गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

21

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस चौथा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग एकवीस*🌿🌿
                    चार दिवसांच्या प्रवासानंतर वैरागजवळ आलो असता संपूर्ण वैराग मध्ये आतिषबाजी सुरु होती फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते रात्रीच्या आकाशात होणाऱ्या या आतिषबाजीने सारे आकाश उजळून निघाले होते जणू माझ्या आगमनाचे स्वागत करण्यात येत होते दिवाळीचा सण साजरा करण्यात येत होता परंतु माझे कशाकडेही लक्ष नव्हते घराची ओढ लागली होती अखेर चार दिवसातील 1055 किमीच्या प्रवासानंतर सायंकाळच्या साडे सात वाजता घरी आलो गाडीवरून उतरताना मन भरून आले होते आणि उगीचच महाभारताच्या लढाईची आठवण झाली मी गाडीचे आभार मानले अगदी मनापासून ती निर्जीव अन यंत्र असली तरी कारण एखाद्या जिवलग मित्राप्रमाने जशी गेली दोन वर्षे साथ दिली तशीच साथ गेल्या चार दिवसांत दिली होती कसलाही त्रास न देता, अगदी हवाही चेक करण्याची गरज लागली नव्हती, घरात आल्यावर सौ ने औक्षण केले आणि मला मी एखाद्या लढाईवरून आल्यासारखे वाटलं, घरी आल्यावर पहिले काम मी जर कोणते केले असेल तर फ्रेश होऊन एक msg तयार करून whats app वर पोस्ट केला कारण मला माहित आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची कमी नाही  पण निलेश शिंदेला माझ्या लक्षात असूनही फोन केला नाही परत करू, परत करू असे करता करता  राहून गेले आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजता परत निलेशचा फोन आला आणि माझीच मला लाज वाटली कारण माझा फोन आला नाही म्हणून त्याने फोन केला होता अशा जिवलग मित्रांचे आभार मानले तर मैत्रीचा उपमर्द ठरेल म्हणून मी त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करतो
               प्रवास संपल्यावर कंटाळा येतो पण मला असे वाटलेच नाही उलट मला उत्साह मिळाला आनंद झाला कधीकधी प्रवासाच्या  मानसिक अवस्थेचा जर विचार केला तर प्रवास हाच त्रास दायक ठरतो तोच नकोसा वाटतो माहेरवाशिणीला माहेरहून निघताना गहिवरून येते आणि संपूर्ण प्रवासात गहिवर राहतो पण सासरी आल्यावर मात्र ती परत त्या घराशी एकरूप होऊन जाते अशी अवस्था मी अनुभवली आहे कैकवेळा  जेंव्हा मी नवीन नोकरीला लागलो होतो तेव्हा हिंगोलीहून येताना कधी गावाकडे पोहोचतो असे व्हायचे पण गावाकडून जाताना मात्र माहेरवाशिणीसारखे व्हायचे संपूर्ण प्रवास जीवावर यायचा, नकोसा वाटायचा  पण एकदा तिथे गेल्यावर मात्र परत येईपर्यंत गावाकडची आठवण व्हायची नाही 
                    प्रवासवर्णन  करत असताना काही ठिकाणी वेळ व  अंतर  लिहिलेले असून ते फक्त आपल्या माहिती साठी असून अंदाजे आहे मी जो प्रवास चार दिवसात केला आहे तो खरं तर कमीत कमी 8 दिवसांचा नक्की आहे मी फार गडबडीत पूर्ण केला याची मला जाणीव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोबतीला कुणीतरी हवेच आपले हक्काचे माणूस नाहीतर जो आनंद आपण एकटेच अनुभवतो  तो असुरीच ठरेल, नाही का?
                   पाटेश्वराच्या डोंगरावरून जड अंतःकरणाने उतरताना झालेली घालमेल अन सज्जनगडावरून उतरताना आलेले वैराग्य कसे विसरणार, लिंगमळा धबधबा पहायला जातांना चार माकडांना पाहून मनात वाटलेली भीती वेण्णा नदीचे खोरे क्षितिजापर्यंत पाहताना छाती दडपून जाते की काय या विचाराने पाणी पाणी झालेले मन इको पॉइंटवर असताना झालेली एकटेपणाची जाणीव काळभैरव मंदिरात जाताना आलेली चीड प्रतापगडावरून जावळीचे खोरे पाहताना भरून आलेली छाती, पालगडला सानेगुरुजींच्या आठवणीने कासावीस झालेले मन , मुरुडचा समुद्र किनारा पाहून एक जिवलग मित्र भेटल्याची भावना, रायगडावर तुमचं आमचं नातं काय ? या जयघोषानंतर अंगावर आलेले रोमांच, पहाटेच्या गडवाऱ्यात आणि रायगडावरील सूर्योदय पाहताना परत कधी असा योग्य येईल या विचाराने कातर झालेले मन, असे  एक ना अनेक प्रसंग मनात घर करून बसले आहेत आणि त्या वरही पुरून उरला तो म्हणजे एकट्यानं एवढा प्रवास करण्याचा बेधुंद अनुभव, खरंच एकट्यानं प्रवास करण्यातही एक मजा आहे एक धुंदी आहे एक मस्ती आहे एक आनंद आहे तो अनुभवण्यासाठी आपणही कधीतरी एकट्याने प्रवास करावाच यापुढंही असा प्रवास करायला खूपच आवडेल नक्कीच पण कधी योग येईल काय माहित? असा योग आल्यास नक्की प्रवास करणारच आपल्यापैकी जर कोणाला करायची आवड असल्यास आपणही प्रवास करावा हि विनंती आणि तो प्रवास माझ्याबरोबर असेल तर सोने पे सुहागाच!
                      आज माझ्या *बाईकसवारी:-एक प्रवास* या प्रवास वर्णन लेखनाचा शेवटचा भाग आहे लेखनसमाप्ती करताना अतिव दुःख होतं आहे मन भरून आलं आहे एखादी सुंदर कलाकृती पूर्ण केल्यावर कलाकाराला जो अनुभव येत असेल तोच अनुभव मी घेत आहे, तो आनंद आणि ते मानसिक समाधानही मी यावेळी अनुभवतो आहे सुखदुःखाच्या ऊनपावसाचा अनुभव मला आता येतोय अन मला कृतार्थ झाल्यासारखे वाटत आहे प्रवास वर्णन  लेखन करणे हा हेतू नव्हताच मुळी पण लक्ष्मण वाघमारे गुरुजीसारख्या जेष्ठ मित्रांच्या आग्रहामुळे हा अक्षरयज्ञ मी आरंभिला, प्रत्येक शब्दाची समिधा या यज्ञात अर्पण करताना मन भरून येत आहे पण त्याच बरोबर परत एकदा वाचकांच्यासह  सहल केल्याचा आनंद अनुभवायला मिळाला याबद्दल माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांचे त्रिवार आभार व्यक्त करण्यापेक्षा ऋणात राहणेच मी पसंत करीन. 
                आज लेखन करताना हात अन हृदय दोन्ही जड झालेलं आहे शब्द सुचत नाहीत  यावेळी ज्यांच्या आठवणीने माझे डोळे भरून  आले आहेत ते माझे परममित्र मार्गदर्शक अन निखळ मनाचा माणूस शिवशंकर  साखरे गुरुजी, संपूर्ण प्रवासात माझी फोन करून विचारणा करणारा आदिल सय्यद सर , राजेंद्र आवारे गुरुजी अध्यक्ष शिक्षक संघ वैराग,आनंद पिंपळे सर (करमाळा), दीपक शेळके,  गु.ना कल्याणी, (ज्याचे हेल्मेट घेऊन मी हा प्रवास पूर्ण केला )बा रा पाटील गुरुजी  सतिश ढेकळे गुरूजी महावीर तुपसमिंदर सर (सातारा) भोसले सर (सातारा)महाबळेश्वरचा प्रवास ज्यांच्यामुळे कमी वेळात पूर्ण झाला ते चव्हाण सर (सातारा) , विनायक शिंदे सर ( महाड ) निलेश शिंदे (रहाता) तसेच सर्व मित्र हितचिंतक वाचकांचे व  प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मित्रांचे ऋण डोक्यावर घेऊन नाचताना आनंद होतो आहे
               माझ्या लेखनाचे कौतुक करणारे बब्रूवाहन काशीद गुरुजी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक संघ शाखा सोलापूर ,आमची प्रत्यक्ष ओळख नसतानाही संपूर्ण प्रवासात माझी विचारपूस करणारे तसेच माझ्या प्रत्येक भागाच्या  लेखनाचे कौतुक करणारे शिक्षक नेते जोतिराम बोंगे गुरुजी (पंढरपूर) तुमची कौतुकाची थाप माझे मनोबल वाढविणारी ठरते प्रत्येक वेळी!
                   प्रवास वर्णनाचे लेखन करतेवेळी माझ्या लेखनाला इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही नव्हती. सोशल मीडियावर दररोज अंदाजे 12 ते 13 हजार मित्रांपर्यंत माझे लेखन पोहोचत आहे, या प्रवास वर्णनाच्या लेखनाने मला काय मिळालं तर अनेक मित्र केवळ या लेखनाच्या माध्यमातून मिळाले शेकडो मित्रांनी माझ्या लेखनाचे समक्ष, सोशल मीडियावर, फोन करून कौतुक केलं, अनेकांनी प्रवास समक्ष अनुभवत असल्याचे सांगितले याहीपेक्षा मला मिळालेलं आत्मिक समाधान खूप मोठं आहे परत एकदा माझ्यावर प्रेम करणाऱ्या , मला लेखन करायला लावणाऱ्या , माझं लेखन वाचणाऱ्या, माझं कौतुक करणाऱ्या  आणि प्रत्यक्ष प्रवास करताना मला मदत करणाऱ्या ज्ञात-अज्ञात मित्रांचे ऋण व्यक्त करतो 
           जीवनाच्या मागे धावपळ करत असताना वेळ मिळाला तर असा प्रवास करायला नक्कीच आवडेल या लेखमालेचे वाचन करणारा एखादा वाचक जर पुढच्या प्रवासात सोबती मिळाला तर यापेक्षा आनंद तो दुसरा कोणता असेल? पाणावलेल्या पापण्यांच्या कडा आणि भरून आलेलं मन यासह तात्पुरता आपला निरोप घेऊन लेखनाची सांगता करतो 
नमस्कार!!!!!🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
     परत भेटू लवकरच नव्या प्रवास वर्णना सह
*ता क*:-ज्या वाचक मित्रानी पहिल्या भागापासून वाचन केले नाही त्या वाचकांना तर माझा प्रवास सुरू आहे असे वाटते असे बरेच संदेश, फोन मला आले  या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो की सदरचा प्रवास मी 27 ते 30 ऑक्टो.2016 या काळात केलेला आहे. प्रवास करताना माझे लेखन उपयुक्त ठरले तरच या लेखनाचे यश आहे माझ्या *बाईकसवारी:-एक प्रवास* या लेखमालेच्या मागच्या सर्व भागांचे pdf रूपांतर केले आहे ते download करण्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून download करून घ्यावे
https://goo.gl/n8ncCL

लेखनसीमा
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
मागील सर्व भागांचे pdf download करण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/n8ncCL
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

वीस

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस चौथा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग वीस*🌿🌿
                     भक्तीगीत ऐकत प्रवास करायची  मजाच निराळी, ती  मस्तीच निराळी ती मजा अन मस्ती अनुभवतच मी निघालो होतो परतीच्या प्रवासाला,  पाठीमागे रायगड सोडून मी महाडच्या दिशेने निघालो होतो महाड म्हटले की आठवतो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला चवदार तळ्याचा सत्याग्रह ते तळे नेमके कोठे आहे हे मला नाही त्यामुळे त्या ठिकाणाला भेट देणे तेवढे राहून गेले आता महाडजवळून सावित्री नदी ओलांडून जात असताना पुलाची आठवण झाली वाहून गेलेल्या पण उंच कठडे असल्याने काही दिसत नव्हते आणि राष्ट्रीय महामार्ग असल्याने थांबूही शकत नव्हतो त्यामुळे तसाच पुढे निघालो दीड तासाच्या प्रवासात मी वरंध घाटात आलो होतो निसर्गरम्य असणारा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट आहे चढायलाही थोडा अवघड आहे या घाटाची शोभा प्रत्यक्ष अनुभवायलाच हवी  आणि या वरंध घाटातच सुप्रसिद्ध 'शिवथर घळ'आहे ज्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी 'दासबोध'लिहिला मी कित्येक वेळा या वरंध घाटातून प्रवास केला आहे पण दरवेळी शिवथरला भेट देणे राहून गेलं आणि देशावरून म्हणजे घाटावरून येणाऱ्या माणसांना शिवथर घळ हे ठिकाण थोडे गैरसोयीचे आहे असे मला वाटते कारण आपण कोकणात येत असताना आपल्याला मुक्कामाला कोकणात जायचे असते अन देशावर येताना घरी पोहोचायची घाई असते यामुळे माझे तर बऱ्याच वेळा यामुळेच येथे भेट देणे राहून गेले आहे 
                     शिवथर घळ येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कोकणात वरंध घाट उतरून उजव्या बाजूला बरसगाव येथे असणाऱ्या रस्त्याने शिवथर येथे यावे अंतर फक्त 15 किमी आहे अन परतही याच मार्गाने जावे हाच रस्ता योग्य आहे या प्रवासाचा,  पण  माझी चूक झाली मला नक्की माहित नसल्यामुळे अन मी घाट चढून तेथे असणाऱ्या माझेरी या ठिकाणापासून शिवथर ला गेलो आणि अंतर फक्त सहा किमी आहे परंतु या मार्गाने मोटारसायकलही 30 किमी पेक्षा जास्त वेगाने धावू शकत नाही रस्ता अतिशय अरुंद व अति खराब आहे मोठमोठे गोलगोल दगडगोटे असल्याने गाडी चालवत असताना खूप त्रास होतो आणि जेवढा घाट आपण चढलो तेवढाच उतरावा लागतो अतितीव्र उतार व अवघड वळणे आहेत जायला खूप वेळ लागतो आणि आता तर रस्त्याच्या कडेला दुरुस्तीचे काम सुरु होते  आणि त्या वेळेत आपण विनात्रास घाट उतरून 15 किमी अंतर पार करून जाऊ शकतो तो रस्ता सपाटीचा आहे असो.
                मी घाट माथ्यावर आल्यावर शिवथर घळ 6 किमी असा बोर्ड दिसला आणि मनात विचार केला की आपण दरवेळेस हे ठिकाण चुकवतो आता जाऊयात पण समोर रस्ता अतिशय खराब होता वाटले थोडा असेल म्हणून मी जायला निघालो अन जावे कि नको या विचारात असताना तोच  पुण्याहून येणाऱ्या बसने माझ्यासमोर नुकताच उतरलेला एक माणूस दिसला तो तेथेच जाणार होता मी त्याला विचारले की रस्ता कसा आहे आणि त्याने सांगितले बरा आहे आणि त्याने मला लिफ्ट मागितली मीपण त्याला सोबत घेत पुढे निघालो अन रस्ता खूप खराब झालेला दिसला इतका कि तीन दिवस जो त्रास झाला नाही तो आंता होत होता खांदे दुखायला लागले होते कारण असे होते की खराब रस्ता तीव्र व अतितीव्र उतार अन डबलशीट अर्धा पाऊण तासाच्या कसरतीनंतर मी शिवथरला पोहोचलो मी सोबत्याला म्हणालो कि जर तुम्ही मला रस्त्याची माहिती सांगितली असती तर मी आलो नसतो आणि तुम्ही तर उलट माहिती सांगितली होती आणि त्याचे कारण असे होते की त्याची घरी जायची सोय झाली होती त्यामुळे तो गप्प होता  तेथून पुढे अर्धा किमी अंतरावर शिवथर घळ आहे त्याने मला दुरूनच रस्ता दाखवला आणि तो निघून गेला आणि पुढे निघालो होतो त्या पवित्र ठिकाणी जिथे समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून दासबोध स्रवला आणि त्यांचे शिष्य कल्याणस्वामी यांनी स्वतःच्या लेखणीतून साकार केला असे परमपवित्र ठिकाण "शिवथरघळ"
                        अर्धाएक किमीच्या सोप्या प्रवासानंतर मी शिवथरघळ  इथं पोहोचलो अतिशय निरव शांतता व नयनरम्य परिसर असे हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जाऊन बसलो कि सर्व शीण निघून जातो माझेही असेच झाले इथे माकडेही भरपूर प्रमाणात आढळतात डाव्या बाजूला मंदिर सोडून थोडे पुढे गेल्यावर समोरच एक धबधबा आहे त्याचा धीरगंभीर नाद वातावरणात पसरलेला असतो सततच्या प्रवाहामुळे दरड कोसळली आहे आणि 
 " गिरीचे मस्तकी गंगा ।तेथुनी चालिली बळे।
धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे।
गर्जतो मेघ तो सिंधू। ध्वनिकल्लोळ उठिला।
कड्यासी आदळे धारा। वात आवर्त होतसे।  "
            असे वर्णन ज्या ठिकाणा चे समर्थानी केले आहे ते अगदी योग्य आहे त्या ठिकाणी मी आता उभा होतो एका विलक्षण अनुभूतीत 
             त्या धबधब्याच्या थोडेच  अलीकडे आहे शिवथर घळ शिवथर घळीचे  तीन भाग आहेत यात रामाचे मंदिर कल्याणस्वामींचे राहण्याचे ठिकाण अन समर्थांचे राहण्याचे ठिकाण अतिशय सुंदर आणि सुरेख संगम असणारे ठिकाण आहे तेथून अलीकडे आलो की मंदिर आहे मंदिराचे दर्शन घेतले अन एका बाजूला असलेल्या कट्ट्यावर बसवून तेथील एका आजोबांनी माहिती सांगायला सुरुवात केली खूप चांगली माहिती मिळाली होती त्यांनी समर्थ विद्यापीठ सज्जनगड यांचेमार्फत चालवल्या जाणाऱ्या अनेक अभ्यासक्रमाची माहिती दिली सर्व अभ्यासक्रम पोस्टल असून अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांना करता येईल अशी शिबिरे अभ्यासक्रम सुरू असल्याची माहिती मिळाली तसेच सहलीसाठी मुक्काम व जेवणाची सोयही असल्याचे सांगितले आणि खरं तर पायच निघत नव्हता परंतु आज मुक्कामी घरी जायचे होते अन टप्पा लांबचा होता त्यामुळे मन असून देखील मी निघालो त्या रस्त्याने यायचे जीवावर आले होते पण नाईलाज होता अर्धा तास कसरत करावी लागली होती आणि मग मी अखेर घाटावर आलो थोडे पुढे गेल्यावर समोरच एक मोठी खिंड असून त्यातून पलीकडे जाता येते त्या ठिकाणी खूप सुंदर दृश्य दिसते उंचच उंच डोंगर खोल खोल दऱ्या हिरवेगार जंगल आणि याच ठिकाणी वडापाव व भजी खाण्याची मजाच न्यारी त्या ठिकाणी माकडेही खूप आहेत मी थांबुन वडापाव खाल्ला त्याची चव अप्रतिम होती वडापावची चव अन वरंध घाटाचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर एकदा यायलाच हवे आणि हो! तेही पावसाळ्यात मला मात्र  वेळ खूप कमी होता त्यामुळे मी लगेच निघालो  घाट उतरत असताना मला एका बाजूला पाण्याचा जलाशय दिसत होता अगदी खूप दूरपर्यंत सोबत होता पाण्यामुळे निसर्गही खुलला होता बऱ्याच ठिकाणी पॉईंट  तयार करण्यात आले होते पण मी मात्र थांबत नव्हतो रस्ता खराब असल्याने उरकत नव्हता आणि मला रस्ता चुकल्यासारखे वाटत होते आणि 20-25किमीच्या प्रवासानंतर आंबेघर हे गाव आले अन ध्यानात आले की आपला रस्ता बरोबर आहे कारण या गावातूनच पुढे रायरेश्वर कारी या ठिकाणाकडे रस्ता जातो आणि मागे एकदा असेच माहित नसल्याने रायरेश्वराच्या अगदी जवळ जाऊन परत आलो होतो फक्त उशीर झालेला असल्याने आणि परत एक वर्षाने रायरेश्वराच्या दर्शनाला जाण्याचा योग जुळून आला 
                आज मात्र खूप  कंटाळाच आला होता आणि रस्ताही उरकत नव्हता मागे याच रस्त्याने रायरेश्वरला गेलो होतो आणि त्यावेळेच्या आठवणी आता ताज्या झाल्या होत्या भोरहून हायवेला लागलो  आणि कापूरहोळ मार्गे सासवडला जायचे होते कापूरहोळ येताच आठवले शंभूराजे आणि त्यांना दूध पाजणारी दूध आई धाराऊ गाडे सईबाईसाहेब यांचे निधन झाल्यावर शंभुराजांना धाराऊ गाडे यांनी अंगावर पाजले त्यांचे गाव कापूरहोळ आजही त्यांचे वंशज या गावात राहत असतीलच 
               त्यापुढेच केतकावळेचा प्रतिबालाजी, नारायणपुरचा एकमुखी दत्त, नारायणेश्वराचे मंदिर सासवड येथील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची समाधी संत सोपानदेव यांची समाधी , बोपगाव येथील कानिफनाथ मंदिर या ठिकाणी मंदिरात प्रवेश करण्यासाठी फक्त एक छोटी खिडकी आहे आणि आपल्याला आत रांगत जावे लागते असे कानिफनाथ मंदिर सासवडपासून फक्त 15 किमी अंतरावर आहे अशी अनेक ठिकाणे डोळ्यापुढून सरकत होती पण मला मात्र आता या ठिकाणी जाता येत नव्हते अगदी रस्त्यावर असून जवळअसूनदेखील याचे  कारण म्हणजे मला आता घराचे वेध लागले होते सासावडमध्ये आलो होतो तेंव्हा अडीच वाजले होते भूक तर पळूनच गेली होती सासावडमध्ये मस्तपैकी चहा घेतला आणि लगेच पुढे निघालो अजून घर 200 किमी दूर होते आणि रस्ते तर असे खराब आहेत यामुळे वैरागला जाण्यासाठी रात्रीचे किमान 10 तरी वाजतील असे वाटले होते कारण अनुभव होता मागील चार दिवसांचा पण असे झाले नाही कारण मागील चार दिवसापेक्षा रस्ता खूप चांगला आहे सासवड जेजुरी मोरगाव बारामती इंदापूर टेम्भूर्णी हा रस्ता संपूर्ण प्रवासातील खूप चांगला रस्ता आहे त्यामुळे मी अगदी 70किमी प्रतितास या वेगाने गाडी चालवु शकलो संपूर्ण प्रवासात कुठेही रस्ता चुकलो नाही पण मोरगावहून बारामतीला आल्यानंतर मात्र रस्ता शोधत असताना अर्धा पाऊण तास रस्ता शोधण्यात गेला एकजनाने जाणीवपूर्वक दौंडकडे जाणाऱ्या रस्त्याला जायला सांगितले एकतर उशीर झालेला असताना असा वेळ गेला पण काही हरकत नव्हती साडेपाच वाजता माझा  जिवलग मित्र निलेश शिंदेचा फोन आला होता की मी पोहोचलो कि नाही कारण दोघांचे पोहोचायचे अंतर रायगडापासून जवळपास सारखेच होते अन तो आता पोहोचला होता आणि मी मात्र अजून 100 किमी अंतर दूर होतो मी  त्याला सांगितले की मी  7:30 ते   8:00 पर्यंत वैरागला पोहोचेल आणि त्याने पोहोचल्यावर फोन करण्यास सांगितले होते  आणि माझा वैरागकडे परतीचा प्रवास सुरू होता 
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

19

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस चौथा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग एकोणवीस*🌿🌿
 🌅 *एक पहाट रायगडावर*🌅
                 साधारणपणे पहाटे तीन वाजता मला जाग आली होती सर्वांची लगबग सुरू झाली होती अगदी लगीनघाईसारखी  आणि मी पण माझे नित्यकर्म आटोपून तयार झालो होतो निलेशच्या सांगण्यावरून प्रथम जगदीश्वर मंदिर शिरकाई मंदिर होळीचा माळ राजदरबार  येथे दीपोत्सव आणि ध्वजारोहण असा कार्यक्रम होता 
                 आम्ही आवरलं आणि सर्वांच्या पुढे जगदीश्वराच्या मंदिराकडे निघालो  ते पंधरा मिनिटे म्हणजे एक अवर्णनीय अनुभव होता गडावर मंद पणे वाहत  असणारा गार गार गडवारा आणि त्यावर गुलाबी थंडी आणि गप्पा मारत जाणारे आम्ही मित्र  मी, निलेश, अन सागर सागर हा निलेशचा भाचा आहे. खूपच गोड छोकरा आहे तो, गप्पा कसल्या चर्चाच होती म्हणा ना निलेशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता मी मात्र नित्याचेच कपडे घातले होते निलेश सांगत होता की अगदी आपण आपल्या घरी आजच्या दिवशी म्हणजे दिवाळीला जसे कपडे परिधान करून साजरा करतो अगदी तसेच कपडे सर्वजण परिधान करतात काहीजण तर मावळ्यांसारखे शिवकालीन पोशाख करतात तर महिलाभगिनीही अगदी पारंपारिक पोशाख करतात अगदी इतिहासकालीन अन त्यामुळे वातावरण अगदी ऐतिहासिक होते  मग मला वाटू लागलं की आपणही वेगळे कपडे आणायला  हवे होते असा विचार करत असतानाच आम्ही मंदिरात प्रवेश केला वारा खूप वेगात सुटला होता त्यामुळे पणत्या राहत नव्हत्या आमच्या आगोदर काही मावळे आले होते मी मंदिराच्या दारात आलो की 
            "सेवेचे ठायी तत्पर,
             हिरोजी इंदुलकर" 
अशी लेख असलेली पायरी दिसली अन पंढरपुरातल्या नामदेव पायरीची आठवण झाली त्याचबरोबर महाराजांच्या राज्याभिषेकाची अन त्या पायरीच्या इतिहासाची आठवण झाली तो इतिहास तुम्हांला माहित असेलच पण मला सांगायची ईच्छा अनावर झाली आहे तो तुमच्याशी शेअर करतो 
       शिवाजी महाराजांचे बांधकाम तज्ञ हिरोजी इंदुलकर यांच्याकडे रायगड वसविण्याची जबाबदारी  सोपविण्यात असली होती आणि त्यांनी ती आपले सर्वस्व पणाला लावून पेलली होती कितीतरी संकट आली तरी किल्ल्याचे बांधकाम थांबले नव्हते  आणि कित्येक वर्षाच्या अथक परिश्रमातून  एक अतिशय देखणा गड उभारला होता राज्याभिषेकावेळी राजांनी सर्वांना आपापल्या कर्तृत्वा प्रमाणे मान दिला इंदुलकरांनी किती कठीण प्रसंगातून रायगड उभारला होता हे राजांना माहित होते राजांनी त्यांना काय बक्षिसी द्यावी ते काय हवे ते मागा असे सांगितले घरावर तुळशीपत्र  ठेऊन ज्यांनी राजधानीचा गड उभारला त्यांच्यासाठी राजांनी काय करावे असे इंदुलकराना विचारल्यावर हिरोजीनी राजांना सांगितले की मी आपण जगदीश्वराच्या मंदिरात आल्यावर मागीन आणि महाराज याच जगदीश्वराच्या मंदिरात आल्यावर त्यांनी हिरोजीना बोलावले तेंव्हा हिरीजीनी मागणे मागितले कि या मंदिराच्या पहिल्या पायरीवर नाव कोरायची परवानगी द्यावी राजांनाही नवल वाटले हिरोजी काहीही मागू शकले असते पण त्यानी किती साधी मागणी केली म्हणून राजांनी त्यांना कारण विचारले असता हिरोजीनी कारण सांगितले की महाराज गडावर असताना रोज जगदीश्वराच्या दर्शनाला येतील आणि त्यांच्या पायाची धूळ शिरावर पडावी हीच ईच्छा!!! 
      हा प्रसंग डोळ्यासमोरून सरकून गेला अन या पायरीवर माथा ठेऊन मंदिरात प्रवेश केला 
                मंदिरात फुलांची आरास केली होती पणत्या लावल्या होत्या रात्रीच काही मावळ्यांनी हे काम केले होते मंदिरात पणत्यांचा  मंद प्रकाश पसरला होता शिवलिंगावर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची सजावट केली होती अशा रम्यकाळी जगादीश्वराचं दर्शन घेऊन मन अगदी प्रफुल्लित झाले होते मंदिराच्या गाभाऱ्यात खाली बसून डोळे बंद करून ध्यान करू लागलो होतो थोड्याच वेळात सर्व मावळे या मंदिरात जमा झाले होते आणि जगदिश्वराची पूजा आणि आरती आता थोड्याच वेळात होणार होती राजांच्या अनेक विश्वासू पराक्रमी असणाऱ्या सरदारांपैकी पाच सरदारांच्या वंशजांच्या शुभ हस्ते हा आजचा सर्व कार्यक्रम पार पडणार होता आणि लगोलग तेही मंदिरात आले शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर गणेश आरती विठ्ठलाची आरती आणि शंकराची आरती करण्यात आली लगेच मंदिराच्या समोरच असणाऱ्या महाराजांच्या समाधीची पूजा करण्यात आली आणि तदनंतर महाराजांची आरतीही करण्यात आली शिवरायांचा जयघोष करण्यात आला बाअदब बामुलाहीजा होशीयर………! 
                          मशाली पेटवण्यात आल्या निलेशच्या आग्रहाखातर मी माझ्या हाती मशाल घेतली होती त्या मशालींची उजेडात अनेकजण फोटो काढत होते निलेशने माझेही फोटो काढले आणि सर्व मशाली पेटविल्यानंतर  त्या प्रकाशात दोन दोनची ओळ करून मंदिरातून सर्वजण बाहेर पडलो प्रथम जरीपटका म्हणजे स्वराज्याचे निशाण हातात असणारे त्यांच्यामागे मशाली असणारे आणि मागे इतर सर्व जण आपापल्या परीने सहभागी झाले होते कुणी घोषणा देत होते तर कुणी गाणे म्हणत होते तर कुणी पोवाडा तर कुणी मंत्रमुग्ध होऊन चालत होते मनात अन शरीरात उत्साह संचारला होता ऐन दिवाळीत रायगडावर निघालेली हि गडफेरी एकदिवस संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असणाऱ्या किल्ल्यांवर प्रकाश पोहोचवणार हे नक्की 
                  आयोजकांच्या सूचनेनुसार सर्वजण शिरकाई देवीच्या मंदिराकडे गेलो मंदिराच्या आवारात मशालजींनी कडे केले होते आणि सर्व महिलांनी देवीची आरती केली पहाटेच्या वाऱ्याचा जोर खूप होता पण मशाली मात्र त्या वाऱ्यावर न विझता फरफरत होत्या तेथून पुढे सर्वजण अगदी शिस्तीत होळीच्या माळावर आलो आणि राजांच्या पुतळ्याची पूजा करून आब्दगिर पुकारण्यात आली खडा आवाज असणारी मुलं मुली पुढे म्हणत होती आणि मागे इतर सर्व जण.  'अरे तुमचे आमचे नाते काय,जय जिजाऊ जय शिवराय' असे म्हणताना सर्वामध्ये असणारा एकोपा दिसून येत होता तेथून पुढे सर्वजण  नगरखान्यातून राजदरबारात आलो राजसिंहासन असणाऱ्या चौथऱ्यावर कोणीही चपला बूट नेत नव्हते त्याबाबत आयोजक सूचना करत होते तेथे सगळीकडे रांगोळी काढली होती तसेच फुलांची आरास केली होती फुलांच्या माळा सोडल्या होत्या पणत्या लावल्या होत्या संपूर्ण परिसर फुलांनी आणि फुलांच्या माळांनी सजवला होता
                 मुख्य कार्यक्रम सुरू झाला होता आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला आणि मग  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अमोल तावरे यांनी केले व आलेल्या पाहुण्यांची ओळख करून दिली व त्यांनी आपले विचार व्यक्त केले आलेल्या पाहुण्यांमध्ये माझी या आगोदर भेट झालेले कारी ता भोर जि पुणे येथील कान्होजी जेधे यांचे वंशज होते त्यांना समक्ष भेटून खूप आनंद झाला 
                राजदरबारापासून नगरखान्यापर्यंत असणाऱ्या फरसबंदीवर दुतर्फा मशाल हाती घेतलेले मावळे उभे राहिले होते बाकी सर्व जण खाली बसून ऐकत होते पूर्वेकडे उजळून आले होते आणि आता कोणत्याही क्षणी भास्कर दर्शन देणार होता   ज्यांची मशाल विझेल ते आपापल्या जागी बसत होते 
                आज एका नवीन कार्यक्रमाची सुरुवात केली होती  ती म्हणजे आपल्या परिसरात असणाऱ्या किल्ल्यावर आजपासून देवदिवाळीपर्यंत एक दिवस दीपोत्सव केला जाणार होता आपापल्या परीने आभार प्रदर्शन झाल्यावर सर्वांना विनंती करण्यात आली की सर्वांनी नगरखाण्याबाहेर असणाऱ्या ध्वजस्तंभाकडे यावे त्या ठिकाणी जाऊन माझा मित्र निलेशने आणलेल्या जरीपटक्याचे ध्वजारोहण होणार होते आणि सर्वजण ध्वजस्तंभाकडे आले मी निलेश आणि सागरने ध्वजस्तंभाच्या साखळीला जरीपटका बांधला आणि सर्वजण जमल्यावर साखळीला ध्वज बांधल्यावर आयोजकांच्या सूचनेनुसार  जे मावळे यावर्षी पहिल्यांदा आले आहेत त्यांच्या हस्ते रोहण करण्यात आले त्यात मीही होतोच ध्वजाची साखळी ओढताना उर अभिमानाने भरून आला होता अन त्याचवेळी पूर्वेला सूर्य उगवला होता आणि त्याचा पहिल्या किरण बरोबर जरीपटकाही डौलाने फडकत होता सगळीकडे आनंदी आनंद झाला होता रायगडावरून सूर्योदय पाहण्याचे भाग्य लाभले होते आणि ते मी माझ्या दोन नेत्रांनी पीत होतो काय माहित परत अशी वेळ कधी येईल?
             आता सकाळचा गारवा अंगाला झोंबू लागला होता पण माझ्याकडे गरम कपडे असल्याने त्याचा त्रास होत नव्हता पण जे बांधव गरम कपड्याशिवाय आले होते त्यांचे काय असा विचार करत असतानाच सर्वांसाठी चहापानाची सोय केली होती आणि थोड्याच वेळात चहापानही झाले होते सर्वांचे त्यामुळे तरतरी आली होती आणि सर्वजण सूर्योदय आपल्या कॅमेऱ्यात टिपत होते मीही त्याला अपवाद नव्हतो  सगळीकडे अप्रतिम सौंदर्य दिसत होते मन प्रसन्न झाले होते माझ्या चार दिवस साच्या प्रवासाचा तो एक सुवर्ण क्षण होता आणि यापुढे मात्र मी सहकुटुंब येण्याचे पक्के केले आणि मला आठवले कि चार दिवसांपूर्वी मी एकट्याने निघताना माझ्या मुलाला समजवताना माझी  पुरेवाट लागली होती मुलालाही फिरायची खूप आवड आहे हे आठवले कि खूप आनंद वाटतो राजदरबारात जुन्नरहून आलेले शिक्षक व त्यांचे सहकारी पोवाडे अभंग व शौर्यगीते यांचे गायन करत होते त्यामुळे सर्वांमध्ये एक ऊर्जा संचारत होती सव्वा सात वाजले होते आणि मी निलेशच्या मागे घाई करत होती की आपण लवकर रोपवेकडे जाऊयात कारण सर्वांना माहीत असावे म्हणून मी सांगतो की रोपवे रोज सकाळी लवकर आठ वाजता सुरु होतो व सायंकाळी सहा वाजता बंद होतो  सर्वांच्या आगोदर आपण गेलो म्हणजे आपण लवकर उतरू आणि मग घरीही लवकर जाता येईल चार दिवस घरापासून दूर असल्याने घराची ओढ लागली होती सर्वजण आपापले साहित्य आणायला रेस्ट हाऊसला गेले होते आणि आम्ही तर सकाळीच ते सोबत घेऊन आलो होतो त्यामुळे साडे सात वाजता आम्ही रोपवेला नंबर लावला पहिलाच माझ्याबरोबर रोपवे पाहायला आलेला एक तरुण होता साताऱ्याचा तो पायी चालत गड चढून वर आला होता आणि आता पायीच उतरणार होता त्याला रोपवेचे कौतुक वाटत होते आणि मला त्याच्या डोळ्यात एक ईच्छा दिसली की त्याला रोपवे मध्ये बसावे वाटते पण पैसे नसल्याने ते जमत नसेल मला माझ्या पूर्वायुष्याची आठवण झाली होती माझीही अवस्था अशीच होती आयुष्याच्या एका वळणावर!,  म्हणून मी त्याला म्हटले की आपण जाऊया रोपवेने मी तिकीट काढतो तुझे मात्र त्याने माझ्यासोबत अजून मित्र आहेत असे म्हणून विनम्रपणे नकार दिला 
                आठ वाजता रोपवे सुरु झाला होता आणि मग आम्ही परत फिरलो पहिल्याच फेरीत आम्ही येईन असे वाटले पण त्यांचे टेस्टिंग करायला 15 मिनिटे गेली आणि आमचा नंबर लागला सहा सात मिनिटात खाली उतरून आलो खूप छान वाटत होते निलेशही नगरहून येतो मोटारसायकलवरच तो पुण्याहून जाणार होता तर मी भोरहून आम्ही एका हॉटेलात चहा बिस्किटे घेतली आणि बॅगा गाडीला बांधल्या आता विनाथांबा 355 किमी अंतर पार करून जायचे होते त्यामुळे थोडी पोटपूजा करून एकमेकांची गळाभेट घेतली निलेशबरोबर त्याचा भाचाही होता ना खूपच गोड छोकरा आहे तोपण गळाभेट घेऊन निघालो घराच्या दिशेने तेंव्हा घड्याळात सव्वा नऊ वाजले होते कानात किशोरी आमोणकर यांच्या भक्तिगीताचे सूर घुमत होते
"अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग"

क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

पंधरा

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस तिसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग पंधरा*🌿🌿
   
           गाडी घेऊन महाडच्या दिशेने निघालो होतो व त्या वेळी अनेक गोष्टी मला आठवत होत्या त्यातील एक गोष्ट म्हणजे काही महिन्यांपूर्वी येथील पूल कोसळून खूप मोठा अपघात झाला होता महाडपासून पोलादपूरला जाणाऱ्या मार्गावर दोनेक किमीवर तो  पूल आहे मी पहिला पण आता मात्र सर्वकाही शांत होते काहीच  न घडल्यासारखे मी  तेथून परत आलो व हायवे लगत असणाऱ्या एका छानशा हॉटेलात जेवण करण्यासाठी थांबलो होतो 
          ऑर्डर दिल्यानंतर ती येईपर्यंत रायगडावर येणाऱ्या मित्राना संपर्क करावा असा विचार करून मी माझ्या मोबाईल वरून फोन केल्यावर ध्यानात आले की कृषी प्लॅन असणाऱ्या bsnl चा आज ब्लॉक डे आहे आणि jio ला महाडमध्ये रेंजच नाही  तरी विचार करत होतो की मला संपर्क कसा साधला नाही अजून आता मात्र मला टेन्शन आले होते रायगडावर जायचे कसे?थांबायचे कुठे? याचे माझे नियोजन काहीच नव्हते तेवढ्यात एका मित्राचा मला फोन आला आणि मी त्याला सांगितले की माझ्याजवळचा नंबर घेऊन त्याला कॉल करून माझा नंबर सांग किंवा मला संपर्क साधा असे सांग पण त्याचाही फोन लागत नव्हता
            माझा फेसबुक मित्र  निलेश शिंदे राहाता जि नगर येथील त्याला संपर्क होत नव्हता आणि आम्ही अजूनही एकमेकांना समक्ष भेटलो नव्हतो कधीच फक्त फोन अन फेसबुकवरच आणि येथून पुढील सर्व नियोजन त्याच्याकडेच होते पण संपर्क होत नाही तर आता काय करायचे असा विचार मी करू लागलो
               माझे जेवण आल्यावर मी जेवण करताना एकच विचार करत होतो की आता काय करायचे आणि जेवण करता करता मी माझा विचार पक्का केला व निलेशशिवाय माझे नियोजन केले अगदी उद्यपर्यंतचे तो रायगडावर कार्यक्रमात भेटेलच याची खात्री होती पण तो आपल्याला नाही भेटला तरी काय करावे लागेल असे नियोजन ठरवले जेवण संपत असताना तीन वाजले होते आणि मग मी माझ्या मनात एक गोष्ट स्पष्ट केली की आपण दिवस मावळेपर्यंत रायगडावर पोहोचणे तेथे इतर मित्र मंडळ आले असतील त्यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रमात सहभागी व्हावे याविचारातच महाड सोडले आणि "जयजयकार महाराष्ट्राचा" हा पोवाडा सुरु होता मोबाईलवर, अंगावर रोमांच उभे राहिले होते आणि तो 28 किमीचा प्रवास चुटकीसरशी संपला आणि मी पाचाडला आलो मातृतीर्थावर दर्शन घेऊन लगेच रायगडाकडे कूच केले मनात मात्र अनामिक भीती होतीच आता पुढे गेल्यावर काय? अशा प्रकारच्या विचारात असताना रायगडाच्या पायथ्याशी आलो अन नकळत मस्तक झुकले उंचच उंच बेलाग कडे असणाऱ्या बा रायगडाच्या पुढ्यात !!!!
          आता गाडी कुठे पार्क करायची इथपासून सुरवात करायची होती आता डोकं थोडं जड झालं होतं गाडीच्या विचाराने कारण उद्यापर्यंत गाडी इथेच राहणार होती आणि मी मात्र गडावर ,एक ठिकाणी चौकशी केली पण तेथील मुलगा गाडीच्या पेट्रोलच्या बाबतीत खात्री देत नव्हता त्यामुळे मी रोपवेकडे चाललो होतो नुकत्याच रोपवेच्या ट्रॉल्या वर चालल्या होत्या अगदी डोक्यावरून मी मात्र  गाडी पार्किंगच्याच विचारात होतो आणि अचानक एक आनंदाची गोष्ट घडली होती आणि तो म्हणजे माझा जिवलग निलेश शिंदे माझ्या समोर उभा होता त्याच्या गाडीवर लाडक्या भाच्यासमक्ष त्यावेळेला कोण आनंद झाला होता तो शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य माझ्या डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याने मला ओळखले नव्हते पण मी त्याला ओळखले होते त्यालाही खूप आनंद  झाला होता मला भेटून दोघेजण भेटलो खूप कडकडून आणि आता मात्र मी पूर्णपणे निश्चिन्त झालो होतो दोन जिवलग मित्र बा रायगडासमक्ष पहिल्यांदा भेटत होते फेसबुकपासून चार पाच वर्षांपूर्वी सुरु झालेली मैत्री अशाप्रकारे समक्ष पर्यंत आली होती आणि मला तर खूप आनंद झाला होता आणि त्याचे कारणही तसेच होते आता उद्या सकाळीपर्यंत मला कसलेही टेन्शन राहणार नव्हते आणि झालेही तसेच!!!!
                    आम्ही रोपवेच्या पार्किंग मध्ये गाड्या पार्क केल्या  आणि उशीर झालेला असल्याने रोपवे ने जायचे ठरवले मग चहापाणी केले थोड्या गप्पा मारल्या गप्पा संपल्या नव्हत्या पण वेळ मात्र पुढे जात होता आणि रोपवे ने गडावर जाण्यासाठी तयार झालो
           रोपवे ने जात असताना खूप excite झालो होतो पण त्याचबरोबर निलेश शिंदे बद्दल माहिती देणे गरजेचे आहे असे वाटते
                 निलेश शिंदे हा राहाता जि नगर येथील असून तो व्यवसाय करतो तसेच 'प्रवास गडांचा' हा ब्लॉग चालवतो जेंव्हा "एक पहाट रायगडावर" उपक्रमाची सुरवात झाली  तेंव्हापासून निलेश दरवर्षी येतो तीन चार वर्षांपासून आम्ही फेसबुक मित्र आहोत फोनवरून संपर्कात आहोत  गेल्यावर्षी त्याने काही फोटो अपलोड केले अन आमची चर्चा झाली खरंतर मी गेल्यावर्षीच जाणार होतो रायगडावर  पण अडचण आली आता मात्र  अडचण येऊ नये म्हणून दोन दिवस आगोदरच निघालो होतो यावर्षी संपर्क करून निघालो होतो बाकी सर्व निलेश कडेच होते यापुढ सर्व सूत्रे निलेशच्या हाती देऊन मी निश्चिन्त झालो होतो निलेश वर्षातून दोनचार वेळेस रायगडी येतोच येतो आणि येतेवेळेस स्वराज्याचे निशाण,  प्रतिक जरीपटका आणतो आणि राजदाराबारासमोरील उंच ध्वजस्तंभावर फडकवतो अगोदरचा जरीपटका फाटला असेल जीर्ण झाला असेल तर तो बदलतो शिवरायांचा निस्सीम भक्त स्वराज्याचा अभिमान अन रायगडाची  उत्कट ओढ असणारा निलेश मला खूपच भावला होता छोट्या भावाप्रमाणे माझी काळजी घेत होता मला निलेश भेटल्यामुळे खूप आनंद झाला होता माझी सर्व काळजी मिटली होती निलेशबरोबर रोपवेने जात असताना त्याला फोटोग्राफीचीही आवड असल्याचे समजले
             आणि 5-6 मिनिटात आम्ही रायगडावर पोहोचलो होतो रायगडावर मी तीनचार वेळेस आलो असलो तरी रायगड दरवेळी नित्यनवा भासतो आताही असेच भासत होते  रोपवे ने वर वर जात असताना रायगडाच्या सरळसोट कड्याकडे पाहताना मनात खूप अभिमान वाटत होता रायगड बांधणाऱ्या हजारो ज्ञात अज्ञात हातांचा त्यांच्या समोर मनोमन नतमस्तक झालो अशातच सूर्य मावळतीकडे झुकला होता अन माझ्या मनात मात्र एक नवी पहाट झाली होती
क्रमश: 
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये
*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस तिसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग चौदा*🌿🌿
               दापोलीहून खेड पालगड कडे जाणाऱ्या रस्त्याने मी जात होतो कोकणातील रस्ते खराब नसतात असा माझा अनुभव होता पण रस्ते खूप खराब होते त्यामुळे गाडी चालवताना कसरत करावी लागत होती अलका याज्ञीक ची गाणी ऐकत मी गाडी चालवत होतो गाण्याच्या संगतीने वेळ कसा जात होता हे कळत नव्हते मनात  सकाळपासून पाहिलेल्या ठिकाणांचे विचार येत होते अगदी अचानक ठरवले होते पण किती अप्रतिम ठिकाणे पाहण्यात आली होती मन अगदी प्रसन्न होऊन गेले होते मुरुडच्या बीचवरील बहुतेक सर्व हॉटेल्सची वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत हेही लक्षात आले होते व त्यांच्या रुमचे बुकिंग आपण करू शकतो हे माहित झाले होते
      हिरवा निसर्ग हा भवतीने
 जीवनसफर करा मस्तीने
     असा सगळा माहोल असतो कोकणातील सफरीचा. परतीच्या वाटेवर असणाऱ्या या रस्त्याने गाडी चालवत असताना अधून मधून खूप उंच  टॉवर लाईन दिसत होती बहुतेक दाभोळ वीज प्रकल्पाची असेल या मार्गावर अनेक ठिकाणी छोटे मोठे घाट आहेत रस्ता मात्र बराच खराब आहे दोन्ही बाजूला असलेल्या दाट झाडीतून गाडी चालवण्याचा आनंद अवर्णनीयच आहे मधून मधून मित्रांचे फोन येत होते हेडफोन असल्याने व ऑटो answer on केल्याने बोलायला अडचण नव्हती आलो तसेच होतो त्याच रस्त्याने परत जायचे असल्याने रस्ता विचारायचे कारण नव्हते हा प्रवास पूर्ण खेडेगावातून होता व भात काढणीची लगबग सुरू झाली होती वाटेत अनेक ठिकाणी भाताची कापणी करत असलेला शेतकरी दिसत होता सगळा महाराष्ट्र  दिवाळीचा सण साजरा करत असताना ही शेतकाऱ्याला मात्र सुट्टी नव्हतीच, शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रात (नव्हे देशातच) कुठलाही का असेना अत्यंत अडचणीत आहे आणि त्यांच्यासाठी सरकार व सर्व समाजाने काहीतरी  करणे आवश्यक आहे 
        साधारण साडेबाराच्या सुमारास  महाड जवळ आलो होतो थोडा वेळ होता म्हणून मी एकेठिकाणी चौकशी केली की सव येथील गरम पाण्याच्या झऱ्याकडे जायला रस्ता कुठून आहे आणि मला समजलं की महाडवरून दोन रस्त्याने सवला जाता येतं 
1 दादली पुलावरून 7-8 किमी आहे तसेच 
 2 मुंबई हायवेलगतही  तेवढेच अंतर  मात्र सावित्री नदीचे पात्र पायी चालत ओलांडावे लागते बस , आपण  जर महाडमध्ये असलो तर आपल्याला वरीलपैकी दोन नंबरचा मार्ग सोपा आहे
            मी दापोलीहून येत असल्याने दादली पुलाच्या अलिकडूनच म्हणजे 1 नंबरच्या मार्गाने मी निघालो सावित्री नदीच्या काठाने 7-8 किमी अंतरावर सव आहे या मार्गाने मात्र गाडी एकतर रस्त्याला लावावी लागते व एक दीड किलोमीटर भाताच्या शेतातूनच पायी चालत जावे लागते किंवा भाताच्या शेतीच्या अगदी बांधाबांधाने एक दीड किमी अंतर पार करून गाडी लावावी लागते मग 100 200 मीटर अंतरावर दाट झाडीत सावित्रीच्या काठावर तीन गरम पाण्याची कुंड आहेत 
                            मी गाडी घेऊन बांधावरून गेलो व थोडे अलीकडे गाडी पार्क करून चालत गेलो भात शेती सभोवताली आहे आणि भात काढणी सुरु झाली आहे अशा वेळी मी बांधावरून गाडी चालवत आलो होतो वाटेत अनेक शेतकरी डोक्यावर कापलेल्या भाताचे भारे घेऊन येत होते रस्ता अगदी लहान असल्याने माझ्या गाडीमुळे त्यांना खूप अडचण येत होती पण कोणीही बोलून दाखविली नाही माझ्या गाडीला वाट देण्यासाठी ते ओझे घेऊन एका बाजूला उभे राहून मला जायला रस्ता देत होते मला मात्र खूप वाईट वाटलं पण आता मात्र काही इलाज नव्हता गाडी पार्क केल्यावर मी चालत जाऊन अगदी जवळ जवळ आल्यावर एका आजोबाला गरम पाण्याचे झरे कुठे?असे विचारले असता ते वैतागले कारण कुंड अगदी समोरच्याच झाडीत होते अन त्यांच्यामते आज दिवाळी असल्याने किमान दोन तीन हजार माणसे अंघोळ करून गेली असतील आणि मी मात्र अगदी जवळ येऊन विचारण्यापेक्षा दहा वीस पावलं पुढं गेलं की तिथेच  कुंड आहेत असो.
             तीन कुंड आहेत इथे आणि पाणी हे कढत अंघोळ करण्यासारखं आहे सुरवातीला थोडं गरम लागत पण नंतर आपले शरीर पाण्याशी समायोजन करते  इथल्या गरम पाण्यात अंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत सर्व प्रकारचे त्वचा रोग नाहीसे होतात कोणताही आजार नसला तरीही  इथल्या अंघोळीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला प्रवासाने  आलेला कंटाळा, आळस, शीण,थकवा अगदी क्षणात नाहीसा होतो अंघोळ नाही केली तरी गुडघाभर पाय पाण्यात बुडवून बसलो तरी सर्व शीण निघून जातो हा स्वानुभाव आहे
               त्या पाण्यातून बाहेरच यावे वाटत नाही अगदी दुपारची वेळ असल्याने तसेच मी एकटाच असल्याने  अंघोळ करण्यापेक्षा पाय भिजवावे अशा विचारात होतो आणि  थोडावेळ पाण्यात पाय बुडविल्यानंतर दोन तीन तरुण अंघोळीला आले होते मग मीपण त्यांच्या सोबत पाण्यात उतरलो त्यावेळी काय वाटत होते हे वर्णन करणे केवळ अशक्य शब्दातीत आहे तीन दिवसाचा ताण आळस क्षणात पळून गेला होता आणि माझे शरीर व मन एकदम ताजेतवाने झाले होते त्याचबरोबर अतिशय हलके हलके  वाटत होते 
             कितीवेळ त्या गरम पाण्यात गेला याकडे लक्षच नव्हते पण  अर्धा तास झाला असेल तेंव्हा तिथे एक मुस्लिम समाजातील कुटुंब आल्याने आम्ही आवरते घेतले कारण बहुतेक त्यांनाही तिथे अंघोळ करायची होती  कुंडाशेजारीच एक दर्गा आहे त्यामुळे तिथे गर्दी असते मात्र गर्दीच्या प्रमाणात तिथे सोयीसुविधा मात्र काहीच नाहीत 
                  उन्हाळे, वज्रेश्वरी इथल्या गरम पाण्याच्या कुंडाला मी भेट दिलेली आहे मात्र इथल्यासारखे या कुंडावर स्त्री-पुरुषांना वेगळी सोय नाही अंघोळीची पण अन कपडे बदलायची पण. त्यामुळे सर्वांचीच कुचंबणा होते अंघोळीचा आनंद घेता येत नाही  मुंबई-गोवा हायवे वर असणाऱ्या अरवली इथल्या कुंडातील पाणीतर खूप गरम आहे 
                 या ठिकाणी या सोयी केल्या तर पर्यटकांचा ओघ खूप वाढू शकतो एका कुंडात अंघोळ करायचे साबण लावायला बंदी आहे कारण पाणी खराब होते तेच पाणी दुसऱ्या बाजूला असलेल्या एका कुंडात जाते त्या व तिसऱ्या कुंडात या कुंडात कपडेही धुतले जातात त्या ऐवजी स्त्री पुरुषांना अंघोळीची व कपडे बदलण्याची वेगळी सोय केली तर खूप बरे होईल पर्यटक इथे येऊन इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल व पर्यटकांचीही सोय होईल 
                मी पटकन  कपडे बदलून टाकले आता शरीर अगदी हलकं हलकं झालं होतं आणि मनही!!  तेथील एका ठिकाणी जाऊन शहाळे घेऊन पाणी प्यायलो अन खोबरे खाल्ले  मला शहळ्यातील ओल्या अन लुसलुशीत खोबऱ्याची (मलई) भारी आवड आहे आणि मी कोकणात आलो की नेहमी एक म्हण आठवते 'कोकणात नारळ फुकट' आमच्या परिसरात वापरात असलेली ही एक म्हण अर्थ असा असावा कि जेथे खूप पिकते तेथे विकताना खूप स्वस्ताई असते मात्र शहाळ्याच्या बाबतीत मात्र असे कधीच जाणवले नाही कोंकणात जो भाव तोच भाव देशावरही असतो असो  मी मात्र परत गाडीकडे निघालो मनातला सारा ताण अन शीण कुठल्या कुठे पळून गेला होता पण मला आता  कडाडून भूक लागली होती दुपारचे दोन वाजले असतील 
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

भाग बारा

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस तिसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग तेरा*🌿🌿
             आज एक जीवाचा जिवलग मित्र मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता त्याच मस्तीत मी गाडीवर बसून मी मुख्य रस्त्यावर आलो होतो एक सांगायचे राहिलेच दापोलीहून येताना 7 किमी अंतरावर आसुद 0किमी हि पाटी पहिली आणि काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होतो पण काही आठवत नव्हते आणि थोड्या वेळाने आठवले कि "केशवराज मंदिर" मिलिंद गुणाजी यांच्या 'गूढ-रम्य महाराष्ट्र' या पुस्तकात या ठिकाणचे खूप रमणीय वर्णन वाचण्यात आले होते आणि ते ठिकाण आता अनपेक्षितपणे माझ्या जवळ आले होते म्हणून मला अत्यंत आनंद झाला होता आसुद गावापासून 1किमी आत गेले की दाबकेवाडी पासून मंदिरात जाता येतं
                    पुस्तकात वाचले होते की 200 सरळ पायऱ्या , करवंदाच्या जाळ्या  , नारळी पोफळीच्या बागा यातून मार्ग आहे आणि तो एक सुंदर अनुभव आहे मी चौकशी करून घेतली व त्यामुळे मला माहित झालं होतं कि मला त्या मंदिरातून पायी जाऊन येण्यासाठी किमान एक तास लागणार होता पण मला मात्र वेळ वाया घालवून चालणार नव्हतं दहा सव्वा दहा वाजले होते अन मला 80 किमी महाड अन तेथून 28 किमी रायगड असा प्रवास करायचा होता आजचा मुक्काम रायगडी करायचा होता अन जेवणालाही वेळ जाणार होता पण मी ठरवले की जेवायचं काय जेवता येईल केंव्हाही?  निसर्गाची ओढ असल्याने मी मंदिराकडे निघालो होतो आणि त्या वेळी दाबकेवाडीत मी मंदिराकडे जाण्याचा रस्ता विचारला तेंव्हा गावातील लोकांनी सांगितले की पायऱ्यांचा मार्ग पुढे असून फक्त छोटया  दुचाकी गाड्यासाठी एक रस्ता तयार केला असून तो मारुती मंदिरापासून जातो एक दीड किमी अंतर गाडीवर जाण्यासाठी 15- 20 मिनिटे लागतात अतिशय अवघड आहे तो रस्ता  पुस्तकात वाचल्याप्रमाणे केशवराज मंदिरात जाण्यासाठी नदीचे पात्र ओलांडून पायऱ्या चढून वर जावे लागते ते खरेही होते कारण पुस्तक लिहिले त्यावेळी पूल नव्हताच  पण सध्या मात्र नदीवर पूल बांधला असून मोटारसायकलीसाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे लहान वाहनांसाठी ,मी गाडीवर जायचे ठरवले आणि मारुती मंदिरापासून आत वळलो आणि पोटात गोळा आला अतितीव्र उतार होता व वळणही होते आणि तेथून गाडी घेऊन जाण्याचे धाडस झाले नाही कारण रस्त्याचा पुढचा भाग इथून दिसतच नव्हता म्हणून भीतीपोटी मी गाडी थांबवली अन शेजारच्या घरी जाऊन रस्त्याची चौकशी केली कि केशवराज मंदिराकडे जाणारा मार्ग हाच आहे का? खात्री पटल्यावर मी स्वतः त्या उतारावर जाऊन खात्री केली की जाता येईल का? परंतु त्या रस्त्याने जाता येईल की नाही अशी शंका मनात आली पण मनाचा हिय्या केला आणि पहिल्या गियरमध्ये गाडी चालू करून उतार उतरू लागलो लगेच एक अवघड वळणही आले ते पार करून पुढे आलो आणि मग त्यापुढे नदीवरील छोटा पूल ओलांडला कि  फक्त अतितीव्र चढण असलेला घाट होता तोही अगदी कच्चा फक्त डोंगराच्या कुशीतून जाणारा  अन त्या रस्त्याने मी एकटाच जात होतो गर्द वनराई खूप छान वाटत होती उंचच उंच माडाची सुपारीची झाडं तसेच इतर अनोळखी झाडं खूप उंच सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नव्हतीच दाट झाडीतून जाणारा मार्ग तोही अगदी निमुळता निसर्गसौंदर्य ओतप्रोत भरलेले होतं  पण मला गाडी चालवत असताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी काळजी घेत होतो कच्चा रस्ता फक्त मोटारसायकल जाण्यापूरता आहे कसरत करत त्या रस्त्याने मंदिराच्या परिसरात पोहोचलो गाडी पार्क करून मी थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर समोरच एक मोठा आवार दिसला आणि सभोवार आकाशाला गवसणी घालणारी नारळी पोफळीची झाडे त्यामुळे खाली सावलीच होती
            मंदिर परिसर स्वच्छ आणि शांत व रमणीय आहे थकवा जाणवत नाही थोडाही मंदिराच्या परिसरात मंदिराच्या आवारात बसायला जागा आहे निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छतेने नटलेला परिसर खूप आल्हाददायक आहे मोठ्या गेटमधून आत गेल्यावर उजव्याबाजूला आतमध्ये खूप उंचावरून येणारे पाणी गोमुखातून आत येते त्याचा उपयोग मंदिरात प्रवेश करण्याअगोदर हातपाय धुण्यासाठी केला जातो एवढ्या उंचीवर असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोमुखातून पाणी येताना पहिले कि निसर्गाच्या अद्भुत चमत्काराची जाणीव होते त्या खळाळत वाहणाऱ्या थंडगार आणि स्वच्छ पाण्यात हात पाय धुवून मी मंदिरात प्रवेश केला. मंदिर अतिशय साधे आहे मंदिराचे बांधकाम लाकडी असून पत्र्याचे व लाकडाचे छत आहे मंदिराच्या गाभाऱ्यात सोवळे नेसूनच प्रवेश केला जातो सोवळे नसल्यास गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही आणि मला सोवळे नेसता येत नाही आता काय करायचे मग पुजाऱ्याने एक मार्ग सांगितला मी कमरेच्या वरची सर्व कपडे काढून गाभाऱ्यात प्रवेश केला व दर्शन घेतले केशवराज  हा भगवान विष्णूचा अवतार असल्याने हातात गदा शंख पुष्प  आदी आयुधे असलेली मूर्ती खूपच सुंदर आहे गाभाऱ्यातून बाहेर येऊन पुजाऱ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली मला करवंदाची जाळी ओळखता येत नव्हती त्याबद्दल पुजार्यांना विचारले असता त्यांनी सांगितले करवंदे आता नसतात मग मी मिलिंद गुणाजी या अभिनेत्याचा संदर्भ दिला असता पुजारी म्हणाले की मिलिंद गुणाजी 7-8 वर्षांपूर्वी आले होते व शुटींग काढून गेले त्याच बरोबर असे सांगितले कि हे मंदिर दीक्षित,पाठक, असे आडनाव असलेल्या  ब्राह्मनांचे कुलदैवत आहे गाडीच्या कच्च्या गाडीच्या रस्त्याची माहिती त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात नाही असे सांगितल्यावर गाडीचा रस्ता आता तयार केला असल्याने त्यांच्या पुस्तकात माहिती नसावी असे सांगितले  व तो अवघड असल्याने आम्ही नवीन माणसाला या मार्गाची माहिती सांगत नाही असे म्हटले 
             परंतु पायऱ्या चढून वर येण्याची मजा काही औरच असते पायऱ्या  चढून येताना वाटेत अनेक ठिकाणी करवंदाच्या जाळ्या लागतात त्या जाळीतून करवंद काढून खाण्याची मजा काही औरच असते असे मी ऐकले होते मात्र मला अनुभवता आले नाही कारण त्यावेळी करवंद तसेच इतर कोकणी मेव्याचा हंगाम नव्हता गोमुखातून येणाऱ्या पाण्याने तोंड धुऊन पाणी पिलो अगदी मिनरल वॉटर सारखे होते त्यामुळे सोबतची बाटली भरली एक सांगायचे झाल्यास कोकणात प्रवास करताना बऱ्याचदा पाण्याची बाटली विकत घेण्याची आवश्यकता भासत नाही मी पुजाऱ्यांचा निरोप घेतला अन परत निघालो होतो पण पाय निघत नव्हता परिसर अत्यंत रमणीय आहे पण वेळ कमी असल्याने मी परत एकदा नमस्कार करून परत निघालो अनेक सुपारीच्या झाडाला सुपाऱ्या लागलेल्या होत्या हिरव्या रंगांच्या, गाडीवर आल्याने बराच वेळ वाचला होता मात्र पायी चालत पायऱ्या चढून वर येण्याचा अनुभव घेण्यास मी मुकलो होतो आता रस्ता माहित झाल्याने थोडे रिलॅक्स होऊन गाडी चालवत होतो पण सभोवताली  असणारा निसर्ग पाहण्याचीही उसंत नव्हती सगळे लक्ष अगदी समोर एक क्षणभरही लक्ष विचलित होत नव्हते 10-12मिनिटात गावात आलो या रस्त्याने डबलशिट गाडी चालवणे खूप कठीण आहे मला तर वाटते अशक्यच आहे सर्वांना परत एकदा सांगावेसे वाटते की हा रस्ता फक्त दुचाकी वाहनासाठीच आहे तीन-चार चाकी वाहन खालीच लावून पायऱ्याने वर येणेच योग्य आहे मी मात्र  परत एकदा मागे वळून पाहिलं आणि ठरवलं की परत यायचेच या ठिकाणी कारण हा परिसर काय तास अर्धा तास घालवण्याचा आहे?  नाहीच, दिवस अर्धा दिवस एक एका ठिकाणी घालवणे खूप आनंददायी असेल गर्द झाडीत असणारे नारळ अन पोफळीच्या उंचच उंच झाडांच्या गर्दीत असणारे हे  केशवराज मंदिर मला खूप आवडले होते आता परत निघालो होतो मी दापोली-पालगड-लाटवण-महाड या मार्गाने अकरा वाजले असतील
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

मंगळवार, १० जानेवारी, २०१७

भाग बारा

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस तिसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग बारा*🌿🌿
                "श्यामची आई " हे मातृप्रेमाचे महंन्मंगल स्तोत्र ज्या सानेगुरुजींनी लिहिले ते वाचत असताना अनेक वेळा डोळ्यातून अश्रू अनावर झाले आपोआप डोळ्याला धारा लागल्या सानेगुरुजींनी सुरवातीलाच लिहिले आहे की ही कथा ऐकून वाचून वाचकाच्या डोळ्यात अश्रू नाही आले तर लेखनच व्यर्थ, मला तर वाटते की श्यामची आई वाचून एकदाही डोळ्यात अश्रू येणार नाही असा माणूसच सापडणार नाही हे नक्कीच !
              अश्या महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पालागडचे दर्शन हीच मुळी आनंदाची गोष्ट आहे एक किमीचा अतिशय खराब रस्ता पार करून आम्ही सानेगुरुजींच्या घरासमोर आलो जेथे श्यामची आई मधला शाम जन्मला,वाढला, खेळला ते घर आता स्मारक घोषित करण्यात आले आहे आणि त्या स्मारकाच्या बाहेर चपला काढून प्रवेश केला मी माझ्या सोबत असणाऱ्या मुलाला विचारले कधी आला होता इथे? तर तो म्हणाला की खूप दिवस झाले, मला वाईट वाटले परंतु मनातल्या मनात म्हटले आपण बार्शीत राहून तरी कधी जातो भगवंत मंदिरात? 
           अशा पावन पवित्र ठिकाणी फोटो काढण्याची ईच्छा अनावर झाली मी माझ्या सोबत असणाऱ्या मुलाला माझा फोटो काढण्याची विनंती केली अन  त्याने माझे फोटो काढले नंतर दोघांनी मिळून घरात असणाऱ्या सर्व खोल्यांची माहिती घेतली  तेथे गुरुजींच्याजीवनातील प्रसंगांच्या  वेगवेगळ्या प्रतिमा अन वेगवेगळी पेपरची कात्रणे अशी ठेवलेली आहेत महत्त्वाच्या घटनांच्या  नोंदी याठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत सानेगुरुजींच्या जीवनातील अनेक प्रसंगाची कात्रणे येथे आपल्याला त्यांच्या महानतेची जाणीव करून देतात  अशा परम पवित्र जागी आल्याचा खूप आनंद झाला होता घराशेजारीच सानेगुरुजींनी काढलेली शाळाही दिसली परत एकदा त्या पवित्र वास्तूला वंदन करून परत निघालो पण त्या वेळी श्यामची आई या पुस्तकातील अनेक गोष्टी डोळ्यासमोरून जात होत्या अन त्या काळात गेल्याची अनुभूती होत होती त्या दिवशी मी माझ्या मनात विचार करत होतो की खरोखरच आज आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच असा  सुंदर योगायोग आलेला आहे 
                  पालगड ते दापोली अंतर साधारणपणे 30 किमी आहे या मार्गावरून प्रवास करत असताना सानेगुरुजींच्या जीवनातील अनेक प्रसंग आठवत होते रस्ता खराब असला तरी जंगल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे झाडी दाट आहे मध्येच अनेक ठिकाणी दूर दूर पर्यंत हिरवी झाडेच दिसत असताना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्याकाही  ठिकाणी दोनचार फोटो काढले नऊ वाजत आले होते आणि मी दापोलीत आलो की मुरुडला जाण्याचा मार्ग सोबतच्या मित्राला विचारला आणखी माहिती घेतली आणि निरोपाचे विडे दिले -घेतले दापोलीपासून सहा किमीवर लाडघर तामतीर्थ असून 7 किमी अंतरावर आसूद हे गाव आहे निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे गाव  याची माहिती मी पुढे सांगेनच दापोलिहून 12 किमी वर मुरुडचा अतिशय सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा आहे गावात दुर्गा देवीचे देखणे मंदिर आहे त्यापुढेच 4 किमीवर हर्णे बंदर आहे त्या ठिकाणी दररोज दुपारी चार पाच वाजता मासळीचे लिलाव होत असतात खूप मोठी उलाढाल असते अगदी 5-6कोटीपर्यंत त्यापुढेच आंजर्ले येथे कड्यावरचा गणपती मंदिर आहे आजच्या प्रवासात मला काहीच नियोजन करता आहे नाही कारण म्हणजे सर्व अचानक पहायचे ठरले तोही फक्त मुरुडचा किनारा पण वाटेत पालगड, आसुद, लाडघर, असे असेल हे  माहीतच नव्हते  
        सव्वा नऊ वाजता मुरुडला पोहोचलो या परिसराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरात अनेक ठिकाणी घरोघरी जेवणाची सोय व मुक्कामाची सोय केलेली आहे या गावातील अनेक लोकांनी आपल्या घरी निवासाची सोय केलेली असते त्यामुळे आपल्याला या गावात अस्सल कोकणी गावात कोकणी माणसांचा पाहुणचार घेता येतो कोकणातील माणूस हा प्रेमळ मायाळू आणि प्रचंड प्रमाणात स्वच्छताप्रिय आहे मग ते हॉटेल असो की घर , अशाच एका घरवजा हॉटेलात चहाला थांबलो  घरची सर्व मंडळी यात गुंतलेली असतात त्या हॉटेलात नव्हे घरात मिळालेला चहा खूपच छान होता  एकदम मस्त अमृततुल्य चव जिभेवर रेंगाळत राहणारी! पण दिवाळीचा सण असल्याने इतक्या लवकर नाश्ता मिळाला नाही माझा आवडीचा कोकणी नाश्ता म्हणजे कांदेपोहे आणि त्यावर किसून टाकलेले खोबरे पण सुके नाहीतर ओल्या नारळाचे पण सणाचा दिवस 
अन सकाळची वेळ असल्याने माझी हि ईच्छा अपूर्णच राहिली 
             गावातून दोन अडीच किमी अंतर कच्च्या रस्त्याचे पार करून किनाऱ्यावर पोहोचलो अथांग सागर पाहताना डोळे भरून आले होते आणि त्याच्या लाटांचा आवाज म्हणजे जीवाचा जिवलग मित्र भेटल्यावर जणू तो मला पाहून आपला आनंद व्यक्त करीत आहे असे मला वाटत होतं समुद्रावर बऱ्यापैकी गर्दी होती अन अनेक किनारे मी पाहिले पण या ठिकाणी असणारे एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आले होते ते म्हणजे आपण या ठिकाणी अगदी पाण्यापर्यंत आपले वाहन चालवत घेऊन जाऊ शकतो अनेक ठिकाणी असे असेलही पण मी मात्र पहिल्यांदाच पाहत होतो त्यामुळे मला खूप आनंद झाला होता.मोटारसायकलवरून समुद्रकिनाऱ्यावर ड्राईव्ह करणे हे अतिशय आनंद देणारे आहे मी पहिल्यांदासागरकिनारी  खूप लांबपर्यंत ड्राईव्ह केले मोटासायकलवरच किनाऱ्यावर अनेक ठिकाणी अनेक प्रकारची वॉटर स्पोर्ट्स ची सोय आहे पण महागडीच तसेच किनाऱ्यावर अनेक हॉटेल्स आहेत अगदी साधारण पासून ते पंचतारांकित मी एका हॉटेलात गेलो त्याठिकाणी वेगवेगळे झोपाळे,झुले, बाकडे होते खूप जास्त प्रमाणात आणि याठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये आहेत प्रत्येकाला आपापली स्पेस मिळावी यासाठी म्हणून अगदी दूरदूर प्रत्येक नारळाच्या झाडाला बांधलेले झुले पाहून मला माझ्या एकटेपणाची जाणीव झाली होती तीही प्रकर्षाने ,सुरूंच्या बागेत झाडाला बांधलेल्या झुल्यावर कानात हेडफोन घालून गाणी ऐकत झुलण्यासारखा आनंद नाही नाहीतर सुरूंच्या बनात सागराकडे तोंड करून असलेल्या बाकावर बसून सागरात मावळणारा सूर्य पाहत चहाची लज्जत घेणे अशीही सोय असणारी  खूप हाँटेल्स इथं आहेत पण थोडी महागच बरं का, 
                 एका हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करायला गेलो किनाऱ्यावरच होते म्हणून पण उपिट (उपमा) शिवाय काही तयार नव्हते म्हणून तोच घेतला अन चहाचा कप हातात घेऊन एका झोपाळ्यावर बसून एकेक घोट घेत समुद्राकडे पाहत होतो सागराचा आवाज ऐकू येत होता त्यामुळे खूप छान वाटत होतं जणू माझ्या जिवलग मित्राला माझ्याकडे पाहून उचंबळून येत आहे अशा  त्या रोम्यांटिक प्रसंगातून बाहेर यायलाच नको वाटत होते पण आता मात्र माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मनात पक्के केले की हे  आनंदच लेणं लुटायला वेळ काढून परत एकदा यायलाच हवे  चहाचा कप संपवून मी परत किनाऱ्यावर आलो होतो आलेल्यापैकी एकाला फोटो काढायची विनंती केली अन दोनचार फोटो काढून गाडीवर बसून एक चक्कर मारली किनाऱ्यावर अगदी सिनेमातल्याप्रमाणे पाण्यातून  गाडी चालवत असताना खूप मजा येत होती गाडी लावून पाय पाण्यात भिजवून शांतपणे सागराकडे पाहत उभा राहून क्षितिजकडे पाहून मन थक्क व्हायला लागले होते व वेळ कमी असल्याने मी सागराकडे एक कटाक्ष टाकला आणि त्या जिवलग मित्राला येतो असे सांगून मागे वळून पाहताना आपला मित्रही आपल्याला हसून निरोप देण्यासाठी अगणित लाटांचे हात हलवत बाय म्हणत होता असे वाटले.
                           एक मात्र नक्की कि आज मला सागराच्या रूपाने एक जिवलग मित्र मिळाला होता आणि माझ्या जिवलग मित्रांची यादी आज एकने वाढली होती
                    कच्च्यारस्त्याने गावात आलो की मुख्य रस्त्याला वळताना डाव्या बाजूला दुर्गादेवीचे अतिशय सुंदर आणि देखणे मंदिर आहे दुर्गादेवीची मूर्ती पाहून अन दर्शन घेऊन मंदिराची रचना कशी झाली आहे आणि त्या मंदिराची माहिती व इतिहास पुजारी बाबांकडून ऐकला आणि परत निघालो आलेल्याच मार्गाने, पण मनातून मात्र सागराच्या लाटांचा घुमणारा आवाज मात्र साथ सोडायला तयारच नव्हता उंचच उंच माडांच्या झाडातून जाताना मन अगदी कातर झालं होतं
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


सोमवार, ९ जानेवारी, २०१७

भाग अकरा

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस तिसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग अकरा*🌿🌿
              रात्री उशिरापर्यंत जागूनही सकाळी लवकर जाग आली होती पाच वाजता, सर्व नित्यकर्म उरकून बॅग आवरून गाडीला पॅक करून होईपर्यंत सहा वाजले होते अजून अंधारलेलेच होते पण तांबडे फुटत होते आणखी एकदा मार्गाची खात्री करून घेतली व पुढे निघालो गुगल मॅपवर gps on केले होते
     सर्वांना या निमित्ताने माझा सल्ला आहे की जेंव्हा आपण अनोळखी भागात प्रवास करतो तेंव्हा एखाद्या विशिष्ट मार्गाची माहिती एकट्या माणसाला विचारून न थांबता दोघातिघांकडून खात्री करावी म्हणजे जरी एखाद्याने फसवायचे ठरवले तरी आपण फसू नये असो....
      मी बरोबर सहा वाजता निघालो रस्ता पूर्णपणे अनोळखी होता सहा वाजून गेले तरी अंधार खूप होता आणि धुकेही इतके दाट होते की 100-200 फुटापेक्षा जास्त पुढचे दिसत नव्हते पण एका मित्राच्या सांगण्यावरून मी google map वर रूट सेट केला होता याची माहिती थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण जर google map वर स्टार्ट ड्रायविंग असे सेट केल्यास आपण त्या मार्गावर जसजसे पुढे जातो तसतसे आपल्याला ऑडिओ गाईड केले जाते जसे की पुढे जर आपल्याला वळायचे असेल तर 300-400 मीटर आगोदरच सूचना देण्यात येते व प्रत्यक्ष वळण आल्यावरही लगेच सूचना दिली जाते असो,
        रस्ता अनोळखी होता आणि तुम्हाला सांगावेसे वाटते की कोकणात सात आठ वाजेपर्यंत धुके खूप मोठ्याप्रमाणात असते त्यामुळे आपण रस्ता चांगला असला तरी वेगाने वाहन चालवू शकत नाही आणि रस्ताही बरा होता दादली पुलावरून गाडी घेऊन मी जात होतो मैलाच्या दगडावरून परत एकदा  रस्ता बरोबर असल्याची खात्री करून घेतली आणि जर्किन हातमोजे हेल्मेट अश्या साधनांचा वापर करून मी थंडीपासून बचाव करत होतो त्यामुळे थंडीचा त्रास होत नव्हता या चार दिवसात मी माझ्या मोबाईल मधील सर्व गाणी ऐकत होतो 
      सकाळची वेळ असताना अनुप जलोटा किशोरी आमोणकर पं भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिगग्ज गायकांची भक्तिगीतं, विठ्ठल गणपती, साई बाबा देवीची गीतं ऐकत प्रवास करणं यासारखा आनंद नाही असे मला वाटतं दाट धुक्यातून मार्ग काढत मी प्रवास करत होतो ती वेळ तो प्रसंग अन तो प्रवास यासारखा आनंद नव्हताच मुळी,
            गाडीचा वेग कमी होता दाट धुक्यांमुळे जास्त दूरवरचे दिसत नव्हते त्यामुळे वेग वाढवू शकत नव्हतो सावकाश गाडी चालवत मी जात होतो आणि सोबतीला भक्तिगीतं, वाहतूक नव्हतीच अगदी एकही वाहन चालवताना कोणी दिसत नव्हते साधारण सोळा किमी अंतरावरून उजवीकडे वळलो गावाचे नाव मात्र लक्षात नाही आणि थोडे अंतर जाताच एका गावातून भजनाचा आवाज येत होता दिवाळीचा सण साजरा करण्यात येणार असल्याने त्या दिवशी पहाटे गाव जागा झाला होता व गावातील बरेच लोक मंदिरात जमले होते आरती सुरु होती विठ्ठलाची रस्त्यालगतच मंदिर असल्याने लगेच मंदिरात प्रवेश केला तर या ठिकाणी भरपूर माणसं होती आरती समाप्ती होईपर्यंत थांबलो  तेंव्हा मन अतिशय प्रसन्न आणि शांत झाले होते अतिशय तरल अवस्था मनाची झाली होती आणि मग अशा मानसिक स्थितीत असतानाच मी माझ्या गाडीला किक मारली आणि पुढे निघालो अजून उजाडले नव्हते दाट धुक्याची चादर पांघरलेला गुळगुळीत रस्ता  अन तोही वळणावळणाचा गाडी चालवत असताना खूप आनंद होत होता पुढे गेल्यावर समोरच एक चौक लागला तेथे एक भैया उभा होता up मधला, मॅप असूनही मी त्याला रस्ता विचारला व तो कोठे जाणार आहे हे विचारून त्यालाही सोबत घेऊन आलो म्हणजे तो आहे तोपर्यंत रस्ता चुकणारच नाही तो लाटवन या गावापर्यंत होता तेथून रस्ता एकेरी व खराब होता घाट चढत असताना एका ठिकाणी पूर्वेला पहिले तर सूर्य डोंगराच्या वर येत होता ते विलोभनीय  दृश्य पाहून गाडी थांबवण्याचा व सूर्योदय पाहण्याचा मोह आवरू शकलो नाही डोंगराच्या आडून वर येणारा सूर्य पाहून मन आनंदी झाले  व तो सुवर्णक्षण मोबाईलमध्ये टिपून पुढे निघालो सोबतच्या माणसाला उतरवून लगेच दुसऱ्या माणसाला सोबत घेऊन जात असताना त्यांनी सांगितले की ते जवळच असलेल्या एका छोट्या गावात उतरणार आहेत त्याही माणसाला उतरविले व थोडे पुढे गेल्यावर एक गोष्ट लक्षात आली की मॅप मधील बाई सांगत असणारा रस्ता दूरचा होता 40 किमी अंतरावर असताना एका ठिकाणी एक महाविद्यालयीन वय असणारा तरुण दिसला त्याने लिफ्ट मागितली  मी त्याला विचारले की तो दापोलीपर्यंत येणार आहे काय?त्याने होकार दिला मग मी त्याला सोबत घेऊन जायला तयार झालो कारण पुढच्या स्टॉपवर उतरणार असेल तर ती चढउतार करणे मला आवडले नसते आणि आम्ही पुढे चाललो तर वाटेत एक ठिकाणी पाटी दिसली 'सानेगुरुजी स्मारक कडे ' आणि 'आंधळा मागतो एक ……' अशी माझी स्थिती झाली
          मी माझ्या सोबत असणाऱ्या मित्राला विचारले असता सोबतचा तरुण म्हणाला दापोली पुढे आहे मी विचारले  आणि पालगड? फक्त 1 किमी!  हर्षवायू व्हायचाच बाकी राहिला होता हेच ते गाव खूप वाचले होते ऐकले होते कितीतरी रात्री जागवल्या होत्या अश्रूंच्या धारांनी सिंचन केले होते कोकणातील एक पवित्र पावन तीर्थ, नक्की कुठे? हे माहीतच नव्हते आणि आज अचानक  माझ्या समोर आले होते अनपेक्षितपणे, अवचितपणे आजचा दिवस खरंच खूप भाग्याचा होता की मी या पवित्र ठिकाणी आलो होतो ध्यानीमनी नसताना  खूप खूप आनंद झाला होता तो शब्दांत मांडणे केवळ अशक्यच!!!! फक्त अनुभूतीचा आनंद होता तोही अवर्णनीय 

क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

रविवार, ८ जानेवारी, २०१७

भाग दहा

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग दहा*🌿🌿
 इतिहासाची पाने चाळता चाळता किती वेळ गेला आहे हे लक्षात आले नाही अचानक तंद्री भंगली आणि मी समोर पहिले तर संपूर्ण आकाशात लालिमा पसरला होता बुरुजावरून खाली पहायची छाती होत नव्हती इतकी खोल दरी होती 
    मी मागे फिरून किल्ल्यावर चढू लागलो दुतर्फा दुकाने, हॉटेल्स आहेत किल्ल्या वर भवानी मातेचे मंदिर आहे तुळजापूरची भवानी भोसले घराण्याचे कुलदैवत आहे शिवरायांना सतत तुळजापूरला जाणे शक्य नाही म्हणून भवानी मातेचे मंदिर इथे उभारले आहे आणि केदारेश्वराचेहि मंदिर आहे केदारेश्वर व भवानी मातेचे दर्शन घेतले आणि परत जायचे ठरवले कारण सहा वाजत आले होते आणि मला महाडपर्यंत जायचे होते अंतर आहे पोलादपूर 18 किमी महाड20 किमी.
प्रतापगडवर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत अश्वारूढ पुतळ्याजवळ सुंदर बागहि आहे पण मी मात्र परत निघालो होतो तेही परत लवकरच येण्याच्या हेतूने,
                         दहा पंधरा मिनिटात गड उतरलो गाडी सुरु केली अन निघालो वाटेत अफजलखानाच्या कबरीकडे जाणारा मार्गही दिसला आणि प्रवेश बंद असल्याचा फलकही गाडी न थांबवता मी निघालो 4किमी वरून पोलादपूरकडे जाणाऱ्या रस्त्याने मी गाडी चालवत होतो कसलीही घाई न करता रस्ता संपूर्ण घाटाचा आहे एकाबाजूला उंच डोंगर अन दुसऱ्याबाजूला खोल दरी अशा रस्त्याने मी चाललो होतो रस्ता अतिशय खराब आहे सात आठ किमी अंतर पार केले असता चार बुलेट सुसाट वेगाने पुढे निघून गेल्या मला वाटले फिरायला आलेले असावेत ग्रुपने मी त्यांना गाठून चौकशी केली असता कळले की ते गोव्याचे आहेत आणि ते महाबळेश्वरला आहे होते फिरायला अन आता ते परत गोव्याकडे निघाले होते त्यांनीही रस्त्याची तक्रारच केली त्यांना दूर जायचे होते आणि तेही रात्री उशिरापर्यंत त्यामुळे ते पुढे निघून गेले मी साडेसहा- पावणेसातच्या दरम्यान पोलादपूरला पोहोचलो आणि एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो त्या हॉटेलवर पोलादपूर येथे असणाऱ्या कवी परमानंद यांच्या स्मारकाची चौकशी केली पण काही त्यांना सांगता आले नाही त्यांनी शिवरायांवर शिवभारत हा ग्रंथ लिहिला आहे 
    मी महाडकडे प्रस्थान केले अर्धा तासाच्या आत महाडजवळ पोहोंचलो आणि एक फलक चमकला त्यावर लिहिले होते हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि  हाच तो सावित्री नदीवरचा पूल  जो वाहून गेला होता दोन तीन महिन्यांपूर्वी !!!
       अंधारात काही दिसत नव्हते त्यामुळे न थांबता पुढे गेलो एक दोन ठिकाणी चौकशी करावी म्हणून थांबलो तर तो एक वाहतूक पोलीस होता मनात म्हटले आता आली का पंचाईत त्यांनी मात्र गाडीचा नंबर पाहून बॅगवरील नाव पाहून कोण कुठून आलात कुठे चालला अशी चौकशी केली व मला मार्गदर्शन केले की हा रस्ता बायपास अन हा रस्ता गावात जातो त्यांचे आभार मानले व महाडमध्ये मुक्कामाची चौकशी करून एका लॉजवर मुक्काम केला तेंव्हा लक्षात आले की काही वर्षांपूर्वी याच लॉजवर मुक्काम ठोकला होता कोकणात देशापेक्षा स्वस्ताई आहे हे माहित असेलच 
       फ्रेश होऊन मुरुड( जंजिरा?  नव्हे दापोली ) येथे जाण्याचा मार्ग विचारून घेतला, महाडपासून जवळचा समुद्रकिनारा हाच आहे तोही सत्तर ऐंशी किमी अंतरावर, हे मात्र मी अचानक ठरवले मला वाटले की आलो आहोत इथे तर जसे मराठ्यांनी आपल्या घोड्याना अटकेचे (नदी) पाणी पाजले होते आणि अटकेपार झेंडे फडकावले होते तसे आपणही आपल्या गाडीचे चाक समुद्राच्या पाण्याने धुवावे कारण संपूर्ण प्रवासात गाडीइतकी साथ कुणीच दिली नाही विना अपघात विना त्रास  इतकी कि प्रवासात साधी हवाही चेक करायची गरज भासली नाही.
     जेवण झाल्यानंतर इंटरनेट सुरु केले व्हाट्स अँप पाहून लगेच निद्रादेवीच्या कुशीत शिरायचे ठरवले मात्र अकरा कसे वाजले हे कळलेही नाही अकरा वाजता मी निद्रादेवीच्या अधीन झालो 
प्रतापगडाची माहिती विकिपीडियावरून साभार
                      वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजीच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.

ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे.

केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्‍याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्‍याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत..

अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.
                 उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्‍या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते.

अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हा(?) बुरूज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो.


क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

शनिवार, ७ जानेवारी, २०१७

भाग नऊ

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग नऊ*🌿🌿
             काही महिन्यांपूर्वी महाडजवळ सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याने खुप मोठा अपघात घडला होता आणि तो पूल इंग्रजांच्या काळातील होता म्हणे पण आता मी एक पूल पाहणार होतो तो पूल म्हणजे थेट शिवरायांनी बांधलेला आहे आणि तोही साडे तीनशे वर्षांपूर्वी!!!
     मागील भागात आपण पाहिले की पार गावापासून जवळ असलेल्या व दुधगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी जवळ हा पूल असून तो अगदी सुस्थितीत आहे नदीचे नाव लक्षात नाही पण 3 -4 कमानी असलेला पूल पहिला कि मन थक्क व्हायला लागते व त्यांच्या पश्चात हि शिवरायांची आठवण आल्याशिवाय राहत नाही पार गावातून परत येताना 1 किमी वर डावीकडे  प्रतापगडाकडे जाणारा रस्ता आहे आणि न वळता पुढे गेल्यावर समोरच एक मोठा पूल दिसतो पुलाजवळ एक मंदिर आहे  खळखळ वाहणारे पाणी आणि निरव शांतता होती निसर्गसौंदर्याने नटलेला ह्या भागात आपल्याला खुप करमते 
                  पुलाचे बांधकाम अगदी किल्ल्याच्या भिंतीसारखे आहे मोठमोठे चिरे वापरून केलेले हे बांधकाम आपल्याला थक्क करते आजही त्या पुलावरून वाहतूक सुरु आहे हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. नदीत उतरून पुलाचे निरीक्षण केले असता खूप आश्चर्य वाटत होते अगदी किल्ल्याच्या बांधकामासारखे बांधकाम केलेले आहे, मी परत फिरलो, परत फिरताना मात्र आपल्या पूर्वजांच्या बांधकाम शैलीतील प्रगतीचाच विचार करत होतो सतत!!
      उजवीकडे वळून 4 किमीच्या  नयनरम्य घाटातून प्रवास करून मी मुख्य रस्त्याला लागलो पोलादपूरकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर समोर एक 4किमी चा रस्ता आहे त्या रस्त्याने आपण प्रतापगडकडे जातो 
        एक किमी गेल्यावर समोरच एक ठिकाणी  मोठी गर्दी आपल्याला दिसते आणि तेथे कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठाप्रमाणे 400 वर्षापूर्वीचे खेडेगाव साकार होत आहे सध्या काम सुरू असून त्याचे 40 रु इतके तिकीट आहे पण ते जास्त वाटते त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी असणारी गावाची प्रतिकृती तयार करण्यात येत आहे म्हणून काम पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी आपण मागच्या काळात गेल्याचा अनुभव आपल्याला येणारच हे नक्कीच आता मात्र काम जोरात चालू आहे 
             येथे एक हस्तकला केंद्र आहे  त्या हस्तकला केंद्रात  अनेक पाहण्यासारख्या गोष्टी आहेत तसेच त्याठिकाणीच हस्तकला प्रदर्शन व विक्री केंद्र आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला महाबळेश्वरमधील सर्व प्रकारच्या वस्तू विकत घेता येतील तेही तिथल्या पेक्षा स्वस्तच !!
              अनेक लाकडी वस्तू,(अगदी किचनमधीलही) तसेच  खेळणी, पेनस्टॅण्ड, कीचेन, मेकअपच्या वस्तू चामड्याच्या वस्तूही आपल्याला मिळतात काही खरेदी करून मी मनातल्या मनात विचार करत  प्रतापगडाकडे निघालो होतो आणि मी माझ्या मनात ठरवले होते की आज आपण अफजलखानाची समाधी पहायची आता माझे मन इतिहासात शिरायला लागले होते आणि मला आठवले कि मी प्रतापगडावर 15 वर्षांपूर्वी आलो होतो तेंव्हा खानाच्या समाधीकडे जाता येत होते आणि तेथील स्वच्छताही किल्ल्यापेक्षाही जास्त होती आणि हि गोष्ट मला खूप खटकली होती पण पुढे मात्र अनेक घटना घडल्या आणि आज या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही तेथे पोलिसांचा पहारा आहे तिकडे जायचा विचार बदलून मी गडाकडे निघालो गाडी घेऊन आपण अगदी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणी जाऊ शकतो तेथे गाडी पार्क करून आपण अगदी कमी वेळेत गडावर जाऊ शकतो गड पाहण्यासाठी दीड दोन तास लागतात साधारणपणे, आता पाच वाजले होते मी गडाच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला तर तेथे दोन्ही बाजूला फळे सरबत ताक पुस्तके विकणारी दुकाने  उपलब्ध आहेत समोर टेहळणी बुरुज आहे थोडासा दूरवर व उंचावर 20-25मोठ्या पायऱ्या चढून गेल्यावर समोर दिसत होते जावळीचे खोरे अन निबिड अन घनदाट अरण्य !
      एका क्षणात माझ्या डोळ्यासोरून चौथीच्या पुस्तकात कितीदा तरी  वाचलेला,शिकलेला ,शिकवलेला, कितीतरी पुस्तकात कथा, कादंबऱ्यात वाचलेला,  ऐकलेला 'अफजलखानाचा वध ' हा प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकून गेला आणि त्या प्रसंगातील पात्रे माझ्यासभोवती फेर धरून नाचू लागली 
बुरुजावर फडफडणाऱ्या जरीपटक्याला मुजरा करून मी मुलुख न्याहळत होतो नजर जाईल तेथपर्यंत जंगल अन डोंगर दऱ्या!  याच ठिकाणी अफजलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला होता अन संभाजी कावजीने त्याचे मुंडके कापून आणले होते 
    बुरुजावरून जावळीचे संपूर्ण खोरे दिसत होते आणि त्या खोऱ्यात अफजलखानासारखा सरदार महाराजांनी  खल्लास केला होता आणि त्याचे मुंडके राजगडावर मासाहेबांना दाखविण्यासाठी धाडले होते राजगडाच्या माचीवर त्याचे विधिवत दफन केले होते 
   मला वाचलेले आठवले " माँसाहेब खानाचे मुंडके पाहिल्यावर म्हणाल्या की हाच तो ज्याने स्वारीच्या पायात साखळदंड बांधले यानेच अनेक मंदिरांचा विध्वंस केला आणि शिवबाला मारायला आलेला तो हाच!" तरीही मासाहेबांनी त्याच्या मुंडीचे दफन करायला सांगितले कारण तो शत्रू असला तरी पराक्रमी सरदार होता आणि शत्रू मेला अन वैर संपले.
क्रमश:
 
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

भाग आठ

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग आठ*🌿🌿
 महाबळेश्वराचा अवघड वाट उतरून खाली येत असताना वाडा या गावाजवळ उजवीकडे 'श्री क्षेत्र काळभैरव मंदिर जावळीचे मोरे यांचे कुलदैवत ' अशी कमान दिसली तसे मी गाडी थांबवून मंदिर किती दूर आहे अशी विचारणा केली असता अगदी जवळ आहे असे समजले कारण इथे जाणे माझ्या नियोजनात नव्हते पण जावळीचे मोरे यांचे कुलदैवत म्हणू  वाट वाकडी केली  आणि मग मी त्या कमानीतून शिरलो सभोवताली उंचचउंच डोंगर दाट झाडीतून रस्ता जात होता आणि मनात विचारांचे काहूर उठले होते ' स्वराज्याच्या उरावर बसून आदिलशहाच्या जीवावर  स्वराज्याचा घोट घेऊ पाहणाऱ्या अनेक स्वकीय शत्रूंच्या यादीत असलेल्या जावळीच्या मोऱ्यांची अन त्यांच्या कर्तृत्वाची मलाच लाज वाटू लागली होती सकाळपासून असलेली मन:शांती संपली होती.मेंदूत अनेक विचारांचे मोहोळ उठले होते आदिलशाहाचे फर्मान आल्यावर मावळातल्या वतनावर पाणी सोडून स्वराज्याच्या यज्ञात सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्या कारीच्या कान्होजी जेधे यांच्यासारखी जाणती माणसं कुठं अन ही पिलावळ कुठं? असे अनेक विचार उसळी मारून येत होते' पाच मिनिटात मंदिर आले मंदिर एकदम शांत होते अन मंदिर परिसरहि अत्यंत स्वच्छ, शांत आणि  रमणीय आहे पण मन अस्थिर झाले होते याच मंदिरात संत तुकाराम महाराजांचे वंशज येथे आल्याचे समजले पण मन मात्र अस्थिरच, थांबूच वाटत नव्हते तिथे असाच एक अनुभव मला काही वर्षांपूर्वी आला होता श्री क्षेत्र गाणगापूर येथे एक क्षणही तिथे थांबावे वाटत नव्हते इतके मन बेचैन झाले होते असो,
         मंदिरातून परत फिरून रस्त्याला लागलो थोड्याच वेळात प्रतापगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला डावीकडे 'रामवरदायिनी माता मंदिर पार ' अशी मोठी कमान दिसली अन त्या कमानीतून पुढे गेल्यावर समोरचा संपूर्ण रस्ता हा घाटरस्ता होता पाच किमीचा एकेरी अवघड रस्ता वेडीवाकडी वळणे तीव्र अन अतितीव्र चढ उतार अन घनदाट जंगल अशा प्रकारच्या रस्त्याने गाडी चालवत जायचा अनुभव वेगळाच होता तापोळेला जाताना जो विरस झाला होता  त्याचा आनंद इथे मिळत होता असा रस्ता संपूच नये असे वाटत होते माझ्या प्रवासातील एक रमणीय प्रवास होता हा नक्कीच
              चार किमी अंतरावर रस्ता काटकोनात वळत होता दोन्हीकडे! 
      एकीकडे दुधगावकडे व दुसरीकडे पार या गावाकडे रस्ता जात होता 1किमी अंतरावर पार हे गाव आहे आणि रामवरदायिनी मातेचे मंदिर आहे मंदिर अतिशय सुंदर असून खूप प्रशस्त आहे शेजारीच महादेवाचेही मंदिर आहे तेही मोठे आहे सुंदर आहे मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला भुरळ पडली होती मंदिरात अभिषेक किंवा पूजा करायला येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची सोय आहे मंदिर परिसरात निरव शांतता पसरली होती त्यामुळे दर्शनाचा आनंद घेता आला 
      रामवरदायिनी मातेच्या मंदिराची रचना सुंदर केलेली आहे मंदिराच्या आवारात शिवरायांचा राज्याभिषेक असलेला पुतळा आहे एकंदर परिसर स्वच्छ व सुंदर तसेच शांत आहे आपण माझ्यासकट सर्वजण इथल्या परिसरात आलो म्हणजे महाबळेश्वर प्रतापगड  इत्यादी ठिकाणीच भेटी देतो पण वाटेतच असणाऱ्या अशा प्रकारच्या सुंदर व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत नाही आणि कारणही तसेच असते की एकतर आपल्याला अशा प्रकारच्या ठिकाणांची माहिती नसते किंवा वेळही नसतो मंदिर आणि मंदिराचा परिसर खूपच छान, सुंदर आणि रमणीय आहे.
    रामवरदायिनी मातेच्या मंदिराची आख्यायिका आहे ती अशी:- 
                 सीतेचे हरण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र सितामाईच्या शोधात या ठिकाणी आले असता त्यांची थट्टा करण्याचा विचार पार्वती मातेच्या मनात आला होता व ती सीतेचे रूप घेऊन प्रभू रामचंद्र यांच्या समोर आली होती व रामाला म्हणाली "माझा शोध थांबवा मी तुमच्या समोर आले आहे" पण रामाने त्यांचे खरे रूप जाणून घेतले होते त्यामुळे ते म्हणाले की "हे माते, माझी थट्टा करू नको तुला मी ओळखले आहे तू माझी  माता आहेस" या प्रसंगामुळे पार्वती आनंदित झाली अशीच आख्यायिका येरमाळा ता:- कळंब येथील येडेश्वरी (येडाई) देवीच्या संदर्भानेही आहे,
             पार्वती रामावर प्रसन्न होऊन गेली आणि त्या वेळी त्यांनी रामाला वर दिला की लवकरच सीता सापडेल व रामाला मिळेल म्हणून पार्वती याठिकाणी रामवरदायिनी माता म्हणून निवास करते आहे मंदिरातून बाहेर पडलो अन याच परिसरात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या एका मारुतीचे मंदिर या ठिकाणी असल्याचे समजले होते मारूतीच्या मंदिरासमोर आल्यावर कळले की समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या सर्व मारुतीच्या मंदिरांची प्रवेशद्वारे दक्षिणमुखी आहेत आणि त्या मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरमुखी होते व या ठिकाणी असे मंदिर नसल्याचे सांगितले आणि मग मी त्यांना या ठिकाणी असणाऱ्या शिवकालीन पुलाची माहिती विचारली अन लगेच मी 365 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पुलाकडे निघालो त्याची माहिती पुढच्या भागात पाहू !
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग सात*🌿🌿
     महाबळेश्वरच्या   मंदिरात व त्या परिसरात फिरून थोडी विश्रांती घेतली आणि मग महागडे असले तरी थोडी खरेदी करायचे ठरवले व लगेच दुकानात जाऊन खरेदी केली कारण महाग असले तरी काही वस्तू मात्र फक्त इथेच मिळतात जसे की जेली चॉकलेट  आता मी  पंचगंगा मंदिराकडे निघालो याठिकाणी कृष्णा, कोयना , वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्यांचा उगम झाला आहे हे आपणाला ज्ञात असेलच !अगदी काही पावलांच्या अंतरावर  हे मंदिर आहे काळ्या रंगाचे दगड वापरून  मंदिराचे बांधकाम केले आहे व गोमुखातून सतत वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आपल्याला सातत्य व गतीशीलतेचा संदेश देतो तसेच संपूर्ण महाराष्ट्रातला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना , कृष्णा या नद्यांचे इतके छोटे छोटे रूप पाहून निसर्गाच्या मोठेपणाची जाणीव होते याठिकाणी येण्याची हि माझी तिसरी वेळ परंतु मला मात्र नवीनच वाटत होते कारण मला काही आठवत नव्हते  मंदिरावर पत्रे असून बांधकाम मात्र दगडी आहे आणि गोमुखातून येणाऱ्या सन्ततधारेचे पाणी तर अप्रतिम आहे थंडगार आणि गोड इथे त्या पाण्यात  हात पाय धुण्यासाही सक्त  मनाई आहे अगदी गोमुखातून पडणाऱ्या पाण्यातही  थोडावेळ मंदिरात बसून मी मंदिराच्या आवारात आलो होतो दोन्ही बाजूंनी असणारी दुकाने पाहत न्याहळत मी परत गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी आलो  
                   महाबळेश्वर मंदिराच्या अलीकडेच थोड्याच अंतरावर सावित्री पॉईंट ऑर्थरशीट पॉईंट माझेरी पॉईंट एल्फिन्स्टन पॉईंट अशी माहिती असलेली पाटी पहिली होती ऑर्थरशीट पॉइंटलाच विंडो पॉईंट असे म्हणतात आणि तो महाबळेश्वर पासून सर्वात दूर असणारा हा पॉईंट आहे, अंतर आहे  14किमी या मार्गावर प्रथम एल्फिन्स्टन पॉईंट लागतो एल्फिन्स्टन पॉईंट व ऑर्थरशीट पॉइंट या दोन पॉईंट मध्येच माझेरी पॉईंट, सावित्री पॉईंट इको पॉईंट इ पॉईंट आहेत प्रत्येक पॉइंटवरून दिसणारे दृश्य पाहून मन आनंदी होते सावित्री पॉइंटवरून सावित्री नदीचे विशाल खोरे दिसते तसेच दरीमध्ये एका उंचवट्यावर असणाऱ्या तीन दगडांना गांधीजींची माकडे असे म्हणतात कारण त्या दगडांचा आकार माकडासारखा दिसतो म्हणून!!!
               मी गाडी सुरु करुन येथे असणाऱ्या पाटीजवळ आलो आणि सावित्री पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे जात होतो वाटेत माझेरी पॉईंट लागला त्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि त्या ठिकाणी दूरवर असणारे डोंगर दऱ्या पाहताना खूप आनंद झाला होता अगदी चित्रातल्याप्रमाणे दिसणारे दृश्य पाहून मन प्रसन्न होऊन गेले होते व त्या वेळी मी एक गोष्ट अनुभवली कि माणूस कितीही तंत्रज्ञान वापरत असला तरी निसर्गापुढे तो खूप लहान आहे  येथून पुढे गेल्यावर समोरच होता सावित्री पॉईंट
             सावित्री पॉईंट जवळ आत्ता पायऱ्यांचे बांधकाम केले आहे आणि त्यामुळे तेथे जाणे सोयीचे होते सावित्री पॉइंटच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की या ठिकाणी सावित्री नदीच्या संपूर्ण खोऱ्याचे दर्शन इथून घडते उंचउंच डोंगररांगा सह्याद्रीच्या आणि खोल खोल दऱ्या जीव घाबरवून टाकणाऱ्या हवेतला गारवा आणि समोरचे हे मन प्रसन्न करणारे दृश्य पाहून इथून पायच निघत नाही मावळतीकडे कळलेला सूर्य आणि सावित्रीचे पाणी पाहून मन उल्हासित झाल्याशिवाय राहत नाही  
सावित्री पॉईंट जवळच इको पॉईंट आहे याठिकाणाहून आपलाच प्रतिध्वनी ऐकू येतो याठिकाणी मी असताना शहरातील एक मुलगा आपल्या मम्मीला जोक सांगत होता तो असा : एक जोडपे या ठिकाणी येते व प्रियकर त्याचे नाव उमेश असते तो प्रेयसीचे नाव (अंजली)घेऊन जोरात ओरडतो  व तोच आवाज त्याला परत परत ऐकू येतो 5-6-7-8 वेळा त्याला कौतुक वाटते व मजाही वाटते तो आपल्या प्रेयसीला स्वतःच्या नावे ओरडायला सांगतो ती उमेश$$$$$ असे ओरडते पण प्रतिध्वनी मात्र सुरेश,गणेश, परेश, निलेश, शैलेश असा 5-6-7-8वेळा ऐकू येतो (हशा) मलाही हसू आवरले नाही सावित्री नदीच्या पात्रात दूरवर पाहत माझ्याही ओठावर हसू उमटले असो,  या पॉइंटवर  रस्तेही चांगले आहेत आणि पॉइंटपर्यंत जायला पक्क्या पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत आणि रेलिंगही बसविण्यात आले आहेत सावित्री पॉईंट ऑर्थरशीट पॉईंट माझेरी पॉईंट एल्फिन्स्टन पॉईंट या ठिकाणाहून आपल्याला प्रतापगडाचे दर्शनही होते दुर्बिनवाले आपल्याला 10 रुपयांत प्रतापगडावरील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा दाखवतात माकडेही मोठ्या प्रमाणात आहेत आणि ती माणसाळलेली देखील आहेत गाडी सावित्री पॉइंटवर लावून चालत चालत मी विंडो पॉईंट वर आलो  थोड्या शेंगा विकत घेऊन माकडांना खायला दिल्या आणि खिडकीवर गेलो विंडो पॉईंट म्हणजे ऑर्थरशीट पॉइंटवर एक खिडकीवजा बांधकाम केले आहे तेथून आपल्याला दूरचा मुलुख न्याहाळता येतो येथे आल्यावर माझे मन मात्र भूतकाळात गेले 
                  जेंव्हा मी पहिल्यांदा महाबळेश्वरला आलो होतो तो काळ साधारणपणे शैक्षणिक सत्र 2002-03   होते जानेवारी2003 मध्ये पुण्याहून शाळेची सहल घेऊन आलो होतो खरे तर सहलीबरोबर आलो होतो असे म्हणनेच योग्य होईल कारण मी फक्त सोबतच आलो होतो सहलीचे नेतृत्त्व माझ्या सहकारी मित्रांकडे होते त्यावेळेच्या सहकाऱ्यांची खूप आठवण झाली अनिता पवार शिंदे मॅडम  मॅडम चौधरी मॅडम सोमवंशी मॅडम भरणे मॅडम सातपुते सर मोहन इंगळे सर शीतल वाघमारे मॅडम  आमच्यासर्वांच्याच जीवनातील संघर्षाचा काळ होता तो त्याकाळात जुळून आलेले ऋणानुबंध अजून घट्ट आहेत आज आम्ही सर्व जण स्थिर झालो सुखी झालो आणि आपापल्या परीने आमच्या शिक्षण क्षेत्राची सेवा करत आहोत आज आमचा संपर्क नसेल, सहवास नसेल मात्र सहवासाचा सुगंध मात्र आजही मन आणि आठवणी सुगंधित करतो  आजही हा लेख जर त्यांच्या वाचनात आला तर एकमेकांची आठवण त्यांनाही आल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी काढलेल्या फोटोची आठवण ताजी झाली आणि आताही फोटो काढण्याची ईच्छा अनावर झाली.
                माझ्यासारख्याच तिथं आलेल्या मुलाकडून दोन तीन फोटो काढून घेतले रमतगमत दाट झाडीतून गाडीकडे आलो पाणी पिऊन फ्रेश झालो  मन मित्रांच्या आठवणीने भरून आले होते व परत एकदा गाडीला किक मारली जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त महाबळेश्वर पालथे घातले होते तीन सव्वा तीन वाजले असतील  मला आता प्रतापगडाची ओढ लागली होती  परत एकदा महाबळेश्वरजवळ जाऊन प्रतापगडाच्या घाटरस्त्याला लागलो कानात घुमत होती आवडती गायिका अलका याज्ञीकची गाणी   उजवीकडे महाबळेश्वरमधील सर्वात पश्चिमेकडील पॉईंट म्हणजे लॉड विक पॉईंट बॉम्बे पॉईंट(सनसेट पॉईंट) असे पॉईंट सोडून मी घाट उतरत होतो गाडीचा वेग नियंत्रणात ठेऊन कानात घुमणाऱ्या गाण्यामुळे आणि खराब रस्ता असूनही सभोवारचा निसर्ग देहभान हरवून टाकत होता अनेक ठिकाणी अवघड वळणे घेत मी जात असताना अनेक ठिकाणी डोंगरावरून कोसळणाऱ्या छोट्या छोट्या धबधब्यांचे दर्शन मनाला भुरळ पडत होते अन मी माझ्या मस्तीत गाणी ऐकत घाट उतरत होतो मला दुरूनच प्रतापगडाचे दर्शनही होत होते आणि सभोवार होता जावळीचा किर्रर्र परिसर ज्यात स्वराज्य बुडवून शिवरायांना जिवंत किंवा मुडदा पकडून विजापूरला नेण्याची शपथ घेणाऱ्या अफजलखानाच्या 10 हजार फौजेचा धुव्वा मूठभर मावळ्यांनी उडवला होता आणि  तो याच सह्यगिरीच्या साह्याने अन साक्षीने !!!!
 क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये