🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙
निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं ठिकाण म्हणजे काय! हे जर अनुभवायचं असेल तर इथं यायलाच हवंय.अस्सल कोकणाचे वर्णन केलं आहे असे ठिकाण पहायचं असेल तर इथं येण्याशिवाय गत्यंतर नाही. सगळा कोकण फिरून झालाय आता काय बघावं कोकणात! असं म्हणणाऱ्यानी तर इथं आलंच पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली- हर्णे रोडवर साधारणपणे सहा सात किलोमीटर अंतरावर आसूद नावाचं गाव आहे. तिथून जवळच दाबकेवाडी नावाचं पुस्तकात वर्णन केल्यासारखं गाव आहे. गावातून पायवाटेने इथं यावं लागतं. आणि हो! आधी नाव सांगायचं राहिलंच की! केशवराज मंदिर.
दाबके वाडीतून अगदी छोट्या पायवाटेने मंदिरापर्यंत काही पायऱ्या चढून वर जावे लागते. आकाशाशी स्पर्धा करणारी नारळाच्या आणि पोफळीच्या बागा, अत्यंत घनदाट जंगल. त्यातच करवंदे तसेच कोकणच्या रानमेवा असलेली झाडे झुडपे. छोटी पायवाट चालून गेल्यावर चढण लागण्यापूर्वी छोट्या नदीवरील सांकव पार करून जावे लागते. पूर्वी तो सांकव लाकडाचा होता. पण आता गावकऱ्यांनी पक्का पूल तयार केला आहे. पूल पार केला की अर्ध्या तासाच्या चढाईने आपण मंदिराच्या परिसरात पोहोचतो. इथली झाडी पाहून अमेझॉन खोऱ्यातील दाट जंगलाची आठवण झाली नाही तरच नवल.
मंदिराच्या समोर थोडे मोकळं पटांगण आहे. मंदिर अत्यंत साध्या पद्धतीचे आहे. लाकडी खण किंवा माळवद असलेले छप्पर आहे. मंदिर परिसर तसा मोठा आहे. त्याच परिसरात उंच डोंगरावर उगम पावणाऱ्या झऱ्याचे पाणी दगडी नळ्याच्या साह्याने मंदिराच्या समोरच गोमुख बांधून आणलेले आहे. त्या गोमुखातून वर्षभर पाणी वाहत असते. त्यातील पाण्याची चव अगदी अमृतासमान आहे. त्या पाण्याने हात पाय धुवून चेहऱ्यावर पाणी मारलं की सगळा शीण कुठल्या कुठे पळून जातो.
मग मंदिरातील केशवराजचे दर्शन घेतले की मन एकदम प्रसन्न होऊन जाते. मंदिरात येण्यासाठी दुसरा एक मोटारसायकल जाण्याइतकाच मार्ग आहे. आणि ती अत्यंत अवघड आहे आणि दूरचा मार्ग आहे. त्या मार्गाने केवळ मोटारसायकल जाऊ शकते पण पायऱ्या चढून गेल्यानेच मंदिरात गेल्याचा आनंद मिळतो. सभोवताली निरव शांतता, आणि ती शांतता भंग करण्याचा लटका प्रयत्न करत असलेले गोमुखातून वाहणारे पाणी, घनदाट जंगल, आकाशात घुसलेल्या झाडांच्या फांद्यामुळे सुर्यप्रकाश देखील जमिनीवर पडायची पंचाईत. या ठिकाणी आल्यानंतर इथून पाय निघतच नाही. अनेक ब्राह्मण मंडळींचे हे कुलदैवत असल्याचे सांगितले जाते. विष्णूचा अवतार असलेले हे नितांतसुंदर केशवराज मंदिर आवर्जून पहायलाच हवं.
अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
फोटो ठिकाण:- केशवराज मंदिर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

अप्रतिम !!!
उत्तर द्याहटवा