शनिवार, ७ जानेवारी, २०१७

भाग नऊ

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग नऊ*🌿🌿
             काही महिन्यांपूर्वी महाडजवळ सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याने खुप मोठा अपघात घडला होता आणि तो पूल इंग्रजांच्या काळातील होता म्हणे पण आता मी एक पूल पाहणार होतो तो पूल म्हणजे थेट शिवरायांनी बांधलेला आहे आणि तोही साडे तीनशे वर्षांपूर्वी!!!
     मागील भागात आपण पाहिले की पार गावापासून जवळ असलेल्या व दुधगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी जवळ हा पूल असून तो अगदी सुस्थितीत आहे नदीचे नाव लक्षात नाही पण 3 -4 कमानी असलेला पूल पहिला कि मन थक्क व्हायला लागते व त्यांच्या पश्चात हि शिवरायांची आठवण आल्याशिवाय राहत नाही पार गावातून परत येताना 1 किमी वर डावीकडे  प्रतापगडाकडे जाणारा रस्ता आहे आणि न वळता पुढे गेल्यावर समोरच एक मोठा पूल दिसतो पुलाजवळ एक मंदिर आहे  खळखळ वाहणारे पाणी आणि निरव शांतता होती निसर्गसौंदर्याने नटलेला ह्या भागात आपल्याला खुप करमते 
                  पुलाचे बांधकाम अगदी किल्ल्याच्या भिंतीसारखे आहे मोठमोठे चिरे वापरून केलेले हे बांधकाम आपल्याला थक्क करते आजही त्या पुलावरून वाहतूक सुरु आहे हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. नदीत उतरून पुलाचे निरीक्षण केले असता खूप आश्चर्य वाटत होते अगदी किल्ल्याच्या बांधकामासारखे बांधकाम केलेले आहे, मी परत फिरलो, परत फिरताना मात्र आपल्या पूर्वजांच्या बांधकाम शैलीतील प्रगतीचाच विचार करत होतो सतत!!
      उजवीकडे वळून 4 किमीच्या  नयनरम्य घाटातून प्रवास करून मी मुख्य रस्त्याला लागलो पोलादपूरकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर समोर एक 4किमी चा रस्ता आहे त्या रस्त्याने आपण प्रतापगडकडे जातो 
        एक किमी गेल्यावर समोरच एक ठिकाणी  मोठी गर्दी आपल्याला दिसते आणि तेथे कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठाप्रमाणे 400 वर्षापूर्वीचे खेडेगाव साकार होत आहे सध्या काम सुरू असून त्याचे 40 रु इतके तिकीट आहे पण ते जास्त वाटते त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी असणारी गावाची प्रतिकृती तयार करण्यात येत आहे म्हणून काम पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी आपण मागच्या काळात गेल्याचा अनुभव आपल्याला येणारच हे नक्कीच आता मात्र काम जोरात चालू आहे 
             येथे एक हस्तकला केंद्र आहे  त्या हस्तकला केंद्रात  अनेक पाहण्यासारख्या गोष्टी आहेत तसेच त्याठिकाणीच हस्तकला प्रदर्शन व विक्री केंद्र आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला महाबळेश्वरमधील सर्व प्रकारच्या वस्तू विकत घेता येतील तेही तिथल्या पेक्षा स्वस्तच !!
              अनेक लाकडी वस्तू,(अगदी किचनमधीलही) तसेच  खेळणी, पेनस्टॅण्ड, कीचेन, मेकअपच्या वस्तू चामड्याच्या वस्तूही आपल्याला मिळतात काही खरेदी करून मी मनातल्या मनात विचार करत  प्रतापगडाकडे निघालो होतो आणि मी माझ्या मनात ठरवले होते की आज आपण अफजलखानाची समाधी पहायची आता माझे मन इतिहासात शिरायला लागले होते आणि मला आठवले कि मी प्रतापगडावर 15 वर्षांपूर्वी आलो होतो तेंव्हा खानाच्या समाधीकडे जाता येत होते आणि तेथील स्वच्छताही किल्ल्यापेक्षाही जास्त होती आणि हि गोष्ट मला खूप खटकली होती पण पुढे मात्र अनेक घटना घडल्या आणि आज या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही तेथे पोलिसांचा पहारा आहे तिकडे जायचा विचार बदलून मी गडाकडे निघालो गाडी घेऊन आपण अगदी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणी जाऊ शकतो तेथे गाडी पार्क करून आपण अगदी कमी वेळेत गडावर जाऊ शकतो गड पाहण्यासाठी दीड दोन तास लागतात साधारणपणे, आता पाच वाजले होते मी गडाच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला तर तेथे दोन्ही बाजूला फळे सरबत ताक पुस्तके विकणारी दुकाने  उपलब्ध आहेत समोर टेहळणी बुरुज आहे थोडासा दूरवर व उंचावर 20-25मोठ्या पायऱ्या चढून गेल्यावर समोर दिसत होते जावळीचे खोरे अन निबिड अन घनदाट अरण्य !
      एका क्षणात माझ्या डोळ्यासोरून चौथीच्या पुस्तकात कितीदा तरी  वाचलेला,शिकलेला ,शिकवलेला, कितीतरी पुस्तकात कथा, कादंबऱ्यात वाचलेला,  ऐकलेला 'अफजलखानाचा वध ' हा प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकून गेला आणि त्या प्रसंगातील पात्रे माझ्यासभोवती फेर धरून नाचू लागली 
बुरुजावर फडफडणाऱ्या जरीपटक्याला मुजरा करून मी मुलुख न्याहळत होतो नजर जाईल तेथपर्यंत जंगल अन डोंगर दऱ्या!  याच ठिकाणी अफजलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला होता अन संभाजी कावजीने त्याचे मुंडके कापून आणले होते 
    बुरुजावरून जावळीचे संपूर्ण खोरे दिसत होते आणि त्या खोऱ्यात अफजलखानासारखा सरदार महाराजांनी  खल्लास केला होता आणि त्याचे मुंडके राजगडावर मासाहेबांना दाखविण्यासाठी धाडले होते राजगडाच्या माचीवर त्याचे विधिवत दफन केले होते 
   मला वाचलेले आठवले " माँसाहेब खानाचे मुंडके पाहिल्यावर म्हणाल्या की हाच तो ज्याने स्वारीच्या पायात साखळदंड बांधले यानेच अनेक मंदिरांचा विध्वंस केला आणि शिवबाला मारायला आलेला तो हाच!" तरीही मासाहेबांनी त्याच्या मुंडीचे दफन करायला सांगितले कारण तो शत्रू असला तरी पराक्रमी सरदार होता आणि शत्रू मेला अन वैर संपले.
क्रमश:
 
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

भाग आठ

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग आठ*🌿🌿
 महाबळेश्वराचा अवघड वाट उतरून खाली येत असताना वाडा या गावाजवळ उजवीकडे 'श्री क्षेत्र काळभैरव मंदिर जावळीचे मोरे यांचे कुलदैवत ' अशी कमान दिसली तसे मी गाडी थांबवून मंदिर किती दूर आहे अशी विचारणा केली असता अगदी जवळ आहे असे समजले कारण इथे जाणे माझ्या नियोजनात नव्हते पण जावळीचे मोरे यांचे कुलदैवत म्हणू  वाट वाकडी केली  आणि मग मी त्या कमानीतून शिरलो सभोवताली उंचचउंच डोंगर दाट झाडीतून रस्ता जात होता आणि मनात विचारांचे काहूर उठले होते ' स्वराज्याच्या उरावर बसून आदिलशहाच्या जीवावर  स्वराज्याचा घोट घेऊ पाहणाऱ्या अनेक स्वकीय शत्रूंच्या यादीत असलेल्या जावळीच्या मोऱ्यांची अन त्यांच्या कर्तृत्वाची मलाच लाज वाटू लागली होती सकाळपासून असलेली मन:शांती संपली होती.मेंदूत अनेक विचारांचे मोहोळ उठले होते आदिलशाहाचे फर्मान आल्यावर मावळातल्या वतनावर पाणी सोडून स्वराज्याच्या यज्ञात सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्या कारीच्या कान्होजी जेधे यांच्यासारखी जाणती माणसं कुठं अन ही पिलावळ कुठं? असे अनेक विचार उसळी मारून येत होते' पाच मिनिटात मंदिर आले मंदिर एकदम शांत होते अन मंदिर परिसरहि अत्यंत स्वच्छ, शांत आणि  रमणीय आहे पण मन अस्थिर झाले होते याच मंदिरात संत तुकाराम महाराजांचे वंशज येथे आल्याचे समजले पण मन मात्र अस्थिरच, थांबूच वाटत नव्हते तिथे असाच एक अनुभव मला काही वर्षांपूर्वी आला होता श्री क्षेत्र गाणगापूर येथे एक क्षणही तिथे थांबावे वाटत नव्हते इतके मन बेचैन झाले होते असो,
         मंदिरातून परत फिरून रस्त्याला लागलो थोड्याच वेळात प्रतापगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला डावीकडे 'रामवरदायिनी माता मंदिर पार ' अशी मोठी कमान दिसली अन त्या कमानीतून पुढे गेल्यावर समोरचा संपूर्ण रस्ता हा घाटरस्ता होता पाच किमीचा एकेरी अवघड रस्ता वेडीवाकडी वळणे तीव्र अन अतितीव्र चढ उतार अन घनदाट जंगल अशा प्रकारच्या रस्त्याने गाडी चालवत जायचा अनुभव वेगळाच होता तापोळेला जाताना जो विरस झाला होता  त्याचा आनंद इथे मिळत होता असा रस्ता संपूच नये असे वाटत होते माझ्या प्रवासातील एक रमणीय प्रवास होता हा नक्कीच
              चार किमी अंतरावर रस्ता काटकोनात वळत होता दोन्हीकडे! 
      एकीकडे दुधगावकडे व दुसरीकडे पार या गावाकडे रस्ता जात होता 1किमी अंतरावर पार हे गाव आहे आणि रामवरदायिनी मातेचे मंदिर आहे मंदिर अतिशय सुंदर असून खूप प्रशस्त आहे शेजारीच महादेवाचेही मंदिर आहे तेही मोठे आहे सुंदर आहे मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला भुरळ पडली होती मंदिरात अभिषेक किंवा पूजा करायला येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची सोय आहे मंदिर परिसरात निरव शांतता पसरली होती त्यामुळे दर्शनाचा आनंद घेता आला 
      रामवरदायिनी मातेच्या मंदिराची रचना सुंदर केलेली आहे मंदिराच्या आवारात शिवरायांचा राज्याभिषेक असलेला पुतळा आहे एकंदर परिसर स्वच्छ व सुंदर तसेच शांत आहे आपण माझ्यासकट सर्वजण इथल्या परिसरात आलो म्हणजे महाबळेश्वर प्रतापगड  इत्यादी ठिकाणीच भेटी देतो पण वाटेतच असणाऱ्या अशा प्रकारच्या सुंदर व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत नाही आणि कारणही तसेच असते की एकतर आपल्याला अशा प्रकारच्या ठिकाणांची माहिती नसते किंवा वेळही नसतो मंदिर आणि मंदिराचा परिसर खूपच छान, सुंदर आणि रमणीय आहे.
    रामवरदायिनी मातेच्या मंदिराची आख्यायिका आहे ती अशी:- 
                 सीतेचे हरण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र सितामाईच्या शोधात या ठिकाणी आले असता त्यांची थट्टा करण्याचा विचार पार्वती मातेच्या मनात आला होता व ती सीतेचे रूप घेऊन प्रभू रामचंद्र यांच्या समोर आली होती व रामाला म्हणाली "माझा शोध थांबवा मी तुमच्या समोर आले आहे" पण रामाने त्यांचे खरे रूप जाणून घेतले होते त्यामुळे ते म्हणाले की "हे माते, माझी थट्टा करू नको तुला मी ओळखले आहे तू माझी  माता आहेस" या प्रसंगामुळे पार्वती आनंदित झाली अशीच आख्यायिका येरमाळा ता:- कळंब येथील येडेश्वरी (येडाई) देवीच्या संदर्भानेही आहे,
             पार्वती रामावर प्रसन्न होऊन गेली आणि त्या वेळी त्यांनी रामाला वर दिला की लवकरच सीता सापडेल व रामाला मिळेल म्हणून पार्वती याठिकाणी रामवरदायिनी माता म्हणून निवास करते आहे मंदिरातून बाहेर पडलो अन याच परिसरात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या एका मारुतीचे मंदिर या ठिकाणी असल्याचे समजले होते मारूतीच्या मंदिरासमोर आल्यावर कळले की समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या सर्व मारुतीच्या मंदिरांची प्रवेशद्वारे दक्षिणमुखी आहेत आणि त्या मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरमुखी होते व या ठिकाणी असे मंदिर नसल्याचे सांगितले आणि मग मी त्यांना या ठिकाणी असणाऱ्या शिवकालीन पुलाची माहिती विचारली अन लगेच मी 365 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पुलाकडे निघालो त्याची माहिती पुढच्या भागात पाहू !
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग सात*🌿🌿
     महाबळेश्वरच्या   मंदिरात व त्या परिसरात फिरून थोडी विश्रांती घेतली आणि मग महागडे असले तरी थोडी खरेदी करायचे ठरवले व लगेच दुकानात जाऊन खरेदी केली कारण महाग असले तरी काही वस्तू मात्र फक्त इथेच मिळतात जसे की जेली चॉकलेट  आता मी  पंचगंगा मंदिराकडे निघालो याठिकाणी कृष्णा, कोयना , वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्यांचा उगम झाला आहे हे आपणाला ज्ञात असेलच !अगदी काही पावलांच्या अंतरावर  हे मंदिर आहे काळ्या रंगाचे दगड वापरून  मंदिराचे बांधकाम केले आहे व गोमुखातून सतत वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आपल्याला सातत्य व गतीशीलतेचा संदेश देतो तसेच संपूर्ण महाराष्ट्रातला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना , कृष्णा या नद्यांचे इतके छोटे छोटे रूप पाहून निसर्गाच्या मोठेपणाची जाणीव होते याठिकाणी येण्याची हि माझी तिसरी वेळ परंतु मला मात्र नवीनच वाटत होते कारण मला काही आठवत नव्हते  मंदिरावर पत्रे असून बांधकाम मात्र दगडी आहे आणि गोमुखातून येणाऱ्या सन्ततधारेचे पाणी तर अप्रतिम आहे थंडगार आणि गोड इथे त्या पाण्यात  हात पाय धुण्यासाही सक्त  मनाई आहे अगदी गोमुखातून पडणाऱ्या पाण्यातही  थोडावेळ मंदिरात बसून मी मंदिराच्या आवारात आलो होतो दोन्ही बाजूंनी असणारी दुकाने पाहत न्याहळत मी परत गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी आलो  
                   महाबळेश्वर मंदिराच्या अलीकडेच थोड्याच अंतरावर सावित्री पॉईंट ऑर्थरशीट पॉईंट माझेरी पॉईंट एल्फिन्स्टन पॉईंट अशी माहिती असलेली पाटी पहिली होती ऑर्थरशीट पॉइंटलाच विंडो पॉईंट असे म्हणतात आणि तो महाबळेश्वर पासून सर्वात दूर असणारा हा पॉईंट आहे, अंतर आहे  14किमी या मार्गावर प्रथम एल्फिन्स्टन पॉईंट लागतो एल्फिन्स्टन पॉईंट व ऑर्थरशीट पॉइंट या दोन पॉईंट मध्येच माझेरी पॉईंट, सावित्री पॉईंट इको पॉईंट इ पॉईंट आहेत प्रत्येक पॉइंटवरून दिसणारे दृश्य पाहून मन आनंदी होते सावित्री पॉइंटवरून सावित्री नदीचे विशाल खोरे दिसते तसेच दरीमध्ये एका उंचवट्यावर असणाऱ्या तीन दगडांना गांधीजींची माकडे असे म्हणतात कारण त्या दगडांचा आकार माकडासारखा दिसतो म्हणून!!!
               मी गाडी सुरु करुन येथे असणाऱ्या पाटीजवळ आलो आणि सावित्री पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे जात होतो वाटेत माझेरी पॉईंट लागला त्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि त्या ठिकाणी दूरवर असणारे डोंगर दऱ्या पाहताना खूप आनंद झाला होता अगदी चित्रातल्याप्रमाणे दिसणारे दृश्य पाहून मन प्रसन्न होऊन गेले होते व त्या वेळी मी एक गोष्ट अनुभवली कि माणूस कितीही तंत्रज्ञान वापरत असला तरी निसर्गापुढे तो खूप लहान आहे  येथून पुढे गेल्यावर समोरच होता सावित्री पॉईंट
             सावित्री पॉईंट जवळ आत्ता पायऱ्यांचे बांधकाम केले आहे आणि त्यामुळे तेथे जाणे सोयीचे होते सावित्री पॉइंटच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की या ठिकाणी सावित्री नदीच्या संपूर्ण खोऱ्याचे दर्शन इथून घडते उंचउंच डोंगररांगा सह्याद्रीच्या आणि खोल खोल दऱ्या जीव घाबरवून टाकणाऱ्या हवेतला गारवा आणि समोरचे हे मन प्रसन्न करणारे दृश्य पाहून इथून पायच निघत नाही मावळतीकडे कळलेला सूर्य आणि सावित्रीचे पाणी पाहून मन उल्हासित झाल्याशिवाय राहत नाही  
सावित्री पॉईंट जवळच इको पॉईंट आहे याठिकाणाहून आपलाच प्रतिध्वनी ऐकू येतो याठिकाणी मी असताना शहरातील एक मुलगा आपल्या मम्मीला जोक सांगत होता तो असा : एक जोडपे या ठिकाणी येते व प्रियकर त्याचे नाव उमेश असते तो प्रेयसीचे नाव (अंजली)घेऊन जोरात ओरडतो  व तोच आवाज त्याला परत परत ऐकू येतो 5-6-7-8 वेळा त्याला कौतुक वाटते व मजाही वाटते तो आपल्या प्रेयसीला स्वतःच्या नावे ओरडायला सांगतो ती उमेश$$$$$ असे ओरडते पण प्रतिध्वनी मात्र सुरेश,गणेश, परेश, निलेश, शैलेश असा 5-6-7-8वेळा ऐकू येतो (हशा) मलाही हसू आवरले नाही सावित्री नदीच्या पात्रात दूरवर पाहत माझ्याही ओठावर हसू उमटले असो,  या पॉइंटवर  रस्तेही चांगले आहेत आणि पॉइंटपर्यंत जायला पक्क्या पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत आणि रेलिंगही बसविण्यात आले आहेत सावित्री पॉईंट ऑर्थरशीट पॉईंट माझेरी पॉईंट एल्फिन्स्टन पॉईंट या ठिकाणाहून आपल्याला प्रतापगडाचे दर्शनही होते दुर्बिनवाले आपल्याला 10 रुपयांत प्रतापगडावरील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा दाखवतात माकडेही मोठ्या प्रमाणात आहेत आणि ती माणसाळलेली देखील आहेत गाडी सावित्री पॉइंटवर लावून चालत चालत मी विंडो पॉईंट वर आलो  थोड्या शेंगा विकत घेऊन माकडांना खायला दिल्या आणि खिडकीवर गेलो विंडो पॉईंट म्हणजे ऑर्थरशीट पॉइंटवर एक खिडकीवजा बांधकाम केले आहे तेथून आपल्याला दूरचा मुलुख न्याहाळता येतो येथे आल्यावर माझे मन मात्र भूतकाळात गेले 
                  जेंव्हा मी पहिल्यांदा महाबळेश्वरला आलो होतो तो काळ साधारणपणे शैक्षणिक सत्र 2002-03   होते जानेवारी2003 मध्ये पुण्याहून शाळेची सहल घेऊन आलो होतो खरे तर सहलीबरोबर आलो होतो असे म्हणनेच योग्य होईल कारण मी फक्त सोबतच आलो होतो सहलीचे नेतृत्त्व माझ्या सहकारी मित्रांकडे होते त्यावेळेच्या सहकाऱ्यांची खूप आठवण झाली अनिता पवार शिंदे मॅडम  मॅडम चौधरी मॅडम सोमवंशी मॅडम भरणे मॅडम सातपुते सर मोहन इंगळे सर शीतल वाघमारे मॅडम  आमच्यासर्वांच्याच जीवनातील संघर्षाचा काळ होता तो त्याकाळात जुळून आलेले ऋणानुबंध अजून घट्ट आहेत आज आम्ही सर्व जण स्थिर झालो सुखी झालो आणि आपापल्या परीने आमच्या शिक्षण क्षेत्राची सेवा करत आहोत आज आमचा संपर्क नसेल, सहवास नसेल मात्र सहवासाचा सुगंध मात्र आजही मन आणि आठवणी सुगंधित करतो  आजही हा लेख जर त्यांच्या वाचनात आला तर एकमेकांची आठवण त्यांनाही आल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी काढलेल्या फोटोची आठवण ताजी झाली आणि आताही फोटो काढण्याची ईच्छा अनावर झाली.
                माझ्यासारख्याच तिथं आलेल्या मुलाकडून दोन तीन फोटो काढून घेतले रमतगमत दाट झाडीतून गाडीकडे आलो पाणी पिऊन फ्रेश झालो  मन मित्रांच्या आठवणीने भरून आले होते व परत एकदा गाडीला किक मारली जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त महाबळेश्वर पालथे घातले होते तीन सव्वा तीन वाजले असतील  मला आता प्रतापगडाची ओढ लागली होती  परत एकदा महाबळेश्वरजवळ जाऊन प्रतापगडाच्या घाटरस्त्याला लागलो कानात घुमत होती आवडती गायिका अलका याज्ञीकची गाणी   उजवीकडे महाबळेश्वरमधील सर्वात पश्चिमेकडील पॉईंट म्हणजे लॉड विक पॉईंट बॉम्बे पॉईंट(सनसेट पॉईंट) असे पॉईंट सोडून मी घाट उतरत होतो गाडीचा वेग नियंत्रणात ठेऊन कानात घुमणाऱ्या गाण्यामुळे आणि खराब रस्ता असूनही सभोवारचा निसर्ग देहभान हरवून टाकत होता अनेक ठिकाणी अवघड वळणे घेत मी जात असताना अनेक ठिकाणी डोंगरावरून कोसळणाऱ्या छोट्या छोट्या धबधब्यांचे दर्शन मनाला भुरळ पडत होते अन मी माझ्या मस्तीत गाणी ऐकत घाट उतरत होतो मला दुरूनच प्रतापगडाचे दर्शनही होत होते आणि सभोवार होता जावळीचा किर्रर्र परिसर ज्यात स्वराज्य बुडवून शिवरायांना जिवंत किंवा मुडदा पकडून विजापूरला नेण्याची शपथ घेणाऱ्या अफजलखानाच्या 10 हजार फौजेचा धुव्वा मूठभर मावळ्यांनी उडवला होता आणि  तो याच सह्यगिरीच्या साह्याने अन साक्षीने !!!!
 क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये



बुधवार, ४ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग सहा*🌿🌿
         वेण्णा तलावापासून बाजारपेठेजवळून तापोळ्याला जाणाऱ्या रस्त्याने मी जात होतो तापोळेला जाताना मिनी काश्मीर असे बरेच फलक दिसले तापोळे बामणोली या ठिकाणी कोयना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जलक्रीडेच्या अनेक बोटी आहेत आपल्याला अनेक ठिकाणी तेथून जाता येते वासोटा किल्लाही पाहता येतो 
      महाबळेश्वर ते तापोळे 27 किमी अंतर आहे तापोळे या ठिकाणी जाऊन परत येणे असे ठरवले होते    मिलिंद गुणाजी यांच्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे एका बाजूने कोयना व एका बाजूने सोळशी या दोन नद्या वाहतात आणि मध्ये असणाऱ्या डोंगर रांगेवरून रस्ता आहे घनदाट झाडी इतकी आहे की संपुर्ण रस्त्यावर सावलीच असते तापोळेला पोहोचण्यापेक्षा रस्त्याचा प्रवासच अतिशय रमणीय आहे पण प्रत्यक्ष मात्र असे आढळले नाही आणि रस्ता अतिशय खराब असल्याने तापोळे येथे जायचे मी रद्द करून त्या मार्गावर साधारणपणे 16 किमी अंतरावर असलेल्या शिवसागर पॉईंट या ठिकाणी जाऊन आलो आहे या पॉइंटवरून कोयना धरणाचा जलाशय   म्हणजेच शिवसागराचे विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न होते सह्याद्रीच्या विविध डोंगरांच्या कुशीत फाट्या फाट्याने शिरलेले पाणी पाहून आपण महाबळेश्वर किंवा महाराष्ट्रामध्ये आहोत असे वाटतच नाहीतर आपण  अगदी  परदेशातील एखादया निसर्गरम्य ठिकाणी आहोत किंवा हॉलिवूड मधील दृश्य पहातो आहोत असा भास होतो अतिशय सुंदर व मन प्रसन्न करणारे दृश्य आहे आणि ते पाहून मन हरखून जाते तिथून पाय निघता निघत नाही
         वेळ कसा गेला आणि किती वेळ गेला हे कळतही नाही महाबळेश्वरच्या मानाने थोड्या उघड्या माळावर हा पॉईंट आहे इथे हॉटेलचीही बरीच उणीव जाणवते येथून तापोळे 10 ते 12 किमी अंतरावर आहे अतिशय सुरेख दिसणारे निसर्गाचे रूप पाहून मी परत फिरलो या मार्गावर रस्ता सोडला तर बाकी सर्व एकदम मस्त आहे सुंदर आहे महाबळेश्वरमधील एक गोष्ट म्हणजे कोणत्याही पॉइंटवर जायचे असेल तर परत मार्केटजवळच यावे लागते त्यामुळे मी परत फिरलो त्या मार्गावर साधारण 10 किमीवर एक पॉईंट आहे नाव त्याचे नाव माझ्या लक्षात नाही बहुतेक शिवकालीन पॉईंट असे काहीतरी असावे या ठिकानाहूनही अत्यन्त चांगले दृश्य पहायला मिळते येथे रस्त्यालगतच एक छोटा धबधबा आहे आणि एकच टपरीवजा हॉटेल, मी येथे थांबलो असता एकदोन वाहनचालकांनी शिवसागर पॉईंट कुठे आहे? अशा प्रकारचे प्रश्न विचारले असता हॉटेल मालकीण असणाऱ्या आजीने मी अशी माहिती सांगण्यावर नाराजी व्यक्त केली आणि कारण तिच्यामते गाडी थांबवून तिला विचारले म्हणजे ती हाच शिवसागर पॉईंट आहे असे सांगेल आणि तिची काही खरेदी केली जाईल पण मी मात्र तिचं गिऱ्हाईक तोडत होतो असे तिला वाटत होतं असो, मी थोडावेळ थांबून पुढे निघालो  महाबळेश्वरचीच नाही तर कोणत्याही ठिकाणची प्रवासाची मजा घ्यायची असेल तर बाईकवरच जायला हवे मी परत बाजारपेठेजवळ आलो आणि विल्सन पॉइंटची चौकशी केली
       महाबळेश्वरमधील  बाजार पेठेपासून सर्वात जवळचा व महाबळेश्वरमधील  उंचावरचा पॉईंट म्हणजे विल्सन पॉईंट होय. महाबळेश्वरमधील सर्व पॉइंटची, रस्त्याची नावे इंग्रज अधिकारी, माणसं यांच्या नावावरूनच असलेली आपल्याला आढळतात 2 किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाणारा रस्ता एकेरी असून दुतर्फा घनदाट झाडी आहे त्यामुळे जातानाच खूप मजा येते अतिशय घनदाट जंगल आहे अक्षरश: सूर्यकिरणेही जमिनीवर पोहोचत नाहीत उंचीवर गेले की मात्र खूप मोठे मैदान दिसते तसेच पोलीस चौकीही असावी खूप मोठे मैदान असून या मैदानाच्या कडेवर दोन उंच चबूतरे बांधले आहेत आपण त्या ठिकाणी बसून क्षितिजापर्यंत दिसणारा सुंदर निसर्ग आपण न्याहाळू शकतो  वातावरणही शांत आहे कसलाही गोंगाट नाही कलकलाट नाही फक्त शांतता ! वेळ कसा जातो हे कळतही नाही  सूर्य डोक्यावर आला तरी गुलाबी थंडी हीच खरी इथली खासियत आहे येथे घोड्याची रपेटही आपण करू शकतो एकदोन घोडेही इथे दिसले  हिरव्यागार डोंगरावरून दूरवरचा परिसर दिसतो त्या ठिकानाहून हलूही वाटत नाही वेळ कसा जातो ते समजतही नाही मी तर तहानभूक विसरून जातो अशावेळी!तिथून परत निघावे वाटत नव्हते मात्र इथेच जास्त वेळ घालवून जमणार नव्हत म्हणून मी परत निघालो विल्सन पॉईंट वरून खाली उतरून येताना दुसऱ्याच मार्गाने आलो होतो या ठिकाणीही असाच एकेरी रस्ता व घनदाट झाडी त्यामुळे मजा अनुभवायला मिळत होती जाताना वाटेत चढ होता पण येताना मात्र उतार होता अरुंद रस्ता तीव्र उतार हेच या रस्त्याचे वैशिष्ट्य आहे आणि रहादरीही खूप कमी आहे मी बाजारपेठेजवळ आलो आणि चौकशी केली ओल्ड महाबळेेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याची आणि पुढे निघालो  बाजारपेठेपासून ओल्ड महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याने मी निघालो होतो याच रस्त्यावर मधमाशीपालन केंद्र आहे त्याठिकाणी अस्सल मध गोळा करून विकला जातो येथे मी थांबलो नाही त्यामुळे मला जास्त माहिती सांगता येणार नाही तसेच प्रत्येक पॉइंटवर शेंगा,फुटाणे स्ट्रॉबेरी, लांबलचक गाजरे, जेली चॉकलेट कंदमुळे सॉस यांची रेलचेल असते महाबळेश्वरपासून ओल्ड महाबळेश्वर थोडे दूर आहे जाताना वाटेत एक पॉईंट लागतो तो म्हणजे केट्स पॉईंट रस्त्यापासून 4 किमी अंतरावर आहे याचे परंतु मी मात्र महाबळेश्वराच्या मंदिराकडे निघालो होतो कारण 1 वाजला होता आणि मला अजून बराच लांबचा टप्पा पार करायचा होता मंदिराच्या अलीकडे थोड्याच अंतरावर सावित्री पॉइंटकडे अशी पाटी दिसली 
             पार्कींग मध्ये गाडी पार्क करून महाबळेश्वराच्या मंदिराच्या आवारात प्रवेश केला गर्दी खूप कमी होती कारण सणाचे दिवस होते गर्दी अगदी नाच्या बरोबर होती येथे खूप मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत आणि सगळीकडे एकाच मालाची विक्री केली जाते मध जेली कातडी वस्तू अशा दोन्ही बाजूंनी दुकाने असणाऱ्या रस्त्याने मी हजारो वर्षे पूर्ण केलेल्या महाबळेश्वरच्या  मंदिरात जाऊन शांत वाटत होतं मनातल्या मनात ओम नमः शिवाय चा जप सुरु होता अंधाऱ्या गाभाऱ्यात शिरून शिवलिंगाचे दर्शन घेतले नंदादीपाच्या  मंद प्रकाशात शिवलिंग तेजस्वी भासत होते मंदिराबाहेर मंदिराचा जीर्णोद्धार कधी , कुणी , केंव्हा केला आहे याची माहिती मिळाली पण मला मात्र मनात एकच घटना आठवत होती तुम्हांलाही आठ्वलीच असेल…… अगदी बरोबर!! 
       छत्रपती शिवरायांनी याच मंदिरात माँसाहेब जिजाऊ साहेब यांची सुवर्ण तुला केली होती येणारी हजारो वर्षे लोटली तरी महाबळेश्वर मंदिरातील मातीचा कण अन कण ती घटना विसरू शकणार नाही अन महाराष्ट्राची मातीही! 
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

भाग पाच

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग पाच*🌿🌿
              लिंगमळा धबधब्याकडे जाणारा रस्ता अतिशय खराब आहे माझ्या संपूर्ण प्रवासात बराचसा रस्ता खराबच होता तीन चारच किमी रस्ता आहे घनदाट जंगल इतके कि ऊनही जमिनीपर्यंत पोहचत नाही लिंगमळाच्या अलीकडे 500 मीटरवर गाडी थांबवावी लागते तिथे जि प चे रेस्ट हाऊस आहे मोठे पटांगण असून तिथल्या वातावरणात मन रमून जाते धबधब्याकडे जाणारा रस्ता हा सोप्या पायऱ्यांचा असून तो नुकताच तयार करण्यात आला आहे आणि तो दाट जंगलातून जातो तसेच धबधबा अतिशय धोकादायक असल्याने तेथे जाण्याची वेळ नक्की ठरवण्यात आली आहे सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण धबधबा पाहू शकतो वातावरण अतिशय आल्हाददायक आहे  थोड्या पायऱ्या उतरल्या कि डावीकडे 100 मीटर वर एक डोह असून पाणी अतिशय नितळ व स्वच्छ असून आपण तिथे जाऊन पोहण्याचा आंनद घेऊ शकतो तिथे पाण्यात पोहण्याचा आनंद घेणे हे अविस्मरणीय ठरू शकते वेण्णा नदीवर असलेल्या वेण्णा धरणातून पाणी सुटले कि इथे भरपूर प्रमाणात पाणी असते नदीपात्रात अनेक झाडे असून आपण डिस्कव्हरी, जिओग्राफीक इ चॅनेल पाहतो असे वाटते नितळ निळे पाणी पाहून कोणालाही पोहण्याची ईच्छा होणे सहज शक्य आहे तसेच आपण तिथल्या दाट झाडांच्या फांद्याच्या गर्दीत बसून जेवण करू शकतो तसेच खळाळणाऱ्या पाण्याचा दुरूनच आनंद घेऊ शकतो इथून  डावीकडे 500 मीटरवर धबधबा पॉईंट आहे तिकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रेलिंग असून रस्ता पक्का व पायऱ्यांचा आहे आपण  रमतगमत अगदी पंधरा  मिनिटात धबधबा पॉइंटवर पोहोचू शकतो  दाट झाडीतून जाणारा रस्ता वेगवेगळ्या पक्ष्यांचा मंजुळ आवाज अन निरव शांतता प्रस्थापित झालेली आणखी काय हवे साधारण सव्वा आठ वाजता मी पायऱ्या उतरू लागलो होतो पंधरा मिनिटात पॉइंटवर पोहोचलो वाटेत एका बाजूला रेलिंगच्या खाली असणारी खोल दरी इतकी कि तळ सापडत नाही खाली नजर ठरत नाही डोळे गरगर करू लागतात दूरवर असणारे वेण्णा नदीचे खोरे मन प्रसन्न करून टाकते एक ठिकाणी अरुंद रस्ता होता त्याच्या रेलिंगवर तीनचार माकडे बसली होती एकदोन खाली होती खूपच धीट होती  मला रस्ता सोडिनात एक माकड आपल्याला घाबरवयाला पुरे! इथे तर इतकी होती अन मला पुढे जायचे धाडस होईना चार पाच मिनिटे यातच गेली जणू मला माकडं वाकुल्या दावीत होती आता आली का पंचाईत! शेवटी मी मन घट्ट करून जंगलाच्या कडेने पुढे चाललो आणि मोबाईलचा कॅमेरा सुरु केला हेतू असा की जर काही घडले तर आपल्याला कळावे काय झालं ते!माकडे अन माझ्यातले अंतर क्षणाक्षणाला कमीकमी होत होते  एक फुटाच्या अंतरावरून जात असताना मात्र भीती खूप दाट झाली होती मागे वळून जावे का? असाही विचार केला पण आता पुढेच जाणे योग्य होईल असा विचार करून जात होतो अचानक मला दिसले की माकड मला घाबरून  दूर पळाले अन त्याला घाबरून मी असो, जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे नदीचे पात्र नजरेच्या टप्प्यात यायला लागते सुरवातीपासूनच  एक दिड हजार फूट उंचीवरून पडणारे पाणी व त्याचा एक गंभीर आवाज खूपच मस्त वाटतो पण काळजी घेणे आवश्यक आहे कारण रेलिंगच्या खाली खूप खोल खोल दरी आहे रेलिंगवर रेलून उभे राहणे रेलिंगच्या बाहेर  जाणे सेल्फी काढणे धोकादायक आहे अश्या अनेक पाट्या पहायला मिळतात अन हे खरेच धोकादायक आहे दरीतून पाहतानाही डोळे गरगरु लागतात आणि त्या वेळी काळजी घेणे आवश्यक असते समोर वेण्णा नदीचे खोरे पहायला मिळते महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवर धबधबा असून पावसाळ्यानंतर काही काळ तो टिकतो लिंगमळा पाहायलाही खूप मजा येते सोबतीला कोणी असेल तर खूप मज्जा येते पण निःशब्द वातावरणात एकट्याने निसर्गाशी संवाद साधण्याची मजा काही औरच, यावेळी माझ्यासोबत कोणीही नव्हते ना आपले ना परके आजच्या या वेळी मी एकटाच होतो इथे नाहीतर माकडांना कोण घाबरतो? 
       हेडफोनवर गाणी ऐकत मस्त भटकंती करणे मला खूपच आवडते  याच मस्तीत लिंगमळा पाहत होतो पॉईंटवर रेलिंग असून त्या ठिकाणी उभाराहून धबधबा पाहणे योग्य ठरते मस्ती करणे स्टंट करणे सेल्फी घेण्याची धडपड जीवावर बेतू शकते लहान मुले असतील तर त्यांचा हात सोडूच नये या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवूच नये उंचावरून फेसाळत पडणारे पाणी त्याचे उडणारे तुषार खूपच सुंदर दिसत होते आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात वेण्णा नदीचे पात्र तर जणू चांदीच्या दागिन्यांचा चंदेरी रस वाहत असल्याचा भास होतो नदी दूरवर पाहणे जरी मस्त वाटत असले तरी जवळच्या दरीमध्ये मात्र खूप भीती वाटते  लिंगमळा पाहून आपल्याच मस्तीत वेगळ्या विश्वात गेल्याचे भासत होते अर्धा तास लागतो पाहायला पण तेथील जंगलात अक्खा दिवसही कमी पडतो म्हणून महाबळेश्वर पाहायचे असेल तर 3-4दिवस तरी हाताशी हवेतच एकाच दिवशी सर्व ठिकाणी जाऊन पहाण्यात मजा येत नाही एकेका पॉइंटवर अर्धा दिवस एक दिवस घालवणेच उत्तम आहे मग प्रवासाचा कंटाळा येणार नाही आणि आपला आनंद द्विगुणित होईल लिंगमळा पाहून डोहाकडे जाऊन लगेच परतलो अन मागे वळून न जाता तसेच पुढे गेल्यावर एक 4-5 किमी अंतरावर पाचगणीहून येणाऱ्या रस्त्याला येता येते हा रस्ताही खराबच आहे पण सभोवतालचा निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने आपल्याला त्रास होत नाही मुख्य रस्त्याला आल्यावर तेथून जवळच असलेल्या वेण्णा तलावाजवळ आपण येतो इथे  आपण बोटिंगची मजा घेऊ शकतो पण मी मुख्य रस्त्याला लागलो आणि लगेच काहीतरी खावे असे ठरवले लगेच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जैन  व्हेज हॉटेलात नाश्ता करण्यासाठी थांबलो हॉटेल अगदी साधे होते पण शांतता अन स्वच्छता चांगली आहे पाणीही फिल्टरचे असल्याने अन स्वच्छता असल्याने पाणी बाटली विकत नाही घेतली तरी चालते मी  ग्लासभर  पाणी पिल्यावर मी  मेनूकार्डवर नजर फिरवली व माझे डोळे विस्फारु लागले महाबळेश्वर महाग आहे हे माहित होते पण इतके ? हे माहित नव्हते  एक ओनियन उत्तपा एक चहा व एक पाणी बॉटल याचे बिल दोनशे रुपये पेक्षा जास्त आहे त्यामुळे येथे येताना खिसा गरम असायलाच हवा हे नक्की! नाश्ता झाल्यावर न थांबता  लगेच पुढे निघालो होतो थोड्या अंतरावर असलेल्या वेण्णा तलावाच्या काठावर पोहोचलो अतिशय नितळ निळे पाणी अन त्यावर उठणारे तरंग अतिशय सुरेख दिसतात आणि फोटो पाहिल्यावर तर हे ठिकाण म्हणजे काश्मीरच असावे असे वाटते त्या ठिकाणी जाऊन बोटिंग करणे म्हणजे एक पर्वणीच वेण्णा तलाव हे ठिकाण कोणालाही आवडणारे असेच आहे कुणीही सहजपणे याच्या प्रेमात पडेल असे आहे त्याच बरोबर तेथे अनेक ठिकाणी नाश्ता भेळ पाणीपुरी याचे ठेले आहेत बार्शीचे भगवंत मैदान सोलापूरचे होम मैदान मुंबईची चौपाटी याठिकाणी असतात तसेच पण आता थोड्या वेळापूर्वीच पोटपूजा झाल्याने तो मोह आवरता घेऊन तलावाच्या काठावर बसलो निवांत वाटत होते वेगवेगळ्या ठिकाणी  फोटो काढले अन पुढे निघालो महाबळेश्वर पाहण्यासाठी पर्यटकांनी नकाशा पाहून कोणते पॉईंट पहायचे ते ठरवणं योग्य ठरते कारण पॉईंट दूर दूर आहेत  त्यामुळे गैरसोय होत नाही आणि एका पॉईंट वर थोडासा तरी वेळ घालवला पाहिजेच नाहीतर पुढील पॉइंटवर गेलो की काही निरस मंडळी इथे काय तिथल्यासारखेच आहे असे म्हणतात  माझा पुढील प्रवासाचे नियोजन तापोळे,विल्सन पॉईंट,ओल्ड महाबळेश्वर असे होते एक दिवस नियोजन असेल तर काही पॉईंट न पाहनेच योग्य ठरते काही ठराविक पॉइंटवर वेळ घालवणेच उत्तम.
क्रमश:
 
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


सोमवार, २ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग चार*🌿🌿
    ठरल्याप्रमाणे सहा वाजता निघायचे नक्की केल्याप्रमाणे सहा वाजता सर्व आवरून गाडी सुरु केली 
                आजचा मार्ग होता मेढा-महाबळेश्वर-प्रतापगड-पोलादपूर-महाड साताऱ्याच्या धुक्यातून मार्ग काढत मी मेढ्याच्या दिशेने निघालो होतो वाटेत कोणालाही विचारायची गरज पडली नाही महाबळेश्वर अंतर आहे 55 किमी तर पोलादपूर 80 ते 90 किमी म्हणजे आज मला गाडीवरचा प्रवास तसा कमीच होता पण इतरत्र फिरायचे असल्याने  200 किमीपर्यंत आजचा प्रवास होईल असे वाटते घाट रस्ता असल्याने दोन तासांचे अंतर आहे मी एकटाच आपल्याच धुंदीत अन मस्तीत निघालो होतो मनात कुठलीच शंका किंवा भीती नव्हती अर्धा पाऊण तासात मी मेढ्यात पोहोचलो एका छोट्या हॉटेलात चहा प्यायला थांबलो हॉटेलचे नाव माहित नाही पण चहा मात्र एकदम अप्रतिम होता हॉटेल समोर उभे असताना एक मध्यमवयीन जोडपे माझ्याजवळ आले ते मुंबईहून आलेले होते त्यांना न्यायला येणारी व्यक्ती मीच असावी असे वाटले हेल्मेटमुळे त्यांना नीटसे ओळखता आले नाही त्यांनाही चहा घेण्याचा आग्रह केला त्यांची विचारपूस करता कळले की जवळच्या खेडेगावातील असून त्यांचे गाव कोयना धरणामुळे विस्थापित आहे आणि त्यांच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणात विस्थापित झाले बरेच लोक तर पंढरपूरजवळील वाखरीजवळ सह्याद्रीनागर येथे राहतात चहा घेऊन त्यांना निरोप देऊन मी निघायच्या विचारात होतो वातावरणात बऱ्या प्रमाणात गारवा होता पण माझ्याकडे गरम कपडे असल्याने थंडी वाजत नव्हती पण येथे अशी तऱ्हा तर महाबळेश्वरमध्ये किती थंडी?असे मनात आले अन 8 च्या ऐवजी 10 वाजता जावे काय?असे वाटले पण जाऊन पाहू  काय होतंय ते असे ठरवून मी माझ्या बाईकला किक मारली पूर्व दिशेला सूर्यनारायण दिसू लागले होते गुलाबी थंडी , कोवळी सूर्यकिरणे,दुतर्फा आकाशाला गवसणी घालणारे डोंगराकडे, मोठमोठी झाडे, हेडफोनवर आवडीची भक्तिगीतं अन अभावानेच आढळलेला  गुळगुळीत रस्ता यामुळे प्रवास मस्त सुरु होता लगेच, घाट सुरु  वाहने सावकाश चालवा घाटात थांबू नका दरड कोसळण्याची शक्यता अशा अनेक सूचना असणाऱ्या पाट्या आढळू लागल्या झाडी अगदी दाट झाली होती आता 18-20 किमीचा घाट चढून जायचा होता धोकादायक रस्ता अवघड वळणे यामुळे गाडीचा वेग30-40 पेक्षा जास्त नव्हता आणि मलाही गडबड नव्हतीच ती उत्तुंग वळणे आणि त्या ठिकाणी असणारा निसर्ग रमणीय तर होताच पण अगदी जिवलग मित्राप्रमाणे साथ देत होता तो प्रवासच इतका सुंदर होता की मनात विचार आला ध्येय साध्य करण्यात जेवढा आंनद त्यापेक्षा अधिक प्रमाणात आंनद त्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात आहे. जीवनाचा आनंद कशात आहे? मोक्ष मिळविण्यात कि जीवन जगण्यात! तर जीवन जगण्यात जीवनाचा आनंद हा जीवनप्रवासातच आहे असो.
                घाटचढत असताना काही ठिकाणी शाळकरी मुली धावण्याचा सराव करत असताना दिसल्या अन खूप बरे वाटले त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की त्या जि प शाळेच्या असून जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेची तयारी करत आहेत महाबळेश्वर अजून 12 किमी होते मी पुढे निघालो 4-5 किमी अंतर गेल्यावर समोरच बगदाद पॉईंट 4 किमी असा बोर्ड दिसला महाबळेश्वर अजून दूर होते बगदाद पॉईंटला जावे असे ठरवले  आणि चार किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी पाहिले निसर्गाचे सौंदर्य सूर्य थोडा वर आला होता आणि कोवळे ऊन छान वाटत होते दूरवर पसरलेला सह्याद्री त्याच्याकुशीतील छोटी छोटी घरे नागमोडी रस्ता अन त्यावर चमकणारी सूर्यकिरणे यामुळे जणू रस्त्यावर चांदी सांडली असल्याचा भास होत होता अगदी चित्रातल्याप्रमाणे दिसत होते सोबत कुणीच नव्हते अगदी सकाळची वेळ आणि पर्यटकांची गर्दी नसलेल्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेता येतो अगदी व्यवस्थितपणे, पहिलाच पॉईंट होता आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य  अनुभवले आणि इथूनच हलू वाटत नाही आणि मग पुढील पॉइंटवर तर पायच निघणार नाही असे वाटले दाट जंगल आणि रस्ताही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केला होता नुकताच त्यामुळे गुळगुळीत होता,थोडे फोटो काढल्यावर परत मुख्य रस्त्यावर येत येत असताना  मेणाचे संग्रहालय दिसले परंतु ते अजून उघडले नव्हते या ठिकाणी मादाम तुसा या संग्रहातील पुतल्याप्रमाणे मेणाचे पुतळे असल्याचे समजले मुख्य रस्त्याला येण्या आगोदर एका छानशा हॉटेलात चहासाठी थांबलो हॉटेल सुंदर होते अगदी सिनेमात पाहतो तसे लहान मुलांसाठी खेळणी ,झोपाळेआरामखुर्च्या,वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या  वाचण्यासाठी वेगवेगळ्या सोयी,स्विमिंग पूल छोटी बाग वातावरण अतिशय सुंदर आणि मस्त होते अगदी सकाळची वेळ असल्याने  मी पहिलेच गिऱ्हाईक असल्याने चहासाठी थोडा वेळ लागला तोपर्यंत मीही संपूर्ण हॉटेल मध्ये फेरफटका मारला चहाची चवही एक अगदीच सर्वसाधारण होती सकाळी मेढयात घेतलेल्या चहाची चव अन हि चव जमीन अस्मानाचा फरक होता पण किंमत मात्र दुप्पट तिप्पट नाहीतर सहापट आहे 30 रु एक कप!! पण येथे काय फक्त गरमागरम हवे पण थंडीही फारशी नव्हतीच 
 सव्वा आठ वाजले होते अनोळखी ठिकाणी जाताना रस्ता माहित नसतो त्यामुळे प्रवासाचा खरा आनंद मिळतो असे नाही पण परत येताना मात्र प्रवासाचा निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो मुख्य रस्त्याला लागलो दोन्ही बाजूला उंच उंच झाडे अन गुळगुळीत रस्ता यामुळे प्रवासात मजा येत होती थोड्या अंतरावर गणेशमंदिर आहे मंदिर परिसरात अतिशय स्वच्छता  आहे नुकतीच पूजाऱ्याने पूजा केली होती त्यामुळे वातावरणात धुपदीप फुले यांच्या सुगंधाची अनुभूती होत होती गाभाऱ्यातील मंद प्रकाशात श्रीगणेशाचे दर्शन घेऊन मी मंदिरातून बाहेर आलो थोड्या अंतरावरून उजवीकडे लिंगमळा धबधबा असा फलक दिसला दोन तीन किमी अंतरावर हा धबधबा आज घनदाट जंगलातून एकेरी रस्ता आहे सकाळची वेळ असल्याने कोणीही संगतीला नव्हते 
       एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे या जंगलात गवा( रानरेडा)असतो गवा हा रेड्यासारखा दिसणारा प्राणी आहे त्यामुळे त्याला रानरेडा असे म्हणतात रात्री उशिरा व सकाळी लवकर हा प्राणी आपल्याला दिसू शकतो  मात्र मी इतक्या लवकर इथे येऊन पोहोचलो होतो तरी मला मात्र गवा आढळला नाही  या परिसरात गवे आहेत पण अशा प्रकारे माणसावर हल्ला करण्याची घटना घडतात असे ऐकले होते पण अलीकडच्या काळात अशी घटना घडली नाही पण रानरेडा माणसावर हल्ला करू शकतो जर आपल्याला गवा दिसला तर त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये त्याचे लक्ष विचलित करू नये आपण काही हालचाल केल्यास कोणत्याही जंगली प्राण्याला असुरक्षित वाटते त्यामुळे तो आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता असते आपल्या समोरून तो जात असेल तर त्याला जाऊ द्यावे आपण गाडीचा हॉर्न वाजवू नये तो आपोआप जातो मला थोडी भीती वाटत होती पण मला गवा आढळला नाही 
लिंगमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने मी चाललो होतो मनात गव्याची भीती वाटत होती वाटेत चिटपाखरूहि दिसत नव्हते त्यामुळे सकाळचे वातावरण पण गंभीर वाटत होती रस्ता अतिशय खराब होता रस्त्यावर दुतर्फा घनदाट झाडी होती इतकी कि दूरपर्यंत फक्त दहा बारा फुटाचा रस्ताच दिसत होता नुकताच पावसाळा संपून गेल्याने झाडाच्या खोडावर खूप मोठ्याप्रमाणात शेवाळ चढलेले पहायला मिळत होते जागोजागी मला मात्र साग पिंपळ सिसव यासारख्या झाडांचीच फक्त माहिती असल्याने इतर झाडे कोणती हे मात्र समजत नव्हते पण आकाशाला गवसणी घालणारी उंचच उंच झाडे पाहून मन प्रसन्न झाले होते त्यामुळे खराब रस्त्याचा त्रास वाटत नव्हता 
     वाटेत कुणीही भेटत नव्हते पण  रस्ता बरोबर असल्याने भीती वाटत नव्हती आणि सरतेशेवटी मी लिंगमळा येथे पोहोचलो खूप मोठे पटांगण,  शेजारी गेस्ट हाऊस तेथील कर्मचाऱ्यांची चाललेली स्वच्छतेची चाललेली लगबग दिसून आली मोठ्या गेटसमोर गाडी पार्क केली अन तेथे असलेले विविध प्रकारच्या माहितीचे फलक वाचले अन पाणी पिऊन पुढे चालता झालो
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


रविवार, १ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस पहिला🏞🛣🌄
🌍🌍🌍भाग तीन 🌍🌍🌍
       साधारणपणे 3 वाजता साताऱ्यात आलो थोडीशी पोटपूजा करून आता पुढे काय?  याचे नियोजन करू लागलो  साताऱ्यात अनेक पाहण्यासारख्या गोष्टी , ठिकाणे आहेत बऱ्याचदा आपण सातारा म्हटले की याआपण अजिंक्य तारा, कास पठार, सज्जनगड, बामणोली इथेच थांबतो पण अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत  मला अजिंक्यतारा पहायचा होता आजपर्यंत एकदाही पहिला नाही पण तो पाहण्यासाठीबराच वेळ लागला असता आणि पुढचे नियोजन बिघडले असते 
          त्यामुळे आज दिवसभर संग्रहालय व सज्जनगड हि दोन ठिकाणे पहावी असे ठरवले 
   छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून (पवई नका) व बसस्टँड पासून अगदी जवळच संग्रहालय आहे अन तिकीट फक्त 3 रु दर सोमवारी व शासकीय सुट्टीच्या दिवशी हे बंद असते संग्रहालयात शिवयुगातील अनेक वस्तू,साहित्य,वस्त्रे, आभूषणे, हत्यारे आहेत हे पाहताना शिवकाळात गेल्याचा भास होतो अर्धा तास सर्व वस्तू पाहण्यास पुरेसा आहे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे संग्रहालय पाहून मी पुढील ठिकाण पाहण्यासाठी चाललो होतो या अगोदरही मी सज्जनगड पाहायला गेलो होतो पण तेंव्हा मात्र दिवस मावळल्यानंतर किल्ल्यावर गेलो होतो त्यामुळे फक्त रामदास स्वामी यांच्या समधीचेच दर्शन घेतले होते तोही एक मस्त अनुभव होता आज मात्र माझ्याकडे पुरेसा वेळ होता साताऱ्यापासून जवळच्या ठिकाणांपैकी एक कास पठार पण आज मी सज्जनगड पाहायला जाणार होतो एकेरी रस्त्याने गाडीवर जात असताना सभोवरचा मुलुख न्याहळत होतो मन प्रसन्न झाले होते आणि माझ्या मनातील एकटेपणा निघून गेला होता सातारा शहरातून बोगद्यातून बाहेर पडलो कि थोड्या वेळाने सज्जनगडाचे दुरूनच दर्शन होते 
माझा मात्र रस्ता चुकला अन मी कास पठाराच्या दिशेने निघालो होतो बोगद्याच्या अलिकडूनच मी वळलो खरे तर बोगद्यातून पुढे जायला हवे होते असो आणि त्या वेळी घाटात अनेक माकडे होती ती खूप  भुकेलेली होती चार किमी जाईपर्यंत माझ्या लक्षात आले नाही आणि मग मी थांबून एका शाळकरी मुलाला विचारले कारण माझ्या लक्षात आले होते की येथून पुढे निघालो तर कास पठार ला जाईन कारण मागे मी कास पठारला आल्यावर इथल्याच एका हॉटेलात जेवण केले होते रस्ता एकेरी होता मागे वळून मी घाटातून येत होतो त्यावेळी काही ठिकाणी फोटो काढले येथून साताऱ्याचे व अजिंक्यताऱ्याचे नयनमनोहर दर्शन होते अन घाटात असणाऱ्या माकडांना माझ्या जवळची  चपाती दिली माझ्या घरून आणली होती पण ती खायला वेळही मिळाला नाही अन भूकही लागली नव्हती असो घाटात वर्दळही तुरळकच होती त्यामुळे माकडे रस्त्यावर उतरून इकडून तिकडे उड्या मारत होती
   दिवस मावळतीकडे कलत होता मी बोगद्यातून वळून सज्जनगडाच्या दिशेने निघालो अगदी 10-15 मिनिटात मी गडाजवळ आलो गडाच्या पायथ्याजवळ एक खूप उंच हनुमानाची मूर्ती आहे  तेथील समर्थ सृष्टी पाहण्यासारखी आहे व महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन सृष्टी आहे रामदास स्वामीच्या जीवनातील महत्त्वाच्या 15 प्रसंगाची माहिती देण्यात आली आहे तिकीट 40 असून 25-30 मिनिटांची डॉक्युमेंटरीहि तेथे दाखवली जाते पण तेवढा वेळ माझ्याकडे नसल्याने मी मनात असूनही ती पाहू शकलो नाही
गाडी सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगला लावली देवस्थानचे पार्किंग असून रात्रंदिवस चालू असते साडेपाच वाजले असतील आणि मी पाण्याची बाटली घेऊन गडाकडे निघालो होतो थोडे अंतर चालून गेलो की लगेच फरसबंदी व सोप्या पायऱ्या आहेत वातावरण अगदी छान असते पायऱ्या चढून जात असताना रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीच्या मूर्तीही आहेत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ आलो असता पाच मिनिटात फोटो काढून घ्या असा आग्रह दुकानदार करू लागला मी अश्या फ़ंदात सहसा पडत नाही पण तेथे मी अनेक पेहराव फेटे , जिरेटोप व पगड्या पाहून मी त्यांना माझा फोटो काढण्यास परवानगी दिली आणि मग त्या वेळी त्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या आभूषणांनी मला सजवून फोटो काढला आणि लगेच प्रिंटही करून दिला त्याचबरोबर माझ्या फोनमध्येही फोटो काढून दिला 
        परिधान केलेली वस्त्र अन अलंकार काढावेसे वाटत नव्हते पण नाईलाज होता अतिशय जड अंतःकरणाने एक एक आभूषण उतरवले समर्थ महाद्वारातून येत असताना गडाची माहिती देणारा नकाशाही पहिला त्याचा खूप उपयोग होतो सज्जनगडावर पाहण्यासारख्या अनेक वस्तू व वास्तू आहेत त्याची माहिती मी विस्ताराने इथं लिहीत नाही पण आजही रात्री 8:45ला गडाचे दरवाजे बंद केले जातात आणि पहाटे पाचला उघडले जातात 
     जवळची बाटली व चपला ठेऊन मी मठात गेलो एकदम निरव शांतता पसरली होती व त्यामुळे मला खूप छान वाटत होते समर्थांचा पलंग , कुबडी पानपुडा समर्थ शिष्य कल्याणस्वामी हे पाणी आणत असलेला हंडा अशा अनेक  वस्तू आहेत मठाजवळच लागून असलेल्या समाधी मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला शांती लाभली अन मनप्रसन्न झाले काहीवेळ ध्यान करून मी बाहेर पडलो समर्थानी स्थापन केलेल्या मारुतीचे दर्शन घेऊन समाधी परिसरात आलो होतो स्पिकरवर वाजणारी रामधून अन मावळतीकडे कलणारा भास्कर यामुळे वातावरणात एक प्रकारचे कारुण्य पसरले होते आणि माझं मन मात्र प्रसन्न आणि शांत झाले होते 
पायथ्याला असणाऱ्या परळी गावाच्या नावावरून त्याचे नाव परळीचा किल्ला म्हणून ओळखला जात होता पण स्वामी रामदास यांच्या वास्तव्यामुळे त्याचे नाव सज्जनगड असे ठेवण्यात आले समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते सन 1682 मध्ये स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची समाधी बांधून घेतली या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व रामदास स्वामी यांच्या चर्चा, मसलती होत असत
     गडावर भोजनाची अन निवासाची मोफत सोय उपलब्ध आहे सहा वाजले होते आणि मंदिरात मनाचे श्लोक पारायण सुरु झाले होते "मना सज्जना……" सहा ते नऊ या काळात मनाचे श्लोक पारायण , दासबोध पठण व नऊ वाजता भोजन असते माझा पाय निघत नव्हता पण मुक्काम साताऱ्यात करायचा असल्याने मी अतिशय कष्टाने तेथून निघालो आणि मनात मात्र "मना सज्जना……" चे सूर गुंजन करत होते गडाचे दरवाजे आजही नेमाने नऊला बंद केले जातात गडावर अनेक पाहण्यासारख्या वास्तू आहेत चढणंही फारसे नाही समर्थांच्या व शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि इथल्या शांत , गंभीर वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी यायलाच हवे.
        मग काय? येणार ना!!
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये