सोमवार, ९ जानेवारी, २०१७

भाग अकरा

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस तिसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग अकरा*🌿🌿
              रात्री उशिरापर्यंत जागूनही सकाळी लवकर जाग आली होती पाच वाजता, सर्व नित्यकर्म उरकून बॅग आवरून गाडीला पॅक करून होईपर्यंत सहा वाजले होते अजून अंधारलेलेच होते पण तांबडे फुटत होते आणखी एकदा मार्गाची खात्री करून घेतली व पुढे निघालो गुगल मॅपवर gps on केले होते
     सर्वांना या निमित्ताने माझा सल्ला आहे की जेंव्हा आपण अनोळखी भागात प्रवास करतो तेंव्हा एखाद्या विशिष्ट मार्गाची माहिती एकट्या माणसाला विचारून न थांबता दोघातिघांकडून खात्री करावी म्हणजे जरी एखाद्याने फसवायचे ठरवले तरी आपण फसू नये असो....
      मी बरोबर सहा वाजता निघालो रस्ता पूर्णपणे अनोळखी होता सहा वाजून गेले तरी अंधार खूप होता आणि धुकेही इतके दाट होते की 100-200 फुटापेक्षा जास्त पुढचे दिसत नव्हते पण एका मित्राच्या सांगण्यावरून मी google map वर रूट सेट केला होता याची माहिती थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण जर google map वर स्टार्ट ड्रायविंग असे सेट केल्यास आपण त्या मार्गावर जसजसे पुढे जातो तसतसे आपल्याला ऑडिओ गाईड केले जाते जसे की पुढे जर आपल्याला वळायचे असेल तर 300-400 मीटर आगोदरच सूचना देण्यात येते व प्रत्यक्ष वळण आल्यावरही लगेच सूचना दिली जाते असो,
        रस्ता अनोळखी होता आणि तुम्हाला सांगावेसे वाटते की कोकणात सात आठ वाजेपर्यंत धुके खूप मोठ्याप्रमाणात असते त्यामुळे आपण रस्ता चांगला असला तरी वेगाने वाहन चालवू शकत नाही आणि रस्ताही बरा होता दादली पुलावरून गाडी घेऊन मी जात होतो मैलाच्या दगडावरून परत एकदा  रस्ता बरोबर असल्याची खात्री करून घेतली आणि जर्किन हातमोजे हेल्मेट अश्या साधनांचा वापर करून मी थंडीपासून बचाव करत होतो त्यामुळे थंडीचा त्रास होत नव्हता या चार दिवसात मी माझ्या मोबाईल मधील सर्व गाणी ऐकत होतो 
      सकाळची वेळ असताना अनुप जलोटा किशोरी आमोणकर पं भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिगग्ज गायकांची भक्तिगीतं, विठ्ठल गणपती, साई बाबा देवीची गीतं ऐकत प्रवास करणं यासारखा आनंद नाही असे मला वाटतं दाट धुक्यातून मार्ग काढत मी प्रवास करत होतो ती वेळ तो प्रसंग अन तो प्रवास यासारखा आनंद नव्हताच मुळी,
            गाडीचा वेग कमी होता दाट धुक्यांमुळे जास्त दूरवरचे दिसत नव्हते त्यामुळे वेग वाढवू शकत नव्हतो सावकाश गाडी चालवत मी जात होतो आणि सोबतीला भक्तिगीतं, वाहतूक नव्हतीच अगदी एकही वाहन चालवताना कोणी दिसत नव्हते साधारण सोळा किमी अंतरावरून उजवीकडे वळलो गावाचे नाव मात्र लक्षात नाही आणि थोडे अंतर जाताच एका गावातून भजनाचा आवाज येत होता दिवाळीचा सण साजरा करण्यात येणार असल्याने त्या दिवशी पहाटे गाव जागा झाला होता व गावातील बरेच लोक मंदिरात जमले होते आरती सुरु होती विठ्ठलाची रस्त्यालगतच मंदिर असल्याने लगेच मंदिरात प्रवेश केला तर या ठिकाणी भरपूर माणसं होती आरती समाप्ती होईपर्यंत थांबलो  तेंव्हा मन अतिशय प्रसन्न आणि शांत झाले होते अतिशय तरल अवस्था मनाची झाली होती आणि मग अशा मानसिक स्थितीत असतानाच मी माझ्या गाडीला किक मारली आणि पुढे निघालो अजून उजाडले नव्हते दाट धुक्याची चादर पांघरलेला गुळगुळीत रस्ता  अन तोही वळणावळणाचा गाडी चालवत असताना खूप आनंद होत होता पुढे गेल्यावर समोरच एक चौक लागला तेथे एक भैया उभा होता up मधला, मॅप असूनही मी त्याला रस्ता विचारला व तो कोठे जाणार आहे हे विचारून त्यालाही सोबत घेऊन आलो म्हणजे तो आहे तोपर्यंत रस्ता चुकणारच नाही तो लाटवन या गावापर्यंत होता तेथून रस्ता एकेरी व खराब होता घाट चढत असताना एका ठिकाणी पूर्वेला पहिले तर सूर्य डोंगराच्या वर येत होता ते विलोभनीय  दृश्य पाहून गाडी थांबवण्याचा व सूर्योदय पाहण्याचा मोह आवरू शकलो नाही डोंगराच्या आडून वर येणारा सूर्य पाहून मन आनंदी झाले  व तो सुवर्णक्षण मोबाईलमध्ये टिपून पुढे निघालो सोबतच्या माणसाला उतरवून लगेच दुसऱ्या माणसाला सोबत घेऊन जात असताना त्यांनी सांगितले की ते जवळच असलेल्या एका छोट्या गावात उतरणार आहेत त्याही माणसाला उतरविले व थोडे पुढे गेल्यावर एक गोष्ट लक्षात आली की मॅप मधील बाई सांगत असणारा रस्ता दूरचा होता 40 किमी अंतरावर असताना एका ठिकाणी एक महाविद्यालयीन वय असणारा तरुण दिसला त्याने लिफ्ट मागितली  मी त्याला विचारले की तो दापोलीपर्यंत येणार आहे काय?त्याने होकार दिला मग मी त्याला सोबत घेऊन जायला तयार झालो कारण पुढच्या स्टॉपवर उतरणार असेल तर ती चढउतार करणे मला आवडले नसते आणि आम्ही पुढे चाललो तर वाटेत एक ठिकाणी पाटी दिसली 'सानेगुरुजी स्मारक कडे ' आणि 'आंधळा मागतो एक ……' अशी माझी स्थिती झाली
          मी माझ्या सोबत असणाऱ्या मित्राला विचारले असता सोबतचा तरुण म्हणाला दापोली पुढे आहे मी विचारले  आणि पालगड? फक्त 1 किमी!  हर्षवायू व्हायचाच बाकी राहिला होता हेच ते गाव खूप वाचले होते ऐकले होते कितीतरी रात्री जागवल्या होत्या अश्रूंच्या धारांनी सिंचन केले होते कोकणातील एक पवित्र पावन तीर्थ, नक्की कुठे? हे माहीतच नव्हते आणि आज अचानक  माझ्या समोर आले होते अनपेक्षितपणे, अवचितपणे आजचा दिवस खरंच खूप भाग्याचा होता की मी या पवित्र ठिकाणी आलो होतो ध्यानीमनी नसताना  खूप खूप आनंद झाला होता तो शब्दांत मांडणे केवळ अशक्यच!!!! फक्त अनुभूतीचा आनंद होता तोही अवर्णनीय 

क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा