत्रेला जायची पूर्वतयारी आठ दहा दिवसापासून चालायची, लहान मुलांना तर तीन चार महिने आधीपासूनच अशा जत्रेची लालच दावली जायची 'पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या पंधरवड्यात आहे जत्रा'असं म्हणून तीन चार महिने निघुन जायचे. जत्रेत एखादा फुगा किंवा आताची मुलं ढुंकूनही पाहणार नाहीत असं खेळणं हेच फक्त मिळायचं. तेही मोठ्या मुश्किलीने.  हट्ट करायचा, रडायचा असतो हेसुद्धा माहिती नसायचं. आपली पसंती न विचारता मिळालेलं खेळणं सांभाळता सांभाळता नाकीनऊ यायचे.

फुगा असला तर घरापर्यंत यायची  पंचाईत. बैलगाडीमध्ये एखादा धक्का लागून फट्टदिशी आवाज व्हायचा आणि हशा पिकायचा आणि संपलं सारं असं व्हायचं,

खडकलगाव माझ्या गावच्या शेजारचे गाव. चंपाषष्ठीला तेथील खंडोबाची यात्रा असते. खडकलगाव माझ्या गावापासून साधारणपणे 5 ते 6 किमी असेल. आमच्या माळावरच्या शेतीपासून तर दोन अडीच किमी अंतरावर आहे. शेतात पिके नसली तर माळावरून खंडोबा मंदिर दिसे, एक एकर क्षेत्रावर असलेले हे मंदिर चारी बाजूंनी किल्ल्यासारखी तटबंदी, चारीबाजूला बुरुज यांनी नटलेले आहे. तटबंदीच्या आत फरसबंदी, उंच दीपमाळ, आणि अत्यंत प्राचीन रचना असलेले मंदिर अतिशय गूढ वाटते. लहान दरवाजातून आत गेलो की समोरच पितळी मूर्ती आहेत. इतरवेळी मंदिरात गेलो की गाभाऱ्यात जाता यायचे म्हणजे लग्न झाल्यावर नवरानवरीसोबत वगैरे. यात्रेच्या वेळी तर कुठून आत गेलो आणि कसे बाहेर पडलो याचा काहीच पत्ता लागायचा नाही.

मंदिराच्या आवारात मोठमोठी झाडे असल्याने तसेच दगडी बांधकाम असल्याने मंदिरात उन्हाळ्यात उकाडा अजिबात जाणवत नाही. मंदिराच्या आवारात खूप मोठ्या दगडी गोट्या आहेत.  गावोगावी चे पैलवान त्या गोट्या खांद्यावर उचलून ताकतीचे प्रदर्शन करीत असत.गावजवळून नदी वाहते तरीदेखील गाव खडकावर वसल्याने कदाचित गावाचे नाव सुद्धा खडकलगाव पडले असावे.  अशा गावात जायचा योग यायचा तो बहुतांश  चंपाषष्ठीला(सटीला). गावातील लोक आपापल्या बैलगाड्या घेऊन जत्रेला जात असत. तो बैलगाडीचा प्रवास आता एक स्वप्नंच बनून गेला आहे. सगळ्या गाड्या एकत्र आल्यास गावाचा एकोपा दिसतो अशी भावना असल्याने बहुतांश गाड्या सोबतच जात असत. ज्यांच्याकडे गाड्या नसतील अशा व्यक्ती चालत किंवा सायकल वर निघत असत.

एखाद्या वर्षी आमची बैलगाडी जाणार नसेल तर मनातून खूपच आनंद होत असे. एकट्यानं कुणासोबत जायचं नाही जत्रेला अशी घरच्यांची तंबी असे. पण घरच्यांच्या नजरा चुकवून जत्रेला जाणे खूपच रोमांचकारी असे. मित्रांसोबत किंवा मोठ्या माणसासोबत पायीच जाणे हाच एकमेव पर्याय असे. पायी चालत जाताना तहानभूक हरपून जाई. सोबतीला कुणी असो किंवा नसो, पण खूप मजा यायची. कुणाच्या तरी सायकली मागून पुढे जात. बैलगाडीत असलेल्या बायकांपैकी कोणा तरी आयबायांना दया येई. त्यांच्याकडून एकटं लेकरू चालत आहे म्हणून नाही तर एकटं आहे म्हणून गाडीत  बसण्याचा आग्रह केला जाई. पण अनवाणी पायाने चालत असलो तरी पायी चालत जाणे आवडायचं त्यामुळे गाडीत बसायला नकार देताना नाकीनऊ यायचे.

जत्रेत गेल्यावर देखील बाजारात मन रमायचं नाही कारण खिशात पैसे नसत. सगळीकडून मंदिर पाहणे, जत्रेतल्या लोकांना पाहणं, त्यांच्या गमतीजमती अनुभवणं हेच आवडत असे. दिवस मावळतीकडे कलला की घराकडे परतीची ओढ लागायची अगदी दुपारपासून खायला प्यायला काहीच नसताना देखील काहीच वाटायचं नाही पण दिवस मावळायला लागला की घराकडे परतत असे. परतीच्या प्रवासात मात्र कुणी तरी गाडीत बसण्याचा आग्रह करावा, कुणी तरी सायकल वर न्यावे असे वाटे. खडकावर वसलेलं खडकलगाव आणि तेथील खंडोबा यांच्यामुळे सुद्धा भटकंती करायची आवड निश्चितच निर्माण झाली.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥗🥙🥗 भाग तीन 🥙🥗🥙


बार्शीपासून 5- 6 किमी अंतरावर माझं गाव असूनही गावाचं वेगळेपण टिकून आहे पण असं असलं तरी गावाला फारसा इतिहास नसावा असं वाटतं कारण गावात कोणत्याही प्रकारची जुनी वास्तू, मंदिर, शिलालेख अशी इतिहासाची उकल करणारी साधनं नाहीत. नाही म्हणायला, चारशे पाचशे वर्षांपूर्वीचा आमचा वाडा, मारुती मंदिराचा गाभारा आणि तेवढ्याच वयाची शाळेच्या आवारातील दोन चिंचेची झाडं अन चार दोन बांधीव विहिरी वगळता यापूर्वीचा इतिहास कळायला काही मार्ग नाही.  त्यामुळेच की काय पण जुनी मंदिरं, जुन्या वास्तूची ओढ अधिक प्रमाणात लागली आहे. 

माझ्या लहानपणी डॉक्टर पेक्षा देवावरच जास्त भरवसा असायचा, गावातल्या आयबायांचा. त्याचाच परिणाम म्हणून लेकरं आजारी पडली की आया  डोंगरातल्या आयांना नवस  बोलून मोकळ्या होत. सटवाई, येमाई, येडाई अशा देवी त्यांचे नवस घ्यायला टपूनच बसलेल्या असत जणू.

माझाही असाच काही तरी नवस तळ्याच्या आईला असावा, तो पूर्ण करण्यासाठी म्हणून तळ्याच्या आईला भेटायला जायचं ठरवलं होतं. तळ्याची आई म्हणजे कोण?? बार्शी तालुक्यातील मराठवाड्याच्या सीमेवर असलेले शेवटचे गाव कोरेगाव या गावातील तळ्याच्या काठावरील येमाई देवी आमच्या गावच्या पंचक्रोशीत तळ्याची आई म्हणून प्रसिद्ध आहे. 

 सकाळी सकाळी लवकर उठून कोरेगाव कडे जाण्यासाठी बैलगाडी हाकायला सुरू केली होती, मजलदरमजल करत इथं पोहोचेपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. गावाच्या अलीकडेच एक दोन किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत तळ्याच्या आईचे  मंदिर आहे. सह्याद्रीच्या बालाघाट डोंगररांगेतील एका बाजूला सुटलेल्या डोंगररांगेत दोन डोंगराच्या मध्ये एक मोठी भिंत बांधून पाणी अडवल्यामुळे खूप मोठा तलाव निर्माण झाला आहे. पलीकडे असलेल्या डोंगरावर शामनाथ महाराजांचा मठ आहे आणि अलीकडे असलेल्या डोंगराच्या कोपऱ्यात यमाईदेवीचे छोटे मंदिर होते, आता मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याने मोठे सभागृह आहे. अत्यंत चिंचोळ्या, पाणंद वजा रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर दोन डोंगराच्या मध्ये असलेली प्रचंड भिंत दिसते. अंदाजे शंभरेक पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मंदिर दिसते आणि सभोवताली पसरलेला मोठ्ठा तलाव. तलावाच्या चारी बाजूंनी जणू राखणीला उभे असलेले डोंगर, त्याच्यावर वनविभागाने लावलेली झाडे त्यामुळे इथल्या परिसराच्या सौंदर्यात अधिकच भर पडलेली दिसते.मंदिर परिसरात मोठा सभामंडप असून त्याच्या कडेला उंच भिंत बांधून कठडा तयार करण्यात आला असल्याने त्यावर  बसून तलावाचे सौंदर्य न्याहाळत बसता येते.तळ्यातील पाण्यातून वर आलेले गवत,  सभोवताली असलेल्या डोंगराचे त्यांच्यावरील झाडासकट पडलेलं प्रतिबिंब, पाण्यात सूर मारणारे पक्षी आणि पाण्यावर विहार करणारी एखादी बदकाची जोडी.  एखाद्या कुशल चित्रकाराच्या कॅनव्हासप्रमाणे हे चित्र  भासते. मुन्नारच्या फोटो पॉईंट वरील शांत तलावासारखे दृश्य दिसते, खरं सांगायचं तर मला मुन्नारच्या तलावातील पाण्यात पाय  सोडून बसल्यावर सुद्धा मला इथलीच आठवण आली होती. यावरून वाचक थोडीशी कल्पना करू शकतात. देवीचे दर्शन आणि इतर धार्मिक विधी झाल्यावरच माझी सुट्टी झाली होती. देवीचे उग्ररुप पाहून कसंसंच झालं होतं पण आपलं भलं करणारी असल्याने घाबरायचं काही कारण नाही असं माझ्या बालमनाला वाटलं. सभागृहाच्या बाजूला तलावाच्या पाण्यापर्यंत उतरायला नदीवरच्या घाटासारख्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्या पायऱ्यावर पाण्यात पाय सोडून बसल्यावर  पायाला माशांनी केलेल्या गुदगुल्या अजूनही आठवतात. मंदिराच्या पाठीमागून धरणाच्या भिंतींवरून पलीकडे जाऊन यायचे होते, तेव्हा इथं मठ आहे असं माहिती नव्हते पण बांधकाम आहे म्हणजे काही तरी आहे असं वाटायचं मला.  15 ते 20 फूट रुंदीची भिंत आहे पण ती भिंत ओलांडून पलीकडे जायला 20 वर्षाचा काळ लोटला होता. 

सूर्य डोक्यावरून कलला आणि आमची गाडी परत फिरण्याची वर्दी आली, तरीही घरी जायला खूप रात्र होणार होती. निघताना पाय निघतच नव्हता. पण निघाल्याशिवाय पर्याय नव्हता. नवस माझा असला तरीही मला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. त्यानिमित्ताने मला इतकं सुंदर ठिकाण अनुभवायला मिळालं होतं. आणि मला इथं परत परत यावं वाटलं तर त्यात नवल ते काय!!!

पण दुसऱ्यांदा इथं यायला 20 वर्षाचा कालावधी जावा लागला.

दुसऱ्या वेळेस ऐन पावसाळ्यात इथं आलो होतो तेही खास हे तळं पहायला. तलावाच्या भिंतींवरून पलीकडे शामनाथ महाराजांच्या मठात जाऊन  आलो. एक दिवस  कौटुंबिक सहलीसाठी अत्यंत चांगले, निसर्गरम्य असलेले हे तळ्याच्या आईचे ठिकाण मनाला वेड लावून गेले. 

तहानभूक, सुखदुःख, ईर्षा,  द्वेष इतकंच काय स्वतःचं अस्तित्व विसरायला लावणारे हे ठिकाण म्हणजे माझ्यासाठी भटकंतीचे बाळकडूच!!!

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥗🥙🥗 भाग चार 🥙🥗🥙


आजूबाजूच्या जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यातील भाविकांचेसुद्धा  श्राद्धस्थान  म्हणजे श्री क्षेत्र येरमाळा येथील श्री. येडेश्वरी देवी, अर्थातच येडाई.

माझा बार्शी तालुका पश्चिम महाराष्ट्रात असला तरीही तिन्ही बाजुंनी मराठवाडा असल्याने मराठवाड्याशी अत्यंत जवळीकतेचे नाते निर्माण झाले आहे. मराठवाड्यात जाण्यासाठी बऱ्याचदा बार्शीतूनच जावे लागते म्हणून बार्शीला मराठवाड्याचे प्रवेशद्वार असे म्हणतात. आजकाल गावोगावीच्या यात्रा काळाच्या ओघात संपुष्टात आल्या असल्या तरी ही यात्रा ऐन उन्हाळ्यात आणि मराठवाड्यात असूनही  येरमाळ्याच्या यात्रेला लाखो भाविक हजेरी लावतात. चैत्री पौर्णिमेला ही यात्रा भरते. देवीची पूजा, पालखी सोहळा, चुना वेचणे हे महत्वाचे कार्यक्रम या यात्रेत असतात. 

 90 च्या दशकात मी सर्वप्रथम येडाईला गेलो असेल, त्यानंतर कित्येक वेळा. येडाईला जायची तयारी आठ दिवसापासून सुरू झालेली असायची, हॉटेल्स ही संकल्पना पुसटशी देखील नव्हती. त्यामुळे कुठे ही प्रवास करायचा असेल तर खाण्याची व्यवस्था करावी लागत असे तर पाण्यासाठी आजसारख्या जार, बाटलीची सोय नव्हती, जिथं विहीर असेल तेथून पाणी भरून पाण्याची गरज भागवली जायची.

येडाईला जायचं म्हणजे सहकुटुंबच असा अलिखित नियम असावा.

यात्रेला जायच्या दिवशी सकाळी लवकर हुरड्याच्या पिठात गूळ घालून केलेली गोड धपाटी, कापण्या, मिरच्या घालून केलेली तिखट धपाटी, हिरव्या मिरच्याचा ठेचा, लाल चटणी, जवसाची चटणी, गेल्या वर्षीचा मुरलेला खार याची लज्जत तर अप्रतिमच, अशी तयारी करण्याच्या गडबडीत घरच्या सुना असत तर सासवा योग्य त्या सूचना देण्यात व्यस्त असत. गडी माणसं बैलगाडी स्वच्छता, कडबा गाडीला बांधून घेणे, बैलांना धुणे , शक्य असल्यास रंगवण्यात व्यस्त असत आणि लहान मुले काही तरी काम वाढवण्यात दंग असत. 

उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतेक प्रवास सकाळी लवकर किंवा रात्रीच्या वेळी असे. 

सायंकाळी जेवण जेवण झाल्यानंतर गाडी येण्याची वाट बघत बसणं लय जड जायचं, कारण प्रवास सुरू व्हायचा रात्री उशिरा त्यामुळे तोपर्यंत जागं राहणं बहुतेक जमत नसे. झोप लागत असे. 

रात्री कधी तरी मागे कडब्यासकट मुंगा बांधून, तसेच प्रवास दोन तीन दिवसांचा असल्याने साठीमध्ये पण कडबा टाकला जाई आणि त्यावर अंथरूण टाकलं की बसायला पण मऊ मऊ वाटे, नळा सुद्धा वंगण करून बैलगाडी दारात उभी राहिली की सगळं साहित्य गाडीत व्यवस्थित ठेवलं जाई. खाण्याचं, देवीचं, परडीच असं सगळं साहित्य,पाण्यासाठी घागर, पाणी प्यायला तांबे, कपडे असं सगळं ठेवून गावातील जेवढ्या गाड्या जाणार असतील तेवढ्या गावाबाहेर उभ्या राहत असतं. आम्ही झोपेत असतानाच गाडीत घातले जाई. रात्री कधी तरी कुत्र्याच्या भुंकण्याने जाग येईल तेव्हा कळायचे की आपण येडाईला निघालो आहोत, खूप आनंद व्हायचा. रात्री उशिरा बैलगाड्या निघायच्या तेव्हा गावोगावीच्या माळावर किंवा मोकळ्या जागेत हळद शिजवण्याचं काम चालू असायचं. मैदानात हळद वाळू घातलेली असायची. चांदण्याच्या शुभ्र प्रकाशात हे सगळं बघत परत आई किंवा आजीच्या कुशीत कधी झोप लागायची हे कळायचं नाही, बाभूळगाव,कुसळंब, धानोरे, पाथरी करत तांबडं फुटायच्या वेळेला पाथरीच्या ब्रिटीशकालीन तळ्यावर सगळ्या बैलगाड्या थांबत, याच तळ्यातून बार्शीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आहे तिचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ उताराचा वापर करून पाणी बार्शीत आणले जात असे. पण काळाच्या ओघात ही योजना बंद पडली आहे. तळ्याच्या काठावर अंधारातच अंघोळी वगैरे सर्व आवरलं जायचं आणि पुढच्या प्रवासाला सुरवात व्हायची, माझ्या दृष्टीने ही खरी सुरवात असायची कारण सूर्योदय झाल्यानंतर पाठीमागे पडलेलं मोठ्ठं तळं, रस्त्याने जाणारी तुरळक वाहन, आणि आमच्या सारख्या अनेक बैलगाड्यांची रांग, प्रवासात खूपच मज्जा यायची तेंव्हाही आणि आताही, मला प्रवासाचा अजिबातच कंटाळा येत नाही कितीही लांबचा प्रवास असला तरीही, सलग 50 तास प्रवास केला तरीही खूप आनंदच वाटतो कंटाळा नाही, 

मराठवाडयात प्रवेश करण्यापूर्वी बालाघाट डोंगररांगेतील घाट पार करावा लागतो, वळणावळणाचा तो रस्ता म्हणजे मी पाहिलेला पहिला घाटरस्ता, बैलांना घाटातून गाडी ओढताना त्रास होई, तेव्हा गडी माणसं, सुना मंडळी गाडीतून उतरत असत, गाडीत फक्त चिलीपिली, म्हातारी माणसं, व गाडीवान इतकेच असत, बैलावर पुत्रवत प्रेम करणारे शेतकरी खूपच काळजी घेत असत. बैलाला कधीच आसूड न लावणारे शेतकरी मला माहित आहेत. मलाही गाडीसोबत पायी चालावं वाटायचं पण बारका असल्याने कधी शक्य झाले नाही, गाडीसोबत काही मंडळी तर गावापासून चालत असत गाडीसोबत ज्यांना बैलगाडीत बसायला जागा नसे आणि ज्यांच्याकडे बैलगाडी नसे अशी माणसं पायी चालत सगळा प्रवास करत असत. ती माणसं गावात कधीही पहिली तरी खूप आदर वाटायचा त्यांचा. घाट चढून गेल्यावर नेमका सूर्योदय झालेला असे, चालत्या गाडीतून पूर्वेला तोंड करून येडाई च्या डोंगराचे दर्शन घेतले जाई. 

जत्रा असल्याने या काळात येडाईला जायचे टाळले जाई. सगळ्या गाड्या चुन्याच्या रानात असलेल्या आमराईत आंब्याच्या झाडाखाली सोडल्या जात. 

सगळीकडे माणसंच माणसं, उंचच उंच पाळणे, खेळणी, पिच्चरच्या टाक्या, इथून येडाईच मंदिर पाच सहा किमी लांब होते पण इथचं आमराईत देवीची पालखी सोहळा पार पडला जाई, वर्षभर काळ्या असलेल्या शेतात जेव्हा देवीची पालखी येते तेव्हा अचानक तिथे चुन्याचे खडे निर्माण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. चुन्याच्या रानातील चुना गोळा करून पालखीवर टाकणे याला चुना वेचणे म्हणत. त्यावेळी खूप खूप गर्दी होत असे काही वेळेस थोडी थोडी चेंगराचेंगरी सुद्धा होत असे. तो मुख्य कार्यक्रम संपल्यावर  मग आंब्याखाली दगडांच्या चुलीवर भाकरी पिठलं असं बनवलं जाई त्याची चव अप्रतिम असायची, सोबतीला कांदा, खाराची फोड, धपाटी इ.असत. जेवणानंतर म्हातारी माणसं आराम करत तर इतर सर्व जण जत्रेची मजा अनुभवत असत. माझ्या आई,चुलत्यांच्या सोबतीने मी जात असे, असंच एकदा जत्रेत आईच्या हातातून माझा हात सोडवून घेतला आणि दुकानातील खेळणी बघत राहिलो आणि  आई नजरेआड झाली, खूपच घाबरलो, काय करावे ते सुचेना, रडू यायला लागलं पण कोणी ओळखीचे दिसत नव्हते त्यामुळे रडूही येत नव्हते.  इकडं आईची परिस्थिती खूपच वाईट झाली होती, सगळा बाजार पालथा घातला, मी खेळण्याच्या दुकानासमोर असेल म्हणून सगळी दुकाने शोधली पण काही पत्ता लागत नव्हता. आईचा धीर सुटला होता, ओळखीच्या माणसांना विचारायची पण सगळं व्यर्थ  आणि शेवटी ती रडायला लागली, परत जायचं कसं? तिला माझ्या वडिलांची, आजीची भिती वाटत असेल. चुलत्या आईला समजावत होत्या पण त्यांनाही भीती वाटत होती. आमराईकडे यायचे त्यांना धाडस होईना, हुडकून हुडकून दमल्या पण माझा पत्ता लागेना. मी मात्र आई दिसेना   तरीही सगळ्या जत्रेतून उनाड वासरासारखा फिरलो,  फिरून फिरून दमल्यावर अन भूक लागल्यावर आंब्याखाली आलो, आजी, वडील यांना पाहून खूपच आनंद झाला पण आजी विचारायला लागली की आई कुठे आहे, मी सांगून टाकले की मी चुकलो आणि परत आलो.  खूप वेळ झाल्यानंतर वडील जत्रेत आले, आई चुलत्यांना शोधलं आणि त्यांना मी असल्याचं सांगितलं तेंव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला. परत आल्यावर मात्र माझ्याकडे खूपच रागाने बघत होती आई, पण आजी समोर काही बोलू शकत नव्हती. कारण आजीनेच आल्या आल्या त्यांची खरडपट्टी काढली होती.

 आज रात्रीचा मुक्काम करून पहाटे पहाटे लवकर परतीचा प्रवास असायचा आजीची बहीण बाभूळगावात असल्याने तिथं एक मुक्काम असायचा, त्या आजीच्या घरासमोर पाण्याचा हौद होता, मोटार सुरू केली की पहिल्यांदा तो हौद भरत असे त्यात डुंबायला खूप आवडायचं. हौदाच्या कडेलाच सोनचाफ्याचे झाड होते त्याच्या फुलांचा सुगंध मनाला धुंद करून टाकत असे. तिथला पाहुणचार संपवून दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर जत्रा संपलेली असे, दरवर्षी येणाऱ्या दिवळीपेक्षा काही वर्षांतून येणाऱ्या या जत्रेतून मिळणारा आनंद म्हणजेच मला भटकंतीचे बाळकडू वाटतो.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🌺🍁महाराष्ट्र देशा!🍁🌺

    🌍एक गौरवशाली इतिहास🌍

"संत महतांची भूमी 

माझ्या मराठवाड्याची" अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाराशिव नगरीमध्ये व परिसरात पर्यटनाचा योग काही दिवसांपूर्वी आला. वैराग व बार्शीहून सारख्याच अंतरावर असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे व तिर्थस्थानांना भेट दिली. 

   रोजच्या रुटीनचा कंटाळा प्रत्येकालाच येतो. त्या रुटीनमुळे आपली ऊर्जा, उत्साह कमी होतो. कामात वेग यावा, काम कंटाळवाणे नव्हता आनंद यावा यासाठी आपल्यात ऊर्जा असणे आवश्यक असते उत्साह आवश्यक असतो .असा आनंद शोधण्यासाठी पर्यटनाची, तिर्थाटनाची गरज निर्माण झाली असावी असे मला वाटते. 

    रविवारी लवकरच घर सोडले , गाडीवरून तासाभरात उस्मानाबाद गाठले तेथून जवळच असलेल्या गडदेवदरी येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या देवस्थानी पोहोचलो. तिथं आणणाऱ्या शांततेचा आनंद घेत त्या रम्य स्थळी थांबून मध्य रेल्वेच्या बार्शी- लातूर रेल्वेवरच्या उंचचउंच पुलाचे दृश्य पाहून मन प्रसन्न झाले होते पण तो पूल प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा झाली अन तेथूनच जवळच असलेल्या जहागिरदार वाडी येथील रेल्वे बोगदा पाहून पूल पाहण्यासाठी जायचे असे ठरले पण बोगद्याजवळ येऊन तो 1602 मी लांबीचा बोगदा पहिला अगदी जवळ आल्यावर एका फलकाने माझे लक्ष वेधले 'हे पर्यटन स्थळ नाही,रेल्वे कर्मचाऱ्याशिवाय इतरांना प्रवेश निषिद्ध आहे,अपघात झाल्यास रेल्वे जबाबदार राहणार नाही' तेथूनच परत फिरलो.मराठवाड्याची विकासवाहिनी असलेल्या रेल्वेचे कौतुक करत संत गोरोबा काका यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 'श्री क्षेत्र तेर' येथे जाण्यासाठी प्रस्थान केले, आमचे परममित्र किरण हुकिरे यांच्या उपळे(माकडाचे) गावातून जाताना मित्राची खूप आठवण आली.उस्मानाबाद येथून 23 किमी अंतरावर असलेल्या तेर  या गावचा इतिहास आपल्याला इतिहासात घेऊन जातो सातवाहन काळात विकासाच्या शिखरावर असलेलं ठिकाण होतं , पुरातत्व खात्याच्या उत्खननातून अनेक बाबी जगासमोर आल्या आहेत, या अगोदर दोन तीन वेळेस तेरला भेट देण्याचा योग आला पण नेमकं येथील संग्रहालयाला सुट्टी होती आज मात्र पहिल्यांदा संग्रहालयाला भेट दिली अवघे3रु तिकीट असलेले रामलिंग अप्पा लामतूरे शासकीय संग्रहालय आज सुरु होते त्यामुळे पहिल्यांदा संग्रहालय पाहून नंतर मंदिरे पहावी असे ठरवले 'रामलिंग अप्पा लामतुरे'या थोर व्यक्तीने आपल्या जन्मभूमीची खरी ओळख जगाला व्हावी या पवित्र हेतूने तेर परिसरात सापडलेल्या, शोधलेल्या जवळपास 24 हजार वस्तूंचे संग्रहालय आहे,या सर्व वस्तू त्यांनी शासनाला दिल्या व शासनाने तेथे त्यांच्या नावाने संग्रहालय सुरु केले, त्याची माहिती तिथेच मिळाली संग्रहालय पाहताना स्वतःलाच स्वतःचा, अन भारतवर्षाचा अन त्याच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान वाटत होता, संग्रहालयातील प्रत्येक वस्तूचा तपशील येथे देणार नाही ते प्रत्यक्ष पाहनेच योग्य होईल . पण तेथे असलेल्या सर्व वस्तूपैकी माझ्या मनाला भुरळ घातलेल्या दोन वस्तूची माहिती देत आहे.

1) पाण्यावर तरंगणारी वीट

   आपल्या देशात विकसित झालेल्या अप्रतिम बांधकामशास्त्राच्या विकासाचा नमुनाच होय. मातीपासून तयार केलेली ही वीट पाण्यावर तरंगलेली आपल्याला पाहायला मिळते.यासारख्या अनेक अप्रतिम वस्तू येथे आपल्याला पाहायला मिळतात. त्या आपण अवश्य पाहायलाच हव्या .

2) कासवाचे पदक

    तत्कालीन समाजात आई व बाळाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून लहान बाळाच्या दंडाला कासवाचा आकार असलेला हस्तीदंताचा मनी बांधत असत. त्याची खूपच रंजक गोष्ट तेथे वाचायला मिळाली ती अशी:-

    कासवाच्या मादीला स्तन नसतात त्यामुळे इतर सस्तन प्राण्यासारखे पिल्लाला दूध पाजता येत नाही. त्यामुळे जेंव्हा कासवाच्या पिल्लाला भूक लागते तेंव्हा ते विशिष्ट आवाज करते व त्या आवाजाने त्याची आई जवळ येते व अशा प्रेमळ नजरेने त्या पिल्लाकडे पाहते कि त्या प्रेमळ नजरेने व आईकडे नुसते पाहण्याने पिल्लाचे पोट भरते. अशाच प्रेमाचे प्रतीक म्हणून त्या काळात लहान बाळाच्या हाताला हे "कासवाचे पदक" बांधले जात होते. 

  प्रत्येक वस्तू पाहताना मन हरखून जाते वस्तुपुढून पाय निघत नाही सर्व वस्तू व्यवस्थित पाहण्यासाठी एक दिवस पूर्ण हवा. 

सात वाहन काळात तेर जागतिक व्यापाराचे प्रमुख केंद्र होते संपूर्ण जगात सर्वत्र व्यापार तेर येथून चालत असल्याचे पुरावे सापडले आहेत असो. 

 विठ्ठलाचे नामस्मरण करत आपले काम करणाऱ्या गोरोबकाकांच्या पायी आपले मूल आले तरी ध्यानात आले नाही अशा विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेल्या संत गोरोबा काकांच्या समधीपुढे नतमस्तक होताना "धन्य हाची दिन 

अनंत जन्मीचा शीण गेला" असेच भाव मनात आले, मन विलक्षण शांत झाले, प्रसन्न झाले मोरपिसासारखे हलके हलके झाल्याचा अनुभव घेतला. मनात एकच विचार विठ्ठलाचा असताना वीणेची सेवा करण्याची इच्छा मनात आली अन लगेच वीणावादन करणाऱ्या माऊलीच्या पाया पडून वीणा गळ्यात घेतली अन ती वडीलधारी व्यक्ती माझ्या पडली तेंव्हा मला माझ्यातील बारकेपणाची प्रकर्षाने जाणीव झाली कोणा जेष्ठ माणसाला पाया पडवून घेताना खूप अवघडून गेलो परंतु नंतर लक्षात आले की वारकरी संप्रदायात सर्व विठ्ठलाचीच रूपे समजतात वारीत अन मंदिरात सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात लहानथोर, लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद असा काही नसतोच, वीणेच्या आवाजाची मधूरता मला माझ्या मनातील विलक्षण आनंदाची  जाणीव करून देत होती, 

मोबाईल मधील कचरा जसा क्लिअर कॅचे करून काढतो अगदी तसेच मनातील कचरा काढण्यासाठी असेच कुठेतरी नतमस्तक होणे आवश्यकच नाही का?

अतिशय जड अंतःकरणाने, भरलेल्या मनाने, विलक्षण शांतीचा अनुभव घेऊन बाहेर पडलो पण बाहेर पडताना इथून हलूच नये असे वाटत होते.


तेर गाव व परीसरात अनेक सुंदर व पुरातनमंदिरे आहेत 

1)गोरोबा काका समाधी मंदिर

2) शिव कालेश्वर मंदिर 

3)उत्तरेश्वर मंदिर

4) त्रिविक्रम मंदिर

5)जैन दिगंम्बर मंदिर

6) सिद्धेश्वर मंदिर 

सर्व मंदिरे अतिशय पुरातन व देखणी आहेत  बांधकामाचा उत्कृष्ट असलेल्या सर्व मंदिरात जाऊन दर्शन घेतले, 

परत येत असताना रस्त्यालगतच असलेल्या जि प कन्या शाळा तेर ला भेट दिली , सुट्टीचा दिवस  असलातरी एक शिक्षक असल्याने पाऊले आपोआप शाळेकडे वळली शाळेच्या आवारात अतिशय सुंदर रंगरंगोटी केलेली आहे सुंदर सुविचार, ओव्या लिहिलेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी चित्रे काढलेली आहेत, शालेय परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसला , 'घराची कळा अंगण दाखवतं'  या म्हणी प्रमाणे शाळेचे अंतरंगही सुंदर असेलच असे मनात पक्के करून उस्मानाबादकडे निघालो .

           सर्वात आवडती गोष्ट प्रवास अन त्यातही कानात हेडफोन घालून मोटारसायकल वरील प्रवास म्हणजे सोने पे सुहागाच फक्त माझ्यासाठीच

       उस्मानाबाद जवळच लेणीही आहेत पण ती आगोदर पहिली असल्याने व वेळ कमी असल्याने हातला देवीच्या मंदिराकडे गेलो आणि छोट्या टेकडीवर असणारे मंदिर पण हिरव्यागार व घनदाट वनराईने नटलेल्या डोंगरावर वेड्यावाकड्या वळणाने गाडी चालवताना आपण दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात आपण आहोत असे वाटतच नाही तर पंचतारांकित थंड हवेच्या ठिकाणी आल्याचा भास होतो, मंदीर परिसराचा अतिशय विकास झालेला आहे सर्वप्रथम देवीचे दर्शन घेतले पौर्णिमेचा दिवस असल्याने भाविकांची वर्दळ होती अन दिवस मावळतीला चालला होता 

     फक्त हातला देवीचा मंदिर परिसर म्हणजे एक दिवस सहलीचा अतिशय छान पॉईंट आहे गर्द हिरवी वनराई डोंगरावरील विविध पॉईंट अतिशय सुंदर आहेत तेथून धाराशिव शहराचे व परिसराचे विहंगम दृश्य दिसते हातला देवीचे दर्शन घेऊन परिसरात फेरफटका मारताना एकदम मस्त वाटते एका विंडो पॉईंट वरून सनसेट चे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले पण आपण पाहत असलेला सनसेट हा माथेरान, महाबळेश्वर येथील असल्याचे भासत होते. अश्या कातरवेळी निसर्गाची क्षणा क्षणाला बदलणारी रूपे पाहताना मनातही अनेक तरंग उठत होते अन बारावीला माझा विषय मराठी नसतानाही केवळ वाचनाच्या आवडीपायी अनेकवेळा वाचलेली बारावीच्या मराठी विषयातील कातरवेळ हि कथा आठवत होती.

       तेथून पाय निघतच नव्हता पण मोटारसायकल वर वैरागला जायचे असल्याने ओझरताच परिसर पाहून घेतला अन येथे परत परत यावेच लागणार आहे असे मनात पक्के केल्यानेतेथुन निघालो ते सर्वसाधारण सात वाजता परत यायचेच हे नक्की करूनच.  बच्चे कंपनीसाठी खेळाची अनेक साधने येथे आहेत परिसर रम्य, शांत व हिरवागार आहे त्यामुळे प्रत्येकाने एकदातरी पिकनिकला जावेच असे ठिकाणं आहेत .

        परत कधी जायचे याचा विचार करत करतच वैरागला पोहोचलो


शब्दांकन 

 शंकर शिंदे


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥗🥙🥗 भाग पाच 🥙🥗🥙

मला मराठवाडा अत्यंत जवळचा वाटतो. कारण माझा जन्मच मराठवाड्यातला आहे त्यामुळे मराठवाड्याची अनामिक ओढ लागली आहे ती कायमचीच, भटकंती करण्याची सुरुवात देखील मराठवाड्यातील पर्यटन स्थळापासून सुरवात झाली. 

माझं आजोळ माझ्या गावात असूनही माझ्या आईची आई तिच्या लहानपणीच वारली असल्याने माझ्या आईचे बाळंतपण आईच्या मामीने केलं. पाच पिंपळा ता. परांडा हे माझं जन्मगाव, इथल्या एका वाड्यात माझा जन्म। झाला आहे. परिस्थिती साधारण असूनही नंणदेच्या मुलीचं बाळंतपण करणारी मामी म्हणजे मला साक्षात देवीच वाटते. 

लहानपणी कधीतरी माहेरवाशीण म्हणून किंवा लग्न किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आई पाच पिंपळा इथं जात असे. प्रवास तसा लांबचा असला तरीही कंटाळा यायचा नाही. बसच्या खिडकीतून बाहेर बघत असतानाच वेळ कसा निघून जायचा हे समजायचं नाही. 

संपूर्ण प्रवासात ओढ असायची ती किल्ल्याची आणि त्यामुळेच कोणत्या बाजूने बसल्यावर किल्ला दिसेल त्याच बाजूच्या सीटवर बसण्यासाठी माझी धडपड असे. किल्ल्याच्या चारी बाजूंनी फिरून बस स्थानकात येत असे त्यामुळे जणू बसमधील प्रवाशांना किल्ला दाखवण्यासाठीच फिरत असेल असे मला वाटत असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे करमत नसे पण किल्ला (बसच्या खिडकीतून का असेना!) पाहण्याच्या ओढीने जायला मला आवडत असे. 

उंचच उंच बुरुज, त्याभोवती असलेल्या खंदकात असलेले हिरव्या रंगाचे पाणी, तटबंदीवर उगवलेली झाडेझुडपे, गवत आणि मध्येच गवतातून डोकावणाऱ्या तोफा किल्ल्याच्या अभेद्यतेची आणि भव्यतेची साक्ष देत असत. बहुतेक किल्ल्याच्या चारी बाजूंनी बस फिरून देखील  किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत नसल्याने किल्ल्यात प्रवेश करण्याविषयी प्रचंड उत्सुकता असे. लोकांमध्ये  किल्ल्याविषयी प्रचंड अनास्था असे, पण पुस्तकात वाचलेल्या,  किल्ल्यासारखा उल्लेख असलेल्या किल्ल्याला दुरुन का होईना पाहिलं याचा आनंद खूप खूप मोठा असे. मी किल्ला पाहिला यावर माझ्या शाळकरी मित्रांसोबत माझी कित्येक दिवस चर्चा चालत असे. पण हा परांड्याचा किल्ला तसेच परांड्यापासून जवळच असलेल्या सोनारीला किंवा कल्याण स्वामींच्या समाधी स्थळी जाण्याचा योग जुळून यायला खूप खूप काळ लोटला.

गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा परांड्याचा किल्ला पाहिला. तेव्हा बालपणी स्वप्नवत असलेल्या ठिकाणी आल्याचा आनंद झाला होता. दुहेरी तटबंदी, सभोवताली  खंदक, त्यावर असलेला सरकता पूल, जो आता नाही, एका इमारतीत असलेले तोफगोळे,  महाराष्ट्रातील किल्ल्यावर क्वचितच आढळणाऱ्या इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या अजस्त्र तोफा पर्यटकांना आकर्षित करतात. सद्या किल्ल्याचा विकास सुरू आहे त्यामुळे भविष्यात इथं पर्यटकांची गर्दी वाढणार हे नक्की पण मी लहानपणीपासून दुरून पाहिलेला हा परांड्याचा किल्ला माझ्यासाठी भटकंतीचे बाळकडूच आहे. परांड्यापासून जवळच असलेल्या सोनारीला किंवा कल्याण स्वामींचे समाधी स्थळ डोणगाव परांड्यापासून जवळच आहे. रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या दासबोधाचे लेखन कल्याणस्वामी यांनी केले आहे आणि त्याची हस्तलिखित प्रत आपणांस इथं पहायला मिळते. चारी बाजूंनी सीना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी आणि मधेच असलेले मंदिर, खूपच रम्य परिसर आहे. तिथून भैरवनाथाचे मंदिर असलेले सोनारी हे अत्यंत जवळचे पर्यटन स्थळ आहे. विशेषतः पावसाळ्यात परांड्याचा किल्ला, डोण गाव, सोनारी ही एकदिवसाची सहल खूपच छान होऊ शकते.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥗🥙🥗 भाग सहा 🥙🥗🥙

उस्मानाबाद जिल्ह्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते ठिकाण म्हणजे रामलिंग. उस्मानाबाद, बीड , सोलापूर, लातूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दा स्थान असल्याने वरील सर्व जिल्ह्यातील भाविकांची गर्दी श्रावण महिन्यात रामलिंगला होते.  त्या गर्दीचाच एक भाग आम्ही असायचो. बालाघाट च्या डोंगररांगेत येडशीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर राम नदीच्या तीरावर रामलिंग आहे. माझ्या गावापासून  अवघ्या चाळीस पंचेचाळीस किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणानेच्या भटकंतीची आवड निर्माण केली. साधारणपणे तीस वर्षांपूर्वी मिरज- लातूर या नॅरोगेज रेल्वेने प्रवास म्हणजे नुसता आनंद आणि धमाल असायची. माथेरान ची टॉयट्रेन, दार्जिलिंग ची टॉयट्रेन याची आठवण करून देणारा प्रवास असायचा हा. केवळ सात रुपये तिकीट असायचे बार्शी ते रामलिंग, नऊ वाजता बार्शीतून आणि पाच वाजता रामलिंगवरून रेल्वे असायची. मागील काही वर्षापूर्वी या रेल्वे मार्गाचे  रुंदीकरण झाले आणि त्यामध्ये मार्गही बदलला गेला. आता या मार्गावर रुळदेखील शिल्लक नाहीत पण स्टेशनचे फलक तेवढे गतवैभवाची साक्ष देत उभे आहेत. सकाळी लवकर भाकरी चटणी, ठेचा असं काहीतरी बांधून सायकलवर बार्शी गाठायची. मोठ्या माणसांच्या ओळखीने टिळक चौक परिसरात कुठे तरी सायकल लावून पायी चालत बारसी टाऊन रेल्वे स्टेशन वर यायचं, गर्दी नसायचीच कारण गावाकडून यायचे असल्याने लवकर यायचो त्यामुळे गर्दी नसायची, 7 रु देऊन जाड पुट्ठ्याचे तिकीट घ्यायचे आणि रेल्वेची वाट पाहत बसायचं काही धीट माणसं तिकीटही घेत नसत पण ते धाडस कधीच झालं नाही तेंव्हाही आणि आताही, रेल्वे स्टेशन म्हणजे अस्सल इंग्रजांच्या काळात गेल्याचा फील येतो, ते जुनाट रंग, फर्निचर, हिंदी, इंग्रजी भाषेत लिहिलेली माहिती. हे निरखण्यातच कधी वेळ निघून जाई, हे लक्षात येत नसे. कारण वर्षातून फक्त श्रावण महिन्यातील एखाद्या सोमवारीच रेल्वे स्टेशन कडे येण्याचा योग येत असे. याव्यतिरिक्त कधीच इकडं येत नसे.  रेल्वे आल्यावर खिडकीत जागा पकडण्यासाठी पळापळ केली जाई, खिडकीतून मागे पळणारी झाडं पाहण्याची इच्छा सगळ्यानाच असते आजही. पांगरी पासून पुढे दाट झाडी, उंच हिरवाईने नटलेले डोंगर, मधूनच धबधबे, उंच उंच पूल पाहून हे बांधणाऱ्या माणसांचे कौतुक वाटायचं. त्यांना पाहत रामलिंग स्टेशन वर गाडी आलेली असायची. बरीच मंडळी रामलिंग स्टेशन वर न उतरता येडशीला उतरून बस किंवा चालत रामलिंगला जात असत. पण मोठी मुले रामलिंगला उतरून डोंगरावरून रामलिंगला पोहोचत असत आणि परतही याच मार्गाने. 

रामलिंग स्टेशनवर उतरलं की लगेचच उजव्या बाजूस रामलिंग परिसरातील सर्वात उंच डोंगर चढून जात असू, त्याला दुर्गा देवीचा डोंगर म्हणून ओळखले जाते तर रेल्वे च्या दप्तरी त्याची ओळख दुर्गादेवी हिल म्हणून आहे. त्या बऱ्याच पसरट असलेल्या डोंगरावर रेल्वेने बांधलेले रेस्ट हाऊस आहे. 1907 साली बांधलेले हे रेस्ट हाऊस खूपच सुंदर आहे. इंग्रजी पद्धतीने केलेले बांधकाम, लाकडी जिने, इतर कलाकुसर पहिली की खूपच छान वाटतं.दोन मजली असलेल्या या रेस्ट हाऊस समोरच मोठी बागसुद्धा आहे. पण त्यावेळी तिथला रेक्टर बागेत जाऊ देत नसे खासकरून श्रावण महिन्यात तरी कारण काही खोडकर मुलं बागेतील फुले, पाने तोडणे, काही तरी नुकसान करणे अशा अनेक गोष्टी करत असत विशेषतः शहरातील मुलं, तेंव्हाही आणि अगदी आताही आपल्या देशाची सार्वजनिक मालमत्ता आपल्याला आपली वाटतच नाही त्यामुळेच त्याचे नुकसान करणे, कोणी करत असेल तर बघ्याची भूमिका घेणे असंच आपलं काम असतं. खूप मोठ्या अतिसुंदर रेस्ट हाऊसच्या शेजारील अगदी लहान जागेत कमरेइतक्या उंचीचे दुर्गादेवी चे मंदिर आहे. पहिल्यांदा मला हे रेस्ट हाऊस म्हणजेच दुर्गादेवीचे मंदिर वाटलं होतं. डोंगराच्या चारी बाजूंनी कुंपण करून एक, दोन ठिकाणी सभोवताच्या परिसराचे निरीक्षण करण्यासाठी ओटे बनवले आहेत. इथूनच सभोवताली असलेल्या हिरव्यागार परिसराचे निरीक्षण करत किती वेळ जातो हे कळत देखील नाही. मोठं झाल्यावर एकदातरी इथं यायचंच,  या रेस्ट हाऊस वर मुक्काम करायचा असं मनाशी ठरवलं आहे पण ते अद्यापही शक्य झालेले नाही. यावर्षीच्या श्रावण महिन्यात तो योग येणार होता पण काही कारणाने शक्य झाले नाही, बघू भविष्यात कधी योग जुळून येईल ते.

दुर्गादेवी हिलवरून रामलिंगला जायचं म्हणजे दोन तीन डोंगर चढायचे आणि उतरायचं. खळाळणाऱ्या पाण्यातून, दाट झाडीतून जाताना भारी वाटायचं. आजही वसोट्याच्या जंगलातून जाताना वाटतं तसं.  वाटेत वैदिक पध्दतीने शिक्षण देणारे गुरुकुल आहे. दोन डोंगराच्या कुशीत वसलेले हे गुरुकुल , त्यात शिक्षण घेणारे बटू विद्यार्थी पाहून जणू काही वैदिक काळातील आश्रमात आल्याचा भास होत असे. पायी चालत असताना तहान लागली की वाहणारे पाणी पिऊन तहान भागवायची व पुढे चालायचं रामलिंग अभयारण्यात जाताना हायवेवरून एक सिंगल डांबरी रस्ता या वैदिक गुरुकुलात येतो.तीव्र उतार, वळणे उंचच उंच झाडे रस्त्याच्या कडेने वाहणारं पाणी, मधेच या काही ठिकाणी या पाण्याला बांधलेले बंधारे, त्यावरून खळखळ करत वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजात  सगळं टेन्शन, ट्रेस गेला नाही तरच नवल. त्यामुळे कधीही रामलिंगला गेलं की त्या रस्त्याने एक फेरी मारल्याशिवाय चैनच पडत नाही.

गुरुकुलापासून रामलिंग देवस्थान जवळच आहे. एक डोंगर चढून गेल्यावर समोर सगळी जत्रा भरते. शंभरेक पायऱ्या उतरून रामलिंग देवस्थानाकडे जाता येते. या वाटेवर मात्र शेकडो माकडं आपली वाट अडवतात, भाविकसुद्धा इथल्या माकडांना खायला देतात. इथं अनेक दुकाने थाटलेली असतात, नारळ, हार फुले, प्रसाद खाऊ इत्यादी. रामलिंग मंदिरात नंदीच्या समोरच जटायूची समाधी आहे. मंदिरातून मागे गेलं की तीस चाळीस फुटावरून पडणाऱ्या धबधब्याचे मुख्य आकर्षण इथं येणाऱ्या पर्यटकांना असते. त्याच्या खालीच त्रिकोणी आकाराची गुहा आहे, त्याची आख्यायिका सांगितली जाते की रावण सीतेला घेऊन जात असताना इथंच रावणाचे जटायूशी युध्द झालं आणि जखमी झालेल्या जटायूला पाणी पाजण्यासाठी रामाने इथं बाण मारला, ती त्रिकोणी आकाराची गुहा किती लांब आहे याचा अंदाज करता येत नाही पण त्यातून बारमाही पाणी वाहत असते. काही वर्षांपूर्वी मार्च महिन्यात रामलिंगला गेलो होतो त्यावेळेस मी, मधुकर थोरात, विजय गुंड जावेद मुजावर होतो त्यावेळेस गुहेतून येणारे पाणी कमी झालेले असल्याने 30 - 40 फुटांपर्यंत आत गेलो होतो पण सुरक्षेच्या कारणास्तव परत आलो होतो. 

राम नदीवरील या धबधब्यात पोहणे गोंधळ घालणे याशिवाय रामलिंगला गेल्याचा फिलच येत नाही असा विश्वास इथं येणाऱ्या पर्यटकांना असावा. इथं मनसोक्त मस्ती केल्यावर धबधब्याच्या डाव्या बाजूने वर चढून एखाद्या झाडाखाली सोबत आणलेली भाकरी खाऊन परत एकदा एखादा डोंगर पायाखाली घालून एका तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यात मनसोक्त पोहून परत येडशी किंवा रामलिंग स्टेशन कडे जायचं म्हणजे परत तोच प्रवास डोंगर चढून उतरणे, आणि रेल्वेची वाट पाहत बसणे. काही वर्षांपूर्वी म्हणजे रेल्वे बंद झाल्यावर रामलिंग स्टेशनवर फोटो काढला होता सगळ्या मित्रांचा त्यावेळी विचार झाला होता की आपण परत येऊ तेव्हा कदाचित ह्या सगळ्या गोष्टी नसतील त्यामुळे हीच शेवटची आठवण असणार आहे. रेल्वेला आता खूपच गर्दी झालेली असे त्यामुळे रेल्वेच्या डब्यावर बसून प्रवास केला जायचा. बाहेरून बघणाऱ्या माणसांना हे खूपच धाडसाचं काम वाटे डब्यावर बसायला नको वाटायचं पण एकदा डब्यावर चढलं की भीती वाटत नसे. खिडकीत बसून प्रवास करण्यापेक्षा इथला प्रवास मनाला भुरळ पाडायचा. बार्शीत रेल्वे येईपर्यंत दिवस मावळत चाललेला असायचा किंचित थकवा आणि निसर्गाच्या ओढीने आणखीन मन कातर झालेलं असायचं. 

भटकंतीच्या वेडापायी अनेक पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, राज्य, देश फिरून झाले, बरेच अजूनही राहिले आहेत पण रामलिंगची ओढ शेवटपर्यंत राहणारच कारण खऱ्या अर्थाने भटकंतीची आवड निर्माण झाली ती रामलिंगमुळेच.


क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥙🥗🥙 गडदेव दरी 🥙🥗🥙

🥗🥙🥗 भाग सात 🥙🥗🥙

गडदेव दरी अर्थात हजरत ख्वाजा शेखफरीद शंकरगंज उर्फ  गदशरीफ हे सुद्धा सभोवतालच्या जिल्ह्यातील सर्वधर्मीय भाविकांच्या श्रद्धेचं स्थान. ते गड म्हणूनच प्रसिद्ध आहे. त्यामुळेच दर गुरुवारी इथं अनेक भाविक येतात एकतर मनातल्या इच्छा नवस म्हणून मागण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी. इथल्या दर्ग्यात येण्यासाठी मांसाहारी असावं लागतं असा गैरसमज लहानपणी होता. कारण गडाला जायचं म्हणजे नवस करण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी त्यामुळे नवस फेडायचा म्हणजे मांसाचा नैवेद्य दाखवतात. त्यासाठी बोकड कापायचे, कापलेले बोकड तिथंच संपवायचे, परत काहीही आणायचे नाही. असं ठरलेलं असायचं. लहानपणी मी शाकाहारी असल्याने गडाला येण्यासाठी बराच काळ लोटला गेला होता.  गडाला यायचं तर मटण खाल्लं पाहिजे हा अलिखित नियम. त्यामुळेच मला गड पहायला खूप खूप दिवस लागले. आणि एक दिवस तो दिवस उजाडला जेव्हा मी गडाला जायला निघालो होतो. गड म्हणजे अगदी किल्ल्यासारखा असेल अगदी पुस्तकात वाचलेल्या किल्ल्यासारखा किंवा परांड्याच्या किल्ल्यासारखा तरी. असं मला वाटत होतं. जवळच्याच कुणाचे तरी बोकड कापायचा कार्यक्रम होता आणि एकदोन पाहुणे शाकाहारी होते आणि त्यात माझ्यासारख्या लहान मुलांची भर पडली तर फारसं काही बिघडत नव्हते. दीड दोन तासांचा टेम्पोतील प्रवास कधी संपतो आणि गड कधी पाहतो असं मला झालं होतं. गड आला आणि माझा भ्रमनिरास झाला. गडाचं नावनिशान कुठे दिसत नव्हते. सभोवताली फक्त माळरान होतं.  ऐन पावसाळ्याचे दिवस होते. त्यामुळे जरा बरं वाटत होतं. घरच्या मंडळींसोबत गडाच्या माथ्यावर होतो. आणि दर्गा पहायला खाली उतरून जायचं होतं. पायऱ्या उतरून जाताना समोर डोंगरदरीत हिरवेगार गवत दिसत होते. मोरांचा आवाज ऐकू येत होता आणि सभोवतालचं वातावरण खूपच छान दिसत होते. दूर दरीमध्ये एक छोटं टुमदार गाव दिसत होते. इतर दर्ग्यात असल्याप्रमाणे इथंही दर्गा होता. आणि इथं नतमस्तक होऊन तिथल्या फकिराने तोंडावरून आणि डोक्यावर आशीर्वादाचे मोरपीस फिरले आणि  इथं आल्याचं सार्थक वाटलं. त्यानंतर मात्र परत इथं जायला खूप  वर्षे झाली. 2017 साली उस्मानाबाद येथील पर्यटक मित्र मनोज डोलारे सर यांच्या शिवशंभू प्रतिष्ठानमार्फत आयोजित गडदेव दरीतील रानफुले आणि पक्ष्यांचा अभ्यासवर्ग आयोजित केला होता आणि त्यात सहभागी होण्यासाठी  आम्ही वैरागवरून गेलो होतो. गडदेवदरीतील रान फुले,पक्षी, काही वास्तूंचे अवशेष याची माहिती मिळाली होती आणि याकाळातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे गडदेवदरीतून जाणारी रेल्वे आणि या मार्गावर असलेला उंच पूल आणि सगळ्यात मोठा बोगदा जो इथून जवळच असलेल्या जहागीरदार वाडी इथं आहे. डोलारे सरांनी काढलेला या पुलावरील धुक्यातून येणाऱ्या रेल्वेचा फोटो आधीच पाहिलेला होता. तो फोटो आपण पाहिला तर आपल्याला वाटणारच नाही की हा फोटो इथला आहे. उस्मानाबाद इथून जवळच असलेले हे ठिकाण माझ्या आवडत्या ठिकाणांच्या यादीत आहे. पावसाळ्यात एक दिवसाची गडदेवदरीची सहल खूपच छान होते.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🌧⛈मन चिंब पावसानं⛈🌧

🌦🌿एक बेधुंद अनुभव🌿🌦

प्रवास,सहल,अन पर्यटन हेच आपलं passion आणि तोच आपला श्वास.

थोडा वेळ मिळाला की फिरायला जाणे आवडते मला. मनातील  जळमटे घालवण्यासाठी , मनावरचा ताण हलका करण्यासाठी मनशांती मिळवण्यासाठी हाच एक उपाय असे मला वाटते .

         आज बऱ्याच वर्षानंतर मनसोक्त पावसात चिंब होण्याचा आनंद झाला. सर्व ऋतूमध्ये पावसाळा माझा आवडता ऋतू आणि त्यातही श्रावण महिन्यातील पाऊस माझा आवडता कारण असे कि श्रावणातील पाऊस धो धो येतो अन लगेच ऊन पडते. आजही असेच झाले अन ध्यानी मनी नसताना पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता आला. 

      आज थोडा वेळ होता म्हणून बार्शी तालुक्यातील जवळगाव नं 2 येथील मध्यम प्रकल्प पहायला दुपारी जाण्याचा योग आला सोबत होता सार्थक. तासभर पाण्याचे सौन्दर्य बघितल्यावर ,पाण्यात खेळल्यावर मन प्रसन्न झाले होते आणि मग आम्ही दोघे मिळून परत निघण्याच्या विचारात असताना अचानक आकाशात ढग दाटून आले . अन लगेच धो धो पाऊस सुरु झाला आम्ही मंदिराचा आसरा घेतला पण आता मात्र पावसात चिंब भिजण्याची इच्छा गप्प बसू देईना आम्हां दोघांनाही!लगेच मंदिरातून पावसात चिंब भिजत बाहेर पडलो अन धरणावर भर पावसात फेरफटका मारला तो आनंद अवर्णनीय होता धरणाच्या पाण्यावर वरुण देव अनंत हातांनी वादन करत असल्याचे भासत होते

     काळ्याभोर ढगातून पडनाऱ्या धारा पाहून मन आनंदी झाले होते त्याच धारा अंगावर झेलत पावसात भिजण्याचा आनंद अवर्णनीय होता पावसात चिंब भिजत गाडी चालवणे म्हणजे तर सोने पे सुहागाच आकाशातून पडणाऱ्या अनंत धारा म्हणजेच भगवंताचा अनंत बाहूंचा प्रेमळ स्पर्श अनुभवत होतो आणि मग मी व सार्थक भिजतच माझ्या मित्राच्या घरी गेलो. मित्राच्या घरी आल्यावर गरमागरम वाफळलेल्या चहाची चव म्हणजे काय अहाहा!!! पंचतारांकित हॉटेल मधील कोणत्याही चहाला फिकी पडणारी अन त्यानंतर ओल्या कपड्यानेच मित्रांबरोबर मारलेल्या गप्पा  आठवताना मन भरून आलं आहे

आजचा दिवस म्हणजे आजवरच्या आयुष्यातील एक अविस्मरणिय, आनंददायी अन मनाला विलक्षण शांती देणारा होता. पावसात भिजताना मन पुलीकत झाले होते.

असे क्षण कमीच येतात आयुष्यात, पण त्यातून मिळणारा आनंद म्हणजे जन्मोजन्मी पुरणारा असतो असा आनंद आज अनुभवला आज मन मोरपिसासारखं हलकं अन  प्रसन्न झाले आहे.

निसर्गाच्या सानिध्यात मन रिझवणं आपलं जिवभावाच माणूस संगतीला घेऊन अशा प्रकारचा आनंद घेणं कोणालाही आवडतच  आजही माझं पिल्लू ( सार्थक)सोबत होतच अशा प्रकारचा आनंद प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक क्षण येवो हीच सदिच्छा 


शब्दांकन

शंकर शिंदे


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥙🥗 श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर 🥙🥗

🥗🥙🥗 भाग आठ 🥙🥗🥙


 लहानपणीची संपूर्ण भटकंती, खडकलगावचा खंडोबा, तळ्याची आई, येरमाळ्याची येडाई, आणि रामलिंग यापुरतीच मर्यादित होती वारंवार वर्षानुवर्षे. उन्हाळी सुट्टीत कधीतरी सकाळी सकाळी पारावर जुनी जाणती मंडळी बसलेली असायची. त्यातील एक जण बसलेल्या सगळयांना महादेवाचा प्रसाद वाटून माहिती सांगत असायचा. महादेव, नीरा नरसिंगपूर तेल्याची कावड, गांजा मळणी, गुप्त लिंग, अशी नावं कानावर पडत असायची, त्यांचाच मुलगा माझ्या वर्गात होता. शाळेत तोही याच गप्पा सांगत असे. त्याच्या बोलण्यातून  महादेवाचे मंदिर आणि परिसर माझ्या डोळ्यासमोर  उभा करण्याचा प्रयत्न करत असे. माझ्या गावातील या सदगृहस्थाची दरवर्षी महादेवाला पायी वारी असे. वर्षानुवर्षे ते पायी चालत जात असत आणि सोबतीला गावातील जे लोक येऊ इच्छितात. त्यांना घेऊन जात असत. दरवर्षी सोबतची माणसं  बदलून आलेली असत पण हे एकटे मात्र नित्यनेमाने असत. त्यामुळे त्यांच्याबरोबर  माझा मित्र सुद्धा जात असे कधी कधी.


महादेवाला पायी चालत जायचं म्हणजे वाटेत दोन मुक्काम पडतात. तिसऱ्या दिवशी घाट चढून गेल्यावर आपण महादेवाला पोहोचतो. जर माझ्या वर्गातील माझा मित्र इतकं चालत असेल तर मलाही अशक्य नाही हे मला ठाऊक होते पण आपल्याला मित्राचे वडील नेणार का?? वर्षभर जेंव्हा भेटतील तेव्हा त्यांना विचारायचो मला पुढच्या वर्षी न्याल का तुमच्या सोबत. त्यांचा होकारच असायचा पण घरची परवानगी मिळणार कशी? घरात विचारायचं कसं. एकत्र कुटुंब, हट्ट करायची माहिती नाही आणि सोयही नाही. काही तरी युक्ती करायलाच हवी म्हणून भावकीतली, पाहुण्यांतील, आमच्या शेतात कामाला येणारी माणसं जी महादेवाला जाणार आहेत त्याना मध्यस्थी करायला लावली. आणि एका वर्षी मला परवानगी मिळाली. रोजच जाणाऱ्या माणसांना विचारून जाण्याचं नक्की असल्याची खात्री करून घ्यायची हे कामच लागलं होतं मला. कारण ऐनवेळी कुणी यायचं रद्द करू नये ही इच्छा असायची. अखेरीस माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या दहा बारा व्यक्ती तयार झाल्या आणि जाण्याची तयारी केली. तयारी तरी काय गऱ्याचे लाडू, भाकरी मिरचीचा ठेचा, चटणी, कपडे  एका बॅगेत भरली की झाली तयारी. पण बसच्या तिकिटाला पैसे?? पायी चालत जायचं असेल तर एसटीच्या तिकिटाला पैसे कशाला?असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. पण काळाच्या ओघात वारीची पद्धती बदलली पाहिजे म्हणून त्यासाठी लागणारा पैसा सोबतीला घेतला आणि बार्शीवरुन टेम्भुर्णी कडे जाणाऱ्या एसटीने प्रवास सुरू झाला होता पण मनात येत होते की चालत जायचं तर आपण एसटीने का निघालोय? याचं उत्तर टेम्भुर्णीत उतरल्यावर मिळालं, गावापासून चालत चालत जायचं म्हणलं तर किती दिवस लागतील म्हणून वेळ वाचवण्यासाठी इथपर्यंत एसटीने प्रवास केला होता.

मला तर महादेव या नावाखेरीज काहीही माहिती नव्हते. पायी पायीच चालत नीरा आणि भीमा नदीच्या संगमावर आलो. त्याआधी नदी एवढाच मोठा कॅनॉल पहिल्यांदाच पाहत असल्याने खूप आश्चर्य वाटलं होतं नदीच्या या काठावरून त्या काठावर असलेल्या कॅनॉलचा पूल पाहून तर खूपच छान वाटलं. माझा गाव, माझा तालुका तेंव्हाही आणि आताही पाण्यासाठी आसुसलेलाच. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात देखील वाहते पाणी पाहून सोबतच्या माणसांच्यासुद्धा माझ्यासारख्याच भावना निर्माण झालेल्या असणार यात शंकाच नाही. आतापर्यंत डांबरी सडकेकरून प्रवास करत होतो पण संगमावरून नदी ओलांडून पलीकडे गेल्यावर आमचा प्रवास शेतातून, बांधावरून असाच सुरू झाला होता. वारी करताना ज्या देवाची वारी असेल त्याच देवाचं दर्शन घेतले पाहिजे आधी म्हणून नरसिंगपूर वरून पुढे येताना तेथील नरसिंह मंदिरात गेलो नव्हतो. अकलूज डाव्या सोडून आम्ही चालत होतो. दुधाच्या कॅन सारखी पाण्याची टाकी लांबून दिसत होती आणि सोबतीची माणसं सांगत होती की ते अकलूज  आहे म्हणून. अकलूज, माळशिरस, फोंडशिरस अशी फक्त नावच वाचायला आणि ऐकायला मिळत होती. नरसिंगपूर पासून नातेपुते पर्यंतचा प्रवास हा शेतातून, बांधावरून आणि पायवाटेने होता. तो मार्ग नेमका होता हे आठवत नाही पण दरवर्षी येणाऱ्या मंडळींना रस्ता कसा माहिती याचंच नवल वाटत होतं. अशाच  एका ठिकाणी म्हणजे शेतातील वस्तीवर मुक्काम केला होता. याच ठिकाणी दरवर्षी मुक्काम केला जायचा म्हणे. शेतात फक्त गोठा असतो तोही जनावरांसाठीच,घर शेतात असतं हे इथल्या परिसरात आल्यावरच समजलं. 

वाटेत असलेल्या कॅनॉलवर अंघोळ करायची कुठे तरी जेवण करायचं, उन्हात थोडा विसावा घ्यायचा आणि पुढे चालायचं असाच प्रवास होता. दुसरा मुक्काम उंबरदेव महादेव मंदिरात असायचा. आपल्यासारखे अनेकजण इथं मुक्कामाला असायचे त्यामुळे आपल्या बॅग, कपडे पैसे सांभाळून ठेवायची सूचना मोठ्या माणसाकडून मिळायची. याच ठिकाणाला गांजामळणी असं म्हटलं जायचं याचं कारणही तितकंच विस्मयकारी होतं. भगवान शंकराने याच ठिकाणी गांजा ओढला होता अशी माहिती दिली जायची. म्हणून कधीच गांजा न पिणारी मंडळी पण इथं गांजाची चिलीम ओढताना दिसायची. अर्थात गांजाच्या धुंदीत प्रवासाचा शीण जाणवत नाही इतकंच पण त्याचा संबंध मात्र देवाशी जोडला जातो. देव सोमरस घेतात म्हणून आम्ही दारू पितो, असं समर्थन सुद्धा मी ऐकलं आहे पण देवानं हलाहल सुद्धा पचवले आहे म्हणून कुणी विषाची परीक्षा घेत नाही असो. 

गांजा मळणी यायच्या आधी चिंध्या देवी म्हणून एक ठिकाण होते त्या ठिकाणी असलेल्या छोट्या झुडपाला आपल्या जवळील चिंधी बांधल्याशिवाय पुढे जायचं नाही असा दंडक होता. काय कारण असेल या मागे कळत नसायचं अर्थात चिंध्याची कमी नसायची कारण भाकरी बांधायचं  फडकं फाडून त्याची चिंधी बांधली जायची. मला तर वाटतं  चिंधी महत्वाची नसून दानत महत्वाची आहे.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥙🥗 श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर 🥙🥗

🥗🥙🥗 भाग नऊ 🥙🥗🥙


गांजामळणी या ठिकाणी दुसरा मुक्काम केला जायचा. त्यामुळे काही जणांच्या पायांना जखमा झालेल्या असायच्या तर काहींच्या पायांना फोड आलेले असायचे, काहींना चप्पल, बूट चावलेले असायचे. त्यामुळे पायी चालताना खूपच त्रास होत असे. त्यामुळे त्यांची बॅग घेऊन त्यांना सहकार्य केले जायचे. सोबतीची गरज असते ती यामुळेच. मला मात्र काहीही त्रास झाला नव्हता कारण काय असेल बरं!!

माझ्या पायात चप्पल, बूट असं काहीच नव्हतं. तरीही डांबरी सडक असो की पायवाट काहीच त्रास होत नसे. गांजा मळणीच्या ठिकाणी अनेक माणसं मुक्कामी असल्याने तसेच काही नवीन माणसं किंवा संशयी माणसं मुक्कामी असल्यास आमच्यापैकी  कोणीतरी एक मोठा माणूस रात्रभर जागरण करत असे जेणेकरून सगळ्यांच्या सामानाची सुरक्षा होत असे. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून घाटाकडे निघायचे. आधीचे दोन दिवस फक्त गावतलेच सोबतीला असत आणि आज मात्र शेकडो लोक सोबतीला असतं, अनेक ठिकाणाहून आलेले लहान मोठे, गरीब श्रीमंत असं सगळे जण असत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लवकर उठून घाट चढून मुक्कामाच्या ठिकाणी लवकर जायची गडबड असे. महादेवाच्या डोंगररांगेत वसलेले श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर अगदी दूरवरून दिसत असते. घाट चढून गेल्यावर पुढे आणखी एक दिव्य करावे लागत असे. आमच्या गावातील एका माणसाने पिंपरणीचे झाड यात्रेच्या मैदानात लावलेले होते. त्या झाडाखाली आमच्या आधीच कोणी आले असले तर प्रसंगी त्यांच्याशी भांडण करून झाडाच्या सावलीतुन हाकलून दिले जायचे. याची मुख्यतः दोन कारणं असायची एक तर झाड खूप लहान असल्याने सर्वांना झाडाखाली जागा पुरायची नाही आणि पुरली तरीही अनोळखी माणसावर विश्वास कोण ठेवणार? सगळेच जण देवाला, देवासाठी आलेले असत पण एकमेकांना मात्र पाण्यात पाहत, अविश्वास ठेवत. अशाने का देव पावणार? पण नाईलाज होता. त्या मैदानावर अशी प्रत्येक झाडाखाली एक एक गावची माणसं असत आणि कोणी कोणाला झाडाखाली येऊ देत नसे, प्रसंगी हातघाईची वेळ येई, ज्यांचे मनुष्यबळ कमी असेल ते माघार घेत. देवाच्या दारात अशी भांडणं सुद्धा होत असत. एखाद्या वेळी आमची माणसं कमी असली तर त्यांना आमचं झाड आहे हे पटवून देणे अवघड होऊन बसे म्हणून वारीतली दरवर्षी नेमाने येणारी माणसं म्हणत की आमच्या मागे कसे होणार वारीचे. दरवर्षी भरपूर माणसं त्यातही तरुण भरपूर आले पाहिजे जेणेकरून ही वारी टिकून राहील. झाडाखाली जेवढी सावली पडत असे तेवढा परिसर स्वच्छ केला जाई. कुठून तरी पाण्यासाठी घागर आणि स्वयंपाकासाठी भांडी उपलब्ध करून घेतली जात. त्यादिवशी सर्वजण यात्रेत सहभागी होत असत पण एखादी जाणती व्यक्ती कायम झाडाखाली राखण करत असे. विविध प्रकारची खेळणी, तमाशे, आर्केस्ट्रा यात तो दिवस जात असे. उन्हात ती पालवी फुटलेली झाडं म्हणजेच इथला सावलीचा प्रमुख स्रोत असे आणि कोणी कोणाला आपल्या झाडाखाली सावलीला बसू देत नसे कारण एकदा एखाद्याने आपले बस्तान बसवले की बोलण्या बोलण्यात ओळख निघे किंवा सहसंबंध निर्माण होत असे त्यामुळे परत त्याना झाडाखालून घालवणे जीवावर येई म्हणून आधीच कोणालाही सावलीला बसू न देणे हे कटाक्षाने पाळले जाई. सायंकाळच्या वेळी मंदिरात गर्दी कमी असेल तर दर्शन घेतले जाई किंवा कलश दर्शन केले जात असे. रात्री त्या ठिकाणी दगडांच्या चुलीवर पिठलं भाकरी करून त्याचा आस्वाद घेतला जाई, जत्रा म्हटलं की हौशे, नवशे, गवशे हे आलेच. जत्रेत अनेक गमतीजमती घडत, कुणाचं पैसे चोरले, कोणी हरवलं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत. हा तिसरा मुक्काम असे आणि तो दिवस साधारणपणे चैत्र शुद्ध सप्तमी असे. अष्टमीला देवाचं लग्न आणि त्यातही तेल्याची कावड बघणं हेच प्रमुख आकर्षण असे. सासवड येथील भुतोजी तेली यांची कावड ही मानाची कावड आहे आणि ती मुंगीच्या घाटातून वर आणली जात असते. त्या कावडीला  मोठमोठे दोन रांजण बांधले जात आणि ती कावड घाटातून वर आणली जाते. ज्या घाटातून ही कावड आणली जाते या वाटेने एकट्या माणसाला यायला देखील अवघड आहे तिथून मोठमोठे दोन रांजण असलेली कावड आणणे हे एक दिव्यच आहे. त्यावेळी देवाला महादेवा, महाद्या अशा प्रकारे हाका मारल्या जात आणि देवाला  मदतीला बोलावले जाई. त्या रांजनातील पाण्याने देवाला अंघोळ घातली असेल. त्यांनंतर मात्र आमची वारी संपलेली असे, प्रसाद, खेळणी, देवाचा फोटो (मी यावेळी खरेदी केलेला देवाचा फोटो आजही माझ्या घरी आहे.)अशी खरेदी करण्यासाठी गडबड होत असे. तसेच बसने गावाकडे निघण्याची घाई झालेली असे. मनात प्रचंड ऊर्जा घेऊन या यात्रेची सांगता होत असे.  सायंकाळी पर्यत गावात पोहोचलो जात असू आणि त्यानंतर कित्येक दिवस या यात्रेतील गमतीजमती वर काढले जात असत. माझ्या भटकंतीच्या प्रवासात ही महादेवाच्या यात्रेला महत्वाचे स्थान आहे.

इतिहास

देवगिरीच्या यादवांच्या कुळातील राजा सिंघण याने शिंगणापूर आणि शंभू महादेव मंदिर  वसवले आहे. हे मालोजीराजे भोसले यांचेही कुलदैवत असल्याने ते इथं देवदर्शनासाठी सहकुटुंब येत असत. इथल्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे त्यांनी इथं मोठा तलाव बांधला आहे तो पुष्कर तीर्थ म्हणून ओळखला जातो.छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा इथं आल्याची नोंद आहे. महादेव मंदिराच्या शिखरावरून  परिसरात असलेल्या अमृतेश्वर मंदिराच्या शिखरावर बांधलेला धागा हा यात्रा काळात बांधला जातो त्याला पागोटे म्हणून संबोधले जाते. महाराष्ट्राच्या अनेक भागातून कावडी इथं येतात त्यातील तेल्याची कावड आणि वाघाची कावड या मानाच्या म्हणून ओळखल्या जातात. मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे, छत्रपती शाहूराजे  यांनी केला आहे. हा प्रदेश पर्जन्यछायेचा असला तरीही पावसाळ्यात परिसर खूप सुंदर दिसतो. म्हणून श्रावण महिन्यात इथं एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥙 सौताडा-कपिलधार-कुंथलगिरी 🥗

🥗🥙🥗 भाग दहा 🥙🥗🥙


कोणत्या ना कोणत्या निमित्ताने फिरायला मिळालं की छान वाटायचं, फिरण्याची हौस भागवणारे दोनच स्त्रोत असायचे,  एक म्हणजे देवदेव किंवा जत्रा आणि दुसरं म्हणजे लग्न. गावात कोणाचेही लग्न परगावी असलं की त्या लग्नाला जावंच वाटायचं. आजच्यासारखं फिरायला जायचं असतं हे समजण्याचे ते दिवस नव्हतेच.  आमचे सगळे पाहुणे एकतर गावांत नाही तर जवळच्याच गावी असल्याने ह्या दोन कारणामुळेच फिरायला मिळायचं. मी दहावीत असेल. तेंव्हा गावातल्या काही कॉलेजात जाणाऱ्या मोठ्या मित्रांकडून  समजलं की रामलिंग पेक्षा सौताड्याचा धबधबा खूप मोठा आहे पण तो खूप लांब आहे, बस ठरवलं की जायचंच!! पण कसं?

काही मोठ्या मुलांकडून सविस्तर माहिती मिळवली. तिथं जायचं तर जीप भाड्याने करूनच जावं लागतंय. आपल्या गावात तर जीप नाही त्यामुळे अवघड आहे हे, असं वाटून आपला यावर्षी सौताड्याला जायचा बेत बारगळतो की काय असं वाटायला लागलं, आणि तसही अनेक महिने अवधी होता. आमच्या गावात कोणाचंही लग्न असलं की नवरी आणण्यासाठी शेजारच्या गावातील गाडी आणली जायची. त्या गाडीवल्याची ओळख झाली आणि मग गप्पा मारताना सौताड्याला जायचं का? म्हणल्यावर त्या गाडीवाल्याने होकार दिला आणि सांगितले की आठ ते दहा जण असलं की भाडं कमी येतंय आणि लय मज्जा येतीय.  आता मित्रांची जमवाजमव सुरू केली. गाडीचं भाडं ठरवलं. मित्रांची जमवाजमव झाली. आता प्रतिक्षा होती श्रावण महिन्यातील सोमवारची.

एखादी गोष्ट हवीहवीशी वाटली आणि त्याची वाट पहायचं असलं की वेळ जाता जात नाही. दिवस सरता सरत नाहीत. तेंव्हा मोबाईल, इंटरनेट, youtube असं काही नव्हतं. कुणाला विचारावं तर जास्त माणसं इथं गेलेली नसायची. सोमवार असला तरी ही गाडीला दुसरे भाडे नसलं तर जायचं असं ठरवलं होतं. नाही तर रविवारी जायचं ठरवलं होतं आणि एक दिवस शनिवारी दुपारी गाडीवाल्याचा निरोप आला की उद्या सकाळी लवकर तो गावात येणार आहे आणि तो आला की लगेचच सौताड्याला  जाऊ असं ठरवलं आणि नुसतं सौताडाच नाही तर त्याबरोबरच कपिलधार आणि कुंथलगिरीला सुद्धा जायचं आहे. सोने पे सुहागाचं होता. सर्वांना निरोप देता देता रात्र झाली. पण उगीचच असं वाटत होतं की आजची रात्र जरा मोठीच झाली आहे. सकाळी लवकरच जाग आली होती आणि सगळं लवकर आटोपून भाकरी बांधून  गाडी सुरू होईपर्यंत आठ वाजून गेले होते. 

पुढं बसायचं, खिडकीशेजारी बसायचे असं काही नव्हतंच कुणाचं, सगळेजण बसलो आणि गाडी भूमकडे निघाली. सिनेमातली आवडती गाणी ऐकत गाडीतला प्रवास खूपच आवडतो तेंव्हाही आणि आताही. दोन अडीच तासाच्या आनंददायी प्रवासात भूम, खर्डा, जामखेड अशी गावं मागे पडत होती, प्रवासात सर्वजण आनंदी होते, हसणं खिदळनं चालू होते. गाडीतला टेप मात्र बंद नव्हता आमच्या गप्पा चालू असल्या तरीही. अखेरीस सौताड्याला पोहोचलो. गावातून रस्ता विचारत विचारत सरतेशेवटी एका माळरानावर आलो आणि सर्व जण गाडीतून खाली उतरलो. सभोवताली पाहिलं तर  सभोवताली फक्त माळरानच दिसत होतं, श्रावणाचा महिना असल्याने सगळीकडे हिरवळ दिसत होती पण धबधबा, डोंगर झाडे असं काहीच दिसत नव्हतं. सगळीकडे माळरानचं दिसत होतं ते पाहून माझा तर भ्रमनिरासच झाला होता. 


क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥙 सौताडा-कपिलधार-कुंथलगिरी 🥗

🥗🥙🥗 भाग अकरा 🥙🥗🥙


महाराष्ट्रातील हे असं एकमेव ठिकाण असेल. जिथं अगदी काही फुटावर जाईपर्यंत इथलं सौंदर्य नजरेस पडत नाही. आमचंही असंच काहीसं झालं होतं. अनिच्छेनेच माळरानाच्या काठावर आलो आणि एकदम स्तब्ध झालो. समोर विस्तीर्ण दरी पसरलेली दिसत होती. हिरवी शाल पांघरलेला परिसर खूपच सुंदर दिसत होता. खाली मंदिराचे शिखर दिसत होते. धबधब्याचा कुठून तरी रौद्रगंभीर आवाज येत होता पण धबधबा मात्र दिसत नव्हता. क्षितिजापर्यंत समोरचा परिसर म्हणजे अगदी स्वर्गच भासत होता. एक क्षण वेळसुद्धा थांबला होता. आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव होता. त्यावेळची मनस्थिती वर्णन करणे  केवळ अशक्य आहे. 

अत्यंत खड्या आणि उंच असलेल्या पायऱ्या उतरून खाली जाताना वाटेत दाट जंगल आहे. रविवार असल्याने भाविक कमी असले तरीहीपर्यटकांची संख्या जास्त प्रमाणात होतीच. दीड दोन फुटांची एक एक पायरी उतरताना   थोडंही अवघड वाटत नव्हतं दरीत खाली उतरून मंदिराकडे जाताना नदीचा प्रवाह ओलांडून पुढे जावं लागतं त्यापलीकडे जाऊन सर्वानी देवाचं दर्शन घेतले. पण तेंव्हा फक्त इथं रामायणातीलच आख्यायिकेचा संदर्भ माहित होता पण इथंच महानुभाव पंथाचे श्रीचक्रधर स्वामी यांचेही स्थान आहे हे मात्र नंतरच्या काळात माहीत झाले.


देवदर्शन झालं की लगेचच धबधब्याच्या दिशेने निघालो, वाटेत एका मोठ्या दगडाच्या चहूबाजूंनी पाणी वाहत होते आणि त्या दगडावर बसून फोटो काढण्यासाठी साऱ्यांची स्पर्धा लागली होती. स्थानिक एक फोटोग्राफर सुध्दा वेगवेगळ्या अँगलने फोटो काढत होता. आमच्याकडे पण फोटो काढण्यासाठी कॅमेरा होता. Yashika कंपनीचा कॅमेरा आणि त्यात फोटो काढण्याचा रोल kodak कंपनीचा होता. दोन रोल आणले होते सोबतीला. त्याचबरोबर कोणाचे किती फोटो काढायचे हे पण पक्के केले होते. मनाजोगते फोटोकाढुन झाल्यावर डोंगराच्या कडेने झाडाझुडुपांमधून धबधब्याच्या दिशेने निघालो होतो. पाण्याचा आवाज ऐकू येत होता मात्र अजूनही धबधबा दृष्टीस पडला नव्हता. त्यामुळे पाय थांबत नव्हते. आणि अखेरीस ज्या क्षणाची आस धरली होती तो क्षण प्रत्यक्षात आला होता. समोर शंभर दीडशे मीटर लांबीचा डोह होता. आणि त्यापलीकडे हजारो फुटावरून धबधबा कोसळत होता. तिथं बरेच जण पोहण्याचा आनंद घेत होते पण आमच्याकडे कपडे नसल्याने आम्ही पाण्यात पोहू शकत नव्हतो कितीही इच्छा असली तरीही. सोबतीला टॉवेल कपडे आणायला हवे होते असं वाटलं पण पुढच्या वेळी नक्की आणू असं ठरवलं. डोहाच्या अलीकडे उभा असलो तरीही धबधब्याच्या पाण्याचे तुषार साऱ्या आसमंतात भरलेले होते त्यामुळे कितीतरी इंद्रधनुष्य दिसत होते आणि तेच तुषार आमच्या अंगावर पडत होते मोठ्या पावसासारखे. त्यामुळे पाण्यात न उतरताही आम्ही पूर्णपणे भिजून गेलो होतो. अगदी पाऊस पडल्यासारखे तुषार सिंचन चालू होते. पूर्ण क्षमतेने धबधबा वाहत असल्याने आणि खूपच तुषार उडत असल्याने  तो किती उंचीवरून पडत आहे हे वर पाहिले तरीही दिसत नव्हते. सगळा गोंधळ, गोंगाट होता, सगळेजण आपल्यातच मग्न होते. सगळेजण आनंद लुटत होते. आम्ही पण मागे नव्हतो, माझा कॅमेरा माझ्याकडेच असल्याने तो पाण्यापासून वाचवताना मला खूपच कसरत करावी लागत होती. शर्ट काढून त्यात कॅमेरा लपवला होता. वाऱ्याचा झोत आला की पाऊस पडल्यासारखे पाण्याचे तुषार पडत होते. काही जणांनी पाण्यात पोहून आनंद लुटला पण माझ्याकडे कॅमेरा असल्याने मी जरा लांबच होतो सरतेशेवटी पाण्याच्या डोहाला अर्धगोलाकार प्रदक्षिणा घालून धबधब्याच्या मागे जायचं ठरवलं पण सगळेच जण त्या गोष्टीला  तयार नसल्याने चार पाच जणच धबधब्याच्या मागे गेलो. खरं तर असं करणं अत्यंत धोकादायक ठरू शकते पण याची यत्किंचितही जाणीव आम्हाला त्यावेळेस नव्हती. कारण अशा वेळी दरडी कोसळण्याची शक्यता आहे, ही गोष्ट जीवावर बेतू शकते पण याची जाणीव किंवा काळजी करण्याचं ते वयच नव्हतं. समोर पाण्याची पांढरीशुभ्र भिंत, मागे काळाकुट्ट पण शेवाळ्याने हिरवट रंग आलेली दगडी भिंत यांच्यामध्ये काहीच क्षण उभे होतो पण माझ्या पोटात मात्र भीतीने खड्डा पडला होता. लगेचच धबधब्यापासून दूर झालो डोहाच्या समोर आलो. आजपर्यंत धबधबा म्हणजे रामलिंगचा अशी धारणा गळून पडली होती. त्या धबधब्यापेक्षा किती तरी उंच मोठा, उग्र असणारा धबधबा बघितला होता. उरलेल्या थोड्या वेळात आणखी फोटो काढले आणि तिथंच मोकळ्या जागेत भाकरी सोडल्या आणि गोपाळ काला केला. त्याची चव म्हणजे अमृतच. आता बराच वेळ झाला होता त्यामुळे पुढे जायची गडबड सुरू झाली होती. उतरलेल्या पायऱ्या चढून वर येताना सुद्धा किंचितही त्रास होत नव्हता  असं हे मनात घर करून राहिलेलं ठिकाण म्हणजे सौताडा. यांनातर च्या काळात कित्येक वेळा या ठिकाणी आलो पण आनंद मात्र कधीच कमी झाला नाही.

मात्र  2015 साली जेव्हा इथं आलो होतो त्यावेळी मात्र या पायऱ्या चढताना जीव अगदी मेटाकुटीला आला होता. निमित्त होते. पाटोदा तालुक्यातील जरेवाडी येथील शाळा पाहण्याचे.

इतिहास

विंचरणा नदीच्या काठावर असलेले सौताडा हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. विंचरणा नदीच्या पाण्याचा प्रवाह इथं हजारो फूट खोल दरीत कोसळतो. रामलिंग सारखाच इथला संदर्भ रामायणाशी आहे. रामायण काळात राम लक्ष्मण आणि सीता यांनी इथं वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे तसेच त्यासंबंधी काही पाऊलखुणा सुद्धा इथं पहायला मिळतात. रामाचे कुंड, सीतेचे कुंड इथं आहेत असं म्हणतात. श्रीरामांनी सीतेसह इथं केस विंचरले म्हणून नदीचे नाव विंचरणा नदी पडले आहे. इथं रामाचे मंदिर आणि शंकराची पिंड असल्याने या ठिकाणाला रामेश्वर असें म्हणतात. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी इथं खूप मोठी यात्रा भरते. लाखो भाविक इथं येतात.  शंभर ताडाईतकी धबधब्याची उंची असल्याने या ठिकाणाला सौताडा असं म्हणतात. दरीमध्ये पसरलेली हिरवीगार वनराई, रंगीबेरंगी फुले, दरीमध्ये झोकून देणारी विंचरणा नदी. असे निसर्ग सौंदर्याने नटलेले हे ठिकाण एक दिवसाच्या पिकनिक साठी खूपच छान आहे.

तसेच याच ठिकाणी महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी यांनी इथं निवास केला असल्याने त्यांचे ही इथं स्थान आहे आणि हे ठिकाण महानुभाव पंथीयांमध्ये अतिशय पवित्र समजले जाते. 

क्रमशः

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗


🥙🥗 भटकंतीचे बाळकडू 🥙🥗

🥙 सौताडा-कपिलधार-कुंथलगिरी 🥗

🥗🥙🥗 भाग बारा 🥙🥗🥙


सौताडा पाहिला, मन प्रसन्न होऊन गेले, रामलिंगचा विसर पडला. आता पुढचे ठिकाण होते. श्री क्षेत्र कपिलधार. साडे चारशे वर्षापूर्वी कपिल मुनींनी इथं अनुष्ठान केले होते. आणि पुढील काळात श्री मन्मथ स्वामींनी देखील इथं तपश्चर्या केली आहे आणि इथंच त्यांची संजीवन समाधी आहे. तास दीड तास प्रवासानंतर कपिलधारला पोहोचलो. मांजरसुंबा गावातून अगदी तीन चार किमी अंतरावर श्री क्षेत्र कपिलधार आहे. कपिलधार जवळ येताच अतितीव्र उतार,आणि अवघड वळणं असलेला एकेरी  घाटरस्ता आहे. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो इथं, कारण अनेकदा या घाटात अपघात झालेले आहेत. घाट उतरून खाली आलो आणि सभोवताली दिसले, उंचच उंच डोंगर, हिरवेगार गवत, मंदिराच्या परिसरात दुतर्फा भक्त निवास आहेत. तिथंच दुकाने सुद्धा. संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिराच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याकडे गेलो, उंचीने कमी असला तरी देखील धबधबा खूप उंच आहे ,समोर खूप मोठा डोह असून त्यामध्ये अनेक जण भिजण्याचा आनंद घेत होते. गर्दी खूप असल्याने तिथं मन तितकं रमलं नाही. इथं धबधबा देखील मंदिराला चिकटून आहे. त्यामुळे ट्रेकसुद्धा करावा लागत नाही. पण मंदिर परिसर अत्यंत रमणीय आहे. पाय निघत नाही इथून. गर्दी नसताना इथं येऊन आपण निरव शांततेचा अनुभव घेऊ शकतो. लिंगायत समाजातील थोर विभूती श्री मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी आपण आवर्जून जायलाच हवं.


आता कुंथलगिरी ला निघायचं होतं. चौसाळा झालं की येणार होते सरमकुंडी. अखिल देशाच्या कानाकोपऱ्यात खवा पोहोचवणारं गाव. इथं न थांबणारं वाहन कवचीतच असेल. आम्ही पण थांबून खवा खरेदी केला आणि कुंथलगिरी ला आलो. आणि एकदम वेगळ्याच विश्वात गेल्याचा भास झाला. एकदम शांत आणि स्वच्छ वातावरण त्यामुळे हे ठिकाण खूपच आवडलं.आणि तेव्हापासून नेहमी मनात विचार येतो की आपल्या मंदिरात अशी शांतता आणि प्रसन्नता का बरं मिळत नाही. याचं उत्तर बऱ्याच कालांतराने मिळालं. मंदिर म्हणलं की डोळ्यासमोर येते ती गर्दी, ढकलाढकली, देवाच्या नावानं केलेला  आरडाओरडा, तेल,तूप, अगरबत्तीचा उग्र वास, नारळाच्या पाण्याचा चिखल, त्याचाही तसेच प्रसाद आणि नैवेद्य कुजल्याने येणारा घाणेरडा वास, शांतता म्हणून नाही. एक क्षण देवदर्शन करावं म्हणलं तर कुणी तरी लगेचच धक्का देणार नाही तर मंदिरातील पुजारी खेकसणार. "व्हा पुढे" म्हणून. मंदिरात गेल्यावर मनःशांती मिळतच नाही ती मिळते निसर्गाच्या सानिध्यात. खळखळ आवाज करत वाहणारा झरा असो की सिंहासारख्या गर्जना करत वाहणारा धबधबा, श्रावणातील उनपाऊस असो की आषाढातील विजांचा कडकडाट. त्या सगळ्यात एक वेगळीच लयबद्धता असल्याने मन प्रसन्न आणि शांत होते याचा अनुभव कैकवेळा घेतलेला आहे. मंदिरातल्या देवाचं दर्शन घेऊन जितका आनंद होत नाही त्यापेक्षा अधिक आनंद निसर्गाच्या सानिध्यात मिळतो.

असाच काहीसा अनुभव इथं येत होता. थोड्या पायऱ्या चढून उंचावर असलेल्या मंदिरात दर्शन घेतले खूप छान वाटलं. उंचावर मंदिर असल्याने सभोवताली असलेला परिसर दिसतो. आता दिवस मावळतीला आला होता. त्या मंदिरापासूनच सूर्यास्त पाहिला आणि परतीचा प्रवास सुरू केला. घरी पोहोचेपर्यंत साडे आठ वाजून गेले होते पण हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं.

इतिहास

कुंथलगिरी हे ठिकाण जैन धर्मियांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आहे. जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरापैकी कुलभूषण व देशभूषण या दोन मुनींचे महानिर्वाण या ठिकाणी झाले आहे. त्यामुळे हे ठिकाण अत्यंत पवित्र समजले जाते तसं या ठिकाणी मंदिर परिसरात शाळाही चालवली जाते.

समाप्त

शब्दांकन

शंकर शिंदे

भटकंती एक्सप्रेस

🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा