सोमवार, २ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग चार*🌿🌿
    ठरल्याप्रमाणे सहा वाजता निघायचे नक्की केल्याप्रमाणे सहा वाजता सर्व आवरून गाडी सुरु केली 
                आजचा मार्ग होता मेढा-महाबळेश्वर-प्रतापगड-पोलादपूर-महाड साताऱ्याच्या धुक्यातून मार्ग काढत मी मेढ्याच्या दिशेने निघालो होतो वाटेत कोणालाही विचारायची गरज पडली नाही महाबळेश्वर अंतर आहे 55 किमी तर पोलादपूर 80 ते 90 किमी म्हणजे आज मला गाडीवरचा प्रवास तसा कमीच होता पण इतरत्र फिरायचे असल्याने  200 किमीपर्यंत आजचा प्रवास होईल असे वाटते घाट रस्ता असल्याने दोन तासांचे अंतर आहे मी एकटाच आपल्याच धुंदीत अन मस्तीत निघालो होतो मनात कुठलीच शंका किंवा भीती नव्हती अर्धा पाऊण तासात मी मेढ्यात पोहोचलो एका छोट्या हॉटेलात चहा प्यायला थांबलो हॉटेलचे नाव माहित नाही पण चहा मात्र एकदम अप्रतिम होता हॉटेल समोर उभे असताना एक मध्यमवयीन जोडपे माझ्याजवळ आले ते मुंबईहून आलेले होते त्यांना न्यायला येणारी व्यक्ती मीच असावी असे वाटले हेल्मेटमुळे त्यांना नीटसे ओळखता आले नाही त्यांनाही चहा घेण्याचा आग्रह केला त्यांची विचारपूस करता कळले की जवळच्या खेडेगावातील असून त्यांचे गाव कोयना धरणामुळे विस्थापित आहे आणि त्यांच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणात विस्थापित झाले बरेच लोक तर पंढरपूरजवळील वाखरीजवळ सह्याद्रीनागर येथे राहतात चहा घेऊन त्यांना निरोप देऊन मी निघायच्या विचारात होतो वातावरणात बऱ्या प्रमाणात गारवा होता पण माझ्याकडे गरम कपडे असल्याने थंडी वाजत नव्हती पण येथे अशी तऱ्हा तर महाबळेश्वरमध्ये किती थंडी?असे मनात आले अन 8 च्या ऐवजी 10 वाजता जावे काय?असे वाटले पण जाऊन पाहू  काय होतंय ते असे ठरवून मी माझ्या बाईकला किक मारली पूर्व दिशेला सूर्यनारायण दिसू लागले होते गुलाबी थंडी , कोवळी सूर्यकिरणे,दुतर्फा आकाशाला गवसणी घालणारे डोंगराकडे, मोठमोठी झाडे, हेडफोनवर आवडीची भक्तिगीतं अन अभावानेच आढळलेला  गुळगुळीत रस्ता यामुळे प्रवास मस्त सुरु होता लगेच, घाट सुरु  वाहने सावकाश चालवा घाटात थांबू नका दरड कोसळण्याची शक्यता अशा अनेक सूचना असणाऱ्या पाट्या आढळू लागल्या झाडी अगदी दाट झाली होती आता 18-20 किमीचा घाट चढून जायचा होता धोकादायक रस्ता अवघड वळणे यामुळे गाडीचा वेग30-40 पेक्षा जास्त नव्हता आणि मलाही गडबड नव्हतीच ती उत्तुंग वळणे आणि त्या ठिकाणी असणारा निसर्ग रमणीय तर होताच पण अगदी जिवलग मित्राप्रमाणे साथ देत होता तो प्रवासच इतका सुंदर होता की मनात विचार आला ध्येय साध्य करण्यात जेवढा आंनद त्यापेक्षा अधिक प्रमाणात आंनद त्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात आहे. जीवनाचा आनंद कशात आहे? मोक्ष मिळविण्यात कि जीवन जगण्यात! तर जीवन जगण्यात जीवनाचा आनंद हा जीवनप्रवासातच आहे असो.
                घाटचढत असताना काही ठिकाणी शाळकरी मुली धावण्याचा सराव करत असताना दिसल्या अन खूप बरे वाटले त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की त्या जि प शाळेच्या असून जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेची तयारी करत आहेत महाबळेश्वर अजून 12 किमी होते मी पुढे निघालो 4-5 किमी अंतर गेल्यावर समोरच बगदाद पॉईंट 4 किमी असा बोर्ड दिसला महाबळेश्वर अजून दूर होते बगदाद पॉईंटला जावे असे ठरवले  आणि चार किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी पाहिले निसर्गाचे सौंदर्य सूर्य थोडा वर आला होता आणि कोवळे ऊन छान वाटत होते दूरवर पसरलेला सह्याद्री त्याच्याकुशीतील छोटी छोटी घरे नागमोडी रस्ता अन त्यावर चमकणारी सूर्यकिरणे यामुळे जणू रस्त्यावर चांदी सांडली असल्याचा भास होत होता अगदी चित्रातल्याप्रमाणे दिसत होते सोबत कुणीच नव्हते अगदी सकाळची वेळ आणि पर्यटकांची गर्दी नसलेल्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेता येतो अगदी व्यवस्थितपणे, पहिलाच पॉईंट होता आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य  अनुभवले आणि इथूनच हलू वाटत नाही आणि मग पुढील पॉइंटवर तर पायच निघणार नाही असे वाटले दाट जंगल आणि रस्ताही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केला होता नुकताच त्यामुळे गुळगुळीत होता,थोडे फोटो काढल्यावर परत मुख्य रस्त्यावर येत येत असताना  मेणाचे संग्रहालय दिसले परंतु ते अजून उघडले नव्हते या ठिकाणी मादाम तुसा या संग्रहातील पुतल्याप्रमाणे मेणाचे पुतळे असल्याचे समजले मुख्य रस्त्याला येण्या आगोदर एका छानशा हॉटेलात चहासाठी थांबलो हॉटेल सुंदर होते अगदी सिनेमात पाहतो तसे लहान मुलांसाठी खेळणी ,झोपाळेआरामखुर्च्या,वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या  वाचण्यासाठी वेगवेगळ्या सोयी,स्विमिंग पूल छोटी बाग वातावरण अतिशय सुंदर आणि मस्त होते अगदी सकाळची वेळ असल्याने  मी पहिलेच गिऱ्हाईक असल्याने चहासाठी थोडा वेळ लागला तोपर्यंत मीही संपूर्ण हॉटेल मध्ये फेरफटका मारला चहाची चवही एक अगदीच सर्वसाधारण होती सकाळी मेढयात घेतलेल्या चहाची चव अन हि चव जमीन अस्मानाचा फरक होता पण किंमत मात्र दुप्पट तिप्पट नाहीतर सहापट आहे 30 रु एक कप!! पण येथे काय फक्त गरमागरम हवे पण थंडीही फारशी नव्हतीच 
 सव्वा आठ वाजले होते अनोळखी ठिकाणी जाताना रस्ता माहित नसतो त्यामुळे प्रवासाचा खरा आनंद मिळतो असे नाही पण परत येताना मात्र प्रवासाचा निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो मुख्य रस्त्याला लागलो दोन्ही बाजूला उंच उंच झाडे अन गुळगुळीत रस्ता यामुळे प्रवासात मजा येत होती थोड्या अंतरावर गणेशमंदिर आहे मंदिर परिसरात अतिशय स्वच्छता  आहे नुकतीच पूजाऱ्याने पूजा केली होती त्यामुळे वातावरणात धुपदीप फुले यांच्या सुगंधाची अनुभूती होत होती गाभाऱ्यातील मंद प्रकाशात श्रीगणेशाचे दर्शन घेऊन मी मंदिरातून बाहेर आलो थोड्या अंतरावरून उजवीकडे लिंगमळा धबधबा असा फलक दिसला दोन तीन किमी अंतरावर हा धबधबा आज घनदाट जंगलातून एकेरी रस्ता आहे सकाळची वेळ असल्याने कोणीही संगतीला नव्हते 
       एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे या जंगलात गवा( रानरेडा)असतो गवा हा रेड्यासारखा दिसणारा प्राणी आहे त्यामुळे त्याला रानरेडा असे म्हणतात रात्री उशिरा व सकाळी लवकर हा प्राणी आपल्याला दिसू शकतो  मात्र मी इतक्या लवकर इथे येऊन पोहोचलो होतो तरी मला मात्र गवा आढळला नाही  या परिसरात गवे आहेत पण अशा प्रकारे माणसावर हल्ला करण्याची घटना घडतात असे ऐकले होते पण अलीकडच्या काळात अशी घटना घडली नाही पण रानरेडा माणसावर हल्ला करू शकतो जर आपल्याला गवा दिसला तर त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये त्याचे लक्ष विचलित करू नये आपण काही हालचाल केल्यास कोणत्याही जंगली प्राण्याला असुरक्षित वाटते त्यामुळे तो आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता असते आपल्या समोरून तो जात असेल तर त्याला जाऊ द्यावे आपण गाडीचा हॉर्न वाजवू नये तो आपोआप जातो मला थोडी भीती वाटत होती पण मला गवा आढळला नाही 
लिंगमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने मी चाललो होतो मनात गव्याची भीती वाटत होती वाटेत चिटपाखरूहि दिसत नव्हते त्यामुळे सकाळचे वातावरण पण गंभीर वाटत होती रस्ता अतिशय खराब होता रस्त्यावर दुतर्फा घनदाट झाडी होती इतकी कि दूरपर्यंत फक्त दहा बारा फुटाचा रस्ताच दिसत होता नुकताच पावसाळा संपून गेल्याने झाडाच्या खोडावर खूप मोठ्याप्रमाणात शेवाळ चढलेले पहायला मिळत होते जागोजागी मला मात्र साग पिंपळ सिसव यासारख्या झाडांचीच फक्त माहिती असल्याने इतर झाडे कोणती हे मात्र समजत नव्हते पण आकाशाला गवसणी घालणारी उंचच उंच झाडे पाहून मन प्रसन्न झाले होते त्यामुळे खराब रस्त्याचा त्रास वाटत नव्हता 
     वाटेत कुणीही भेटत नव्हते पण  रस्ता बरोबर असल्याने भीती वाटत नव्हती आणि सरतेशेवटी मी लिंगमळा येथे पोहोचलो खूप मोठे पटांगण,  शेजारी गेस्ट हाऊस तेथील कर्मचाऱ्यांची चाललेली स्वच्छतेची चाललेली लगबग दिसून आली मोठ्या गेटसमोर गाडी पार्क केली अन तेथे असलेले विविध प्रकारच्या माहितीचे फलक वाचले अन पाणी पिऊन पुढे चालता झालो
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा