*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस तिसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग पंधरा*🌿🌿
गाडी घेऊन महाडच्या दिशेने निघालो होतो व त्या वेळी अनेक गोष्टी मला आठवत होत्या त्यातील एक गोष्ट म्हणजे काही महिन्यांपूर्वी येथील पूल कोसळून खूप मोठा अपघात झाला होता महाडपासून पोलादपूरला जाणाऱ्या मार्गावर दोनेक किमीवर तो पूल आहे मी पहिला पण आता मात्र सर्वकाही शांत होते काहीच न घडल्यासारखे मी तेथून परत आलो व हायवे लगत असणाऱ्या एका छानशा हॉटेलात जेवण करण्यासाठी थांबलो होतो
ऑर्डर दिल्यानंतर ती येईपर्यंत रायगडावर येणाऱ्या मित्राना संपर्क करावा असा विचार करून मी माझ्या मोबाईल वरून फोन केल्यावर ध्यानात आले की कृषी प्लॅन असणाऱ्या bsnl चा आज ब्लॉक डे आहे आणि jio ला महाडमध्ये रेंजच नाही तरी विचार करत होतो की मला संपर्क कसा साधला नाही अजून आता मात्र मला टेन्शन आले होते रायगडावर जायचे कसे?थांबायचे कुठे? याचे माझे नियोजन काहीच नव्हते तेवढ्यात एका मित्राचा मला फोन आला आणि मी त्याला सांगितले की माझ्याजवळचा नंबर घेऊन त्याला कॉल करून माझा नंबर सांग किंवा मला संपर्क साधा असे सांग पण त्याचाही फोन लागत नव्हता
माझा फेसबुक मित्र निलेश शिंदे राहाता जि नगर येथील त्याला संपर्क होत नव्हता आणि आम्ही अजूनही एकमेकांना समक्ष भेटलो नव्हतो कधीच फक्त फोन अन फेसबुकवरच आणि येथून पुढील सर्व नियोजन त्याच्याकडेच होते पण संपर्क होत नाही तर आता काय करायचे असा विचार मी करू लागलो
माझे जेवण आल्यावर मी जेवण करताना एकच विचार करत होतो की आता काय करायचे आणि जेवण करता करता मी माझा विचार पक्का केला व निलेशशिवाय माझे नियोजन केले अगदी उद्यपर्यंतचे तो रायगडावर कार्यक्रमात भेटेलच याची खात्री होती पण तो आपल्याला नाही भेटला तरी काय करावे लागेल असे नियोजन ठरवले जेवण संपत असताना तीन वाजले होते आणि मग मी माझ्या मनात एक गोष्ट स्पष्ट केली की आपण दिवस मावळेपर्यंत रायगडावर पोहोचणे तेथे इतर मित्र मंडळ आले असतील त्यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रमात सहभागी व्हावे याविचारातच महाड सोडले आणि "जयजयकार महाराष्ट्राचा" हा पोवाडा सुरु होता मोबाईलवर, अंगावर रोमांच उभे राहिले होते आणि तो 28 किमीचा प्रवास चुटकीसरशी संपला आणि मी पाचाडला आलो मातृतीर्थावर दर्शन घेऊन लगेच रायगडाकडे कूच केले मनात मात्र अनामिक भीती होतीच आता पुढे गेल्यावर काय? अशा प्रकारच्या विचारात असताना रायगडाच्या पायथ्याशी आलो अन नकळत मस्तक झुकले उंचच उंच बेलाग कडे असणाऱ्या बा रायगडाच्या पुढ्यात !!!!
आता गाडी कुठे पार्क करायची इथपासून सुरवात करायची होती आता डोकं थोडं जड झालं होतं गाडीच्या विचाराने कारण उद्यापर्यंत गाडी इथेच राहणार होती आणि मी मात्र गडावर ,एक ठिकाणी चौकशी केली पण तेथील मुलगा गाडीच्या पेट्रोलच्या बाबतीत खात्री देत नव्हता त्यामुळे मी रोपवेकडे चाललो होतो नुकत्याच रोपवेच्या ट्रॉल्या वर चालल्या होत्या अगदी डोक्यावरून मी मात्र गाडी पार्किंगच्याच विचारात होतो आणि अचानक एक आनंदाची गोष्ट घडली होती आणि तो म्हणजे माझा जिवलग निलेश शिंदे माझ्या समोर उभा होता त्याच्या गाडीवर लाडक्या भाच्यासमक्ष त्यावेळेला कोण आनंद झाला होता तो शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य माझ्या डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याने मला ओळखले नव्हते पण मी त्याला ओळखले होते त्यालाही खूप आनंद झाला होता मला भेटून दोघेजण भेटलो खूप कडकडून आणि आता मात्र मी पूर्णपणे निश्चिन्त झालो होतो दोन जिवलग मित्र बा रायगडासमक्ष पहिल्यांदा भेटत होते फेसबुकपासून चार पाच वर्षांपूर्वी सुरु झालेली मैत्री अशाप्रकारे समक्ष पर्यंत आली होती आणि मला तर खूप आनंद झाला होता आणि त्याचे कारणही तसेच होते आता उद्या सकाळीपर्यंत मला कसलेही टेन्शन राहणार नव्हते आणि झालेही तसेच!!!!
आम्ही रोपवेच्या पार्किंग मध्ये गाड्या पार्क केल्या आणि उशीर झालेला असल्याने रोपवे ने जायचे ठरवले मग चहापाणी केले थोड्या गप्पा मारल्या गप्पा संपल्या नव्हत्या पण वेळ मात्र पुढे जात होता आणि रोपवे ने गडावर जाण्यासाठी तयार झालो
रोपवे ने जात असताना खूप excite झालो होतो पण त्याचबरोबर निलेश शिंदे बद्दल माहिती देणे गरजेचे आहे असे वाटते
निलेश शिंदे हा राहाता जि नगर येथील असून तो व्यवसाय करतो तसेच 'प्रवास गडांचा' हा ब्लॉग चालवतो जेंव्हा "एक पहाट रायगडावर" उपक्रमाची सुरवात झाली तेंव्हापासून निलेश दरवर्षी येतो तीन चार वर्षांपासून आम्ही फेसबुक मित्र आहोत फोनवरून संपर्कात आहोत गेल्यावर्षी त्याने काही फोटो अपलोड केले अन आमची चर्चा झाली खरंतर मी गेल्यावर्षीच जाणार होतो रायगडावर पण अडचण आली आता मात्र अडचण येऊ नये म्हणून दोन दिवस आगोदरच निघालो होतो यावर्षी संपर्क करून निघालो होतो बाकी सर्व निलेश कडेच होते यापुढ सर्व सूत्रे निलेशच्या हाती देऊन मी निश्चिन्त झालो होतो निलेश वर्षातून दोनचार वेळेस रायगडी येतोच येतो आणि येतेवेळेस स्वराज्याचे निशाण, प्रतिक जरीपटका आणतो आणि राजदाराबारासमोरील उंच ध्वजस्तंभावर फडकवतो अगोदरचा जरीपटका फाटला असेल जीर्ण झाला असेल तर तो बदलतो शिवरायांचा निस्सीम भक्त स्वराज्याचा अभिमान अन रायगडाची उत्कट ओढ असणारा निलेश मला खूपच भावला होता छोट्या भावाप्रमाणे माझी काळजी घेत होता मला निलेश भेटल्यामुळे खूप आनंद झाला होता माझी सर्व काळजी मिटली होती निलेशबरोबर रोपवेने जात असताना त्याला फोटोग्राफीचीही आवड असल्याचे समजले
आणि 5-6 मिनिटात आम्ही रायगडावर पोहोचलो होतो रायगडावर मी तीनचार वेळेस आलो असलो तरी रायगड दरवेळी नित्यनवा भासतो आताही असेच भासत होते रोपवे ने वर वर जात असताना रायगडाच्या सरळसोट कड्याकडे पाहताना मनात खूप अभिमान वाटत होता रायगड बांधणाऱ्या हजारो ज्ञात अज्ञात हातांचा त्यांच्या समोर मनोमन नतमस्तक झालो अशातच सूर्य मावळतीकडे झुकला होता अन माझ्या मनात मात्र एक नवी पहाट झाली होती
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
मागील सर्व भागांच्या पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे सर्व फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा