शुक्रवार, १७ मार्च, २०२३

कोकण पर्यटन

फिरायला जायचं आहे तर उत्तम पर्याय आहेत कोकणातील पर्यटन स्थळे - Places To Visit In Konkan
फिरायला जाण्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळी ठिकाणं असतात. पण बऱ्याचदा प्लॅन केला जातो तो कोकणात फिरायला जायचा. कोकणातील पर्यटन स्थळे अनेक आहेत. कोकण सहल काढणं म्हणजे खरं तर एक मजा. कोकण पर्यटन स्थळे नक्की कोणती, तिथे कसं जायचं, कुठे फिरायचं असा प्रश्नही पडतो. कोकण दर्शन माहिती मराठी मध्ये आपल्याला नेहमीच जाणून घ्यायला आवडते. कोकण हा खरं तर महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया असे नेहमीच म्हटले गेले आहे. इथले समुद्रकिनारे, शुद्ध हवा, परिसर, हिरवळ या सगळ्याने मन प्रसन्न होऊन जाते. इतकंच नाही तब्बेतही चांगली होते. इथली हवाच निराळी आहे. त्यामुळे रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून सुटका हवी असेल तर कोकण सहल ही किमान एकदा तरी करायला हवी. तुमचं कोकणात घर असेल तर मग मजाच आहे. पण जर घर नसेल आणि तुम्हाला कोकणात फिरायला जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट द्यायला हवी जी आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. कोकणात खरं तर अनेक ठिकाणं फिरण्यासारखी आहेत. काही प्रसिद्ध आहेत तर काही प्रसिद्ध नाहीत तरीही सुंदर आहेत जिथे किमान एकदा जाऊन तरी तुम्ही भेट द्यायला हवी. पाहूया कोणती आहेत ही ठिकाणं.

कशेळी, कनकादित्य मंदिर (Kankaditya Mandir)

रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी हे लहानंसं गाव आहे. अजूनही इथे मातीचे रस्ते आणि कोकणातील शुद्ध आणि स्वच्छ वातावरण जपलं गेलं आहे. गावची वस्ती तशी जास्त नाही. पण या गावात दोन मंदिर आहेत. त्यापैकी एक लक्ष्मीनारायण मंदिर आणि एक आहे ते कनकादित्य मंदिर. सूर्याची केवळ सात मंदिरे संपूर्ण भारतामध्ये आहेत आणि त्यापैकी एक मंदिर आहे ते म्हणजे कनकादित्याचं मंदिर. हे मंदिर कसं निर्माण झालं याचीही एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. एक गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलले नाही. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणाने कनकेला म्हनाले की तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने ही गोष्ट त्यावेळी ग्रामस्थांना सांगितली मग ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्य मूर्ती गावात आणून स्थापना केली. त्या कनकाबाई मुळे घडले त्यामुळे कनकेचा आदित्य म्हनून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले.

कसे पोचावे - रत्नागिरी पर्यंत ट्रेन आणि त्यानंतर रिक्षा अथवा एस. टी. , राजापूरपासून धारतळे आणि मग आडिवरे अशी एस. टी.

वैशिष्ट्य - रथसप्तमी उत्सव पाच दिवस चालणारा हा उत्सव कशेळी आणि आजूबाजूच्या गावासाठी महत्त्वाचा काळ असतो. या उत्सवात कनकादित्य आणि कालिकादेवी यांचे होणारे लग्न हा सर्वांसाठीच आवर्जून बघण्याचा लग्नसोहळा असतो. कनकादित्या मंदिरामध्ये साधारण 850 वर्षांपूर्वीचा ताम्रपटही आहे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 3000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

आडिवरे, महाकाली मंदिर (Adivare Mahakali)
कशेळी गावापुढील गाव असणारे आडिवरे हे तेथील महाकाली मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. इथे कायम भक्तांची रांग असते. पण कितीही गर्दी असली तरीही इथे अतिशय प्रसन्न वाटते आणि त्याशिवाय शांतताही असते. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा तीन देवी अनेकांच्या कुलदेवता आहेत. त्यापैकी महाकाली ही कुलदेवता या ठिकाणी आहे. इसवी सनाच्या ९व्या शतकात भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करुणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टान्त दिला आणि मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर असे सांगितले. त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील महाकालीची मूर्ती सापडली आणि त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा "वाडापेठ" येथे देवीची स्थापना केली अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. महाकाली देवी अनेकांना प्रसन्न होते असंही म्हटलं जातं. 

कसे पोचावे - रत्नागिरी पर्यंत ट्रेन आणि त्यानंतर रिक्षा अथवा एस. टी
वैशिष्ट्य - अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये महाकाली मंदिरात यात्रा भरते. या यात्रेसाठी खूपच गर्दी होते. उत्सव काळात देवीला वस्त्रालंकारांनी नटवले जाते. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा पालखी सोहळा म्हणजे एक विहंगम दृष्यं असते. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 3000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

तारकर्ली (Tarkarli Beach)
कोकणात आल्यानंतर सर्वात जास्त ओढ असते ती समुद्रकिनाऱ्याची आणि आता कोकणामध्ये तारकर्लीचा समुद्रकिनारा हा खूपच प्रसिद्ध झाला आहे. कारण आता या समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग आणि अन्य अॅक्टिव्हिटीही सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणामधील सर्वच समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ आहेत आणि त्यामध्ये तारकर्लीचा समुद्रकिनारा हा पुढे आहे असं म्हटलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनही आहेत आणि त्यांना बघण्यासाठीही अनेक जण कोकण सहल काढताना तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्याला मुद्दाम भेट देतात. 

कसे पोचावे - कुडाळ स्टेशनला उतरून रिक्षा अथवा एस. टी. अथवा स्वतःची गाडी 

वैशिष्ट्य - तारकर्लीचा समुद्रकिनारा हा त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. इतकंच नाही  इथलं पाणी अतिशय स्वच्छ आहे. दिवसा साधारण 20 फूट खोलीपर्यंत तुम्ही डोळ्याने स्वच्छ पाणी पाहू शकता इतकी स्वच्छता या पाण्यामध्ये आहे. त्याशिवाय आजूबाजूला असणारा नयनरम्य निसर्ग हा तुमचा थकवा कुठच्या कुठे पळवून लावतो. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 3 दिवस (प्रति व्यक्ती)

मुरूड - जंजिरा (Murud Janjira)

अलिबागमधील मुरूड - जंजिरा हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण. अलिबाग हा कोकणचा एक भाग असून याठिकाणी अनेक समुद्रकिनारे आहेत. इथल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या कोकणच्या भागात नेहमीच सहल काढण्यात येते.  शिवाय कोकण पर्यटन स्थळे म्हणून अलिबागमधील अनेक स्थळं प्रसिद्ध आहेत. त्यापैकी मुरूड-जंजिराला तर इतिहास लाभला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला असा होतो. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आणि त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. आजही हा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. 

कसे पोचावे - गेट वे ऑफ इंडियावरून लाँच अलिबागपर्यंत. अलिबाग ते मुरूड जंजिरा एस. टी. अथवा रिक्षा 

वैशिष्ट्य - इतिहासप्रेमी आणि किल्लाप्रेमींंसाठी मुरूड - जंजिरा किल्ला ही पर्वणीच आहे. याचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आपोआपच अभिमान जागृत होतो. या किल्ल्याची तटबंदी ही बुलंद आहे आणि  हेच याचे वैशिष्ट्य आहे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)



रत्नदुर्ग किल्ला (Ratnadurga Fort)
रत्नदुर्ग किल्ला 

रत्नागिरीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटर वर असणारा हा रत्नदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे असलेले भगवती मंदिर. समुद्रापर्यंत इथे भुयारी मार्ग जातो. इथे येणारे प्रत्येक पर्यटक हे इथल्या विहंगम दृष्यामुळे मोहून जातात. हा किल्ला समुद्राच्या काठावरील असणाऱ्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या पाथथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. 

कसे पोचावे - रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच भगवतीचे शिवकालीन मंदिर अतिशय सुबकरित्या बांधण्यात आले आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते जिथे  तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे. आता हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट ज्याठिकाणी होतो तेथे असलेली प्रचंड गुहा स्पष्ट दिसते.

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

श्रीवर्धन (Shrivardhan Beach)
श्रीवर्धनचा प्रसिद्ध समुद्रकिनारा

अतिशय शांत आणि रम्य असणारा हा समुद्रकिनाराही त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला फेसाळ लाटांमध्ये फिरायला खूपच मजा येते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. इथून दिसणारा सूर्यास्त हा अप्रतिम असतो. अर्थात सर्वच समुद्रकिनाऱ्यांवरून सूर्यास्त चांगला दिसतो पण श्रीवर्धन किनाऱ्यावरून समुद्राच्या काठावरून पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. श्रीवर्धनमधील लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णुमूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातील असावी असा अंदाज आहे. 

कसे पोचावे - मुंबईवरून एस. टी., बस 

वैशिष्ट्य - श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर २००-२५० वर्षांपूर्वीचे आहे. अगस्ती मुनींनी याची स्थापना केली, असे मानले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. येथील कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारख्या आहेत असे सांगितले जाते. कोकण पर्यटन करायचे असेल तर श्रीवर्धनला भेट दिलीच पाहिजे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 6000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

धुतपापेश्वर (Dhutpapeshwar)
धुतपापेश्वर मंदिर

शांत आणि डोंगराच्या मधोमध असणारं हे काळ्या पाषाणातील शिवलिंग असणारं निसर्गाचं अप्रतिम ठिकाण. पेशवेकालीन बांधकाम या मंदिरात असून इथे लाकडात खूपच आकर्षक काम करण्यात आलं आहे. यावर अनेक कलाकुसरी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत. हे मंदिर पुरातन असून सहसा पावसाळ्याच्या दिवसात येथील धबधबा बघण्यासाठी अनेक पर्यटक जातात. इथे शंकराचे असलेले मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा अतिशय नयनरम्य आणि मनोहारी आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे कोकणातील भटकंतीचा आणि दाट वनराईचा आणि वळणाच्या रस्त्यांचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर इथे नक्की भेट द्यायला हवी.  

कसे पोचावे - रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - पताक्यांचा वापर करून तयार करण्यात आलेले शिवलिंग हे येथील वैशिष्ट्य आहे. हे शिवलिंग खूपच मोठे असून अतिशय आकर्षक आहे. महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी खूपच मोठा उत्सव होतो जिथे आजूबाजूच्या गावातील अनेक लोक दर्शनाला येतात. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

महाशिवरात्र - महाराष्ट्रातील कोणती आहेत खास प्राचीन शिवाची मंदिरे

थिबा राजवाडा (Thiba Palace)
थिबा राजाचा राजवाडा 

कोकणात फिरण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांपासून ते राजवाड्यापर्यंत सर्व काही आहे. कोकणाला एक इतिहास लाभला आहे. त्यापैकीच एक स्थळ म्हणजे थिबा राजवाडा. रत्नागिरीमध्ये हा थिबा राजवाडा असून यामध्ये एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. आताचे म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रम्हदेशाच्या थिबा मिन राजाला येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. थिबाने वापरलेल्या अनेक गोष्टी येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. हा राजवाडा त्याकाळी ब्रिटिशांनी बांधला असून आता पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 

कसे पोचावे -  रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - थिबा राजा आणि राणी हे दोघेही या राजवाड्यात राहात होते आणि त्यांनी वापरलेल्या अनेक गोष्टी इथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्या पाहण्यासाठी कोकण सहल काढून अनेक पर्यटक इथे येत असतात. त्याशिवाय कोकणातील पर्यटन स्थळे म्हटली की थिबा राजवाड्याचं नाव आलं नाही असं होत नाही. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 4000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

लोकमान्य टिळक घर (Lokmanya Tilak House)
लोकमान्य टिळकांचं घर

लोकमान्य टिळक हे व्यक्तिमत्व मराठी माणसाला माहीत नाही असा एकही माणूस सापडणार नाही. लोकमान्य टिळकांचे घर हे रत्नागिरीत आहे. आजही अनेक पर्यटकांसाठी हे घर उघडे आहे. कोकण सहल काढणार असाल तर तुम्ही लोकमान्य टिळकांचं हे घर पाहायलाच हवं. रत्नागिरी शहरातील टिळक आळीतमध्ये टिळकांचं टुमदार घर आजही तसंच आहे. साधारण दहा वर्षे टिळक याच घरामध्ये राहात होते. हे घर महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याने जतन केले असून स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे घर पाहिल्यानंतर टिळकांबद्दलचा अभिमान अधिक दाटून येतो हे नक्की. 

कसे पोचावे - रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - स्वातंत्रसंग्रामातील लोकमान्य टिळक यांनी दिलेले योगदान खूपच मोठे आहे. या घरात त्याच्या स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत. आपल्यालाही या आठवणींनी एक स्फूर्ती मिळते. सोमवार वगळता इतर सर्व दिवशी तुम्हाला इथे जाऊन नक्की भेट देता येईल. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 4000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

रायगड किल्ला (Raigad Fort)
शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला 

महाराष्ट्रीची शान रायगड किल्ला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा भाग कोकण पट्ट्यात येतो.  रायगडमध्ये अनेक डोंगर किल्ले आणि समुद्रकिनारे आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातील राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला हा तर कोकण पर्यटकांसाठी पर्वणी आहे. रायगड किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे. त्याशिवाय हा किल्ला फिरण्यासाठीही खूपच मोठा आहे. इतक्या वर्षांनंतरही रायगड किल्ल्याची शान महाराष्ट्राने जपून ठेवली आहे. दरवर्षी शिवाजी महाराजांच्या जयंतीला इथे मोठा सोहळा साजरा करण्यात येतो. 

कसे पोचावे - गाडी, बस 

वैशिष्ट्य - किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. मराठी इतिहासामध्ये या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवराज्याभिषेक हा सर्वात मोठा अनुभव या किल्ल्याने अनुभवला आहे. या किल्ल्यामध्ये शिवरायांनी सर्वात जास्त वास्तव्य केले असे सांगितले जाते. या किल्ल्यावर जिजाबाईंचा वाडा, खुबलढा बुरूज,  नाना दरवाजा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्तीतलाव, स्तंभ, मेणा दरवाजा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, टकमक टोक, हिरकणी टोक इतक्या सगळ्या भारावलेल्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 2000 आणि 1 दिवस (प्रति व्यक्ती)

किहिम समुद्रकिनारा (Kihim Beach, Alibaug)
किहिम समुद्रकिनारा 

अलिबागमध्येच असणारा हा कोकणातील स्वच्छ आणि सुंदर असा किहीमचा समुद्रकिनारा. सरखल कान्होजी आंग्रे यांच्या अखत्यारीत किहिम समुद्रकिनारा अधिक प्रसिद्ध झाला. शिवरायांच्या काळात नौदलासाठी हा समुद्रकिनारा महत्त्वाचा मानण्यात आला होता. आता या समुद्रकिनाऱ्यावर अनेक पर्यटक फिरायला येतात. इथली पांढरी आणि मऊशार वाळू फिरण्यासाठी अधिक छान भासते.

कसे पोचावे - गेट वे ऑफ इंडियावरून लाँचने अलिबाग आणि तिथून रिक्षा वा बस 

वैशिष्ट्य - या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू ही अतिशय मऊ आणि पांढरी आहे. त्याशिवाय इथे कोणत्याही प्रकारची घाण तुम्हाला दिसून येत नाही.  दोन दिवसात पटकन फिरून येता येते. इथली हवा शुद्ध असल्याने रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाटते. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

गणपतीपुळे (Ganpatipule)

गणपतीपुळेला इतिहास लाभला आहे. कोकण म्हणजे गणपतीपुळे असं एक गणितच होऊन गेलं आहे. साधारण 1600 वर्षांपूर्वी समुद्रकिनाऱ्यावर निर्माण झालेलं हे स्वयंभू गणपतीमंदीर येथील वैशिष्ट्य आहे. याचं पश्चिम द्वार असल्यामुळे हे याचं वैशिष्ट्य ठरतं. हा समुद्रकिनारा खूपच सुंदर असून गणपतीचं मंदीर असल्यामुळे याला पवित्र ठिकाण मानलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू ही पांढरी असल्यामुळेच याला गणपतीपुळे असं नाव देण्यात आलं आहे. 

कसे पोचावे - मुंबई सेंट्रलवरून एस. टी., ट्रेन,  स्वतःची गाडी 

वैशिष्ट्य - गणपतीपुळेला गणपतीचं पुरातन मंदिर तर आहेच. पण आता या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने हॉर्स रायडिंग, बोटिंग असे पर्यायही उपलब्ध आहेत. त्याशिवाय जवळच असणारा जयगड किल्लाही पाहण्यासारखा आहे.

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

आरे वारे समुद्रकिनारा (Are-Ware)

रत्नागिरीच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांपैकी असणारा आरे वारे बीच हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे. आरे वारे हा आता कोकणात सहल काढण्यासाठी उत्तम पर्याय झाला आहे. इथे मनाला मिळणारी शांतता आणि मुळात असणारा स्वच्छपणा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये समुद्र असा मनमोहक निसर्गाचा नजारा इथे पाहायला मिळतो. आरे वारेच्या समुद्रकिनाऱ्याला आता बरेच पर्यटक भेट देऊ लागले आहेत. 

कसे पोचावे - रत्नागिरीवरून रिक्षा अथवा एस. टी.  

वैशिष्ट्य - रत्नागिरीमध्ये असलेल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी सर्वात जास्त प्रसिद्ध असणारा आरे वारे हा समुद्रकिनारा आहे. आरे वारे हे दोन आजूबाजूला असणारे समुद्रकिनारे असून भौगोलिकदृष्ट्या आश्चर्य असणारे हे किनारे असल्याचं म्हटलं गेलं आहे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

हरिहरेश्वर (Harihareshwar)
चिंचोळे रस्ते, अजूनही शहरीकरण न झालेलं हरिहरेश्वर गाव आणि समुद्राची कानी पडणारी गाज. या गावात पोचताच इथलं साधेपणा तुम्हाला आपलासा वाटू लागतो. तसंही मुंबईकरांना गर्दीतून सुटका हवी असतेच. आता प्रत्येक घरात या सुट्ट्यांमध्ये कुठे जायचं याचं प्लॅनिंग झालं असेल किंवा सुरू असेल. दरवर्षी कुटुंबाला एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला नेणं जरा कठीणच आणि रिसोर्ट्स पिकनिक्सचाही कंटाळा आला असेल तर हरिहरेश्वरला नक्कीच भेट द्यायला हवी. 

कसे पोचावे - हरिहरेश्वर हे मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे माणगाव आहे. जे इथून जवळपास 60km अंतरावर आहे. एसटीच्या अनेक बसेस हरिहरेश्वरला जातात. तसंच तुम्ही खाजगी वाहनानेही इथे पोचू शकता. 

वैशिष्ट्य - हरिहरेश्वरमध्ये अजून जास्त हॉटेल्स नाहीत पण तुम्ही होम स्टेचा ऑप्शन घेऊ शकता. जो चांगला आणि स्वस्तही आहे. एमटीडीसीची इकडे कॉटेजेस आहेत. हरिहरेश्वराला कधीही वर्षभरात कधीही भेट देऊ शकता पण जास्त उन्हाळा असल्यास मात्र टाळा. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

दापोली (Dapoli)

कोकणच्या हृदयात वसलेलं निसर्गरम्य दापोली हे मुंबईपासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे. इथली पर्यटकांची गर्दी गेल्या काही वर्षात वाढली असली तरी अजूनही इथे पूर्णपणे व्यावसायिकीकरण झालेलं नाही. नेहमीच्या रूटीनपासून ब्रेक हवा असल्यास दापोलीला नक्कीच भेट देता येईल. याची मुख्य कारण म्हणजे इथले निसर्गाचं वरदान लाभलेले स्वच्छ आणि कमी गर्दी असलेले समुद्रकिनारे आणि सुट्टीमध्ये एन्जॉय करण्यासाठी मिळणारे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. 

कसे पोचावे - एस. टी. , बस, स्वतःची गाडी, ट्रेन 

वैशिष्ट्य - दापोली म्हणजे समुद्रकिनारे यात समावेश होतो तो केळशी, दाभोळ, बुरोंडी या किनारपट्टी भागाचा. येथील समुद्रकिनाऱ्यांमध्ये प्रसिध्द असलेले किनारे म्हणजे कर्दे बीच, केळशी बीच, मुरूड बीच, लाडघर बीच, कोळथरे बीच आणि तामस तीर्थ बीच. पर्यटकांची संख्या वाढूनही आजही इथले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत, हे विशेष. एवढंच नाहीतर इथल्या काही बीचवर तुम्हाला डॉल्फीन आणि वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करता येतील तर काही किनाऱ्यावर फक्त आणि फक्त तुम्हीच असाल एवढा निवांतपणा अनुभवता येईल.

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

प्रश्नोत्तरे
1. कोकणात जाण्याचा उत्तम कालावधी कोणता?

साधारण ऑक्टोबर ते मे या काळामध्ये तुम्ही कोकणात कधीही जाऊ शकता. आंब्याचा आस्वादा घ्यायचा असेल तर एप्रिल आणि मे महिना फिरण्यासाठी उत्तम काळ आहे. 

2. कोकणात सर्वात जास्त काय प्रसिद्ध आहे?

कोकणातील समुद्रकिनारे, आंबा, काजू, मंदिरे या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. सर्वात जास्त फिरण्याची ठिकाणं म्हणजे कोकणातील समुद्रकिनारे आणि पुरातन मंदिरे. 

3. पुण्यापासून कोकणात जायला साधारण किती वेळ लागतो?

पुण्यापासून कोकणात जायला साधारण 13-14 तास लागतात. पुण्यातून अनेक एस. टी. आहेत. त्याशिवाय आता अनेक ट्रेननेही प्रवास करता येतात. 

4. कोकणातील सर्वात चांगले समुद्रकिनारे कोणते?

गणपतीपुळे, भाट्याचे पुळण, आरे वारे, भोगवे,वेंगुर्ले, आचरा, चिवला,मालवण, तारकर्ली हे अतिशय प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. या ठिकाणी अतिशय स्वच्छ समुद्रकिनारे असून इथे फिरायला मजा येते. 

5. कोकणात पोहचायला मुंबईतून किती वेळ लागतो?

ट्रेनने कोकणात पोहचण्यासाठी साधारण 9 तास लागतात. तर बस अथवा एस. टी. ने कोकणातील काही भागामध्ये पोहचण्यासाठी 12 तास लागतात. 

6. कोकण पट्टा नक्की कोणता आहे?

रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मुंबई हा संपूर्ण कोकणपट्टा आहे. पण तरीही सर्वात जास्त पर्यटक हे रत्नागिरी आणि रायगड या ठिकाणी फिरायला जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा