शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

भाग एक

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस पहिला🏞🛣🌄
🌍🌍🌍भाग एक🌍🌍🌍
      प्रवास!!
                  न आवडणारी व्यक्ती तशी दुर्मिळच आणि प्रवास कोणालाही आवडो अथवा नावडो प्रत्येकाला प्रवास करावाच लागतो आणि प्रवासात माणूस प्रगल्भ होतो माणसाचा भावनिक सामाजिक अन सांस्कृतिक विकास होण्यासाठी प्रवास मदत करतो माझ्याबाबतीत बोलायचे झाले तर  प्रवास म्हणजे आपला श्वास अन जगण्याचे औषधच. प्रवास आवडण्याचे दुसरे कारण म्हणजे प्रवासात सर्व समान असतात. फक्त प्रवाशी! निसर्गाच्या सानिध्यात प्रवास करण्यासारखे सौख्य नाही. जीवनाच्या धावपळीत येणारा ताण, डोक्यात साचणारा अनावश्यक कचरा क्षणापूरता का होईना कमी करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणचा प्रवास नाहीतर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहणे यासारखा दुसरा उपाय नाही.
       मी आजपर्यंत वेळोवेळी बराच प्रवास केला आहे. मला खूप आवडतो निसर्गाच्या सानिध्यात प्रवास करणे. डोळ्याला शांती अन मनाला विश्रांती घेण्यासाठी प्रवास खूप आवश्यक आहे.  मला प्रवास आवडत असला तरीही मी  आजपर्यंत लांबचा प्रवास मोठ्या वाहनानेच केलेला आहे जसे की बस कार पण मोटारसायकलचा  प्रवास मी आत्ताच केला आहे. माझ्या आजपर्यंतच्या जीवनातील सर्वात लांबचा मोटारसायकलवरील प्रवासाचा टप्पा मी एकट्यानेच पार केला तो तुमच्यासारख्या हितचिंतकांच्या शुभेच्छामुळेच! चार दिवस, चार जिल्हे, आणि 1055 किमी अंतर एकट्याने चालवत असताना जे अनुभव आले, चांगले, वाईट? नाही चांगलेच अनुभव आले  अन या जगण्यावर हजारदा प्रेम करू वाटावे असा अनुभव घेतला,  त्याचा जो आनंद मनाला झाला, जो अनुभव आला तो तुमच्या सोबत शेअर करताना अतिशय आनंद होत आहे.
       निमित्त होते किल्ले रायगडावर होणाऱ्या दीपोत्सवाचे! दि,29 व 30 ऑक्टोबर 2016 रोजी रायगडावर 'महाराष्ट्राची  दुर्गसंपत्ती'परिवारातर्फे दीपोत्सव साजरा केला जाणार होता आणि यावर्षीचे वर्ष पाचवे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळीला घराघरातून दीपोत्सव आपण करतो युगानुयुगे. घर प्रकाशाने घर उजळून टाकतो पण ज्या किल्ल्यांमुळे ( छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामुळे )आपला महाराष्ट्र अन महाराष्ट्र धर्म जिवंत राहिला जे किल्ले शिवरायांच्या पराक्रमाची मूक साक्ष देत उभे आहेत ते किल्ले मात्र सणाच्या दिवशी अंधारात? असा विचार कोणा अवलीयाच्या मनात आला मन गलबलून गेले असेल हा विचार ज्याच्या मनात आला असेल त्याचे अन पाच वर्षांपूर्वी फक्त पाच मित्रांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रायगडावर पणती लावली अन यावर्षी किमान हजार माणसांनी! असो
      फेसबुक अन व्हाट्स अप च्या माध्यमातून " एक पहाट रायगडावर " या उत्सवाची किंवा कार्यक्रमाची माहिती गेल्यावर्षीच मिळाली होती आणि जाऊ, जाऊ म्हणत होतो पण काही अडचणीमुळे जाता आले नव्हते पण यावर्षी मात्र काहीही अडचण आली तरी जायचेच असा विचार पक्का केला अन सोबतीला कुणाला तरी घेऊन जायचा विचार करत असताना लक्षात आले की सणाचे दिवस असल्याने सोबतीला कोणीही तयार नाही बऱ्याच मित्राना हटकले पण कोणीही तयार झाले नाही पण ज्यांना विचारले नाही असे मित्र मात्र म्हणत राहिले कि मला का सांगितले नाही मी काय येण्यासारखा नव्हतो काय!  अन त्यामुळे एकट्यानेच मोटारसायकलवर जावे असा मनात विचार आलाआणि मनात थोडी शंकाही आली की आपल्याला हे जमेल काय? मोटारसायकलवर जाण्याचा विचार  मित्रांना माहित झाला तेंव्हा काहींनी इतका प्रवास गाडीवर करू नये असा सल्ला दिला तो प्रेमापोटीच, कारण आजच्या धावपळीच्या काळात केव्हा काय घडेल याचा काही नेम नाही एक गोष्ट मलाही आठवली ती म्हणजे आपल्या देशात कोणत्याही आजाराने इतकी माणसं मरत नाहीत जितकी माणसं रस्ते अपघातात मरण पावतात वाहनांची वाढती संख्या खराब रस्ते वाहनचालकांचा बेदरकारपणा हि महत्वाची कारणे आहेत आणि स्वतःच्याच चुकांमुळे वाहनांचे जास्त अपघात होतात पण मी मात्र पक्का निर्धार केला होता की जायचे आणि कोणीही सोबत न मिळाल्याने 26 ऑक्टोबरला रात्री 11:00 वाजता पक्के केले की 27 ऑक्टोबर ला सर्व नियोजन व तयारीनिशी निघायचे ठरवले व मार्गही ठरवला 

वैराग-पंढरपूर-म्हसवड-गोंदवले- दहिवडी-माहुली-पाटेश्वर-सातारा-सज्जनगड-सातारा(मुक्काम)-मेढा-महाबळेश्वर-प्रतापगड-पोलादपूर-महाड(मुक्काम)-पालगड-दापोली-सव-रायगड(मुक्काम)-महाड-शिवथरघळ-भोर-कापूरहोळ-सासवड-मोरगाव-बारामती-इंदापूर-टेंभुर्णी-कुर्डुवाडी-वैराग
    प्रवास कसा करायचा,कधी करायचा याचेही काही नियम मनाशी पक्के केले 
1गाडी वेगात चालवायची नाही
2घाई करायची नाही 
3प्रवासाची सुरवात सकाळी सहा वाजता करायचीच 
4रात्री अंधार पडायच्या आत मुक्कामाला पोहोचायचे
5 वाहतुकीचे सर्व  नियम पाळून प्रवास करायचा
     आपला सर्वांचा असा अनुभव आहेकी प्रवासाला निघायचे पूर्वनियोजित असूनहीआपण प्रवासाला निघायला उशीर करतो त्यामुळे सर्व गोष्टीना विलंब होतो आणि प्रवास व सहलीतला आनंद कमी होतो.प्रवास करताना जर आपण लवकर उठून सुरवात केलीतर आपला खूप वेळ वाचतो प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो आणि रात्री लवकर मुक्कामी पोहोचता येते आणि आराम करून परत एकदा सकाळी आपल्याला लवकर उठून सुरवात करता येते निघायला उशीर कि पोहोचायला उशीर आणि आरामही मिळत नाही आणि प्रवासाचा आनंदही मिळत नाही
     मोजकीच कपडे, आवश्यक साहित्य गरम कपडे घेऊन 27/10/2016 ला सकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले त्याअगोदर सोशल मीडियावर मी प्रवासाला निघत असल्याचा msg पाठवला, सकाळचा मन प्रसन्न करणारा प्रहर कानात घुमणारी भक्तिगीतं अन गरम कपड्यातूनही अंगाला झोंबणारा गार वारा आणि मनात डोकावणारी एक अनामिक भीती,'आपण हा सर्व प्रवास पूर्ण करू शकू कि अर्ध्यातून सोडावा लागेल आपलं शरीर अन मनही साथ देईल का?' या विचारातच सकाळचा वेळ जात होता गाडीमध्ये पेट्रोल भरले तोपर्यंत अगदी हेल्मेटचेही ओझे वाटत होते आजपर्यंत कधीच हेल्मेट वापरले नव्हते पण ऊन वारा आणि थंडीपासून बचाव होत होता जर हेल्मेट नसते तर मी माझा प्रवास रोज सकाळी सहा वाजता प्रवास सुरु करू शकलो नसतो हे मात्र नक्की,पंढरपुरपर्यंत सगळा मुलुख माहितीचा वाटत होता आणि मनात विचार मात्र निगेटिव्ह येत होते आणि माझा प्रवास सुरू होता पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्याकळसाचे दर्शन घेतले तरी मनातील भावना मनाला साथ देत नव्हत्या पण आपल्याच धुंदीत गाडी चालवत असल्याने त्याचा एक नाद मनाला भुरळ पाडत होता त्यामुळे मला प्रवास करताना एक मजा अनुभवाला येत होती जेंव्हा प्रवास झेपणार नाही तेंव्हा आपण परत फिरू असा विचार करून सर्व निगेटिव्ह विचार मनातून काढून टाकले आणि गाडी चालवायला सुरवात केली

क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा