*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस चौथा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग एकोणवीस*🌿🌿
🌅 *एक पहाट रायगडावर*🌅
साधारणपणे पहाटे तीन वाजता मला जाग आली होती सर्वांची लगबग सुरू झाली होती अगदी लगीनघाईसारखी आणि मी पण माझे नित्यकर्म आटोपून तयार झालो होतो निलेशच्या सांगण्यावरून प्रथम जगदीश्वर मंदिर शिरकाई मंदिर होळीचा माळ राजदरबार येथे दीपोत्सव आणि ध्वजारोहण असा कार्यक्रम होता
आम्ही आवरलं आणि सर्वांच्या पुढे जगदीश्वराच्या मंदिराकडे निघालो ते पंधरा मिनिटे म्हणजे एक अवर्णनीय अनुभव होता गडावर मंद पणे वाहत असणारा गार गार गडवारा आणि त्यावर गुलाबी थंडी आणि गप्पा मारत जाणारे आम्ही मित्र मी, निलेश, अन सागर सागर हा निलेशचा भाचा आहे. खूपच गोड छोकरा आहे तो, गप्पा कसल्या चर्चाच होती म्हणा ना निलेशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता मी मात्र नित्याचेच कपडे घातले होते निलेश सांगत होता की अगदी आपण आपल्या घरी आजच्या दिवशी म्हणजे दिवाळीला जसे कपडे परिधान करून साजरा करतो अगदी तसेच कपडे सर्वजण परिधान करतात काहीजण तर मावळ्यांसारखे शिवकालीन पोशाख करतात तर महिलाभगिनीही अगदी पारंपारिक पोशाख करतात अगदी इतिहासकालीन अन त्यामुळे वातावरण अगदी ऐतिहासिक होते मग मला वाटू लागलं की आपणही वेगळे कपडे आणायला हवे होते असा विचार करत असतानाच आम्ही मंदिरात प्रवेश केला वारा खूप वेगात सुटला होता त्यामुळे पणत्या राहत नव्हत्या आमच्या आगोदर काही मावळे आले होते मी मंदिराच्या दारात आलो की
"सेवेचे ठायी तत्पर,
हिरोजी इंदुलकर"
अशी लेख असलेली पायरी दिसली अन पंढरपुरातल्या नामदेव पायरीची आठवण झाली त्याचबरोबर महाराजांच्या राज्याभिषेकाची अन त्या पायरीच्या इतिहासाची आठवण झाली तो इतिहास तुम्हांला माहित असेलच पण मला सांगायची ईच्छा अनावर झाली आहे तो तुमच्याशी शेअर करतो
शिवाजी महाराजांचे बांधकाम तज्ञ हिरोजी इंदुलकर यांच्याकडे रायगड वसविण्याची जबाबदारी सोपविण्यात असली होती आणि त्यांनी ती आपले सर्वस्व पणाला लावून पेलली होती कितीतरी संकट आली तरी किल्ल्याचे बांधकाम थांबले नव्हते आणि कित्येक वर्षाच्या अथक परिश्रमातून एक अतिशय देखणा गड उभारला होता राज्याभिषेकावेळी राजांनी सर्वांना आपापल्या कर्तृत्वा प्रमाणे मान दिला इंदुलकरांनी किती कठीण प्रसंगातून रायगड उभारला होता हे राजांना माहित होते राजांनी त्यांना काय बक्षिसी द्यावी ते काय हवे ते मागा असे सांगितले घरावर तुळशीपत्र ठेऊन ज्यांनी राजधानीचा गड उभारला त्यांच्यासाठी राजांनी काय करावे असे इंदुलकराना विचारल्यावर हिरोजीनी राजांना सांगितले की मी आपण जगदीश्वराच्या मंदिरात आल्यावर मागीन आणि महाराज याच जगदीश्वराच्या मंदिरात आल्यावर त्यांनी हिरोजीना बोलावले तेंव्हा हिरीजीनी मागणे मागितले कि या मंदिराच्या पहिल्या पायरीवर नाव कोरायची परवानगी द्यावी राजांनाही नवल वाटले हिरोजी काहीही मागू शकले असते पण त्यानी किती साधी मागणी केली म्हणून राजांनी त्यांना कारण विचारले असता हिरोजीनी कारण सांगितले की महाराज गडावर असताना रोज जगदीश्वराच्या दर्शनाला येतील आणि त्यांच्या पायाची धूळ शिरावर पडावी हीच ईच्छा!!!
हा प्रसंग डोळ्यासमोरून सरकून गेला अन या पायरीवर माथा ठेऊन मंदिरात प्रवेश केला
मंदिरात फुलांची आरास केली होती पणत्या लावल्या होत्या रात्रीच काही मावळ्यांनी हे काम केले होते मंदिरात पणत्यांचा मंद प्रकाश पसरला होता शिवलिंगावर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची सजावट केली होती अशा रम्यकाळी जगादीश्वराचं दर्शन घेऊन मन अगदी प्रफुल्लित झाले होते मंदिराच्या गाभाऱ्यात खाली बसून डोळे बंद करून ध्यान करू लागलो होतो थोड्याच वेळात सर्व मावळे या मंदिरात जमा झाले होते आणि जगदिश्वराची पूजा आणि आरती आता थोड्याच वेळात होणार होती राजांच्या अनेक विश्वासू पराक्रमी असणाऱ्या सरदारांपैकी पाच सरदारांच्या वंशजांच्या शुभ हस्ते हा आजचा सर्व कार्यक्रम पार पडणार होता आणि लगोलग तेही मंदिरात आले शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर गणेश आरती विठ्ठलाची आरती आणि शंकराची आरती करण्यात आली लगेच मंदिराच्या समोरच असणाऱ्या महाराजांच्या समाधीची पूजा करण्यात आली आणि तदनंतर महाराजांची आरतीही करण्यात आली शिवरायांचा जयघोष करण्यात आला बाअदब बामुलाहीजा होशीयर………!
मशाली पेटवण्यात आल्या निलेशच्या आग्रहाखातर मी माझ्या हाती मशाल घेतली होती त्या मशालींची उजेडात अनेकजण फोटो काढत होते निलेशने माझेही फोटो काढले आणि सर्व मशाली पेटविल्यानंतर त्या प्रकाशात दोन दोनची ओळ करून मंदिरातून सर्वजण बाहेर पडलो प्रथम जरीपटका म्हणजे स्वराज्याचे निशाण हातात असणारे त्यांच्यामागे मशाली असणारे आणि मागे इतर सर्व जण आपापल्या परीने सहभागी झाले होते कुणी घोषणा देत होते तर कुणी गाणे म्हणत होते तर कुणी पोवाडा तर कुणी मंत्रमुग्ध होऊन चालत होते मनात अन शरीरात उत्साह संचारला होता ऐन दिवाळीत रायगडावर निघालेली हि गडफेरी एकदिवस संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असणाऱ्या किल्ल्यांवर प्रकाश पोहोचवणार हे नक्की
आयोजकांच्या सूचनेनुसार सर्वजण शिरकाई देवीच्या मंदिराकडे गेलो मंदिराच्या आवारात मशालजींनी कडे केले होते आणि सर्व महिलांनी देवीची आरती केली पहाटेच्या वाऱ्याचा जोर खूप होता पण मशाली मात्र त्या वाऱ्यावर न विझता फरफरत होत्या तेथून पुढे सर्वजण अगदी शिस्तीत होळीच्या माळावर आलो आणि राजांच्या पुतळ्याची पूजा करून आब्दगिर पुकारण्यात आली खडा आवाज असणारी मुलं मुली पुढे म्हणत होती आणि मागे इतर सर्व जण. 'अरे तुमचे आमचे नाते काय,जय जिजाऊ जय शिवराय' असे म्हणताना सर्वामध्ये असणारा एकोपा दिसून येत होता तेथून पुढे सर्वजण नगरखान्यातून राजदरबारात आलो राजसिंहासन असणाऱ्या चौथऱ्यावर कोणीही चपला बूट नेत नव्हते त्याबाबत आयोजक सूचना करत होते तेथे सगळीकडे रांगोळी काढली होती तसेच फुलांची आरास केली होती फुलांच्या माळा सोडल्या होत्या पणत्या लावल्या होत्या संपूर्ण परिसर फुलांनी आणि फुलांच्या माळांनी सजवला होता
मुख्य कार्यक्रम सुरू झाला होता आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला आणि मग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अमोल तावरे यांनी केले व आलेल्या पाहुण्यांची ओळख करून दिली व त्यांनी आपले विचार व्यक्त केले आलेल्या पाहुण्यांमध्ये माझी या आगोदर भेट झालेले कारी ता भोर जि पुणे येथील कान्होजी जेधे यांचे वंशज होते त्यांना समक्ष भेटून खूप आनंद झाला
राजदरबारापासून नगरखान्यापर्यंत असणाऱ्या फरसबंदीवर दुतर्फा मशाल हाती घेतलेले मावळे उभे राहिले होते बाकी सर्व जण खाली बसून ऐकत होते पूर्वेकडे उजळून आले होते आणि आता कोणत्याही क्षणी भास्कर दर्शन देणार होता ज्यांची मशाल विझेल ते आपापल्या जागी बसत होते
आज एका नवीन कार्यक्रमाची सुरुवात केली होती ती म्हणजे आपल्या परिसरात असणाऱ्या किल्ल्यावर आजपासून देवदिवाळीपर्यंत एक दिवस दीपोत्सव केला जाणार होता आपापल्या परीने आभार प्रदर्शन झाल्यावर सर्वांना विनंती करण्यात आली की सर्वांनी नगरखाण्याबाहेर असणाऱ्या ध्वजस्तंभाकडे यावे त्या ठिकाणी जाऊन माझा मित्र निलेशने आणलेल्या जरीपटक्याचे ध्वजारोहण होणार होते आणि सर्वजण ध्वजस्तंभाकडे आले मी निलेश आणि सागरने ध्वजस्तंभाच्या साखळीला जरीपटका बांधला आणि सर्वजण जमल्यावर साखळीला ध्वज बांधल्यावर आयोजकांच्या सूचनेनुसार जे मावळे यावर्षी पहिल्यांदा आले आहेत त्यांच्या हस्ते रोहण करण्यात आले त्यात मीही होतोच ध्वजाची साखळी ओढताना उर अभिमानाने भरून आला होता अन त्याचवेळी पूर्वेला सूर्य उगवला होता आणि त्याचा पहिल्या किरण बरोबर जरीपटकाही डौलाने फडकत होता सगळीकडे आनंदी आनंद झाला होता रायगडावरून सूर्योदय पाहण्याचे भाग्य लाभले होते आणि ते मी माझ्या दोन नेत्रांनी पीत होतो काय माहित परत अशी वेळ कधी येईल?
आता सकाळचा गारवा अंगाला झोंबू लागला होता पण माझ्याकडे गरम कपडे असल्याने त्याचा त्रास होत नव्हता पण जे बांधव गरम कपड्याशिवाय आले होते त्यांचे काय असा विचार करत असतानाच सर्वांसाठी चहापानाची सोय केली होती आणि थोड्याच वेळात चहापानही झाले होते सर्वांचे त्यामुळे तरतरी आली होती आणि सर्वजण सूर्योदय आपल्या कॅमेऱ्यात टिपत होते मीही त्याला अपवाद नव्हतो सगळीकडे अप्रतिम सौंदर्य दिसत होते मन प्रसन्न झाले होते माझ्या चार दिवस साच्या प्रवासाचा तो एक सुवर्ण क्षण होता आणि यापुढे मात्र मी सहकुटुंब येण्याचे पक्के केले आणि मला आठवले कि चार दिवसांपूर्वी मी एकट्याने निघताना माझ्या मुलाला समजवताना माझी पुरेवाट लागली होती मुलालाही फिरायची खूप आवड आहे हे आठवले कि खूप आनंद वाटतो राजदरबारात जुन्नरहून आलेले शिक्षक व त्यांचे सहकारी पोवाडे अभंग व शौर्यगीते यांचे गायन करत होते त्यामुळे सर्वांमध्ये एक ऊर्जा संचारत होती सव्वा सात वाजले होते आणि मी निलेशच्या मागे घाई करत होती की आपण लवकर रोपवेकडे जाऊयात कारण सर्वांना माहीत असावे म्हणून मी सांगतो की रोपवे रोज सकाळी लवकर आठ वाजता सुरु होतो व सायंकाळी सहा वाजता बंद होतो सर्वांच्या आगोदर आपण गेलो म्हणजे आपण लवकर उतरू आणि मग घरीही लवकर जाता येईल चार दिवस घरापासून दूर असल्याने घराची ओढ लागली होती सर्वजण आपापले साहित्य आणायला रेस्ट हाऊसला गेले होते आणि आम्ही तर सकाळीच ते सोबत घेऊन आलो होतो त्यामुळे साडे सात वाजता आम्ही रोपवेला नंबर लावला पहिलाच माझ्याबरोबर रोपवे पाहायला आलेला एक तरुण होता साताऱ्याचा तो पायी चालत गड चढून वर आला होता आणि आता पायीच उतरणार होता त्याला रोपवेचे कौतुक वाटत होते आणि मला त्याच्या डोळ्यात एक ईच्छा दिसली की त्याला रोपवे मध्ये बसावे वाटते पण पैसे नसल्याने ते जमत नसेल मला माझ्या पूर्वायुष्याची आठवण झाली होती माझीही अवस्था अशीच होती आयुष्याच्या एका वळणावर!, म्हणून मी त्याला म्हटले की आपण जाऊया रोपवेने मी तिकीट काढतो तुझे मात्र त्याने माझ्यासोबत अजून मित्र आहेत असे म्हणून विनम्रपणे नकार दिला
आठ वाजता रोपवे सुरु झाला होता आणि मग आम्ही परत फिरलो पहिल्याच फेरीत आम्ही येईन असे वाटले पण त्यांचे टेस्टिंग करायला 15 मिनिटे गेली आणि आमचा नंबर लागला सहा सात मिनिटात खाली उतरून आलो खूप छान वाटत होते निलेशही नगरहून येतो मोटारसायकलवरच तो पुण्याहून जाणार होता तर मी भोरहून आम्ही एका हॉटेलात चहा बिस्किटे घेतली आणि बॅगा गाडीला बांधल्या आता विनाथांबा 355 किमी अंतर पार करून जायचे होते त्यामुळे थोडी पोटपूजा करून एकमेकांची गळाभेट घेतली निलेशबरोबर त्याचा भाचाही होता ना खूपच गोड छोकरा आहे तोपण गळाभेट घेऊन निघालो घराच्या दिशेने तेंव्हा घड्याळात सव्वा नऊ वाजले होते कानात किशोरी आमोणकर यांच्या भक्तिगीताचे सूर घुमत होते
"अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग"
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
मागील सर्व भागांच्या पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे सर्व फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा