चारधाम यात्रा

*चारधाम पदभ्रमण यात्रा... शुभारंभ...*

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - १*

नर्मदा परिक्रमेनंतर  पुढील नियोजनासाठी मधे जवळजवळ अकरा वर्षे गेली. दरम्यान च्या काळात गिरनार वाऱ्या सुरू होत्या.  दैनंदिन कामे व प्रपंच  सुरू होता. मी दररोज पहाटे सकाळी तळजाईला व्यायामासाठी जायचो. तेथे अनेक ज्येष्ठ, वृद्ध, तरुण व्यायाम पटू भेटायचे. तळजाई चढून आल्यानंतर मंदिरापाशी पाच मिनिटे गप्पा व्हायच्या. तेथे चर्चेमध्ये एकदा समजले की तळजाई ला दररोज येणारे श्री दिवाकर घड्याळजी या ज्येष्ठ सदस्यांनी नुकतीच सुमारे एक हजार किलोमीटरची  चारधाम यात्रा म्हणजे गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ ही ऋषिकेश पासून ऋषिकेश पर्यंत पायी पूर्ण केली आहे.

माझे कुतूहल चाळवले. त्यांची भेट घेतली, माहिती घेतली, चर्चा केली आणि मनामध्ये आपणही चार धाम यात्रा पायी करावी याचे बीज रूजले. २०२० साली मे महिन्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जेव्हा कपाट उघडतात म्हणजे मंदिर उघडतात त्यावेळी आपण चारधाम यात्रेला जावे असा बेत निश्चित केला. परंतु
 कोव्हिड संसर्गामुळे लाॅकडाऊन झाला व जाता आले नाही.  २०२१ साली मी माझा मुलगा चि मिहिर कडे मुलाकडे अमेरिकेत गेलो होतो आणि तिथून मी एप्रिल महिन्यात परत येणार होतो आणि मे महिन्यात मध्ये  चारधाम यात्रेला जाणार होतो‌. परंतु एप्रिल मध्ये अमेरिकेत असतानाच भारतात कोव्हिडचा संसर्ग पुन्हा वाढल्यामुळे देशभर लाॅकडाऊन सुरू झाल्याचे समजले. त्यामुळे २०२१ साली उत्तराखंड शासनाने चार धाम यात्रा स्थगित केली. त्यामुळे २०२१ सालीही चारधाम यात्रा पायी करण्याचा विचार सोडून द्यावा लागला. अखेर २०२२ में महिन्यामध्ये, मी चार धाम यात्रा पायी करण्याचे नियोजन सुरू केले. पुन्हा श्री घड्याळजी काकांची भेट घेतली, चर्चा केली, माहिती घेतली. कोणत्या रस्त्याने जायचे, रस्त्यात येणाऱ्या अडचणी,  निवास व्यवस्था, कसे जायचे कुठे थांबायचे, बरोबर काय नेले पाहिजे, साहित्य किती असावे, त्याचे वजन किती असावे, किती वाजता चालायला सुरुवात करावी, कधी थांबायला पाहिजे, हवामान या सगळ्यांची माहिती त्यांच्याकडून घेतली. फेब्रुवारी २०२२ मध्ये रेल्वेचे तिकीट काढले. मुंबई ते हरिद्वार. तीस तासांचा हा प्रवास... 

तिकिट काढल्यानंतर हळूहळू सामान जमा करण्यास सुरुवात केली. माझ्याकडे एक
 ट्रेकिंगची मोठी सॅक आहे. तिचे वजन चार किलो आहे. त्यामुळे ती नेण्याचा विचार रद्द केला. आता नवीन सॅक खरेदी करणे आले. मग पुण्यातील भवानी पेठेत पीक एडवेंचर्स नावाचे सॅक बनविणारे दुकानदार आहेत. त्यांच्याकडे जाऊन नवीन 40 लिटर सामान बसू शकेल एवढी हॅवर सॅक खरेदी केली. या  सॅकचे वजन सुमारे तेराशे ग्रॅम आहे. कमी वजनाच्या फॅब्रिकचा वापर करून,  कमी वजनाची सॅक त्यांनी बनवली आहे. त्याच्यानंतर बरोबर नेण्याच्या वस्तूंची यादी... आपल्या घरात असलेल्या वस्तू आणि नवीन खरेदी करण्याच्या वस्तू अशा दोन स्वतंत्र याद्या तयार केल्या. बाहेरून आणायच्या एक एक वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली. हातातली काठी डोक्यावर लावावयाचा हेडलाईट, गॉगल इ...

मित्रवर्य मुकुंद सहस्त्रबुद्धे याचा जावई श्री अद्वैत गोखले हा नियमित हिमालयात ट्रेकिंगसाठी ग्रुप घेऊन जातो. त्यांच्याकडूनही काही टिप्स घेतल्या. कपड्यांचे रोल करून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवणे, जेणेकरून पावसामुळे सॅक ओली झाली तरी सॅकमध्ये पाणी येऊन कपडे भिजत आहेत. छत्री घेणे असा काही टिप्स श्री अद्वैतने दिल्या.

निघेपर्यंत बॅगमध्ये वस्तू भरणे चालू होते. अगदी शेवटी निघताना उन्हासाठी टोपी आणि पायमोजे भरले व सॅक बंद केली. सॅकचे वजन जवळजवळ सामानासह साडेआठ किलो झाले होते. पहिली भरलेली स्लीपिंग बॅग काढून टाकली आणि दुसरी हलकी स्लीपिंग बॅग घेतली, त्यामुळे वजन कमी झाले. जास्ती झालेले सामान हरिद्वारला ठेवण्याचा पर्याय होताच.

रेल्वेत पॅन्ट्री कार बंद असल्यामुळे ३३ तासांच्या प्रवासात लागतील एवढी शिदोरी घेतली. घरातून निघताना आईच्या पाया पडलो. देवाला नमस्कार केला. पत्नी सौ वर्षांची गळाभेट घेतली, चि मिहिरने  निघायच्या दिवशी खास फोन करून पाठिंबा दिला व गंगोत्रीच्या पुढे जवळच असलेले गंगेचा उगम होतो ते गोमुख व पुढील तपोवन करायलाही सांगितले. आणखी हुरुप आला. घरून प्रस्थान ठेवले. पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन एक्सप्रेस निघताना पत्नी सौ वर्षा हिच्या डोळ्यात पाणी आलेले पाहिले... २९ वर्षांचा सहवास. पती-पत्नी यापैकी कोणीही एक दीर्घकाळ दूर राहणार असेल तर भरून येणारच. तिच्या डोळ्यातील अश्रू न सांगताच बरेच काही बोलून गेले. रेल्वे प्लॅटफॉर्म सोडेपर्यंत एकमेकांना हात दाखवत होतो नाईलाजाने ती घराकडे निघाली आणि मी मुंबईकडे...

मुंबईत उतरल्यावर सायंकाळी मित्रवर्य मुकुंद सहस्रबुद्धे याच्या प्रभादेवीच्या घरी थांबलो. त्याच्याशी छान गप्पा झाल्या. नियोजनाविषयी चर्चा झाली. थोडेसे या हृदयीचे त्या हृदयी झाले. रात्री मुकुंद ने छान भोजन प्रबंध आयोजित केला. माझ्याकडे चार तासांचा वेळ होता‌. रात्री बारा वाजता हरिद्वार एक्स्प्रेस होती.  ही रेल्वे नावाला एक्स्प्रेस आहे...खरेतर जनता गाडी म्हणावी... गाडीने वेग  घेईपर्यंत पुढचे स्टेशन येते मजल-दरमजल करत प्रवास करतात, तसा प्रवास चालू होता सकाळी उठल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत ना चहावाला ना नाश्ता विचारणारा... कोणीही डब्यात आले नाही. घरून पत्नी सौ वर्षाने बनवून दिले मेथीचे थेपले सोबत टॉमेटो केचप असा नाष्टा केला, पुढील स्टेशनवर चहा प्यायलो.

एक एक स्टेशन मागे पडत होती. रतलाम सारख्या जंक्शन असलेल्या स्टेशनवरून सुद्धा जेवणासाठी बरी व्यवस्था नव्हती. आश्चर्य म्हणजे रतलाम ला स्टेशनवर जेवायला भाजी नव्हती.  पण घट्ट रबडी खुणावत होती. प्रवासात दूध व दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत. गिरनारला मी एकदा आईस्क्रीम खाऊन पोट बिघडल्याचा अनुभव घेतला होता. शेवटच्या दोन हजार पायऱ्या उतरलो ते दत्त महाराजांच्या कृपेने...
तेव्हा पासून कानाला खडा...

सुमारे ३४ तासांचा प्रवास करून सकाळी ९.३०  वाजता हरिद्वारला पोहोचलो. रेल्वेतून उतरल्यावर मी हरिद्वारला सामान ठेवून, आवरून ऋषिकेशला जाणार होतो. परंतु रेल्वेतील एक सहप्रवासी श्री गर्ग हे ऋषिकेशला मेहुणीच्या लग्नासाठी मोटारने निघाले होते. त्यामुळे मूळचा बेत बदलून मी त्यांच्या बरोबर ऋषिकेशला गेलो.

चारधाम यात्रेची पूर्वतयारी करीत असताना, मला वेळोवेळी  स्वतःचा व्यक्तिगत मोबाईल नंबर देऊन मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या, गढवाल मंडल विकास निगमचे  एक पर्यटन अधिकारी श्री वीरेन्द्र सिंह गुसाई यांची भेट घेऊन, त्यांचे अनोपचारिक आभार मानायचे होते. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. पुण्याहून आणलेली खास चितळ्यांची बाकरवडी व आंबा बर्फी त्यांना भेट दिली. आठवणीसाठी त्यांच्याबरोबर फोटो काढला. त्यांनी मोठ्या मनाने परत काही मदत लागली तर जरूर फोन करा असे आवर्जून सांगितले. त्यांची गळा भेट घेऊन मी परत हरिद्वारला निघालो.

सकाळी नाष्टा केला नव्हता. दुपारचे ११ वाजले होते. ऋषिकेश हून निघताना भरतराम भट्ट भोजनालयात भरपेट जेवण केले. मिक्स व्हेजिटेबल, बटर रोटी व सोबत कांदा. तेथून हरिद्वारला येण्यासाठी एसटी स्टँडवर गेलो. तेथे समोरच चार धाम यात्रेकरूंचे मोफत रजिस्ट्रेशन चालू होते. काउंटरवर मी एकटाच. आधार कार्ड व काही अधिक माहिती देऊन फोटो काढून माझे इ रजिस्ट्रेशन करून घेतले. त्यांनी मला चार धाम यात्रेचा एक व हेमकुंड साहेब यात्रेचा एक असे बार कोड असलेले दोन रिस्ट बॅण्ड दिले.

एसटीने हरिद्वारला आलो.
हरिद्वार मध्ये छोटी खोली घेतली. स्नान केले.
दुपारी विश्रांती घेतली. किसी जास्तीचे सामान मुकुंद सहस्रबुद्धे याच्या कृपेने त्यांच्या हरिद्वार येथील सरोवर पोर्टिगो हाॅटेलच्या प्रतिनिधी सोबत पाठवून दिले. यात्रा पूर्ण झाल्यावर ते तो आणून देणार होता. सायंकाळच्या हर की पौडीच्या गंगारतीच्या सोहळ्याचे वेध लागले होते...

हरिद्वार म्हणजे...हरिचे द्वार
हरि म्हणजे विष्णू...
विष्णूकडे जाण्याचे द्वार
हरिद्वारला भाविक, विष्णूच्या दारी डोके टेकवून आपली यात्रा सुरू करतात. पूर्वीच्या काळी चार धाम यात्रा कच्चे रस्ते, दरड कोसळणे, दरीत कोसळणे इ कारणांमुळे कठीण समजली जायची. बरेच वेळा यात्रेकरू परत येत नसत. वैकुंठाचा अधिपती रमा पती श्री विष्णूस नतमस्तक होऊन यात्रेकरू त्याला सुखरूप यात्रेसाठी साकडे घालत किंवा काही बरेवाईट झाले तर वैकुंठाला ने असे आर्जवही करीत.
केदारनाथ हे भोलेनाथ शंकराचे स्थान तर बद्रीनाथ हे विष्णूचे. एक पालन करणारा तर दुसरा पैलतीरी नेणारा. दोघांनाही अनन्यभावाने शरण जाऊन आपल्याला मोक्ष मिळावा म्हणजे जन्म दरजन्मातून मुक्ती मिळविण्याचा मार्ग खुला व्हावा..

गंगातिरी भाविक आपल्या आप्तांच्या आत्म्यास सद्गती लाभावी म्हणून फुले, वात, उदबत्ती असलेला पानांचा द्रोण गंगामैयाला अर्पण करतात. पाण्यात सोडलेला हा द्रोण हिंदोळ्यावर पुढे सरकत जातो. दूरवर जात दिसेनासा होतो. जड मनाने आप्त माघारी फिरतात. पाण्यात वाहण्यासाठी तयार करून ठेवलेले द्रोण खूप मनोवेधक दिसतात... आरतीसाठी भाविक गोळा होऊ लागतात. आरती दिसावी म्हणून मोक्याची जागा पटकावण्याची धावपळ सुरू असते. जागा न मिळालेले मागे उभे राहतात. 

सायंकाळी हरकी पौडी म्हणजे हरीची पायरी येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर गंगा मातेच्या आरती चा मोठा सोहळा असतो. हा सोहळा अतिशय दिमाखदार, देखणा, प्रेक्षणीय व मनोहारी असतो. हजारो यात्रेकरू या सोहळ्यासाठी सायंकाळी गंगामाईच्या किनारी येतात व आरतीत सहभागी होतात. या आरतीचा एक वेगळाच आयाम आहे. आरतीचा एक तासाचा वेळ कसा निघून जातो समजत नाही. 

सुरुवात होते मंत्रांनी... मोठमोठ्या पंचारती, झांजा, घंटा, आरत्या म्हणणारे पुजारी आणि भाविक...
पाण्यात पडलेले आरतीचे प्रतिबिंब
हळूहळू मंद होत जाणारा प्रकाश आणि खळखळत वाहणारी गंगामैय्या. आपण एका वेगळ्याच विश्वात जातो. सगळे कसे मनात, हृदयात भरून ठेवण्याजोगे. विस्तृत पात्राने वाहणारी, स्वच्छ गंगामैय्या हरकी पौडी या घाटाच्या बाजूला वळवलेली आहे.  इथे पाण्याला प्रचंड ओढ असल्यामुळे नदीकिनारी रेलिंग करून साखळ्या लावलेल्या आहेत. आपल्याला पाण्यात उतरल्यावर स्नान करताना त्या साखळ्या धराव्या लागतात.  आरतीची सांगता होते. सगळे भाविक हळूहळू आपल्या घराकडे परतू लागतात. अव्याहत वाहणारी गंगामैया सागराच्या मिलनासाठी निघालेली असते. येथे येणाऱ्या भाविकांच्या मनात हरकी पौडी येथे होणाऱ्या सायंकाळच्या गंगारतीसाठी उपस्थित राहणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जो तो आपापल्या परीने गंगा मातेचे चित्र डोळ्यासमोर उभे करतो. डोळे मिटून तिला भक्तिभावाने शरण जातो. जीवनदायिनी गंगा माता हजारो वर्षांपासून अविरत प्रवास करीत आहे.  गंगामाते विषयी प्रत्येक हिंदू धर्मीयांच्या मनात एक वेगळीच आत्मीयता, आदराचे स्थान आहे व तिचे पौराणिक असे महत्त्व आहे.

मनातील आंदोलने कमी करून, आपले मन  अधिक शांततामय करून, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विशाल करण्यासाठी पाण्याच्या किनारी थोडा वेळ बसून राहावे असे म्हटले जाते. खळखळ वाहणारे नदीचे पाणी, सरोवर, तळे यांच्याकडे ती अलौकिक अशी शक्ती आहे असे म्हणतात. कधीतरी सर्वांनी करून पाहावे. आरती संपल्यानंतर, घाटावरची गर्दी कमी झाल्यावर मी सुद्धा गंगा मातेच्या किनारी एका बाजूला डोळे मिटून शांतपणे थोडा वेळ बसून राहिलो. मनातल्या मनात चारधाम यात्रेचा संकल्प सोडला उद्या सकाळपासून हरिद्वार हून चारधामची यात्रा सुरू होणार होती.

 हा प्रवास आहे...आनंदसाठी, मनःशांतीसाठी आत्मिक उन्नतीसाठी, लौकिक पारलौकिक अनुभवासाठी, सामाजिक - नैसर्गिक प्रत्ययासाठी... ईश्वर, निसर्ग, दाते, अन्नदाते, आक्षयदाते,मदत कर्ते दयाळू यांच्याकडून शिकण्यासाठी...

गर्व, दुराभिमान, मत्सर, राग, आसक्ती, द्वेष
यापलिकडे जाण्यासाठी पदभ्रमणाचा हा प्रपंच...
आपले प्रत्येक पाऊल आपल्याला कणाकणाने काहीतरी मागे सोडायचा मार्ग दाखवणार आहे असा विश्वास वाटतो...

देव तर सगळीकडे आहे, मग तिकडे कशाला जायचे...
माणसेही सगळी सारखीच मग तिकडची अशी काय वेगळी आहेत...
निसर्ग तर इथून तिथून सारखाच... थोडाफार फरक काय तो असेल...
सातपुडा, सह्याद्री अशा पर्वत रांगा असताना, हिमालयाचे असे काय वेगळे आहे...
मंदिरे, नद्या, बर्फ, जंगल, दऱ्याखोऱ्या हे तर बऱ्याच ठिकाणी आहेत...

मग हा अट्टाहास, उठाठेव, तंगडेतोड कशासाठी ?

ज्याला हे प्रश्न पडतात, त्यांची  उत्तरे त्यांनीच शोधली पाहिजेत...
मला मिळालेले उत्तर दुसऱ्याचे समाधान कसे करू शकेल...
सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करायच्या नसतात... काही दुसऱ्यासाठी पण करून बघाव्यात. जगणे आणि जगून बघणे यातील फरक समजणे सोपे आहे का...
जो जगलाच नाही, तो मेलाच कसा.‌‌..

प्रपंच हा न संपणारा आहे...
जन्म, शिक्षण, लग्न, अपत्य, त्यांचे संगोपन, त्यांचे शिक्षण, त्यांची लग्ने, नातवंडे, आजारपण, स्टॅडर्ड ऑफ लिव्हिंग, मुदत ठेवी, व्याज, गुंतवणूक, सोने खरेदी, बंगला, गाडी, परदेश प्रवास ....बापरे
हे सगळे करता करता, करायचे राहून गेलेल्या गोष्टींची यादी यापेक्षा कधी मोठी झाली ते समजत नाही...
सकाळी उठण्यासाठी घड्याळाचा गरज लावताना सकाळी जिवंत असू याची खात्री देता येत नाही...तेव्हा...गजर न लावता जागे व्हा

कोरी पाटी घेऊन निघावे...जे जे उमटेल त्याचा अभ्यास करावा... आजन्म विद्यार्थ्यांने ज्ञानार्जनासाठी हे करणे उत्तम

उद्या रविवारी, पहाटे ब्रह्म मुहूर्तावर पदभ्रमणाचा श्री गणेशा करायचा आहे... लवकर निद्रादेवीच्या स्वाधीन करायला हवे...

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*
*चारधाम पदभ्रमण यात्रा...*

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - २*

हरिद्वारहून पहाटे ५ वाजता ऋषिकेश ला प्रमाण केले.

पहाटे लवकर उठून आवरून, सॅक भरली. धर्मशाळेत एक लखनऊ चा बारा तेरा वर्षाचा मुलगा काम करत होता. छोटू त्यांचे नाव. अगदीच कोवळा मुलगा होता. बिचाऱ्याला या वयात काम करावे लागत होते, हे पाहून वाईट वाटले.  अशा परिस्थितीत सुद्धा तो हसत मुख होता. त्याला चहा सांगितले चहा आणून दिला, साबण कुठे मिळते विचारले तर साबण आणून दिला‌ चार हेलपाटे मारले आधार कार्डची झेरॉक्स मिळावी म्हणून... जे सांगेल ते काम विना तक्रार करत होता. त्याला म्हणालो, उद्या पहाटे निघायचे आहे.  ५ वाजता दरवाजा उघडावा लागेल म्हणून तुला सांगून ठेवलं.   मी  दरवाजाजवळच्या खोलीत झोपतो. तुम्ही मला कधीही हाक मारा. मी दरवाजा उघडेन, काळजी करू नका, असे तो उत्तरला. दरवाजा आतून लॉक केल्यामुळे त्याला उठवण्याशिवाय पर्याय नव्हता. पाच वाजता निघताना त्याला झोपेतून उठवले. त्याने दरवाजा उघडला त्याला अच्छा केला आणि निघालो.
मजबुरी...या वयातील शहरी मुलं १० हाका मारल्या तरी उठत नाहीत. जबाबदारी मुलांना पोक्त करते. काही पैसे त्याच्या हातात ठेवून निघालो. तेवढेच मी करू शकत होतो.

गल्ली बोळ पार करत गंगामैयाच्या पुलावर आलो. पुलाच्या तोंडाशी सुमारे शंभर फूट उंचीचा एक मोठा केशरी रंगाने रंगवलेला जाडजूड खांब आणि त्याच्यावर त्रिशूल आणि डमरू लावलेले होते.  पहाटेच्या वेळी अंधारात त्रिशूल आणि डमरू विशेष लक्ष वेधून घेत होते.  पूल ओलांडला आणि हरिद्वार - ऋषिकेश हायवेवर आलो. डाव्या हाताला वळून ऋषिकेश कडे कूच केले.

 रात्रभर प्रवास करून आलेल्या लक्झरी गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या.  एकेक गाडीतून यात्रेकरू उतरून हरकी पोडीच्या दिशेने मार्गस्थ होत होते. मधूनच कार हायवेवरून आत वळत होत्या. चुकून पुढे गेलेल्या मोटारी बिनधास्त राॅंग साईडने येत होत्या. उतरणाऱ्या लोकांना हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी रिक्षा, सायकल रिक्षा यांची गर्दी झाली होती. रस्त्यावर चालणारा मी एकटाच होतो. रस्त्यावर शहरात असल्यामुळे दिवे होते. पण जसजसा पुढे गेलो तसे दिवे बंद झाले. पण तेवढ्यात फटफटू लागले. त्यामुळे हेड लाईट लावावा लागला नाही. पहाटे २० ते २२ डिग्री तापमान होते. आल्हाददायक वाटत होते,  परंतु वारं असल्यामुळे  थंडी बोचरी वाटत होती.कानाला गार लागायला लागल्यामुळे खिशातून रुमाल काढून कानावर बांधला. टोपी घातलेली होतीच. सर्व सामान पाठीवर सॅकमध्ये ठेवले होते. त्यामुळे दोन्ही हात मोकळे होते. 

हरकी पोडी संपल्यानंतर हरिद्वार संपतेच. सीमेवर असलेल्या एका बागेत  शंकराची एक भव्य मूर्ती उभी केलेली होती. त्याच्यावर फोकस टाकल्यामुळे मूर्ती अंधारातही दूरवरून सहजच दिसत होती. हरिद्वार नगरीत स्वागत करण्यासाठी आणि हरिद्वार नगरीचे रक्षण करण्यासाठी साक्षात महादेव सीमेवर पहारा देत उभे असावेत असे वाटले. मूर्ती खूप मोहक आहे. मूर्तीचे फोटो काढून पाय उचलले.

चालत असताना रस्त्याला दुकानाच्या हसू येईल अशा पाट्या दिसल्या एका दुकानावर पाटी लिहिली होती मुलाला मुन्नालाल टायर पंचर दुसऱ्या दुकानावर पाटी लिहिली होती, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मिक्साॅलाॅजी...मस्त पुढे निघालो.

रस्त्याने चालताना  कधी फूटपाथ तर कधी डांबरी सडकेवरून चालत होतो. मधूनच फूटपाथ गायब, तर कधी ओव्हरब्रीजच्या कामामुळे सर्व्हिस रोड छोटा...कुठे पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी यात्रेकरूंची गाडीत बसायची लगबग सुरू होती. 
एक मूर्तीकाराच्या दुकानात छान मूर्ती करून ठेवल्या होत्या. समोरच ठेवलेली भगवान बुद्धांची
मूर्ती जणू स्वागत करीत होती.

 आकाश लाल झाले, ७ वाजले होते. दोन तास चालत होतो. चहा पिण्यासाठी थांबलो. चहावाल्याने तंदूर पेटवला होता. एक जण हात शेकत होता. धुळीसाठी लावलेला मास्क उच्छ्वासामुळे ओला झाला होता. तो तंदूर वर गरम केला. मिथुन भाई,( दुकान चालकाचे नाव ) त्याने मस्त, गरमगरम, फक्कड व ग्लासभर चहा आणून दिला. १० मिनिटे विश्रांती झाली. पुढे निघालो.

८ वाजले. पोटात कावळे ओरडू लागले होते नाष्ट्याची व्यवस्था पाहायला हवी होती. परंतु कुठेही टपऱ्या दुकाने रेस्टॉरंट उघडण्याची चिन्हे दिसत नव्हती एका ठिकाणी उभा राहून एका मोटरसायकलला हात केला आणि विचारले तेव्हा त्यांनी सांगितले पुढे उजव्या हाताला आत गावात तुम्हाला दुकानात मिळतील तिथे नाश्ता मिळेल रस्ता क्रॉस करून पलीकडे गेलो वाटेत तिथला गावकरी भेटला तो म्हणाला गावातले सगळे दुकाने बंद आहेत समोर दिसणारे दोन स्नॅक्स सेंटर चालू आहे तिथे तुम्हाला नाश्ता मिळेल पुन्हा रस्ता क्रॉस करून समोर गेलो स्नॅक्स सेंटर मध्ये बसलो काय विचारले पराठे ची ऑर्डर दिली पराठे तयार होईपर्यंत घरी फोन करुन पत्नीसह वर्षाला सकाळी निघून तीन तासाचा प्रवास झाल्याचे कळवले आठ वाजेपर्यंत एकूण 13 किलोमीटरचा प्रवास झाला होता पाण्याचा वेग चांगला होता ख्यालीखुशाली कळवून व इतर चर्चा करून चौकशी करून कप्पा वरून फोन ठेवला व पुढे निघालो दोन पराठे त्याच्यावर अमूल बटर एक चहा पाण्याची बाटली एवढ्या सगळ्या चे बिल फक्त एकशे तीस रुपये.

चालताना पुढे  एक मोठा ओव्हरब्रीज लागला. तो खूप उंच होता. एवढे चढायला नको, म्हणून मी पुलाच्या सर्विस रोड कडून पुढे जाऊ लागलो. पुढे गेल्यानंतर तो सर्विस रोड पुलाच्या शेजारून जाता जाता  डेड एंड झाला होता हे मला नंतर समजले. तसाच पुढे चालत राहिलो. चालताना काय मला काही खरे वाटेना, म्हणून समोरून येणाऱ्या दोघांकडे चौकशी केली की हा रस्ता पुलाच्या तिकडे जातो का ? त्यातला एक जण म्हणाला याच रस्त्याने पुढे जा, तर दुसरा म्हणाला, जानवर का डर हैं, इधरसे मत जाव. पूल चढके पुरसे जाव. मी तसेच पुढे जायचे ठरवले.  वाटेत रेल्वे क्रॉसिंग होते. धड रस्ताही नव्हता. कसातरी उड्या मारत,हकसरत करीत पुलाच्या डाव्या हाताला पोहोचलो.  काल ज्या धर्मशाळेत मी उतरलो होतो तिथल्या मॅनेजर काकांनी मला आधीच घाबरवुन सोडले होते. पहाटे लवकर निघू नका, वाटेत जंगले प्राणी असतात. त्यामुळे मी पहाटे तीनच्या ऐवजी पाच ला निघालो आणि सकाळी सात वाजले तरी त्या दोघांनी मला जंगली प्राण्यांची भीती घालून  आणखीन घाबरून सोडले. तरीही मनाचा हिय्या करून मी पुढे चालत राहिलो. समोरून चालत आलेली एक दोन माणसे मागे गेली.   रेल्वे क्रॉसिंग करून पलिकडे गेल्यानंतर वनखात्याचे चेकपोस्ट दिसले. त्यांच्याकडे चौकशी करता ते म्हणाले की, रात्री पुलाखालून प्राण्यांची ये-जा असते आणि आता तर सकाळ झाली त्यामुळे आता प्राणी येत नाहीत. फुकट दोन तास उशीर निघालो, त्यामुळे उन्हात चालावे लागणार होते. कपाळावर हात मारला आणि चालू लागलो. पुलावरून सोडून गेलो असतो तर परवडले असते, इतका वेळ या सगळ्यात गेला होता.

 पुढे रस्त्यात ठिकठिकाणी बोर्ड लावले होते. मोतीचूर रेंज, राजाजी टायगर रिझर्व.  प्राणी रस्ता ओलांडतात, प्राणी रस्त्यात येऊ शकतात, गाडीतून उतरून नका.  हे मी घरी सांगितले असते तर घरच्यांनी मला सकाळी सातच्या आत बाहेर पडू नको सल्ला दिला असता. पण मी निघून इथे येईपर्यंत जवळजवळ दोन तास गेले होते व लक्ख उजाडले होते. 

ऊन वाढू लागले होते मी रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला गेलो. आता माझ्या समोरून वाहने येत होती. या बाजूला थोडी झाडी असल्यामुळे थेट ऊन अंगावर येत नव्हते. काही सोनचाफ्याची तर काही अनोळखी झाडे होती. चालताना झाडांची महत्त्व कळते. कितीही कडेने चालले तरी वाहने अगदी शेजारून जात होती. एकूणच पादचाऱ्यांना शून्य किंमत असते.

वाटेत काली कमलीवाले बाबा यांची मोठी गोशाळा लागली. मोठे आवार, सुसज्ज व्यवस्था, खूप गोधन होते. उत्तराखंड मध्ये काली कमलीवाले बाबा यांचे अनेक ठिकाणी आश्रम आहेत. बाहेरच्या मानाने तेथे माफक दरात निवासाची सोय होते.

 सावलीमुळे चालणे थोडे सुसह्य झाले. पण  ऊन लागायला लागल्यामुळे  तहान लागून सारखे पाणी प्यावे असे वाटत होते. सुरुवातीला पाणी   प्यायलो,नंतर ज्यूस, उसाचा रस, शहाळे असे करत करत वाटचाल चालू होती. दहा वाजता हायवेवर लावलेली आडवी पाटी दिसली... ऋषिकेश पाच किलोमीटर !!!  एक तासात आश्रमात पोहोचू असा विचार केला. गुगल मॅप उघडून स्वामी रामानंद आश्रमाचा पत्ता टाकला तर तो दोन तास पंधरा मिनिटे ची वेळ दाखवत होता.  चुपचाप गुगल मॅप बंद केले आणि पाय उचलले. 

थोडे पुढे गेल्यानंतर एक स्थानिक नागरिक भेटला. त्याला आश्रमाचा पत्ता विचारलं तर त्यांनी मला नीट पत्ता सांगितला तो म्हणाला पुढे गेल्यानंतर  चंद्रभागा ( एक क्षण नाव ऐकून मला आश्चर्य वाटले ) पूल लागेल. तो पूल ओलांडला की उजव्या हाताला वळा आणि मग विचारत विचारत पुढे जा. आश्रम खूप लांब आहे. तुम्हाला रिक्षाने जावे लागेल.  त्यावर मी हरिद्वार पासून चालत आलोय सांगितल्यानंतर तो चकित झाला. पण तरीही आश्रम खूप लांब आहे हे सांगणे त्यांनी मात्र सोडले नाही. नंतर माझी चौकशी केली, तुम्ही कुठून आलात कशासाठी चालत आलात  वगैरे विचारले माहिती दिल्यानंतर शुभेच्छा देऊन तो त्याच्या वाटेने, तर मी माझ्या वाटेने निघालो. सासूबाई आणि सासरे यांना वाटचालीची माहिती कळविली. त्यांचे आशीर्वाद होतेच. त्यांनी चार धाम यात्रेसाठी त्यांचा सहभाग व शुभेच्छा म्हणून आर्थिक वाटा उचलला. माझ्या या पूण्यकर्मात सर्वांचा वाटा होताच. एकट्याने सगळे थोडेच होते. 

चालताना उजव्या हाताला बहात्तर सीडी नावाचा घाट नावाचा घाट लागला. त्यावर मंदिर गंगेश्वर बजरंग महादेव अशी पाटी होती.  येथून खाली डोकावल्यावर ऋषिकेश च्या गंगेचे प्रथम दर्शन झाले. दोन मिनिटं उभा राहिलो, फोटो काढले आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. ऋषिकेशमध्ये चौकशी करीत रामानंद आश्रमात पोहोचलो. माझे बुलढाण्याचे एक मित्र श्री सुनील वायाळ यांनी त्यांच्या नातेवाईकां मार्फत सदर आश्रमात राहायची सोय केली होती. रजनीकांत, नरेंद्र मोदी हे स्वामी रामानंद यांचे शिष्य. मला पण आपण सेलिब्रिटी झाल्याचा फील आला...

श्री अशोक वायाळ यांची भेट घ्यायची होती.
आश्रमात प्रवेश करून त्यांची चौकशी केली तर ते समोरच उभे. नमस्कार केला. समक्ष भेट आज प्रथमच झाली होती. काल फोन करून मी उद्या १२-१ वाजेपर्यंत पोहोचतो आहे, असे कळवले होते. श्री अशोक वायाळ यांचे वडील ऋषिकेश ला संस्कृत शिक्षणासाठी. त्यांनी पुढे पीएचडी केली व येथेच स्थायिक झाले. स्वामी रामानंद तसेच त्यांचे उत्तराधिकारी  विद्यमान स्वामीजीं
यांचे ते अगदी निकटचे सहकारी आहेत. त्यांना अनेक भारतीय भाषा अस्खलितपणे बोलता येतात. अतिशय उमदा माणूस व प्रभावी व्यक्तिमत्त्व. तुम्ही कितीही दिवस राहा, काळजी करू नका असे त्यांनी मला अनेकदा सांगितले.
ऋणानुबंध म्हणायचे...त्यांचा टूर्स आणि ट्रॅव्हल्स चा व्यवसाय आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा यात्रेकरूंची गर्दी लोटली होती. सगळी लाॅजेस, आश्रम, धर्मशाळा ओव्हरफुल झाली होती. त्यांना कामामुळे उसंत नव्हती.

दुपारचे १२.३० झाले होते. आश्रमाची जेवणाची वेळ झाली होती. घंटा वाजली. आम्ही भोजनासाठी गेलो. सगळा शिस्तबद्ध कारभार...
तांदळाची खीर, मेदू वडे, सांबार, कारल्याची भाजी व ताक... भरगच्च मेन्यू.
हवे तेवढे घ्या, फक्त टाकू नका. जेवण झाल्यावर स्वतः चे ताट, चमचे, भांडे स्वतः स्वच्छ धुवून ठेवायचे. चांगला नियम व शिस्त.

आश्रमात बरेच विद्यार्थी आढळले. यातील काही लहान तर काही प्रौढ ही होते. तीन वर्षांचे वैदिक व उच्च शिक्षण येथे देतात. तरूण संन्याशी ही येथे बरेच आहेत. सायंकाळी तांदळाची खिचडी,कढी, रस्सा भाजी व पोळी असा मेन्यू होता.

या आश्रमात सर्वांना सरसकट प्रवेश मिळत नाही. अनुयायी, शिष्य, विद्यार्थी यांनाच प्रवेश दिला जातो. आश्रम खूप मोठा, स्वच्छ ठेवलेला परिसर असा आहे. शंकराचे मंदिर, स्वामीजींचे समाधी स्थान,यज्ञ शाळा, पाहुण्यांसाठी सुसज्ज व वातानुकूलित खोल्या. मोठे भोजन गृह. पार्किंगसाठी भरपूर जागा.

आश्रमाच्या मागील बाजूस गंगा वाहात असते. त्यावर बांधलेला घाट. सायंकाळी मनोहारी वातावरण असते. लोक पायऱ्यांवर येऊन बसतात. कोणी एकटा येतो, तर कोणी सहकुटुंब.
कोणी ध्यानात मग्न तर कोणी मित्र मैत्रिणींशी हितगुज करण्यात मशगुल. कोणी आरती करून दिले पाण्यात सोडतो तर कोणी पाण्यात पाय सोडून विचारात हरवलेला... कोणी पाण्यात खेळत असतात तर कोणी दुरूनच गंगामैय्याला डोळ्यात साठवत असतात...घाटाच्या पायऱ्यांवर बांधलेल्या रस्त्यावर व्यायाम करणारे, सन्याशांची ये-जा चालू असते...बऱ्याच वृद्धांची मनिषा सफल झाल्याची भावना.

 संध्याछाया पसरत असतात, समोर गंगामैय्या संथपणे वाहात असते, कोणीतरी आरती करून सोडलेले दिवे हेलकावे खात पुढे जात असतात, मधूनच एखादा मासा पाण्यावर उडी मारून क्षणात पाण्यात लुप्त होतो, मासे आपल्याशी लपाछपी खेळत असतात... प्रत्येक आश्रमाच्या गंगारती होतात. हा छोटेखानी सोहळा असतो.
चटई पसरून बसलेले भाविक. मंत्र म्हणणारे विद्यार्थी, दीपमाळेला लावलेल्या वाती...उदबत्तीचा सुगंध, वातींचा धूर...

हळूहळू काळोख आपले बाहू पसरतो. उरल्या सुरल्या संधीप्रकाशाला कवेत घेतो. लोक घरी परतू लागतात... मागे उरतो गंगामैय्याचा आवाज, दूरवर दिसणारे मंदिराचे दिवे, साधनामस्तांसाठी उत्तम वेळ... कालचक्र आहे हे...न थांबणारे.
मर्त्य मानव, आज असणारे उद्या नाहीत... निसर्ग मात्र तोच आहे...

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा