मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

भाग पाच

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग पाच*🌿🌿
              लिंगमळा धबधब्याकडे जाणारा रस्ता अतिशय खराब आहे माझ्या संपूर्ण प्रवासात बराचसा रस्ता खराबच होता तीन चारच किमी रस्ता आहे घनदाट जंगल इतके कि ऊनही जमिनीपर्यंत पोहचत नाही लिंगमळाच्या अलीकडे 500 मीटरवर गाडी थांबवावी लागते तिथे जि प चे रेस्ट हाऊस आहे मोठे पटांगण असून तिथल्या वातावरणात मन रमून जाते धबधब्याकडे जाणारा रस्ता हा सोप्या पायऱ्यांचा असून तो नुकताच तयार करण्यात आला आहे आणि तो दाट जंगलातून जातो तसेच धबधबा अतिशय धोकादायक असल्याने तेथे जाण्याची वेळ नक्की ठरवण्यात आली आहे सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण धबधबा पाहू शकतो वातावरण अतिशय आल्हाददायक आहे  थोड्या पायऱ्या उतरल्या कि डावीकडे 100 मीटर वर एक डोह असून पाणी अतिशय नितळ व स्वच्छ असून आपण तिथे जाऊन पोहण्याचा आंनद घेऊ शकतो तिथे पाण्यात पोहण्याचा आनंद घेणे हे अविस्मरणीय ठरू शकते वेण्णा नदीवर असलेल्या वेण्णा धरणातून पाणी सुटले कि इथे भरपूर प्रमाणात पाणी असते नदीपात्रात अनेक झाडे असून आपण डिस्कव्हरी, जिओग्राफीक इ चॅनेल पाहतो असे वाटते नितळ निळे पाणी पाहून कोणालाही पोहण्याची ईच्छा होणे सहज शक्य आहे तसेच आपण तिथल्या दाट झाडांच्या फांद्याच्या गर्दीत बसून जेवण करू शकतो तसेच खळाळणाऱ्या पाण्याचा दुरूनच आनंद घेऊ शकतो इथून  डावीकडे 500 मीटरवर धबधबा पॉईंट आहे तिकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रेलिंग असून रस्ता पक्का व पायऱ्यांचा आहे आपण  रमतगमत अगदी पंधरा  मिनिटात धबधबा पॉइंटवर पोहोचू शकतो  दाट झाडीतून जाणारा रस्ता वेगवेगळ्या पक्ष्यांचा मंजुळ आवाज अन निरव शांतता प्रस्थापित झालेली आणखी काय हवे साधारण सव्वा आठ वाजता मी पायऱ्या उतरू लागलो होतो पंधरा मिनिटात पॉइंटवर पोहोचलो वाटेत एका बाजूला रेलिंगच्या खाली असणारी खोल दरी इतकी कि तळ सापडत नाही खाली नजर ठरत नाही डोळे गरगर करू लागतात दूरवर असणारे वेण्णा नदीचे खोरे मन प्रसन्न करून टाकते एक ठिकाणी अरुंद रस्ता होता त्याच्या रेलिंगवर तीनचार माकडे बसली होती एकदोन खाली होती खूपच धीट होती  मला रस्ता सोडिनात एक माकड आपल्याला घाबरवयाला पुरे! इथे तर इतकी होती अन मला पुढे जायचे धाडस होईना चार पाच मिनिटे यातच गेली जणू मला माकडं वाकुल्या दावीत होती आता आली का पंचाईत! शेवटी मी मन घट्ट करून जंगलाच्या कडेने पुढे चाललो आणि मोबाईलचा कॅमेरा सुरु केला हेतू असा की जर काही घडले तर आपल्याला कळावे काय झालं ते!माकडे अन माझ्यातले अंतर क्षणाक्षणाला कमीकमी होत होते  एक फुटाच्या अंतरावरून जात असताना मात्र भीती खूप दाट झाली होती मागे वळून जावे का? असाही विचार केला पण आता पुढेच जाणे योग्य होईल असा विचार करून जात होतो अचानक मला दिसले की माकड मला घाबरून  दूर पळाले अन त्याला घाबरून मी असो, जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे नदीचे पात्र नजरेच्या टप्प्यात यायला लागते सुरवातीपासूनच  एक दिड हजार फूट उंचीवरून पडणारे पाणी व त्याचा एक गंभीर आवाज खूपच मस्त वाटतो पण काळजी घेणे आवश्यक आहे कारण रेलिंगच्या खाली खूप खोल खोल दरी आहे रेलिंगवर रेलून उभे राहणे रेलिंगच्या बाहेर  जाणे सेल्फी काढणे धोकादायक आहे अश्या अनेक पाट्या पहायला मिळतात अन हे खरेच धोकादायक आहे दरीतून पाहतानाही डोळे गरगरु लागतात आणि त्या वेळी काळजी घेणे आवश्यक असते समोर वेण्णा नदीचे खोरे पहायला मिळते महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवर धबधबा असून पावसाळ्यानंतर काही काळ तो टिकतो लिंगमळा पाहायलाही खूप मजा येते सोबतीला कोणी असेल तर खूप मज्जा येते पण निःशब्द वातावरणात एकट्याने निसर्गाशी संवाद साधण्याची मजा काही औरच, यावेळी माझ्यासोबत कोणीही नव्हते ना आपले ना परके आजच्या या वेळी मी एकटाच होतो इथे नाहीतर माकडांना कोण घाबरतो? 
       हेडफोनवर गाणी ऐकत मस्त भटकंती करणे मला खूपच आवडते  याच मस्तीत लिंगमळा पाहत होतो पॉईंटवर रेलिंग असून त्या ठिकाणी उभाराहून धबधबा पाहणे योग्य ठरते मस्ती करणे स्टंट करणे सेल्फी घेण्याची धडपड जीवावर बेतू शकते लहान मुले असतील तर त्यांचा हात सोडूच नये या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवूच नये उंचावरून फेसाळत पडणारे पाणी त्याचे उडणारे तुषार खूपच सुंदर दिसत होते आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात वेण्णा नदीचे पात्र तर जणू चांदीच्या दागिन्यांचा चंदेरी रस वाहत असल्याचा भास होतो नदी दूरवर पाहणे जरी मस्त वाटत असले तरी जवळच्या दरीमध्ये मात्र खूप भीती वाटते  लिंगमळा पाहून आपल्याच मस्तीत वेगळ्या विश्वात गेल्याचे भासत होते अर्धा तास लागतो पाहायला पण तेथील जंगलात अक्खा दिवसही कमी पडतो म्हणून महाबळेश्वर पाहायचे असेल तर 3-4दिवस तरी हाताशी हवेतच एकाच दिवशी सर्व ठिकाणी जाऊन पहाण्यात मजा येत नाही एकेका पॉइंटवर अर्धा दिवस एक दिवस घालवणेच उत्तम आहे मग प्रवासाचा कंटाळा येणार नाही आणि आपला आनंद द्विगुणित होईल लिंगमळा पाहून डोहाकडे जाऊन लगेच परतलो अन मागे वळून न जाता तसेच पुढे गेल्यावर एक 4-5 किमी अंतरावर पाचगणीहून येणाऱ्या रस्त्याला येता येते हा रस्ताही खराबच आहे पण सभोवतालचा निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने आपल्याला त्रास होत नाही मुख्य रस्त्याला आल्यावर तेथून जवळच असलेल्या वेण्णा तलावाजवळ आपण येतो इथे  आपण बोटिंगची मजा घेऊ शकतो पण मी मुख्य रस्त्याला लागलो आणि लगेच काहीतरी खावे असे ठरवले लगेच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जैन  व्हेज हॉटेलात नाश्ता करण्यासाठी थांबलो हॉटेल अगदी साधे होते पण शांतता अन स्वच्छता चांगली आहे पाणीही फिल्टरचे असल्याने अन स्वच्छता असल्याने पाणी बाटली विकत नाही घेतली तरी चालते मी  ग्लासभर  पाणी पिल्यावर मी  मेनूकार्डवर नजर फिरवली व माझे डोळे विस्फारु लागले महाबळेश्वर महाग आहे हे माहित होते पण इतके ? हे माहित नव्हते  एक ओनियन उत्तपा एक चहा व एक पाणी बॉटल याचे बिल दोनशे रुपये पेक्षा जास्त आहे त्यामुळे येथे येताना खिसा गरम असायलाच हवा हे नक्की! नाश्ता झाल्यावर न थांबता  लगेच पुढे निघालो होतो थोड्या अंतरावर असलेल्या वेण्णा तलावाच्या काठावर पोहोचलो अतिशय नितळ निळे पाणी अन त्यावर उठणारे तरंग अतिशय सुरेख दिसतात आणि फोटो पाहिल्यावर तर हे ठिकाण म्हणजे काश्मीरच असावे असे वाटते त्या ठिकाणी जाऊन बोटिंग करणे म्हणजे एक पर्वणीच वेण्णा तलाव हे ठिकाण कोणालाही आवडणारे असेच आहे कुणीही सहजपणे याच्या प्रेमात पडेल असे आहे त्याच बरोबर तेथे अनेक ठिकाणी नाश्ता भेळ पाणीपुरी याचे ठेले आहेत बार्शीचे भगवंत मैदान सोलापूरचे होम मैदान मुंबईची चौपाटी याठिकाणी असतात तसेच पण आता थोड्या वेळापूर्वीच पोटपूजा झाल्याने तो मोह आवरता घेऊन तलावाच्या काठावर बसलो निवांत वाटत होते वेगवेगळ्या ठिकाणी  फोटो काढले अन पुढे निघालो महाबळेश्वर पाहण्यासाठी पर्यटकांनी नकाशा पाहून कोणते पॉईंट पहायचे ते ठरवणं योग्य ठरते कारण पॉईंट दूर दूर आहेत  त्यामुळे गैरसोय होत नाही आणि एका पॉईंट वर थोडासा तरी वेळ घालवला पाहिजेच नाहीतर पुढील पॉइंटवर गेलो की काही निरस मंडळी इथे काय तिथल्यासारखेच आहे असे म्हणतात  माझा पुढील प्रवासाचे नियोजन तापोळे,विल्सन पॉईंट,ओल्ड महाबळेश्वर असे होते एक दिवस नियोजन असेल तर काही पॉईंट न पाहनेच योग्य ठरते काही ठराविक पॉइंटवर वेळ घालवणेच उत्तम.
क्रमश:
 
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा