*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग आठ*🌿🌿
महाबळेश्वराचा अवघड वाट उतरून खाली येत असताना वाडा या गावाजवळ उजवीकडे 'श्री क्षेत्र काळभैरव मंदिर जावळीचे मोरे यांचे कुलदैवत ' अशी कमान दिसली तसे मी गाडी थांबवून मंदिर किती दूर आहे अशी विचारणा केली असता अगदी जवळ आहे असे समजले कारण इथे जाणे माझ्या नियोजनात नव्हते पण जावळीचे मोरे यांचे कुलदैवत म्हणू वाट वाकडी केली आणि मग मी त्या कमानीतून शिरलो सभोवताली उंचचउंच डोंगर दाट झाडीतून रस्ता जात होता आणि मनात विचारांचे काहूर उठले होते ' स्वराज्याच्या उरावर बसून आदिलशहाच्या जीवावर स्वराज्याचा घोट घेऊ पाहणाऱ्या अनेक स्वकीय शत्रूंच्या यादीत असलेल्या जावळीच्या मोऱ्यांची अन त्यांच्या कर्तृत्वाची मलाच लाज वाटू लागली होती सकाळपासून असलेली मन:शांती संपली होती.मेंदूत अनेक विचारांचे मोहोळ उठले होते आदिलशाहाचे फर्मान आल्यावर मावळातल्या वतनावर पाणी सोडून स्वराज्याच्या यज्ञात सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्या कारीच्या कान्होजी जेधे यांच्यासारखी जाणती माणसं कुठं अन ही पिलावळ कुठं? असे अनेक विचार उसळी मारून येत होते' पाच मिनिटात मंदिर आले मंदिर एकदम शांत होते अन मंदिर परिसरहि अत्यंत स्वच्छ, शांत आणि रमणीय आहे पण मन अस्थिर झाले होते याच मंदिरात संत तुकाराम महाराजांचे वंशज येथे आल्याचे समजले पण मन मात्र अस्थिरच, थांबूच वाटत नव्हते तिथे असाच एक अनुभव मला काही वर्षांपूर्वी आला होता श्री क्षेत्र गाणगापूर येथे एक क्षणही तिथे थांबावे वाटत नव्हते इतके मन बेचैन झाले होते असो,
मंदिरातून परत फिरून रस्त्याला लागलो थोड्याच वेळात प्रतापगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला डावीकडे 'रामवरदायिनी माता मंदिर पार ' अशी मोठी कमान दिसली अन त्या कमानीतून पुढे गेल्यावर समोरचा संपूर्ण रस्ता हा घाटरस्ता होता पाच किमीचा एकेरी अवघड रस्ता वेडीवाकडी वळणे तीव्र अन अतितीव्र चढ उतार अन घनदाट जंगल अशा प्रकारच्या रस्त्याने गाडी चालवत जायचा अनुभव वेगळाच होता तापोळेला जाताना जो विरस झाला होता त्याचा आनंद इथे मिळत होता असा रस्ता संपूच नये असे वाटत होते माझ्या प्रवासातील एक रमणीय प्रवास होता हा नक्कीच
चार किमी अंतरावर रस्ता काटकोनात वळत होता दोन्हीकडे!
एकीकडे दुधगावकडे व दुसरीकडे पार या गावाकडे रस्ता जात होता 1किमी अंतरावर पार हे गाव आहे आणि रामवरदायिनी मातेचे मंदिर आहे मंदिर अतिशय सुंदर असून खूप प्रशस्त आहे शेजारीच महादेवाचेही मंदिर आहे तेही मोठे आहे सुंदर आहे मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला भुरळ पडली होती मंदिरात अभिषेक किंवा पूजा करायला येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची सोय आहे मंदिर परिसरात निरव शांतता पसरली होती त्यामुळे दर्शनाचा आनंद घेता आला
रामवरदायिनी मातेच्या मंदिराची रचना सुंदर केलेली आहे मंदिराच्या आवारात शिवरायांचा राज्याभिषेक असलेला पुतळा आहे एकंदर परिसर स्वच्छ व सुंदर तसेच शांत आहे आपण माझ्यासकट सर्वजण इथल्या परिसरात आलो म्हणजे महाबळेश्वर प्रतापगड इत्यादी ठिकाणीच भेटी देतो पण वाटेतच असणाऱ्या अशा प्रकारच्या सुंदर व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत नाही आणि कारणही तसेच असते की एकतर आपल्याला अशा प्रकारच्या ठिकाणांची माहिती नसते किंवा वेळही नसतो मंदिर आणि मंदिराचा परिसर खूपच छान, सुंदर आणि रमणीय आहे.
रामवरदायिनी मातेच्या मंदिराची आख्यायिका आहे ती अशी:-
सीतेचे हरण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र सितामाईच्या शोधात या ठिकाणी आले असता त्यांची थट्टा करण्याचा विचार पार्वती मातेच्या मनात आला होता व ती सीतेचे रूप घेऊन प्रभू रामचंद्र यांच्या समोर आली होती व रामाला म्हणाली "माझा शोध थांबवा मी तुमच्या समोर आले आहे" पण रामाने त्यांचे खरे रूप जाणून घेतले होते त्यामुळे ते म्हणाले की "हे माते, माझी थट्टा करू नको तुला मी ओळखले आहे तू माझी माता आहेस" या प्रसंगामुळे पार्वती आनंदित झाली अशीच आख्यायिका येरमाळा ता:- कळंब येथील येडेश्वरी (येडाई) देवीच्या संदर्भानेही आहे,
पार्वती रामावर प्रसन्न होऊन गेली आणि त्या वेळी त्यांनी रामाला वर दिला की लवकरच सीता सापडेल व रामाला मिळेल म्हणून पार्वती याठिकाणी रामवरदायिनी माता म्हणून निवास करते आहे मंदिरातून बाहेर पडलो अन याच परिसरात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या एका मारुतीचे मंदिर या ठिकाणी असल्याचे समजले होते मारूतीच्या मंदिरासमोर आल्यावर कळले की समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या सर्व मारुतीच्या मंदिरांची प्रवेशद्वारे दक्षिणमुखी आहेत आणि त्या मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरमुखी होते व या ठिकाणी असे मंदिर नसल्याचे सांगितले आणि मग मी त्यांना या ठिकाणी असणाऱ्या शिवकालीन पुलाची माहिती विचारली अन लगेच मी 365 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पुलाकडे निघालो त्याची माहिती पुढच्या भागात पाहू !
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
मागील सर्व भागांच्या पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे सर्व फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा