बुधवार, ४ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग सहा*🌿🌿
         वेण्णा तलावापासून बाजारपेठेजवळून तापोळ्याला जाणाऱ्या रस्त्याने मी जात होतो तापोळेला जाताना मिनी काश्मीर असे बरेच फलक दिसले तापोळे बामणोली या ठिकाणी कोयना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जलक्रीडेच्या अनेक बोटी आहेत आपल्याला अनेक ठिकाणी तेथून जाता येते वासोटा किल्लाही पाहता येतो 
      महाबळेश्वर ते तापोळे 27 किमी अंतर आहे तापोळे या ठिकाणी जाऊन परत येणे असे ठरवले होते    मिलिंद गुणाजी यांच्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे एका बाजूने कोयना व एका बाजूने सोळशी या दोन नद्या वाहतात आणि मध्ये असणाऱ्या डोंगर रांगेवरून रस्ता आहे घनदाट झाडी इतकी आहे की संपुर्ण रस्त्यावर सावलीच असते तापोळेला पोहोचण्यापेक्षा रस्त्याचा प्रवासच अतिशय रमणीय आहे पण प्रत्यक्ष मात्र असे आढळले नाही आणि रस्ता अतिशय खराब असल्याने तापोळे येथे जायचे मी रद्द करून त्या मार्गावर साधारणपणे 16 किमी अंतरावर असलेल्या शिवसागर पॉईंट या ठिकाणी जाऊन आलो आहे या पॉइंटवरून कोयना धरणाचा जलाशय   म्हणजेच शिवसागराचे विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न होते सह्याद्रीच्या विविध डोंगरांच्या कुशीत फाट्या फाट्याने शिरलेले पाणी पाहून आपण महाबळेश्वर किंवा महाराष्ट्रामध्ये आहोत असे वाटतच नाहीतर आपण  अगदी  परदेशातील एखादया निसर्गरम्य ठिकाणी आहोत किंवा हॉलिवूड मधील दृश्य पहातो आहोत असा भास होतो अतिशय सुंदर व मन प्रसन्न करणारे दृश्य आहे आणि ते पाहून मन हरखून जाते तिथून पाय निघता निघत नाही
         वेळ कसा गेला आणि किती वेळ गेला हे कळतही नाही महाबळेश्वरच्या मानाने थोड्या उघड्या माळावर हा पॉईंट आहे इथे हॉटेलचीही बरीच उणीव जाणवते येथून तापोळे 10 ते 12 किमी अंतरावर आहे अतिशय सुरेख दिसणारे निसर्गाचे रूप पाहून मी परत फिरलो या मार्गावर रस्ता सोडला तर बाकी सर्व एकदम मस्त आहे सुंदर आहे महाबळेश्वरमधील एक गोष्ट म्हणजे कोणत्याही पॉइंटवर जायचे असेल तर परत मार्केटजवळच यावे लागते त्यामुळे मी परत फिरलो त्या मार्गावर साधारण 10 किमीवर एक पॉईंट आहे नाव त्याचे नाव माझ्या लक्षात नाही बहुतेक शिवकालीन पॉईंट असे काहीतरी असावे या ठिकानाहूनही अत्यन्त चांगले दृश्य पहायला मिळते येथे रस्त्यालगतच एक छोटा धबधबा आहे आणि एकच टपरीवजा हॉटेल, मी येथे थांबलो असता एकदोन वाहनचालकांनी शिवसागर पॉईंट कुठे आहे? अशा प्रकारचे प्रश्न विचारले असता हॉटेल मालकीण असणाऱ्या आजीने मी अशी माहिती सांगण्यावर नाराजी व्यक्त केली आणि कारण तिच्यामते गाडी थांबवून तिला विचारले म्हणजे ती हाच शिवसागर पॉईंट आहे असे सांगेल आणि तिची काही खरेदी केली जाईल पण मी मात्र तिचं गिऱ्हाईक तोडत होतो असे तिला वाटत होतं असो, मी थोडावेळ थांबून पुढे निघालो  महाबळेश्वरचीच नाही तर कोणत्याही ठिकाणची प्रवासाची मजा घ्यायची असेल तर बाईकवरच जायला हवे मी परत बाजारपेठेजवळ आलो आणि विल्सन पॉइंटची चौकशी केली
       महाबळेश्वरमधील  बाजार पेठेपासून सर्वात जवळचा व महाबळेश्वरमधील  उंचावरचा पॉईंट म्हणजे विल्सन पॉईंट होय. महाबळेश्वरमधील सर्व पॉइंटची, रस्त्याची नावे इंग्रज अधिकारी, माणसं यांच्या नावावरूनच असलेली आपल्याला आढळतात 2 किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाणारा रस्ता एकेरी असून दुतर्फा घनदाट झाडी आहे त्यामुळे जातानाच खूप मजा येते अतिशय घनदाट जंगल आहे अक्षरश: सूर्यकिरणेही जमिनीवर पोहोचत नाहीत उंचीवर गेले की मात्र खूप मोठे मैदान दिसते तसेच पोलीस चौकीही असावी खूप मोठे मैदान असून या मैदानाच्या कडेवर दोन उंच चबूतरे बांधले आहेत आपण त्या ठिकाणी बसून क्षितिजापर्यंत दिसणारा सुंदर निसर्ग आपण न्याहाळू शकतो  वातावरणही शांत आहे कसलाही गोंगाट नाही कलकलाट नाही फक्त शांतता ! वेळ कसा जातो हे कळतही नाही  सूर्य डोक्यावर आला तरी गुलाबी थंडी हीच खरी इथली खासियत आहे येथे घोड्याची रपेटही आपण करू शकतो एकदोन घोडेही इथे दिसले  हिरव्यागार डोंगरावरून दूरवरचा परिसर दिसतो त्या ठिकानाहून हलूही वाटत नाही वेळ कसा जातो ते समजतही नाही मी तर तहानभूक विसरून जातो अशावेळी!तिथून परत निघावे वाटत नव्हते मात्र इथेच जास्त वेळ घालवून जमणार नव्हत म्हणून मी परत निघालो विल्सन पॉईंट वरून खाली उतरून येताना दुसऱ्याच मार्गाने आलो होतो या ठिकाणीही असाच एकेरी रस्ता व घनदाट झाडी त्यामुळे मजा अनुभवायला मिळत होती जाताना वाटेत चढ होता पण येताना मात्र उतार होता अरुंद रस्ता तीव्र उतार हेच या रस्त्याचे वैशिष्ट्य आहे आणि रहादरीही खूप कमी आहे मी बाजारपेठेजवळ आलो आणि चौकशी केली ओल्ड महाबळेेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याची आणि पुढे निघालो  बाजारपेठेपासून ओल्ड महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याने मी निघालो होतो याच रस्त्यावर मधमाशीपालन केंद्र आहे त्याठिकाणी अस्सल मध गोळा करून विकला जातो येथे मी थांबलो नाही त्यामुळे मला जास्त माहिती सांगता येणार नाही तसेच प्रत्येक पॉइंटवर शेंगा,फुटाणे स्ट्रॉबेरी, लांबलचक गाजरे, जेली चॉकलेट कंदमुळे सॉस यांची रेलचेल असते महाबळेश्वरपासून ओल्ड महाबळेश्वर थोडे दूर आहे जाताना वाटेत एक पॉईंट लागतो तो म्हणजे केट्स पॉईंट रस्त्यापासून 4 किमी अंतरावर आहे याचे परंतु मी मात्र महाबळेश्वराच्या मंदिराकडे निघालो होतो कारण 1 वाजला होता आणि मला अजून बराच लांबचा टप्पा पार करायचा होता मंदिराच्या अलीकडे थोड्याच अंतरावर सावित्री पॉइंटकडे अशी पाटी दिसली 
             पार्कींग मध्ये गाडी पार्क करून महाबळेश्वराच्या मंदिराच्या आवारात प्रवेश केला गर्दी खूप कमी होती कारण सणाचे दिवस होते गर्दी अगदी नाच्या बरोबर होती येथे खूप मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत आणि सगळीकडे एकाच मालाची विक्री केली जाते मध जेली कातडी वस्तू अशा दोन्ही बाजूंनी दुकाने असणाऱ्या रस्त्याने मी हजारो वर्षे पूर्ण केलेल्या महाबळेश्वरच्या  मंदिरात जाऊन शांत वाटत होतं मनातल्या मनात ओम नमः शिवाय चा जप सुरु होता अंधाऱ्या गाभाऱ्यात शिरून शिवलिंगाचे दर्शन घेतले नंदादीपाच्या  मंद प्रकाशात शिवलिंग तेजस्वी भासत होते मंदिराबाहेर मंदिराचा जीर्णोद्धार कधी , कुणी , केंव्हा केला आहे याची माहिती मिळाली पण मला मात्र मनात एकच घटना आठवत होती तुम्हांलाही आठ्वलीच असेल…… अगदी बरोबर!! 
       छत्रपती शिवरायांनी याच मंदिरात माँसाहेब जिजाऊ साहेब यांची सुवर्ण तुला केली होती येणारी हजारो वर्षे लोटली तरी महाबळेश्वर मंदिरातील मातीचा कण अन कण ती घटना विसरू शकणार नाही अन महाराष्ट्राची मातीही! 
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

भाग पाच

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग पाच*🌿🌿
              लिंगमळा धबधब्याकडे जाणारा रस्ता अतिशय खराब आहे माझ्या संपूर्ण प्रवासात बराचसा रस्ता खराबच होता तीन चारच किमी रस्ता आहे घनदाट जंगल इतके कि ऊनही जमिनीपर्यंत पोहचत नाही लिंगमळाच्या अलीकडे 500 मीटरवर गाडी थांबवावी लागते तिथे जि प चे रेस्ट हाऊस आहे मोठे पटांगण असून तिथल्या वातावरणात मन रमून जाते धबधब्याकडे जाणारा रस्ता हा सोप्या पायऱ्यांचा असून तो नुकताच तयार करण्यात आला आहे आणि तो दाट जंगलातून जातो तसेच धबधबा अतिशय धोकादायक असल्याने तेथे जाण्याची वेळ नक्की ठरवण्यात आली आहे सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण धबधबा पाहू शकतो वातावरण अतिशय आल्हाददायक आहे  थोड्या पायऱ्या उतरल्या कि डावीकडे 100 मीटर वर एक डोह असून पाणी अतिशय नितळ व स्वच्छ असून आपण तिथे जाऊन पोहण्याचा आंनद घेऊ शकतो तिथे पाण्यात पोहण्याचा आनंद घेणे हे अविस्मरणीय ठरू शकते वेण्णा नदीवर असलेल्या वेण्णा धरणातून पाणी सुटले कि इथे भरपूर प्रमाणात पाणी असते नदीपात्रात अनेक झाडे असून आपण डिस्कव्हरी, जिओग्राफीक इ चॅनेल पाहतो असे वाटते नितळ निळे पाणी पाहून कोणालाही पोहण्याची ईच्छा होणे सहज शक्य आहे तसेच आपण तिथल्या दाट झाडांच्या फांद्याच्या गर्दीत बसून जेवण करू शकतो तसेच खळाळणाऱ्या पाण्याचा दुरूनच आनंद घेऊ शकतो इथून  डावीकडे 500 मीटरवर धबधबा पॉईंट आहे तिकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रेलिंग असून रस्ता पक्का व पायऱ्यांचा आहे आपण  रमतगमत अगदी पंधरा  मिनिटात धबधबा पॉइंटवर पोहोचू शकतो  दाट झाडीतून जाणारा रस्ता वेगवेगळ्या पक्ष्यांचा मंजुळ आवाज अन निरव शांतता प्रस्थापित झालेली आणखी काय हवे साधारण सव्वा आठ वाजता मी पायऱ्या उतरू लागलो होतो पंधरा मिनिटात पॉइंटवर पोहोचलो वाटेत एका बाजूला रेलिंगच्या खाली असणारी खोल दरी इतकी कि तळ सापडत नाही खाली नजर ठरत नाही डोळे गरगर करू लागतात दूरवर असणारे वेण्णा नदीचे खोरे मन प्रसन्न करून टाकते एक ठिकाणी अरुंद रस्ता होता त्याच्या रेलिंगवर तीनचार माकडे बसली होती एकदोन खाली होती खूपच धीट होती  मला रस्ता सोडिनात एक माकड आपल्याला घाबरवयाला पुरे! इथे तर इतकी होती अन मला पुढे जायचे धाडस होईना चार पाच मिनिटे यातच गेली जणू मला माकडं वाकुल्या दावीत होती आता आली का पंचाईत! शेवटी मी मन घट्ट करून जंगलाच्या कडेने पुढे चाललो आणि मोबाईलचा कॅमेरा सुरु केला हेतू असा की जर काही घडले तर आपल्याला कळावे काय झालं ते!माकडे अन माझ्यातले अंतर क्षणाक्षणाला कमीकमी होत होते  एक फुटाच्या अंतरावरून जात असताना मात्र भीती खूप दाट झाली होती मागे वळून जावे का? असाही विचार केला पण आता पुढेच जाणे योग्य होईल असा विचार करून जात होतो अचानक मला दिसले की माकड मला घाबरून  दूर पळाले अन त्याला घाबरून मी असो, जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे नदीचे पात्र नजरेच्या टप्प्यात यायला लागते सुरवातीपासूनच  एक दिड हजार फूट उंचीवरून पडणारे पाणी व त्याचा एक गंभीर आवाज खूपच मस्त वाटतो पण काळजी घेणे आवश्यक आहे कारण रेलिंगच्या खाली खूप खोल खोल दरी आहे रेलिंगवर रेलून उभे राहणे रेलिंगच्या बाहेर  जाणे सेल्फी काढणे धोकादायक आहे अश्या अनेक पाट्या पहायला मिळतात अन हे खरेच धोकादायक आहे दरीतून पाहतानाही डोळे गरगरु लागतात आणि त्या वेळी काळजी घेणे आवश्यक असते समोर वेण्णा नदीचे खोरे पहायला मिळते महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवर धबधबा असून पावसाळ्यानंतर काही काळ तो टिकतो लिंगमळा पाहायलाही खूप मजा येते सोबतीला कोणी असेल तर खूप मज्जा येते पण निःशब्द वातावरणात एकट्याने निसर्गाशी संवाद साधण्याची मजा काही औरच, यावेळी माझ्यासोबत कोणीही नव्हते ना आपले ना परके आजच्या या वेळी मी एकटाच होतो इथे नाहीतर माकडांना कोण घाबरतो? 
       हेडफोनवर गाणी ऐकत मस्त भटकंती करणे मला खूपच आवडते  याच मस्तीत लिंगमळा पाहत होतो पॉईंटवर रेलिंग असून त्या ठिकाणी उभाराहून धबधबा पाहणे योग्य ठरते मस्ती करणे स्टंट करणे सेल्फी घेण्याची धडपड जीवावर बेतू शकते लहान मुले असतील तर त्यांचा हात सोडूच नये या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवूच नये उंचावरून फेसाळत पडणारे पाणी त्याचे उडणारे तुषार खूपच सुंदर दिसत होते आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात वेण्णा नदीचे पात्र तर जणू चांदीच्या दागिन्यांचा चंदेरी रस वाहत असल्याचा भास होतो नदी दूरवर पाहणे जरी मस्त वाटत असले तरी जवळच्या दरीमध्ये मात्र खूप भीती वाटते  लिंगमळा पाहून आपल्याच मस्तीत वेगळ्या विश्वात गेल्याचे भासत होते अर्धा तास लागतो पाहायला पण तेथील जंगलात अक्खा दिवसही कमी पडतो म्हणून महाबळेश्वर पाहायचे असेल तर 3-4दिवस तरी हाताशी हवेतच एकाच दिवशी सर्व ठिकाणी जाऊन पहाण्यात मजा येत नाही एकेका पॉइंटवर अर्धा दिवस एक दिवस घालवणेच उत्तम आहे मग प्रवासाचा कंटाळा येणार नाही आणि आपला आनंद द्विगुणित होईल लिंगमळा पाहून डोहाकडे जाऊन लगेच परतलो अन मागे वळून न जाता तसेच पुढे गेल्यावर एक 4-5 किमी अंतरावर पाचगणीहून येणाऱ्या रस्त्याला येता येते हा रस्ताही खराबच आहे पण सभोवतालचा निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने आपल्याला त्रास होत नाही मुख्य रस्त्याला आल्यावर तेथून जवळच असलेल्या वेण्णा तलावाजवळ आपण येतो इथे  आपण बोटिंगची मजा घेऊ शकतो पण मी मुख्य रस्त्याला लागलो आणि लगेच काहीतरी खावे असे ठरवले लगेच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जैन  व्हेज हॉटेलात नाश्ता करण्यासाठी थांबलो हॉटेल अगदी साधे होते पण शांतता अन स्वच्छता चांगली आहे पाणीही फिल्टरचे असल्याने अन स्वच्छता असल्याने पाणी बाटली विकत नाही घेतली तरी चालते मी  ग्लासभर  पाणी पिल्यावर मी  मेनूकार्डवर नजर फिरवली व माझे डोळे विस्फारु लागले महाबळेश्वर महाग आहे हे माहित होते पण इतके ? हे माहित नव्हते  एक ओनियन उत्तपा एक चहा व एक पाणी बॉटल याचे बिल दोनशे रुपये पेक्षा जास्त आहे त्यामुळे येथे येताना खिसा गरम असायलाच हवा हे नक्की! नाश्ता झाल्यावर न थांबता  लगेच पुढे निघालो होतो थोड्या अंतरावर असलेल्या वेण्णा तलावाच्या काठावर पोहोचलो अतिशय नितळ निळे पाणी अन त्यावर उठणारे तरंग अतिशय सुरेख दिसतात आणि फोटो पाहिल्यावर तर हे ठिकाण म्हणजे काश्मीरच असावे असे वाटते त्या ठिकाणी जाऊन बोटिंग करणे म्हणजे एक पर्वणीच वेण्णा तलाव हे ठिकाण कोणालाही आवडणारे असेच आहे कुणीही सहजपणे याच्या प्रेमात पडेल असे आहे त्याच बरोबर तेथे अनेक ठिकाणी नाश्ता भेळ पाणीपुरी याचे ठेले आहेत बार्शीचे भगवंत मैदान सोलापूरचे होम मैदान मुंबईची चौपाटी याठिकाणी असतात तसेच पण आता थोड्या वेळापूर्वीच पोटपूजा झाल्याने तो मोह आवरता घेऊन तलावाच्या काठावर बसलो निवांत वाटत होते वेगवेगळ्या ठिकाणी  फोटो काढले अन पुढे निघालो महाबळेश्वर पाहण्यासाठी पर्यटकांनी नकाशा पाहून कोणते पॉईंट पहायचे ते ठरवणं योग्य ठरते कारण पॉईंट दूर दूर आहेत  त्यामुळे गैरसोय होत नाही आणि एका पॉईंट वर थोडासा तरी वेळ घालवला पाहिजेच नाहीतर पुढील पॉइंटवर गेलो की काही निरस मंडळी इथे काय तिथल्यासारखेच आहे असे म्हणतात  माझा पुढील प्रवासाचे नियोजन तापोळे,विल्सन पॉईंट,ओल्ड महाबळेश्वर असे होते एक दिवस नियोजन असेल तर काही पॉईंट न पाहनेच योग्य ठरते काही ठराविक पॉइंटवर वेळ घालवणेच उत्तम.
क्रमश:
 
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


सोमवार, २ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग चार*🌿🌿
    ठरल्याप्रमाणे सहा वाजता निघायचे नक्की केल्याप्रमाणे सहा वाजता सर्व आवरून गाडी सुरु केली 
                आजचा मार्ग होता मेढा-महाबळेश्वर-प्रतापगड-पोलादपूर-महाड साताऱ्याच्या धुक्यातून मार्ग काढत मी मेढ्याच्या दिशेने निघालो होतो वाटेत कोणालाही विचारायची गरज पडली नाही महाबळेश्वर अंतर आहे 55 किमी तर पोलादपूर 80 ते 90 किमी म्हणजे आज मला गाडीवरचा प्रवास तसा कमीच होता पण इतरत्र फिरायचे असल्याने  200 किमीपर्यंत आजचा प्रवास होईल असे वाटते घाट रस्ता असल्याने दोन तासांचे अंतर आहे मी एकटाच आपल्याच धुंदीत अन मस्तीत निघालो होतो मनात कुठलीच शंका किंवा भीती नव्हती अर्धा पाऊण तासात मी मेढ्यात पोहोचलो एका छोट्या हॉटेलात चहा प्यायला थांबलो हॉटेलचे नाव माहित नाही पण चहा मात्र एकदम अप्रतिम होता हॉटेल समोर उभे असताना एक मध्यमवयीन जोडपे माझ्याजवळ आले ते मुंबईहून आलेले होते त्यांना न्यायला येणारी व्यक्ती मीच असावी असे वाटले हेल्मेटमुळे त्यांना नीटसे ओळखता आले नाही त्यांनाही चहा घेण्याचा आग्रह केला त्यांची विचारपूस करता कळले की जवळच्या खेडेगावातील असून त्यांचे गाव कोयना धरणामुळे विस्थापित आहे आणि त्यांच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणात विस्थापित झाले बरेच लोक तर पंढरपूरजवळील वाखरीजवळ सह्याद्रीनागर येथे राहतात चहा घेऊन त्यांना निरोप देऊन मी निघायच्या विचारात होतो वातावरणात बऱ्या प्रमाणात गारवा होता पण माझ्याकडे गरम कपडे असल्याने थंडी वाजत नव्हती पण येथे अशी तऱ्हा तर महाबळेश्वरमध्ये किती थंडी?असे मनात आले अन 8 च्या ऐवजी 10 वाजता जावे काय?असे वाटले पण जाऊन पाहू  काय होतंय ते असे ठरवून मी माझ्या बाईकला किक मारली पूर्व दिशेला सूर्यनारायण दिसू लागले होते गुलाबी थंडी , कोवळी सूर्यकिरणे,दुतर्फा आकाशाला गवसणी घालणारे डोंगराकडे, मोठमोठी झाडे, हेडफोनवर आवडीची भक्तिगीतं अन अभावानेच आढळलेला  गुळगुळीत रस्ता यामुळे प्रवास मस्त सुरु होता लगेच, घाट सुरु  वाहने सावकाश चालवा घाटात थांबू नका दरड कोसळण्याची शक्यता अशा अनेक सूचना असणाऱ्या पाट्या आढळू लागल्या झाडी अगदी दाट झाली होती आता 18-20 किमीचा घाट चढून जायचा होता धोकादायक रस्ता अवघड वळणे यामुळे गाडीचा वेग30-40 पेक्षा जास्त नव्हता आणि मलाही गडबड नव्हतीच ती उत्तुंग वळणे आणि त्या ठिकाणी असणारा निसर्ग रमणीय तर होताच पण अगदी जिवलग मित्राप्रमाणे साथ देत होता तो प्रवासच इतका सुंदर होता की मनात विचार आला ध्येय साध्य करण्यात जेवढा आंनद त्यापेक्षा अधिक प्रमाणात आंनद त्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात आहे. जीवनाचा आनंद कशात आहे? मोक्ष मिळविण्यात कि जीवन जगण्यात! तर जीवन जगण्यात जीवनाचा आनंद हा जीवनप्रवासातच आहे असो.
                घाटचढत असताना काही ठिकाणी शाळकरी मुली धावण्याचा सराव करत असताना दिसल्या अन खूप बरे वाटले त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की त्या जि प शाळेच्या असून जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेची तयारी करत आहेत महाबळेश्वर अजून 12 किमी होते मी पुढे निघालो 4-5 किमी अंतर गेल्यावर समोरच बगदाद पॉईंट 4 किमी असा बोर्ड दिसला महाबळेश्वर अजून दूर होते बगदाद पॉईंटला जावे असे ठरवले  आणि चार किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी पाहिले निसर्गाचे सौंदर्य सूर्य थोडा वर आला होता आणि कोवळे ऊन छान वाटत होते दूरवर पसरलेला सह्याद्री त्याच्याकुशीतील छोटी छोटी घरे नागमोडी रस्ता अन त्यावर चमकणारी सूर्यकिरणे यामुळे जणू रस्त्यावर चांदी सांडली असल्याचा भास होत होता अगदी चित्रातल्याप्रमाणे दिसत होते सोबत कुणीच नव्हते अगदी सकाळची वेळ आणि पर्यटकांची गर्दी नसलेल्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेता येतो अगदी व्यवस्थितपणे, पहिलाच पॉईंट होता आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य  अनुभवले आणि इथूनच हलू वाटत नाही आणि मग पुढील पॉइंटवर तर पायच निघणार नाही असे वाटले दाट जंगल आणि रस्ताही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केला होता नुकताच त्यामुळे गुळगुळीत होता,थोडे फोटो काढल्यावर परत मुख्य रस्त्यावर येत येत असताना  मेणाचे संग्रहालय दिसले परंतु ते अजून उघडले नव्हते या ठिकाणी मादाम तुसा या संग्रहातील पुतल्याप्रमाणे मेणाचे पुतळे असल्याचे समजले मुख्य रस्त्याला येण्या आगोदर एका छानशा हॉटेलात चहासाठी थांबलो हॉटेल सुंदर होते अगदी सिनेमात पाहतो तसे लहान मुलांसाठी खेळणी ,झोपाळेआरामखुर्च्या,वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या  वाचण्यासाठी वेगवेगळ्या सोयी,स्विमिंग पूल छोटी बाग वातावरण अतिशय सुंदर आणि मस्त होते अगदी सकाळची वेळ असल्याने  मी पहिलेच गिऱ्हाईक असल्याने चहासाठी थोडा वेळ लागला तोपर्यंत मीही संपूर्ण हॉटेल मध्ये फेरफटका मारला चहाची चवही एक अगदीच सर्वसाधारण होती सकाळी मेढयात घेतलेल्या चहाची चव अन हि चव जमीन अस्मानाचा फरक होता पण किंमत मात्र दुप्पट तिप्पट नाहीतर सहापट आहे 30 रु एक कप!! पण येथे काय फक्त गरमागरम हवे पण थंडीही फारशी नव्हतीच 
 सव्वा आठ वाजले होते अनोळखी ठिकाणी जाताना रस्ता माहित नसतो त्यामुळे प्रवासाचा खरा आनंद मिळतो असे नाही पण परत येताना मात्र प्रवासाचा निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो मुख्य रस्त्याला लागलो दोन्ही बाजूला उंच उंच झाडे अन गुळगुळीत रस्ता यामुळे प्रवासात मजा येत होती थोड्या अंतरावर गणेशमंदिर आहे मंदिर परिसरात अतिशय स्वच्छता  आहे नुकतीच पूजाऱ्याने पूजा केली होती त्यामुळे वातावरणात धुपदीप फुले यांच्या सुगंधाची अनुभूती होत होती गाभाऱ्यातील मंद प्रकाशात श्रीगणेशाचे दर्शन घेऊन मी मंदिरातून बाहेर आलो थोड्या अंतरावरून उजवीकडे लिंगमळा धबधबा असा फलक दिसला दोन तीन किमी अंतरावर हा धबधबा आज घनदाट जंगलातून एकेरी रस्ता आहे सकाळची वेळ असल्याने कोणीही संगतीला नव्हते 
       एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे या जंगलात गवा( रानरेडा)असतो गवा हा रेड्यासारखा दिसणारा प्राणी आहे त्यामुळे त्याला रानरेडा असे म्हणतात रात्री उशिरा व सकाळी लवकर हा प्राणी आपल्याला दिसू शकतो  मात्र मी इतक्या लवकर इथे येऊन पोहोचलो होतो तरी मला मात्र गवा आढळला नाही  या परिसरात गवे आहेत पण अशा प्रकारे माणसावर हल्ला करण्याची घटना घडतात असे ऐकले होते पण अलीकडच्या काळात अशी घटना घडली नाही पण रानरेडा माणसावर हल्ला करू शकतो जर आपल्याला गवा दिसला तर त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये त्याचे लक्ष विचलित करू नये आपण काही हालचाल केल्यास कोणत्याही जंगली प्राण्याला असुरक्षित वाटते त्यामुळे तो आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता असते आपल्या समोरून तो जात असेल तर त्याला जाऊ द्यावे आपण गाडीचा हॉर्न वाजवू नये तो आपोआप जातो मला थोडी भीती वाटत होती पण मला गवा आढळला नाही 
लिंगमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने मी चाललो होतो मनात गव्याची भीती वाटत होती वाटेत चिटपाखरूहि दिसत नव्हते त्यामुळे सकाळचे वातावरण पण गंभीर वाटत होती रस्ता अतिशय खराब होता रस्त्यावर दुतर्फा घनदाट झाडी होती इतकी कि दूरपर्यंत फक्त दहा बारा फुटाचा रस्ताच दिसत होता नुकताच पावसाळा संपून गेल्याने झाडाच्या खोडावर खूप मोठ्याप्रमाणात शेवाळ चढलेले पहायला मिळत होते जागोजागी मला मात्र साग पिंपळ सिसव यासारख्या झाडांचीच फक्त माहिती असल्याने इतर झाडे कोणती हे मात्र समजत नव्हते पण आकाशाला गवसणी घालणारी उंचच उंच झाडे पाहून मन प्रसन्न झाले होते त्यामुळे खराब रस्त्याचा त्रास वाटत नव्हता 
     वाटेत कुणीही भेटत नव्हते पण  रस्ता बरोबर असल्याने भीती वाटत नव्हती आणि सरतेशेवटी मी लिंगमळा येथे पोहोचलो खूप मोठे पटांगण,  शेजारी गेस्ट हाऊस तेथील कर्मचाऱ्यांची चाललेली स्वच्छतेची चाललेली लगबग दिसून आली मोठ्या गेटसमोर गाडी पार्क केली अन तेथे असलेले विविध प्रकारच्या माहितीचे फलक वाचले अन पाणी पिऊन पुढे चालता झालो
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


रविवार, १ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस पहिला🏞🛣🌄
🌍🌍🌍भाग तीन 🌍🌍🌍
       साधारणपणे 3 वाजता साताऱ्यात आलो थोडीशी पोटपूजा करून आता पुढे काय?  याचे नियोजन करू लागलो  साताऱ्यात अनेक पाहण्यासारख्या गोष्टी , ठिकाणे आहेत बऱ्याचदा आपण सातारा म्हटले की याआपण अजिंक्य तारा, कास पठार, सज्जनगड, बामणोली इथेच थांबतो पण अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत  मला अजिंक्यतारा पहायचा होता आजपर्यंत एकदाही पहिला नाही पण तो पाहण्यासाठीबराच वेळ लागला असता आणि पुढचे नियोजन बिघडले असते 
          त्यामुळे आज दिवसभर संग्रहालय व सज्जनगड हि दोन ठिकाणे पहावी असे ठरवले 
   छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून (पवई नका) व बसस्टँड पासून अगदी जवळच संग्रहालय आहे अन तिकीट फक्त 3 रु दर सोमवारी व शासकीय सुट्टीच्या दिवशी हे बंद असते संग्रहालयात शिवयुगातील अनेक वस्तू,साहित्य,वस्त्रे, आभूषणे, हत्यारे आहेत हे पाहताना शिवकाळात गेल्याचा भास होतो अर्धा तास सर्व वस्तू पाहण्यास पुरेसा आहे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे संग्रहालय पाहून मी पुढील ठिकाण पाहण्यासाठी चाललो होतो या अगोदरही मी सज्जनगड पाहायला गेलो होतो पण तेंव्हा मात्र दिवस मावळल्यानंतर किल्ल्यावर गेलो होतो त्यामुळे फक्त रामदास स्वामी यांच्या समधीचेच दर्शन घेतले होते तोही एक मस्त अनुभव होता आज मात्र माझ्याकडे पुरेसा वेळ होता साताऱ्यापासून जवळच्या ठिकाणांपैकी एक कास पठार पण आज मी सज्जनगड पाहायला जाणार होतो एकेरी रस्त्याने गाडीवर जात असताना सभोवरचा मुलुख न्याहळत होतो मन प्रसन्न झाले होते आणि माझ्या मनातील एकटेपणा निघून गेला होता सातारा शहरातून बोगद्यातून बाहेर पडलो कि थोड्या वेळाने सज्जनगडाचे दुरूनच दर्शन होते 
माझा मात्र रस्ता चुकला अन मी कास पठाराच्या दिशेने निघालो होतो बोगद्याच्या अलिकडूनच मी वळलो खरे तर बोगद्यातून पुढे जायला हवे होते असो आणि त्या वेळी घाटात अनेक माकडे होती ती खूप  भुकेलेली होती चार किमी जाईपर्यंत माझ्या लक्षात आले नाही आणि मग मी थांबून एका शाळकरी मुलाला विचारले कारण माझ्या लक्षात आले होते की येथून पुढे निघालो तर कास पठार ला जाईन कारण मागे मी कास पठारला आल्यावर इथल्याच एका हॉटेलात जेवण केले होते रस्ता एकेरी होता मागे वळून मी घाटातून येत होतो त्यावेळी काही ठिकाणी फोटो काढले येथून साताऱ्याचे व अजिंक्यताऱ्याचे नयनमनोहर दर्शन होते अन घाटात असणाऱ्या माकडांना माझ्या जवळची  चपाती दिली माझ्या घरून आणली होती पण ती खायला वेळही मिळाला नाही अन भूकही लागली नव्हती असो घाटात वर्दळही तुरळकच होती त्यामुळे माकडे रस्त्यावर उतरून इकडून तिकडे उड्या मारत होती
   दिवस मावळतीकडे कलत होता मी बोगद्यातून वळून सज्जनगडाच्या दिशेने निघालो अगदी 10-15 मिनिटात मी गडाजवळ आलो गडाच्या पायथ्याजवळ एक खूप उंच हनुमानाची मूर्ती आहे  तेथील समर्थ सृष्टी पाहण्यासारखी आहे व महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन सृष्टी आहे रामदास स्वामीच्या जीवनातील महत्त्वाच्या 15 प्रसंगाची माहिती देण्यात आली आहे तिकीट 40 असून 25-30 मिनिटांची डॉक्युमेंटरीहि तेथे दाखवली जाते पण तेवढा वेळ माझ्याकडे नसल्याने मी मनात असूनही ती पाहू शकलो नाही
गाडी सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगला लावली देवस्थानचे पार्किंग असून रात्रंदिवस चालू असते साडेपाच वाजले असतील आणि मी पाण्याची बाटली घेऊन गडाकडे निघालो होतो थोडे अंतर चालून गेलो की लगेच फरसबंदी व सोप्या पायऱ्या आहेत वातावरण अगदी छान असते पायऱ्या चढून जात असताना रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीच्या मूर्तीही आहेत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ आलो असता पाच मिनिटात फोटो काढून घ्या असा आग्रह दुकानदार करू लागला मी अश्या फ़ंदात सहसा पडत नाही पण तेथे मी अनेक पेहराव फेटे , जिरेटोप व पगड्या पाहून मी त्यांना माझा फोटो काढण्यास परवानगी दिली आणि मग त्या वेळी त्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या आभूषणांनी मला सजवून फोटो काढला आणि लगेच प्रिंटही करून दिला त्याचबरोबर माझ्या फोनमध्येही फोटो काढून दिला 
        परिधान केलेली वस्त्र अन अलंकार काढावेसे वाटत नव्हते पण नाईलाज होता अतिशय जड अंतःकरणाने एक एक आभूषण उतरवले समर्थ महाद्वारातून येत असताना गडाची माहिती देणारा नकाशाही पहिला त्याचा खूप उपयोग होतो सज्जनगडावर पाहण्यासारख्या अनेक वस्तू व वास्तू आहेत त्याची माहिती मी विस्ताराने इथं लिहीत नाही पण आजही रात्री 8:45ला गडाचे दरवाजे बंद केले जातात आणि पहाटे पाचला उघडले जातात 
     जवळची बाटली व चपला ठेऊन मी मठात गेलो एकदम निरव शांतता पसरली होती व त्यामुळे मला खूप छान वाटत होते समर्थांचा पलंग , कुबडी पानपुडा समर्थ शिष्य कल्याणस्वामी हे पाणी आणत असलेला हंडा अशा अनेक  वस्तू आहेत मठाजवळच लागून असलेल्या समाधी मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला शांती लाभली अन मनप्रसन्न झाले काहीवेळ ध्यान करून मी बाहेर पडलो समर्थानी स्थापन केलेल्या मारुतीचे दर्शन घेऊन समाधी परिसरात आलो होतो स्पिकरवर वाजणारी रामधून अन मावळतीकडे कलणारा भास्कर यामुळे वातावरणात एक प्रकारचे कारुण्य पसरले होते आणि माझं मन मात्र प्रसन्न आणि शांत झाले होते 
पायथ्याला असणाऱ्या परळी गावाच्या नावावरून त्याचे नाव परळीचा किल्ला म्हणून ओळखला जात होता पण स्वामी रामदास यांच्या वास्तव्यामुळे त्याचे नाव सज्जनगड असे ठेवण्यात आले समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते सन 1682 मध्ये स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची समाधी बांधून घेतली या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व रामदास स्वामी यांच्या चर्चा, मसलती होत असत
     गडावर भोजनाची अन निवासाची मोफत सोय उपलब्ध आहे सहा वाजले होते आणि मंदिरात मनाचे श्लोक पारायण सुरु झाले होते "मना सज्जना……" सहा ते नऊ या काळात मनाचे श्लोक पारायण , दासबोध पठण व नऊ वाजता भोजन असते माझा पाय निघत नव्हता पण मुक्काम साताऱ्यात करायचा असल्याने मी अतिशय कष्टाने तेथून निघालो आणि मनात मात्र "मना सज्जना……" चे सूर गुंजन करत होते गडाचे दरवाजे आजही नेमाने नऊला बंद केले जातात गडावर अनेक पाहण्यासारख्या वास्तू आहेत चढणंही फारसे नाही समर्थांच्या व शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि इथल्या शांत , गंभीर वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी यायलाच हवे.
        मग काय? येणार ना!!
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

बाईक सवारी

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस पहिला🏞🛣🌄
🌍🌍🌍भाग दोन 🌍🌍🌍
*अज्ञात कलाकाराची कलाकृती-श्री क्षेत्र पाटेश्वर*
सकाळी सहा वाजता निघाल्यानंतर मनात थोडी धाकधुक होतीच आणि पहिल्यांदाच हेल्मेट वापरत होतो त्यामुळे त्यानेच अवघडल्यासारखे वाटत होते.विचार आला की कदाचित या हेल्मेट मुळेच आपला प्रवास मधूनच सोडून द्यावा लागणार कि काय परंतु तसे झाले नाही पन्नासेक किमी अंतर जाईपर्यंत अवघडल्यासारखे वाटत होते पण थंडी, वारा यापासून बचाव होण्यासाठी हेल्मेटची खूप मदत झाली 
      सकाळची गुलाबी थंडी एकटाच आपल्याच मस्तीत माझ्या आवडीची भक्तिगीते ऐकत माझा प्रवास सुरु होता. गाडीची टाकी फुल्ल करून पिलीवला सर्वप्रथम चहा घेण्यासाठी व आवश्यक वस्तू खरेदीसाठी थांबलो सकाळी नऊ वाजता अन पंधरा मिनिटात निघालो तेंव्हा माहित नव्हते की महाराष्ट्रातील सर्व रस्ते इतक्या प्रमाणात खराब असतील या आधीही पिलीवला गेलो होतो एक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडातून जाणारा रस्ता खूपच सुंदर दिसत होता
         पिलीवनंतर गोंदवले याठिकाणी समाधीचे दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो आणि एक गोष्ट मला नमूद करावी वाटते की स्वच्छ आणि शांत मंदिर परिसर असेल तर मन प्रसन्न होते लगेच आणि दर्शनाचा आनंद मिळवितो आपण देव कोणता हे महत्वाचे नसते तर त्या ठिकाणच्या परिसरावर सर्व अवलंबून असते दर्शन घेऊन झाल्यावर मंदिरात एक ठिकाणी शांत बसने डोळे मिटून यात खूप आनंद मिळतो  मंदिरात गर्दी नसल्याने लवकर दर्शन झाले आणि मी सितामाईच्या डोंगराची चौकशी केली पण कोणाकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही आणि म्हणून मी तेथे जायचे रद्द केले ' सितामाईच्या डोंगराची माहिती' परत सांगीन कधीतरी,मंदिराच्या आवारात फोटो काढले आणि प्रसाद घेऊन मी साताऱ्याच्या दिशेने निघालो वर्धनगडाचे गाडीवरूनच दर्शन घेऊन साताऱ्याच्या दिशेने जात होतो तेंव्हा लक्षात आलेकी म्हसवड दहिवडी या भागातून दुष्काळाचे दुर्भिक्ष्य खूप जाणवते ऐन पावसाळ्यातही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे हे पाहून मन विषण्ण होतं दूरपर्यंत दिसणारी बोडकी जमीन त्यात कुसळाशिवाय काहीच उगवू शकत नाही अशा वेळी येथून प्रवास करणेही जीवावर येते  साताऱ्याजवळ आलो की एक मोठी पाटी वाचायला मिळाली "श्री क्षेत्र माहुली संगम" माहुली हे गाव म्हणजे पेशवाईतील खूप मोठे न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे गाव आणि संगमावर अनेक मंदिरेही आहेत असे माहित होते  त्यामुळे त्या कमानीतून संगमकडे गेलो अनेक मंदिरांचे दर्शन झाले पण त्याबरोबरच मनाला पीळ पडणारी एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे माहुलीला दक्षिण काशी समजले जाते त्यामुळे त्याठिकाणी देवाज्ञा झालेल्या व्यक्तींची मरणोत्तर कार्ये (दहावा तेरावा)करण्यासाठी खूप मोठया प्रमाणात लोक येतात त्यामुळे तेथील वातावरणात एक प्रकारचे कारुण्य भरलेले असते त्याठिकाणी थांबूच वाटत नव्हते म्हणून लगेच परत निघालो थोडे पुढे गेल्यावर midc मधून गणेश चौक -देगाव फाटा मार्गे पाटेश्वराच्या डोंगराकडे निघालो.
       पाटेश्वर हे ठिकाण सताऱ्यापासूनअगदी जवळच म्हणजे फक्त 14 किमी अंतरावर आहे साताऱ्यापासून 7किमी midc असून तेथून 4किमी अंतरावर देगाव लागते तेथून दोन किमी अंतराचा कच्चा घाटरस्ता चढून जावा लागतो या रस्त्याने छोटे चारचाकी वाहन जाऊ शकते . लोकांच्या वर्दळीपासून दूर पण शहराच्या अतिशय जवळ असलेले ठिकाण म्हणजे पाटेश्वर, उंच डोंगराकडे जाणारा वळणावळणाचा एकेरी घाटरस्ता निरव अन निशब्द शांतता यामुळे वातावरण धीरगंभीर बनते 
    मी जात असताना घाटरस्ता चढत असताना एक दोन गुराखी माणसाव्यतिरिक्त कोणीही आढळले नाही त्यामुळे मनात एक भीती वाटत होती की आता पुढे काय असेल? जसजसा मी पुढे जात होतो तसतसा मनातून अधिकच घाबरलो होतो कारण असे की अनोळखी ठिकाण अन सोबतीलाही कोणी नाही साधारण 2किमीचा अवघड घाट पार केल्यावर एका निमुळत्या जागी गाडी पार्क केली अन मला खूप बरे वाटले कारण असे की तेथेच एक चारचाकी गाडीही होती माझ्या जीवात जीव आला की चला कोणीतरी सोबतीला आहे आणि त्याचबरोबर मी न पाहिलेल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाची(no mans land)आठवण झाली
       परंतु तेथून पुढे साधारण 1किमी अंतर चालून जायचे होते मनातील भीती अगदी गडद होत होती पण वातावरण अगदी रम्य होते एक निमुळती वाट , वाटेत सुरवातीलाच एक छोटेसे गणेशाचे मंदिर आहे आणि उंच डोंगर, सभोवताली दाट झाडी, उंच वाढलेले गवत अन पाखरांचा किलबिलाट, येथे अनेक प्रकारचे पक्षी पहायला मिळतात पण मला त्यांची माहिती नसल्याने जास्त सांगता येणार नाही. प्रसिद्ध अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या पुस्तकात मिळालेल्या माहितीवरून इथपर्यंत आलो होतो पण पुढे काय? हे मात्र माहीत नव्हते, मनातील मरगळ झटकली पाणी प्यायलो भूक तर कुठे पळून गेली होती कुणास ठाऊक! अन चालत निघालो सकाळपासून जेवलेलोच नव्हतो आणि आपल्याच धुंदीमध्ये असल्याने खरे सांगायचे तर भूकच लागलेली नव्हती 
      एका बाजूला खूप खोल दरी अन दुसऱ्या बाजूला उंच डोंगर अन झाडी इतकी दाट कि संपूर्ण रस्त्यावर सवलीच होती मी पुढे पुढे चालत होतो अन मनात खूप भीती वाटायला लागली होती चालायचा टप्पा जास्त नव्हता पण पुढे काहीच माहित नव्हते फक्त पाण्याची बाटली सोबत घेऊन निघालो होतो वाऱ्याची झुळूक आली की डोंगरावर असणाऱ्या सागाच्या झाडाच्या पानांची सळसळ अन त्यातून येणारा सूं सूं आवाजाने तर जास्तच भीती वाटत होती भीती वाटायचे कारण कि निर्जन परिसर अन सोबत, सभोवताली कुणीच नाही अशातच एखादा रानटी प्राणी आला तर? 
त्यातूनही मन घट्ट करून सावलीतून जाताना खूप आनंद झाला असता पण मनात भीतीच जास्त होती त्यामुळे त्याचा आनंद घेताच आला नाही 10 मिनिटे चालल्यावर एका छोट्या तलावावर आलो तळ्यात कमळे फुलली होती अन एक आश्रमही दिसत होता पण माणसाचे नावनिशानही दिसत नव्हते अन रस्तेही दोन दिशेला फुटले होते त्याच वेळेला कोणाचातरी आवाज कानी पडला मी लक्षपूर्वक ऐकले तेंव्हा तलावाच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या पायऱ्यांच्या रस्त्याने वरच्या बाजूने थोडे वर असणाऱ्या मंदिरातून येत होता लगेच मी मंदिराकडे गेलो तेंव्हा मंदिरात पुण्याहून आलेली चार हौशी चित्रकार मंडळी होती  मला त्यांना भेटल्यावर खूप आनंद झाला मनातील भीती कुठल्याकुठे पळाली मंदिर पाटेश्वराचे होते मंदिरात दर्शन घेतले अन तिथल्या मंडळींना बोलू लागलो होतो तेव्हा त्यांनी मला एक सल्ला दिला की तुम्ही थोडे रिलॅक्स व्हा मग आपण बोलू मला खूप बरे वाटले अन मंदिरासमोरील नंदिशेजारी थोडा आराम करावा म्हणून आडवा झालो जोरात श्वास घेत होतो म्हणून मला लगेच आराम मिळाला अन मी मंदिर व परिसर न्याहाळू लागलो मंदिरात अनेक शिवलिंग होती तीही वेगवेगळ्या आकाराची अन प्रकारची वातावरण अतिशय थंड अन प्रसन्न आम्ही सर्वांनी मिळून मंदिरात ओंकार म्हटला अनेक वेळा त्याच्या नादाने मन अगदी प्रसन्न झाले मंदिर खूप जुने अन सुंदर आहे मंदिराच्या डाव्या बाजूने थोडे वर गेलो कि  सर्व मंदिर दृष्टीपथात आले ज्या नंदीजवळ मी आराम केला त्या नंदीच्या अंगाची तकाकी तर अगदी मारबाल सारखीच होती ती पाहून मन अगदी थक्क झाले अन आपल्या पूर्वजांचा खूप अभिमान वाटला कि पूर्वी इतकी शिल्पकला समृद्ध होती अगदी आरशासारखी नंदीची पाठ आहे मंदिर परिसरात अनेक शिवलिंग आहेत ती वेगवेगळ्या आकाराची अन प्रकाराची अगदी अंगठ्याचा आकारापासून ते पाच फूट उंचीपर्यंत ची शिवलिंग येथे आहेत इथले हेच प्रमुख वैशिष्ट्ये आहे संपूर्ण डोंगरावर हजारो शिवलिंग आहेत प्रत्येकाची रचना आकार वेगळा अन  काही ठिकाणी तर ती छोट्या लेण्यात काढली आहेत ती कोणी बनविली? का बनविली? हे मात्र एक गूढच आहे तसेच त्याची एक आख्यायिका हि सांगितली जाते ती मात्र मी सांगत नाही संपूर्ण वातावरण आल्हाददायक अन प्रसन्न आहे आणि त्या डोंगरावरून सातारा शहर व परिसराचे अतिशय रमणीय दृश्य दिसते 
      पाटेश्वर डोंगरावर एक आश्रम असून महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते दररोज 12 वाजायच्या आत प्रसादाची सोयही असते डोंगराच्या कुशीत थोडे पूर्वेला गेलो की तिथे एका लेण्यात इतर कुठेही न आढळणारा नंदी आढळला त्याचे वैशिष्टये म्हणजे समोरून पाहिले तर माणसाची प्रतिमा दिसते व बाजूने नंदीची , अशी नंदीची मूर्ती कुठेही पहायला मिळत नाही संपूर्ण डोंगरावर शिवलिंग नंदी ब्रह्म विष्णू भैरवी सात आसरा साप यांच्या आकृती व शिल्पे काढली आहेत  असे हे ठिकाण प्रत्येकाने पाहायलाच हवे असे आहे
10 मिनिटात परत निघू असे ठरवलेले असताना दोन अडीच तास कसे  गेले हे कळलेही नाही
परत येताना त्या अरुंद वाटेची मजा अनुभवता आली  सर्वांनी मिळून एक सेल्फी काढली अन आम्ही परत निघालो जो घाट चढताना मनात भीती होती तो घाट उतरताना मात्र मन खूप आनंदी वाटत होते शहराच्या जवळ अन निरव शांतता अनुभवायचीय? तर पाटेश्वरला यायलाच हवे मी तर परत येणारच आणि तुम्ही?
क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

भाग एक

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस पहिला🏞🛣🌄
🌍🌍🌍भाग एक🌍🌍🌍
      प्रवास!!
                  न आवडणारी व्यक्ती तशी दुर्मिळच आणि प्रवास कोणालाही आवडो अथवा नावडो प्रत्येकाला प्रवास करावाच लागतो आणि प्रवासात माणूस प्रगल्भ होतो माणसाचा भावनिक सामाजिक अन सांस्कृतिक विकास होण्यासाठी प्रवास मदत करतो माझ्याबाबतीत बोलायचे झाले तर  प्रवास म्हणजे आपला श्वास अन जगण्याचे औषधच. प्रवास आवडण्याचे दुसरे कारण म्हणजे प्रवासात सर्व समान असतात. फक्त प्रवाशी! निसर्गाच्या सानिध्यात प्रवास करण्यासारखे सौख्य नाही. जीवनाच्या धावपळीत येणारा ताण, डोक्यात साचणारा अनावश्यक कचरा क्षणापूरता का होईना कमी करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणचा प्रवास नाहीतर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहणे यासारखा दुसरा उपाय नाही.
       मी आजपर्यंत वेळोवेळी बराच प्रवास केला आहे. मला खूप आवडतो निसर्गाच्या सानिध्यात प्रवास करणे. डोळ्याला शांती अन मनाला विश्रांती घेण्यासाठी प्रवास खूप आवश्यक आहे.  मला प्रवास आवडत असला तरीही मी  आजपर्यंत लांबचा प्रवास मोठ्या वाहनानेच केलेला आहे जसे की बस कार पण मोटारसायकलचा  प्रवास मी आत्ताच केला आहे. माझ्या आजपर्यंतच्या जीवनातील सर्वात लांबचा मोटारसायकलवरील प्रवासाचा टप्पा मी एकट्यानेच पार केला तो तुमच्यासारख्या हितचिंतकांच्या शुभेच्छामुळेच! चार दिवस, चार जिल्हे, आणि 1055 किमी अंतर एकट्याने चालवत असताना जे अनुभव आले, चांगले, वाईट? नाही चांगलेच अनुभव आले  अन या जगण्यावर हजारदा प्रेम करू वाटावे असा अनुभव घेतला,  त्याचा जो आनंद मनाला झाला, जो अनुभव आला तो तुमच्या सोबत शेअर करताना अतिशय आनंद होत आहे.
       निमित्त होते किल्ले रायगडावर होणाऱ्या दीपोत्सवाचे! दि,29 व 30 ऑक्टोबर 2016 रोजी रायगडावर 'महाराष्ट्राची  दुर्गसंपत्ती'परिवारातर्फे दीपोत्सव साजरा केला जाणार होता आणि यावर्षीचे वर्ष पाचवे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळीला घराघरातून दीपोत्सव आपण करतो युगानुयुगे. घर प्रकाशाने घर उजळून टाकतो पण ज्या किल्ल्यांमुळे ( छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामुळे )आपला महाराष्ट्र अन महाराष्ट्र धर्म जिवंत राहिला जे किल्ले शिवरायांच्या पराक्रमाची मूक साक्ष देत उभे आहेत ते किल्ले मात्र सणाच्या दिवशी अंधारात? असा विचार कोणा अवलीयाच्या मनात आला मन गलबलून गेले असेल हा विचार ज्याच्या मनात आला असेल त्याचे अन पाच वर्षांपूर्वी फक्त पाच मित्रांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रायगडावर पणती लावली अन यावर्षी किमान हजार माणसांनी! असो
      फेसबुक अन व्हाट्स अप च्या माध्यमातून " एक पहाट रायगडावर " या उत्सवाची किंवा कार्यक्रमाची माहिती गेल्यावर्षीच मिळाली होती आणि जाऊ, जाऊ म्हणत होतो पण काही अडचणीमुळे जाता आले नव्हते पण यावर्षी मात्र काहीही अडचण आली तरी जायचेच असा विचार पक्का केला अन सोबतीला कुणाला तरी घेऊन जायचा विचार करत असताना लक्षात आले की सणाचे दिवस असल्याने सोबतीला कोणीही तयार नाही बऱ्याच मित्राना हटकले पण कोणीही तयार झाले नाही पण ज्यांना विचारले नाही असे मित्र मात्र म्हणत राहिले कि मला का सांगितले नाही मी काय येण्यासारखा नव्हतो काय!  अन त्यामुळे एकट्यानेच मोटारसायकलवर जावे असा मनात विचार आलाआणि मनात थोडी शंकाही आली की आपल्याला हे जमेल काय? मोटारसायकलवर जाण्याचा विचार  मित्रांना माहित झाला तेंव्हा काहींनी इतका प्रवास गाडीवर करू नये असा सल्ला दिला तो प्रेमापोटीच, कारण आजच्या धावपळीच्या काळात केव्हा काय घडेल याचा काही नेम नाही एक गोष्ट मलाही आठवली ती म्हणजे आपल्या देशात कोणत्याही आजाराने इतकी माणसं मरत नाहीत जितकी माणसं रस्ते अपघातात मरण पावतात वाहनांची वाढती संख्या खराब रस्ते वाहनचालकांचा बेदरकारपणा हि महत्वाची कारणे आहेत आणि स्वतःच्याच चुकांमुळे वाहनांचे जास्त अपघात होतात पण मी मात्र पक्का निर्धार केला होता की जायचे आणि कोणीही सोबत न मिळाल्याने 26 ऑक्टोबरला रात्री 11:00 वाजता पक्के केले की 27 ऑक्टोबर ला सर्व नियोजन व तयारीनिशी निघायचे ठरवले व मार्गही ठरवला 

वैराग-पंढरपूर-म्हसवड-गोंदवले- दहिवडी-माहुली-पाटेश्वर-सातारा-सज्जनगड-सातारा(मुक्काम)-मेढा-महाबळेश्वर-प्रतापगड-पोलादपूर-महाड(मुक्काम)-पालगड-दापोली-सव-रायगड(मुक्काम)-महाड-शिवथरघळ-भोर-कापूरहोळ-सासवड-मोरगाव-बारामती-इंदापूर-टेंभुर्णी-कुर्डुवाडी-वैराग
    प्रवास कसा करायचा,कधी करायचा याचेही काही नियम मनाशी पक्के केले 
1गाडी वेगात चालवायची नाही
2घाई करायची नाही 
3प्रवासाची सुरवात सकाळी सहा वाजता करायचीच 
4रात्री अंधार पडायच्या आत मुक्कामाला पोहोचायचे
5 वाहतुकीचे सर्व  नियम पाळून प्रवास करायचा
     आपला सर्वांचा असा अनुभव आहेकी प्रवासाला निघायचे पूर्वनियोजित असूनहीआपण प्रवासाला निघायला उशीर करतो त्यामुळे सर्व गोष्टीना विलंब होतो आणि प्रवास व सहलीतला आनंद कमी होतो.प्रवास करताना जर आपण लवकर उठून सुरवात केलीतर आपला खूप वेळ वाचतो प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो आणि रात्री लवकर मुक्कामी पोहोचता येते आणि आराम करून परत एकदा सकाळी आपल्याला लवकर उठून सुरवात करता येते निघायला उशीर कि पोहोचायला उशीर आणि आरामही मिळत नाही आणि प्रवासाचा आनंदही मिळत नाही
     मोजकीच कपडे, आवश्यक साहित्य गरम कपडे घेऊन 27/10/2016 ला सकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले त्याअगोदर सोशल मीडियावर मी प्रवासाला निघत असल्याचा msg पाठवला, सकाळचा मन प्रसन्न करणारा प्रहर कानात घुमणारी भक्तिगीतं अन गरम कपड्यातूनही अंगाला झोंबणारा गार वारा आणि मनात डोकावणारी एक अनामिक भीती,'आपण हा सर्व प्रवास पूर्ण करू शकू कि अर्ध्यातून सोडावा लागेल आपलं शरीर अन मनही साथ देईल का?' या विचारातच सकाळचा वेळ जात होता गाडीमध्ये पेट्रोल भरले तोपर्यंत अगदी हेल्मेटचेही ओझे वाटत होते आजपर्यंत कधीच हेल्मेट वापरले नव्हते पण ऊन वारा आणि थंडीपासून बचाव होत होता जर हेल्मेट नसते तर मी माझा प्रवास रोज सकाळी सहा वाजता प्रवास सुरु करू शकलो नसतो हे मात्र नक्की,पंढरपुरपर्यंत सगळा मुलुख माहितीचा वाटत होता आणि मनात विचार मात्र निगेटिव्ह येत होते आणि माझा प्रवास सुरू होता पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्याकळसाचे दर्शन घेतले तरी मनातील भावना मनाला साथ देत नव्हत्या पण आपल्याच धुंदीत गाडी चालवत असल्याने त्याचा एक नाद मनाला भुरळ पाडत होता त्यामुळे मला प्रवास करताना एक मजा अनुभवाला येत होती जेंव्हा प्रवास झेपणार नाही तेंव्हा आपण परत फिरू असा विचार करून सर्व निगेटिव्ह विचार मनातून काढून टाकले आणि गाडी चालवायला सुरवात केली

क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

*बोधकथा*
एक बाई मोलकरीण म्हणुन एका राजमहालात काम करत असते.

तिला लहान मुलगा असल्याने ती त्याला तिच्या सोबतच कामाला येतांना घेऊन यायची.

एक दिवस त्या मुलाला खेळता खेळता राजमहालात हिरा सापडतो,

तो मुलगा तो हिरा घेऊन पळत आईकडे जातो आणि सांगतो की, "आई बघ मला हिरा सापडला !"

मोलकरीण हुशार असते.
तिला वाटते, हा हिरा घेऊन आपण राजमहालाबाहेर जाऊ शकणार नाही ! 

ती मुलाला म्हणते, "नाही रे ! काच आहे, हा हिरा नाही.", असे म्हणुन ती तो हिरा बाहेर फेकुन देते.

काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हिरा सोबत घेऊन जाते.
मग ती तो हिरा सोनाराकडे घेऊन जाते. सोनाराला कळतं की, हिला हा हिरा कुठंतरी सापडला असणार,
हिला काय माहीत ? हा हिराच आहे ! म्हणुन तो सोनार तिला म्हणतो, "हा हिरा नाही, ही तर काच आहे!"

आणि असे म्हणुन तो पण तो हिरा बाहेर फेकुन देतो.

जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हिरा घेऊन येतो व जोहरीकडे घेऊन जातो.

जोहरी हिरा पाहतो, त्याला कळतं हा हिरा अनमोल आहे, त्याची नियत खराब होते.
तो हिरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो आणि "काच आहे", असं म्हणतो.

जसा हिरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. हे सगळं एक वाटसरु लांबुन पहात असतो.
तो त्या हिऱ्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, "मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकलं तेव्हा तु तुटला नाही, 
पण आता का तू तुटला ?"

हिरा म्हणतो, "जेंव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले तेव्हा ते माझी खरी किंमत जाणत नव्हते.

परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता तरी त्याने मला फेकले ! 
हा आघात मी सहन करुच शकलो नाही,
म्हणुन मी तुटलो."

मनुष्याच्या बाबतीत असेच होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमचं मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.
म्हणुन कधीही आपल्या लोकांचं जराश्या स्वार्था करता मन तोडु नका...
आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणसं
हिऱ्यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका...

     *-@तात्पर्य- गरज संपताच लोकांना विसरु नका.*😔