शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

बाईक सवारी

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस पहिला🏞🛣🌄
🌍🌍🌍भाग दोन 🌍🌍🌍
*अज्ञात कलाकाराची कलाकृती-श्री क्षेत्र पाटेश्वर*
सकाळी सहा वाजता निघाल्यानंतर मनात थोडी धाकधुक होतीच आणि पहिल्यांदाच हेल्मेट वापरत होतो त्यामुळे त्यानेच अवघडल्यासारखे वाटत होते.विचार आला की कदाचित या हेल्मेट मुळेच आपला प्रवास मधूनच सोडून द्यावा लागणार कि काय परंतु तसे झाले नाही पन्नासेक किमी अंतर जाईपर्यंत अवघडल्यासारखे वाटत होते पण थंडी, वारा यापासून बचाव होण्यासाठी हेल्मेटची खूप मदत झाली 
      सकाळची गुलाबी थंडी एकटाच आपल्याच मस्तीत माझ्या आवडीची भक्तिगीते ऐकत माझा प्रवास सुरु होता. गाडीची टाकी फुल्ल करून पिलीवला सर्वप्रथम चहा घेण्यासाठी व आवश्यक वस्तू खरेदीसाठी थांबलो सकाळी नऊ वाजता अन पंधरा मिनिटात निघालो तेंव्हा माहित नव्हते की महाराष्ट्रातील सर्व रस्ते इतक्या प्रमाणात खराब असतील या आधीही पिलीवला गेलो होतो एक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडातून जाणारा रस्ता खूपच सुंदर दिसत होता
         पिलीवनंतर गोंदवले याठिकाणी समाधीचे दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो आणि एक गोष्ट मला नमूद करावी वाटते की स्वच्छ आणि शांत मंदिर परिसर असेल तर मन प्रसन्न होते लगेच आणि दर्शनाचा आनंद मिळवितो आपण देव कोणता हे महत्वाचे नसते तर त्या ठिकाणच्या परिसरावर सर्व अवलंबून असते दर्शन घेऊन झाल्यावर मंदिरात एक ठिकाणी शांत बसने डोळे मिटून यात खूप आनंद मिळतो  मंदिरात गर्दी नसल्याने लवकर दर्शन झाले आणि मी सितामाईच्या डोंगराची चौकशी केली पण कोणाकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही आणि म्हणून मी तेथे जायचे रद्द केले ' सितामाईच्या डोंगराची माहिती' परत सांगीन कधीतरी,मंदिराच्या आवारात फोटो काढले आणि प्रसाद घेऊन मी साताऱ्याच्या दिशेने निघालो वर्धनगडाचे गाडीवरूनच दर्शन घेऊन साताऱ्याच्या दिशेने जात होतो तेंव्हा लक्षात आलेकी म्हसवड दहिवडी या भागातून दुष्काळाचे दुर्भिक्ष्य खूप जाणवते ऐन पावसाळ्यातही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे हे पाहून मन विषण्ण होतं दूरपर्यंत दिसणारी बोडकी जमीन त्यात कुसळाशिवाय काहीच उगवू शकत नाही अशा वेळी येथून प्रवास करणेही जीवावर येते  साताऱ्याजवळ आलो की एक मोठी पाटी वाचायला मिळाली "श्री क्षेत्र माहुली संगम" माहुली हे गाव म्हणजे पेशवाईतील खूप मोठे न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे गाव आणि संगमावर अनेक मंदिरेही आहेत असे माहित होते  त्यामुळे त्या कमानीतून संगमकडे गेलो अनेक मंदिरांचे दर्शन झाले पण त्याबरोबरच मनाला पीळ पडणारी एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे माहुलीला दक्षिण काशी समजले जाते त्यामुळे त्याठिकाणी देवाज्ञा झालेल्या व्यक्तींची मरणोत्तर कार्ये (दहावा तेरावा)करण्यासाठी खूप मोठया प्रमाणात लोक येतात त्यामुळे तेथील वातावरणात एक प्रकारचे कारुण्य भरलेले असते त्याठिकाणी थांबूच वाटत नव्हते म्हणून लगेच परत निघालो थोडे पुढे गेल्यावर midc मधून गणेश चौक -देगाव फाटा मार्गे पाटेश्वराच्या डोंगराकडे निघालो.
       पाटेश्वर हे ठिकाण सताऱ्यापासूनअगदी जवळच म्हणजे फक्त 14 किमी अंतरावर आहे साताऱ्यापासून 7किमी midc असून तेथून 4किमी अंतरावर देगाव लागते तेथून दोन किमी अंतराचा कच्चा घाटरस्ता चढून जावा लागतो या रस्त्याने छोटे चारचाकी वाहन जाऊ शकते . लोकांच्या वर्दळीपासून दूर पण शहराच्या अतिशय जवळ असलेले ठिकाण म्हणजे पाटेश्वर, उंच डोंगराकडे जाणारा वळणावळणाचा एकेरी घाटरस्ता निरव अन निशब्द शांतता यामुळे वातावरण धीरगंभीर बनते 
    मी जात असताना घाटरस्ता चढत असताना एक दोन गुराखी माणसाव्यतिरिक्त कोणीही आढळले नाही त्यामुळे मनात एक भीती वाटत होती की आता पुढे काय असेल? जसजसा मी पुढे जात होतो तसतसा मनातून अधिकच घाबरलो होतो कारण असे की अनोळखी ठिकाण अन सोबतीलाही कोणी नाही साधारण 2किमीचा अवघड घाट पार केल्यावर एका निमुळत्या जागी गाडी पार्क केली अन मला खूप बरे वाटले कारण असे की तेथेच एक चारचाकी गाडीही होती माझ्या जीवात जीव आला की चला कोणीतरी सोबतीला आहे आणि त्याचबरोबर मी न पाहिलेल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाची(no mans land)आठवण झाली
       परंतु तेथून पुढे साधारण 1किमी अंतर चालून जायचे होते मनातील भीती अगदी गडद होत होती पण वातावरण अगदी रम्य होते एक निमुळती वाट , वाटेत सुरवातीलाच एक छोटेसे गणेशाचे मंदिर आहे आणि उंच डोंगर, सभोवताली दाट झाडी, उंच वाढलेले गवत अन पाखरांचा किलबिलाट, येथे अनेक प्रकारचे पक्षी पहायला मिळतात पण मला त्यांची माहिती नसल्याने जास्त सांगता येणार नाही. प्रसिद्ध अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या पुस्तकात मिळालेल्या माहितीवरून इथपर्यंत आलो होतो पण पुढे काय? हे मात्र माहीत नव्हते, मनातील मरगळ झटकली पाणी प्यायलो भूक तर कुठे पळून गेली होती कुणास ठाऊक! अन चालत निघालो सकाळपासून जेवलेलोच नव्हतो आणि आपल्याच धुंदीमध्ये असल्याने खरे सांगायचे तर भूकच लागलेली नव्हती 
      एका बाजूला खूप खोल दरी अन दुसऱ्या बाजूला उंच डोंगर अन झाडी इतकी दाट कि संपूर्ण रस्त्यावर सवलीच होती मी पुढे पुढे चालत होतो अन मनात खूप भीती वाटायला लागली होती चालायचा टप्पा जास्त नव्हता पण पुढे काहीच माहित नव्हते फक्त पाण्याची बाटली सोबत घेऊन निघालो होतो वाऱ्याची झुळूक आली की डोंगरावर असणाऱ्या सागाच्या झाडाच्या पानांची सळसळ अन त्यातून येणारा सूं सूं आवाजाने तर जास्तच भीती वाटत होती भीती वाटायचे कारण कि निर्जन परिसर अन सोबत, सभोवताली कुणीच नाही अशातच एखादा रानटी प्राणी आला तर? 
त्यातूनही मन घट्ट करून सावलीतून जाताना खूप आनंद झाला असता पण मनात भीतीच जास्त होती त्यामुळे त्याचा आनंद घेताच आला नाही 10 मिनिटे चालल्यावर एका छोट्या तलावावर आलो तळ्यात कमळे फुलली होती अन एक आश्रमही दिसत होता पण माणसाचे नावनिशानही दिसत नव्हते अन रस्तेही दोन दिशेला फुटले होते त्याच वेळेला कोणाचातरी आवाज कानी पडला मी लक्षपूर्वक ऐकले तेंव्हा तलावाच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या पायऱ्यांच्या रस्त्याने वरच्या बाजूने थोडे वर असणाऱ्या मंदिरातून येत होता लगेच मी मंदिराकडे गेलो तेंव्हा मंदिरात पुण्याहून आलेली चार हौशी चित्रकार मंडळी होती  मला त्यांना भेटल्यावर खूप आनंद झाला मनातील भीती कुठल्याकुठे पळाली मंदिर पाटेश्वराचे होते मंदिरात दर्शन घेतले अन तिथल्या मंडळींना बोलू लागलो होतो तेव्हा त्यांनी मला एक सल्ला दिला की तुम्ही थोडे रिलॅक्स व्हा मग आपण बोलू मला खूप बरे वाटले अन मंदिरासमोरील नंदिशेजारी थोडा आराम करावा म्हणून आडवा झालो जोरात श्वास घेत होतो म्हणून मला लगेच आराम मिळाला अन मी मंदिर व परिसर न्याहाळू लागलो मंदिरात अनेक शिवलिंग होती तीही वेगवेगळ्या आकाराची अन प्रकारची वातावरण अतिशय थंड अन प्रसन्न आम्ही सर्वांनी मिळून मंदिरात ओंकार म्हटला अनेक वेळा त्याच्या नादाने मन अगदी प्रसन्न झाले मंदिर खूप जुने अन सुंदर आहे मंदिराच्या डाव्या बाजूने थोडे वर गेलो कि  सर्व मंदिर दृष्टीपथात आले ज्या नंदीजवळ मी आराम केला त्या नंदीच्या अंगाची तकाकी तर अगदी मारबाल सारखीच होती ती पाहून मन अगदी थक्क झाले अन आपल्या पूर्वजांचा खूप अभिमान वाटला कि पूर्वी इतकी शिल्पकला समृद्ध होती अगदी आरशासारखी नंदीची पाठ आहे मंदिर परिसरात अनेक शिवलिंग आहेत ती वेगवेगळ्या आकाराची अन प्रकाराची अगदी अंगठ्याचा आकारापासून ते पाच फूट उंचीपर्यंत ची शिवलिंग येथे आहेत इथले हेच प्रमुख वैशिष्ट्ये आहे संपूर्ण डोंगरावर हजारो शिवलिंग आहेत प्रत्येकाची रचना आकार वेगळा अन  काही ठिकाणी तर ती छोट्या लेण्यात काढली आहेत ती कोणी बनविली? का बनविली? हे मात्र एक गूढच आहे तसेच त्याची एक आख्यायिका हि सांगितली जाते ती मात्र मी सांगत नाही संपूर्ण वातावरण आल्हाददायक अन प्रसन्न आहे आणि त्या डोंगरावरून सातारा शहर व परिसराचे अतिशय रमणीय दृश्य दिसते 
      पाटेश्वर डोंगरावर एक आश्रम असून महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते दररोज 12 वाजायच्या आत प्रसादाची सोयही असते डोंगराच्या कुशीत थोडे पूर्वेला गेलो की तिथे एका लेण्यात इतर कुठेही न आढळणारा नंदी आढळला त्याचे वैशिष्टये म्हणजे समोरून पाहिले तर माणसाची प्रतिमा दिसते व बाजूने नंदीची , अशी नंदीची मूर्ती कुठेही पहायला मिळत नाही संपूर्ण डोंगरावर शिवलिंग नंदी ब्रह्म विष्णू भैरवी सात आसरा साप यांच्या आकृती व शिल्पे काढली आहेत  असे हे ठिकाण प्रत्येकाने पाहायलाच हवे असे आहे
10 मिनिटात परत निघू असे ठरवलेले असताना दोन अडीच तास कसे  गेले हे कळलेही नाही
परत येताना त्या अरुंद वाटेची मजा अनुभवता आली  सर्वांनी मिळून एक सेल्फी काढली अन आम्ही परत निघालो जो घाट चढताना मनात भीती होती तो घाट उतरताना मात्र मन खूप आनंदी वाटत होते शहराच्या जवळ अन निरव शांतता अनुभवायचीय? तर पाटेश्वरला यायलाच हवे मी तर परत येणारच आणि तुम्ही?
क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

भाग एक

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस पहिला🏞🛣🌄
🌍🌍🌍भाग एक🌍🌍🌍
      प्रवास!!
                  न आवडणारी व्यक्ती तशी दुर्मिळच आणि प्रवास कोणालाही आवडो अथवा नावडो प्रत्येकाला प्रवास करावाच लागतो आणि प्रवासात माणूस प्रगल्भ होतो माणसाचा भावनिक सामाजिक अन सांस्कृतिक विकास होण्यासाठी प्रवास मदत करतो माझ्याबाबतीत बोलायचे झाले तर  प्रवास म्हणजे आपला श्वास अन जगण्याचे औषधच. प्रवास आवडण्याचे दुसरे कारण म्हणजे प्रवासात सर्व समान असतात. फक्त प्रवाशी! निसर्गाच्या सानिध्यात प्रवास करण्यासारखे सौख्य नाही. जीवनाच्या धावपळीत येणारा ताण, डोक्यात साचणारा अनावश्यक कचरा क्षणापूरता का होईना कमी करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणचा प्रवास नाहीतर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहणे यासारखा दुसरा उपाय नाही.
       मी आजपर्यंत वेळोवेळी बराच प्रवास केला आहे. मला खूप आवडतो निसर्गाच्या सानिध्यात प्रवास करणे. डोळ्याला शांती अन मनाला विश्रांती घेण्यासाठी प्रवास खूप आवश्यक आहे.  मला प्रवास आवडत असला तरीही मी  आजपर्यंत लांबचा प्रवास मोठ्या वाहनानेच केलेला आहे जसे की बस कार पण मोटारसायकलचा  प्रवास मी आत्ताच केला आहे. माझ्या आजपर्यंतच्या जीवनातील सर्वात लांबचा मोटारसायकलवरील प्रवासाचा टप्पा मी एकट्यानेच पार केला तो तुमच्यासारख्या हितचिंतकांच्या शुभेच्छामुळेच! चार दिवस, चार जिल्हे, आणि 1055 किमी अंतर एकट्याने चालवत असताना जे अनुभव आले, चांगले, वाईट? नाही चांगलेच अनुभव आले  अन या जगण्यावर हजारदा प्रेम करू वाटावे असा अनुभव घेतला,  त्याचा जो आनंद मनाला झाला, जो अनुभव आला तो तुमच्या सोबत शेअर करताना अतिशय आनंद होत आहे.
       निमित्त होते किल्ले रायगडावर होणाऱ्या दीपोत्सवाचे! दि,29 व 30 ऑक्टोबर 2016 रोजी रायगडावर 'महाराष्ट्राची  दुर्गसंपत्ती'परिवारातर्फे दीपोत्सव साजरा केला जाणार होता आणि यावर्षीचे वर्ष पाचवे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळीला घराघरातून दीपोत्सव आपण करतो युगानुयुगे. घर प्रकाशाने घर उजळून टाकतो पण ज्या किल्ल्यांमुळे ( छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामुळे )आपला महाराष्ट्र अन महाराष्ट्र धर्म जिवंत राहिला जे किल्ले शिवरायांच्या पराक्रमाची मूक साक्ष देत उभे आहेत ते किल्ले मात्र सणाच्या दिवशी अंधारात? असा विचार कोणा अवलीयाच्या मनात आला मन गलबलून गेले असेल हा विचार ज्याच्या मनात आला असेल त्याचे अन पाच वर्षांपूर्वी फक्त पाच मित्रांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रायगडावर पणती लावली अन यावर्षी किमान हजार माणसांनी! असो
      फेसबुक अन व्हाट्स अप च्या माध्यमातून " एक पहाट रायगडावर " या उत्सवाची किंवा कार्यक्रमाची माहिती गेल्यावर्षीच मिळाली होती आणि जाऊ, जाऊ म्हणत होतो पण काही अडचणीमुळे जाता आले नव्हते पण यावर्षी मात्र काहीही अडचण आली तरी जायचेच असा विचार पक्का केला अन सोबतीला कुणाला तरी घेऊन जायचा विचार करत असताना लक्षात आले की सणाचे दिवस असल्याने सोबतीला कोणीही तयार नाही बऱ्याच मित्राना हटकले पण कोणीही तयार झाले नाही पण ज्यांना विचारले नाही असे मित्र मात्र म्हणत राहिले कि मला का सांगितले नाही मी काय येण्यासारखा नव्हतो काय!  अन त्यामुळे एकट्यानेच मोटारसायकलवर जावे असा मनात विचार आलाआणि मनात थोडी शंकाही आली की आपल्याला हे जमेल काय? मोटारसायकलवर जाण्याचा विचार  मित्रांना माहित झाला तेंव्हा काहींनी इतका प्रवास गाडीवर करू नये असा सल्ला दिला तो प्रेमापोटीच, कारण आजच्या धावपळीच्या काळात केव्हा काय घडेल याचा काही नेम नाही एक गोष्ट मलाही आठवली ती म्हणजे आपल्या देशात कोणत्याही आजाराने इतकी माणसं मरत नाहीत जितकी माणसं रस्ते अपघातात मरण पावतात वाहनांची वाढती संख्या खराब रस्ते वाहनचालकांचा बेदरकारपणा हि महत्वाची कारणे आहेत आणि स्वतःच्याच चुकांमुळे वाहनांचे जास्त अपघात होतात पण मी मात्र पक्का निर्धार केला होता की जायचे आणि कोणीही सोबत न मिळाल्याने 26 ऑक्टोबरला रात्री 11:00 वाजता पक्के केले की 27 ऑक्टोबर ला सर्व नियोजन व तयारीनिशी निघायचे ठरवले व मार्गही ठरवला 

वैराग-पंढरपूर-म्हसवड-गोंदवले- दहिवडी-माहुली-पाटेश्वर-सातारा-सज्जनगड-सातारा(मुक्काम)-मेढा-महाबळेश्वर-प्रतापगड-पोलादपूर-महाड(मुक्काम)-पालगड-दापोली-सव-रायगड(मुक्काम)-महाड-शिवथरघळ-भोर-कापूरहोळ-सासवड-मोरगाव-बारामती-इंदापूर-टेंभुर्णी-कुर्डुवाडी-वैराग
    प्रवास कसा करायचा,कधी करायचा याचेही काही नियम मनाशी पक्के केले 
1गाडी वेगात चालवायची नाही
2घाई करायची नाही 
3प्रवासाची सुरवात सकाळी सहा वाजता करायचीच 
4रात्री अंधार पडायच्या आत मुक्कामाला पोहोचायचे
5 वाहतुकीचे सर्व  नियम पाळून प्रवास करायचा
     आपला सर्वांचा असा अनुभव आहेकी प्रवासाला निघायचे पूर्वनियोजित असूनहीआपण प्रवासाला निघायला उशीर करतो त्यामुळे सर्व गोष्टीना विलंब होतो आणि प्रवास व सहलीतला आनंद कमी होतो.प्रवास करताना जर आपण लवकर उठून सुरवात केलीतर आपला खूप वेळ वाचतो प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो आणि रात्री लवकर मुक्कामी पोहोचता येते आणि आराम करून परत एकदा सकाळी आपल्याला लवकर उठून सुरवात करता येते निघायला उशीर कि पोहोचायला उशीर आणि आरामही मिळत नाही आणि प्रवासाचा आनंदही मिळत नाही
     मोजकीच कपडे, आवश्यक साहित्य गरम कपडे घेऊन 27/10/2016 ला सकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले त्याअगोदर सोशल मीडियावर मी प्रवासाला निघत असल्याचा msg पाठवला, सकाळचा मन प्रसन्न करणारा प्रहर कानात घुमणारी भक्तिगीतं अन गरम कपड्यातूनही अंगाला झोंबणारा गार वारा आणि मनात डोकावणारी एक अनामिक भीती,'आपण हा सर्व प्रवास पूर्ण करू शकू कि अर्ध्यातून सोडावा लागेल आपलं शरीर अन मनही साथ देईल का?' या विचारातच सकाळचा वेळ जात होता गाडीमध्ये पेट्रोल भरले तोपर्यंत अगदी हेल्मेटचेही ओझे वाटत होते आजपर्यंत कधीच हेल्मेट वापरले नव्हते पण ऊन वारा आणि थंडीपासून बचाव होत होता जर हेल्मेट नसते तर मी माझा प्रवास रोज सकाळी सहा वाजता प्रवास सुरु करू शकलो नसतो हे मात्र नक्की,पंढरपुरपर्यंत सगळा मुलुख माहितीचा वाटत होता आणि मनात विचार मात्र निगेटिव्ह येत होते आणि माझा प्रवास सुरू होता पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्याकळसाचे दर्शन घेतले तरी मनातील भावना मनाला साथ देत नव्हत्या पण आपल्याच धुंदीत गाडी चालवत असल्याने त्याचा एक नाद मनाला भुरळ पाडत होता त्यामुळे मला प्रवास करताना एक मजा अनुभवाला येत होती जेंव्हा प्रवास झेपणार नाही तेंव्हा आपण परत फिरू असा विचार करून सर्व निगेटिव्ह विचार मनातून काढून टाकले आणि गाडी चालवायला सुरवात केली

क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

*बोधकथा*
एक बाई मोलकरीण म्हणुन एका राजमहालात काम करत असते.

तिला लहान मुलगा असल्याने ती त्याला तिच्या सोबतच कामाला येतांना घेऊन यायची.

एक दिवस त्या मुलाला खेळता खेळता राजमहालात हिरा सापडतो,

तो मुलगा तो हिरा घेऊन पळत आईकडे जातो आणि सांगतो की, "आई बघ मला हिरा सापडला !"

मोलकरीण हुशार असते.
तिला वाटते, हा हिरा घेऊन आपण राजमहालाबाहेर जाऊ शकणार नाही ! 

ती मुलाला म्हणते, "नाही रे ! काच आहे, हा हिरा नाही.", असे म्हणुन ती तो हिरा बाहेर फेकुन देते.

काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हिरा सोबत घेऊन जाते.
मग ती तो हिरा सोनाराकडे घेऊन जाते. सोनाराला कळतं की, हिला हा हिरा कुठंतरी सापडला असणार,
हिला काय माहीत ? हा हिराच आहे ! म्हणुन तो सोनार तिला म्हणतो, "हा हिरा नाही, ही तर काच आहे!"

आणि असे म्हणुन तो पण तो हिरा बाहेर फेकुन देतो.

जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हिरा घेऊन येतो व जोहरीकडे घेऊन जातो.

जोहरी हिरा पाहतो, त्याला कळतं हा हिरा अनमोल आहे, त्याची नियत खराब होते.
तो हिरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो आणि "काच आहे", असं म्हणतो.

जसा हिरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. हे सगळं एक वाटसरु लांबुन पहात असतो.
तो त्या हिऱ्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, "मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकलं तेव्हा तु तुटला नाही, 
पण आता का तू तुटला ?"

हिरा म्हणतो, "जेंव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले तेव्हा ते माझी खरी किंमत जाणत नव्हते.

परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता तरी त्याने मला फेकले ! 
हा आघात मी सहन करुच शकलो नाही,
म्हणुन मी तुटलो."

मनुष्याच्या बाबतीत असेच होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमचं मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.
म्हणुन कधीही आपल्या लोकांचं जराश्या स्वार्था करता मन तोडु नका...
आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणसं
हिऱ्यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका...

     *-@तात्पर्य- गरज संपताच लोकांना विसरु नका.*😔